‘दास बूट’-पाणबुडीचं जग दाखविणारा भन्नाट युद्ध चित्रपट

-अमित जोशी

Das Boot -पाणबुडीवर आधारित युद्ध चित्रपटांपैकी एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अशी या चित्रपटाची ओळख आहे.

अनेकदा होतं काय की युद्ध चित्रपट हे अमेरिका किंवा इंग्लंड वगैरे या दुसऱ्या महायुद्धातील ‘जेत्या’ राष्ट्रातील निर्माते – दिग्दर्शकांनी बनवलेले असतात.  ते चित्रपट चांगले असले तरी त्यामध्ये काहीसा एकसुरीपणा  किंवा ठराविक पद्धतीने चित्रपटांची मांडणी केलीअसते. ज्यात जर्मन – जपान किंवा सध्याच्या काळांत अरब देशांना जोरदार टार्गेट केलं जातं. या देशातील माणसं कसे निष्ठूर आहेत, वगैरे दाखवलं जातं.

‘दास बूट’ हा जर्मन चित्रपट आहे. हाही चित्रपट दुसऱ्या महायुध्दाशी संबंधित आहे. पण या चित्रपटाच्या निमित्ताने जर्मनीचा युध्दाबद्दलचा दृष्टीकोन काय होता, हे समोर आलं आलं आहे. पण जगभर या  चित्रपटाचे प्रचंड कौतुक झालं. प्रशंसा झाली.

अशा चित्रपटात असतो तो  देशभक्ती, देशप्रेमाचा मसाला आणि शूर अधिकाऱ्यांच्या, सैनिकांच्या भावनांचा चढउतार चित्रपटात दाखविण्यात आला आहे, पण यात कुठेही अतिरंजितपणा दिसला नाही.

दास बुट या चित्रपटाची कथा एकदम सुटसुटीत आहे. जर्मनीच्या U – 96 या पाणबुडीला तेव्हा ताब्यात असलेल्या फ्रान्सच्या तळावरून अटलांटिक महासागरात गस्त घालण्याच्या एका मोहिमेसाठी जाण्याच्या सूचना मिळतात. ही गस्त पूर्ण झाल्यावर इटलीच्या किनाऱ्यावरील नौदल तळावर reporting करायचे असते.

 ही पाणबुडी पहिल्या मोहिमेला निघते.वातावरण खराब असतांनाही  शत्रूपक्षाच्या एका ताफ्याला चकवा देत दोन युद्धनौकांचा ही पाणबुडी यशस्वीरित्या वेध घेते. त्यांना डुबविते.

मात्र दुसर्या मोहिमेत शत्रुपक्षाची युद्धनौका हल्ला करते. यामुळे या पाणबुडीला काही संकटांना सामोरं जावं लागतं,  पाणबुडीच्या काही यंत्रणा बंद पडतात, त्याच्यामुळे ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी जाऊन स्थिरावते. शेवटी कशीबशी पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी होते. त्यानंतर  फ्रान्सच्या तळावर सुखरूप परत येते. मात्र या तळावर आल्यावर त्याठिकाणी शत्रूपक्षाची विमाने बॉम्बहल्ला करतात आणि तो तळ हा अर्ध्यापेक्षा जास्त नष्ट करतात.

यामध्ये पाणबुडीतील अनेक नौसैनिक अधिकारी जखमी होतात, मरतात. पाणबुडीचा कॅप्टन हा सुद्धा जबर जखमी होतो. तळावरच तो पाणबुडी बुडतांना बघतो आणि प्राण सोडतो. चित्रपट संपतो.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे पाणबुडीचं युद्धकालीन जग नेमकं कसं असतं, हे यात अतिशय सुंदरपणे मांडण्यात आलं आहे.

