राष्ट्रध्वजाबाबत माहीत असायलाच हव्यात अशा महत्वाच्या गोष्टी

-अ‍ॅड. अभिजीत उदय खोत

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ‘भारत गणराज्य’ हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला स्वतंत्र देश म्हणून जगाच्या पाठीवर उदयास आला. प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे प्रतिक हा त्या राष्ट्राचा ‘राष्ट्रध्वज’ असतो. असंख्य देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि अस्मितेचे प्रतिनिधीत्व करणारा राष्ट्रध्वज, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच महत्वाचे स्थान भूषवतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात अनेकदा बदल झालेत. समाजातील तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा राष्ट्रध्वजाच्या रचनेवर परिणाम होत गेला. अखेर २२ जुलै १९४७ रोजी आपला  सध्याचा प्रिय ‘तिरंगा’ अस्तित्वात आला. त्यापूर्वी अस्तित्वात आलेले राष्ट्रध्वजांचे डिझाईन पुढील प्रमाणे होते-

 

 

ज्यावेळी संविधानाच्या मसुद्यावर चर्चासत्रे सुरु होती तेव्हा राष्ट्रध्वजाच्या महत्वाची जाणीव Constituent Assembly च्या सभासदांना झाली. त्यावेळी स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज ‘डिझाईन’ करण्यासाठी एका तदर्थ समितीची स्थापना करण्यात आली ज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते व सदस्य म्हणून अब्दुल कलाम आझाद, के. एम. पणीकर, सरोजिनी नायडू, सी. राजगोपालाचारी, के. एम. मुंशी व डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा समावेश होता. सदरच्या समितीने या विषयावर सखोल अभ्यास करून त्यांचा अंतिम निर्णय दिला जो पुढील प्रमाणे होता.

(a) The flag of the Indian National Congress should be adopted as the National Flag of India with suitable modifications, to make it acceptable to all parties and communities in India.

(b) The flag should be tricoloured, with three bands horizontally arranged.

(c) The colours should be in the following order : saffron on top, white in the middle and dark green at the bottom.

(d) The emblem of the flag should be an exact reproduction of the wheel on the capital of Asoka’s Sarnath Pillar, superimposed in the middle of the central white band.

(e) The colour of the emblem should be dark blue.

स्वातंत्रोत्तर काळात संविधान लागू झाल्यावर देशाच्या राष्ट्रीय चिन्हांसाठी (ज्यामध्ये राष्ट्रध्वज, राजमुद्रा, राष्ट्रगीत व राष्ट्रीय बोध चिन्हांचा समावेश होतो) विशेष कायदे बनविण्यात आले ज्यामुळे राष्ट्रीय बोधचिन्हांचा वापर, मान-सन्मान, उपयोग-दुरुपयोग यांसारख्या बाबींवर अंकुश लावणे शक्य झाले. त्यानुसार ‘The Emblems and Names (Prevention of Improper Use) Act, 1950’ व ‘The Prevention of Insults to National Honour Act, 1971’ असे दोन कायदे अस्तित्वात आले. तसेच गरजेनुसार वेळोवेळी देशाच्या केंद्रीय गृहखात्याद्वारे देखील काही अधिसूचना, नियम, मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या त्यातीलच एक म्हणजे  ‘भारतीय ध्वज संहिता, २००२’ (Flag Code of India, 2002). सदरची संहिता हि तीन भागांमध्ये विभाजित केली गेली असून त्यातील भाग-१ हा राष्ट्रध्वजाच्या सामान्य वर्णनाबाबत आहे ज्यामध्ये राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी व आकार याबद्दल तपशील पुरविले आहेत. भाग-२ मध्ये सामान्य नागरिक, शैक्षणिक संस्था, खासगी संस्थांद्वारा केल्या जाणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाबद्दल नियमावली/मार्गदर्शिका देण्यात आलेली असून भाग-३ मध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, त्यांचे विभाग, संस्था व एजन्सी‌ज् द्वारा केल्या जाणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाबद्दल नियमावली/मार्गदर्शिका देण्यात आली आहे.

