आज २७ एप्रिलला सुपर पिंक मून

  – प्रा सुरेश चोपणे       

     आज २७ एप्रिल रोजी अवकाशात एक विलोभनीय  घटना आपल्याला पहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल.ह्यावेळेस चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल . या सुपर मूनचे विशिष्ट म्हणजे पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६, २७, २८ एप्रिल असे  ३ दिवस चंद्र जवळ जवळ पूर्ण दिसेल. या तीन दिवसांत चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर ३,५८.६१५  किमी असेल .

       प्रत्येक वर्षी  सुपरमूनचे वेळेस चंद्र-पृथ्वी मधील अंतर कमी अधिक होत असते. हे कमीतकमी अंतर ३,५६,५००  किमी तर दूरचे अंतर ४,०६,७०० किमी असते .ह्या वर्षीचे पृथ्वी व चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर काल २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी होते. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेबर  २०१६ ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. यावर्षी २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हे देखील खूप कमी अंतराचे राहील.परंतु पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल तर ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून होणार आहे.खऱ्या अर्थाने २७ एप्रिल आणि २६ मे २०२१ हे दोन जुळे सुपरमून आहेत.दोन्ही वेळेसच्या चंद्र -पथ्वी अंतरात केवळ १५७ किमीचा फरक आहे.

       चंद्र जेव्हा जवळ येतो तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षानामुळे समुद्राला मोठी भरती येते.पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्व आहे.परंतु आपल्या सोबत सतत राहणारा,प्रेमाचे प्रतिक आणि धार्मिकदृष्ट्या  महत्वाचा मानला जाणारा चांदोबा हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे, भविष्यात हजारो वर्षाने चंद्र खूप दूर जाईल आणि पृथ्वीवर ग्रहणे होणार नाहीत. भरतीचे चक्र राहणार नाही.

       चंद्र स्वत:भोवती आणि पृथ्वीभोवती २७.३ दिवसात प्रदक्षिणा करतो मात्र चंद्राच्या लंबवर्तुळाकार प्रदक्षिणेमुळे पौर्णिमा ते पौर्णिमा हा महिना २९.५  दिवसाचा असतो. पाश्चात्य जगात या  पौर्णिमेला  पिंक मून म्हणून संबोधले असले तरी त्याचा रंगाशी काहीही सबंध नाही. ग्रास मून, एग मून,फिश मून आणि पाश्चल मून म्हणून हे ओळखले  जाते. भारतीय कॅलेंडरनुसार ही चैत्र पौर्णिमा असून या दिवशी हनुमान जयंती आहे,गौतम बुद्धाने याच दिवशी श्रीलंकेला भेट दिली होती त्यामुळे तिथे ह्या पौर्णिमेला ‘ बक पोसा’ असे म्हटले जाते.

        सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. पौर्णिमेला तो तूळ राशीत असेल ,सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिनीची आवश्यकता नाही परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहू  शकता . यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने  ह्या खगोलीय घटनेचा खूप आनंद घ्या.आपल्या घराच्या गच्चीतून वा अंगणातून या सुपर पिंक मूनचा नक्की आनंद घ्या.

(लेखक नामवंत खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आहेत)

9822364473

काल २६ तारखेचे भारतातील सुपर पिंक मूनचे विलोभनीय दर्शन . समोरील लिंकवर क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=sObjOLYnvdc

Previous articleअरुणा सबानेंचे ‘ते आठ दिवस’ : ग्रामीण वास्तवाचा एक छोटा एक्सरे !
Next articleनारायणराव दाभाडकरांचा मृत्यू
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.