दुसऱ्या महायुद्धातील पाणबुड्या आणि आताच्या पाणबुड्या यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. अगदी छोटी काही उदाहरण देतो.  सोनार हे पाणबुडीचे कान आणि डोळे असतात. दुसऱ्या महायुद्धात सोनार हे तंत्रज्ञान नुकतच कुठे विकसित व्हायला सुरुवात झाली होती. पाणबुडीमध्ये सोनार यंत्रणा त्याकाळी अजून बसवायची सुद्धा होती. तर युद्धनौकामध्ये सोनार यंत्रणा नुकतीच कुठे बसवायला सुरुवात झाली होती. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्यांची कामगिरी ही अत्यंत आव्हानात्मक अशी होती. शत्रुपक्षाची युद्धनौका आहे की आपल्या देशाची हे ओळखण्यासाठी पाणबुडीला पूर्णपणे पेरिस्कोपवर अवलंबून राहावे लागत असे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणबुडीमध्ये एक महत्त्वपूर्ण यंत्रणा असते ती म्हणजे वातानुकुलित यंत्रणा आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देणारी यंत्रणा. आताच्या तुलनेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पाणबुडीमध्ये या दोन्ही यंत्रणा प्राथमिक पातळीवर होत्या. त्यामुळे पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. पाणबुड्यांचा आकारही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काहीसा मर्यादित होता. त्यामुळे अनेक गोष्टींचे काटेकोरपणे नियोजन पाणबुडीमध्ये करावं लागायचं. उदाहरणार्थ अन्नसाठा करून ठेवण्याची त्यावेळची पद्धत ही अत्यंत डोकेखाऊ होती. दास बुट मध्ये या सर्व गोष्टी अत्यंत रंजक पद्धतीने दाखवण्यात आलेल्या आहेत.

आत्ता काय किंवा तेव्हा काय…..पाणबुडीमध्ये आंघोळ ही एक अत्यंत चैनीची गोष्ट होती. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पाणबुड्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता ही एक अत्यंत भयानक गोष्ट होती. विशेषतः अत्यंत मर्यादित जागेत टॉयलेट. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत विनोदी पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.

पाणबुडीमध्ये राहणे, अत्यंत तणावाच्या काळांत इतर नोसैनिक अधिकाऱ्यांचे वागणे, शत्रुपक्षाच्या युद्धनौकांनी हल्ला केल्यावर बदलला जाणार स्वभाव – मानसिकता, हल्ला होत असल्यामुळे उडालेली तारांबळ – भीती, अशा परिस्थितीतही लढण्याची वृत्ती,जिद्द याचे सुंदर चित्रण या चित्रपटात बघायला मिळतं.

विशेष म्हणजे या चित्रपटात एक पत्रकार वार्तांकन करण्यासाठी या पाणबुडीच्या मोहिमेत सहभागी झालेला असतो. एका नागरिकांसमोर सैनिकांचे वागणे हे सुद्धा अत्यंत रोचक पद्धतीचा बघायला मिळतं.

चित्रपटातील कलाकार कुठेही ॲक्टिंग करत आहेत, असं वाटतं नाहीत, तुमच्या आमच्यासारखे सहजपणे वावरत आहेत, असंच वाटत राहतं.

 हा संपूर्ण चित्रपट बघताना जणू आपणच पाणबुडीतून प्रवास करत आहोत, शत्रुपक्षाचा हल्ला सहन करत आहोत, असंच शेवटपर्यंत वाटत राहतं. शेवटच्या टप्प्यात पाणबुडीची यशस्वी सुटका झाल्यामुळे आपल्यालाही आनंद झाल्यावाचून रहात नाही. चित्रपटाच्या शेवटी बुडणारी पाणबुडी आणि कॅप्टन, नौसैनिकांचा मृत्यू बघून आपल्यालाही दुःख झाल्याशिवाय वाटत नाही. यातच या चित्रपटाचं यश सामावलेलं आहे.

भाषा जर्मन असली तरी चित्रपट बघताना एक क्षणही भाषेची अडचण भासणार नाही इतका हा १४९ मिनिटांचा सहज आकलन होणारा चित्रपट आहे. दुसऱ्या महायुद्धानतील अनेक घटनांचे तुकडे एकत्र करत हा चित्रपट साकारला आहे.

चला तर.. ‘पाणबुडी’ विषयातील  हा सर्वोत्कृष्ट चित्रपट बघायला अजिबात विसरू नका.

( लेखक झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Das Boot चा ट्रेलर

Previous articleलशीचा जुमला, चमत्काराचा मामला…कोरोनाच्या नावानं मोठ्यांनं बोंबला
Next articleउपेक्षित प्रतिभेचे ‘टिकटॉक’ पुराण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.