कालांतराने समजात अनेक बदल होत गेले व संविधानाने बहाल केलेल्या मुलभूत अधिकारांचे देखील महत्व सामान्य नागरिकांना उमजत गेले. वेगवेगळ्या माध्यमातून विस्तृत जनजागृती व्हायला लागली. अश्यातच संविधानाच्या कलम १९(१)(अ) अन्वये प्राप्त झालेल्या ‘भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या अधिकाराचा चांगलाच बोलबाला व्हायला लागला होता. याच काळात एका पब्लिक लिमिटेड कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक असलेले, उद्योजक नवीन जिंदाल यांच्यावर, त्यांनी त्यांच्या कारखान्याच्या आवारात राष्ट्रध्वज फडकवल्याबद्दल सरकारी यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली ज्यामध्ये २२ सप्टेबर १९९५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता नवीन जिंदाल यांच्या बाजूने निर्णय देऊन, सामान्य नागरिकांद्वारे राष्ट्रध्वजाचे त्यांचा संपूर्ण मान-सन्मान राखून प्रदर्शन करण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले. सरकारद्वारे या प्रकरणात अपील करून सदरचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले. या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने [युनियन ऑफ इंडिया वि. नवीन जिंदाल (AIR 2004 SC 1556) मध्ये] दिनांक २३ जानेवारी २००४ रोजी निर्णय देऊन देशाच्या इतिहासात स्वर्णिम अध्याय जोडला.

या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले कि संविधानाच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत ‘राष्ट्रध्वज फडकवणे’/ त्याचे प्रदर्शन करणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार असून एकाद्या कायद्याद्वारे त्यास वाजवी निर्बंध (Reasonable Restrictions) लावून नियंत्रित करता येऊ शकते पण असे निर्बंध हे वाजवी असणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे भारतीय ध्वज संहिता, २००२ ही फक्त ‘कार्यकारी सूचना’ (Executive Instructions) असून त्यास संविधानाच्या कलम १३ नुसार ‘कायदा’ म्हणता येणार नाही व त्याच प्रमाणे भारतीय ध्वज संहिता, २००२ नुसार नागरिकांद्वारे राष्ट्रध्वजाच्या वापरावरील काही निर्वंध अवाजवी असून जेथवर ते अवाजवी आहे तेथवर ते लागू नसतील, असे देखील स्पष्ट केले. पण महत्वाचे म्हणजे त्यामध्ये नमूद केलेले इतर सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे मत देखील न्यायालयाने यावेळी मांडले. तसेच या मुद्यावर जगातील विविध देशांमधील पद्धती, परिस्थिती, कायदे, नियम या सर्वांबाबतीत या निर्णयामध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार बहाल करणारा कुठलाही कायदा अस्तित्वात नसून वर सांगितल्याप्रमाणे “The Emblems and Names (Prevention of Improper Use) Act, 1950” व “The Prevention of Insults to National Honour Act, 1971” या दोन कायद्यांद्वारेच या विषयाचा ‘एकहाती’ कारभार सांभाळला जातो. त्यामुळे सध्याच्या काळात डिजिटलायझेशन, इंटरनेटचा वाढता वापर व सोबतच टेक्नो-सॅव्ही पिढी व त्यांची कल्पकता हे सर्व लक्षात घेता याबाबतीत परिपूर्ण असा कायदा असण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

व्यवहारिक (Commercial) प्रदर्शनासाठी केंद्र सरकारद्वारा निर्देशित केलेल्या प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. भारतीय ध्वजसंहिते मधील काही रोचक नियमांना जाणून घेणे व त्यांचे अवलोकन करणे नक्कीच हिताचे असेल. त्याबद्दलचा आढावा पुढील प्रमाणे:

 • गाड्यांवर (मोटार कारवर) राष्ट्रीय ध्वज लावण्याचा विशेषाधिकार हा खालील नमूद व्यक्तींपुरताच मर्यादित आहे:

 • राष्ट्रपती,

 • उपराष्ट्रपती,

 • पंतप्रधान, इतर कॅबिनेट मंत्री, केंद्रीय राज्य मंत्री,

 • राज्यपाल आणि लेफ्टनंट राज्यपाल (केद्र शासित प्रदेशांचे राज्यपाल),

 • राज्यसभेचे उपसभापती,

 • लोकसभाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष,

 • विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष,

 • विधान परिषदेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष,

 • मुख्यमंत्री, इतर कॅबिनेट मंत्री व राज्य मंत्री,

 • परदेशातील भारतीय मिशनचे प्रमुख,

 • आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे उच्च पदस्थ अधिकारी,

 • भारताचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश,

 • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश.

 • टेबलवर राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करतांना ध्वज नेहमी दर्शकाच्या डाव्या बाजूला असावा.

 • खाजगी इमारतींवर देखील सरकारी इमारतींप्रमाणे सर्व निकषांचे योग्य पालन करून राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतात.

 • दिवस आणि रात्री ध्वजारोहणाचे नियम – सूर्योदयापासून सूर्यास्तादरम्यान (irrespective of weather) ध्वज फडकला पाहिजे. रात्रीच्या वेळी ध्वज फडकवू नये.

 • झेंडा झुकविणे – कुठल्याही व्यक्तीच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज झुकवला जाऊ शकत नाही.

 • ध्वज चढविणे आणि उतरवणे – झेंडा फडकवतांना त्याला ‘स्पीड’ पाहिजे पण त्याउलट ध्वज उतरवतांना त्याची ‘स्पीड’ हळू असायला हवी व सोबत बिगुलाची धून देखील हवी.

 • परेडच्या वेळी ध्वज धारक नेहमी परेडच्या केंद्रस्थानी असावा.

 • झेंडा फडकवतांनाचा घटना क्रम पुढील प्रमाणे असायला हवा:

१. दक्ष (सावधान) स्थितीत उभे राहणे,

 1. ध्वजारोहण,

३. ‌सॅल्युट करणे (सलामी देणे),

४. राष्ट्रगीत,

५. परेड.

 • ध्वजावर काही लिहू नये.

 • ध्वजाचा जमिनीला आणि पाण्याला स्पर्श होऊ देऊ नये.

 • ध्वजाचा टेबल कव्हर किंवा टेबल क्लॉथ म्हणून वापरू नये.

 • राष्ट्रीय कार्यक्रमानंतर ध्वज फेकू नये.

 • ध्वजामध्ये फुलांच्या पाकळ्या वगळता काहीही ठेऊ नये.

 • एखाद्या पुतळ्याचे अनावरण करतांना ध्वजाचा पुतळ्यावरील कव्हर म्हणून वापरू नये.

 • राष्ट्रध्वजाचा ड्रेस म्हणून वापरू नये.

 • ध्वज उलटा प्रदर्शित करू नये.

 • सशस्त्र दलाचे मेंबर्स किंवा शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यसंस्कारांशिवाय इतर अंत्यसंस्कारांसाठी झेंड्याचा वापर करणे प्रतिबंधित आहे.

 • राष्ट्रगीत किंवा ध्वजारोहण समारंभादरम्यान गोंधळ निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

 • जीर्ण/जुना झालेला झेंड्याची खाजगीमध्ये सन्मानपूर्वक विल्हेवाट लावावी.

The Prevention of Insults to National Honour Act, 1971 या कायद्यान्वये राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हा गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्हीही प्रकारच्या शिक्षांची तरतूद आहे.

 अशाप्रकारे असंख्य देशवासीयांच्या भावनेचे, देशप्रेमाचे, त्यागाचे, बलिदानाचे, गौरवाचे, अभिमानाचे प्रतिक असलेल्या व देशातील अनेक राजकीय, सांप्रदायिक ध्वजांपेक्षा ‘ ‘सर्वोच्च’ ’ असलेल्या व आपल्या सर्वांना जात-पात, पंथ व धर्म या पलीकडे नेऊन ‘भारतीय’ म्हणून ओळख देणाऱ्या राष्ट्रध्वजाबद्दल व त्याच्या वापराबद्दल माहिती असणे, ही सर्व सुज्ञ नागरिकांची जबाबदारी आहे. राष्ट्रध्वजाबद्दलची जवळीकता ही फक्त राष्ट्रीय सण किंवा भारत-पाकिस्तान क्रिकेट ‌मॅचपुरती मर्यादित न राहता झेंड्याचा अभिमान सदैव मनात तेवत राहायला हवा .२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘झेंडा’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जर एखाद्याला “कोणता झेंडा घेऊ हाती?” असा प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर नक्कीच ‘राष्ट्रध्वज’ असेच असायला हवे.

सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जय हिंद! जय भारत!

(लेखक नव्या पिढीतील अभ्यासू वकील आहेत)

86000 60665

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी:

https://www.indiacode.nic.in/bitstream/123456789/1578/3/A1971-69.pdf#search=embalm

Previous articleनरेन्द्र मोदी कळीच्या मुद्द्यांवर का बोलत नाही ?
Next articleबस ज़रा सा दिल टूटा है, और तो कोई बात नहीं..!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.