नशा आणणाऱ्या ‘कैफी’ गीतांचा इतिहास

१४ जानेवारी १९१९ रोजी आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच ते जगातली दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाले, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून त्यांनी शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत त्यांची गाणी अग्रेसर असत, ते स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसत. युवावस्थेत असताना कम्युनिस्ट पार्टीच्या ‘कौमी जंग’ला ते निनावी कविता पाठवीत असत. सारे कम्युनिस्ट हैराण होते की, या कविता सुंदर आहेत पण कवी कोण? एका मुशायर्या‘त अली सरदार जफरींना त्या ‘निनावी’ कवितांचा धनी अतहरच असल्याचा शोध लागला. त्यांनी अतहर यांना मुंबईचे निमंत्रण दिले. ‘ये दुनिया, ये मेहफिल मेरे काम की नही’ म्हणत त्यांनी गाव सोडले आणि अनेक कविसंमेलनांत त्यांना बोलावणे येऊ लागले.

शायरीनिमित्ताने हैदराबादला गेलेलं असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते ’ असंच काहीसं झालं. ते जिच्या प्रेमात पडले ती मुलगी उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत होय. क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडीलांसोबत औरंगाबादहून मुंबईत येऊन प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीनी शौकतजींना विचारले, ‘‘तुला हा विवाह कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परीस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. गावी गेले. तेथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला.

शौकत यांनी ‘इप्टा’त कामे करून कैफींना मजबूत साथ दिली. कैफी आझमींचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या दिग्गजासोबत त्यांनी काम केले. शौकत यांचे अभिनय गुण शबाना व बाबात उतरले. कैफींची गरिबांसाठीची धडपड शबानात उतरली. एकदा शबाना आझमी यांना त्यांच्या एका चित्रपटाच्या शोसाठी कान चित्रपट महोत्सवात जायचे होते. जाण्यापूर्वी त्यांना कळले की मुंबईत कुठेतरी झोपड्या पाडल्या जात आहेत. तेव्हा शबाना यांनी कान महोत्सवाला जाणे रद्द करून झोपड्या वाचवण्यासाठी उपोषण सुरू केले. रणरणत्या उन्हात जमिनीवर बसून उपोषण करणा-या शबानांचा रक्तदाब वाढला. सर्व नातेवाईक चिंतेत पडले. कैफी आझमी बाहेरगावी गेलेले होते. लोकांना वाटले की त्यांना सांगितले तर कदाचित या जिद्दी मुलीला ते समजावून सांगू शकतील. कैफी आझमी एक मोठे कवी होते, आपल्या मुलीवर त्यांचे आत्यंतिक प्रेम होते आणि शबानाचे सर्वात चांगले मित्र होते; पण कैफी आझमी एक कम्युनिस्टही होते. त्यांची तार आली. त्यात लिहिले होते- ‘बेस्ट ऑफ लक कॉम्रेड’.

कैफींना मिळालेले चित्रपट पडत होते. त्या दरम्यान चेतन आनंद त्यांच्याकडे ‘हकीकत’ची कथा घेऊन गेले, तेव्हा कैफींनी साफ नकार दिला. पण आनंद म्हणाले, ‘‘तुम्ही चित्रपटाला ‘अनलकी’ आहात असे सारे म्हणतात आणि मलाही यश नाही. तेव्हा असे करू या दोघे ‘अनलकी’एकत्र येऊ या.’’ हकीकतने इतिहास घडविला. तो पहिला युद्धपट होता. मग आलेल्या ‘हिर रांझा’सारख्या चित्रपटात कैफींनी सगळे संवाद पद्यात लिहिले. तो विक्रम झाला. ‘कागज के फूल’पासून बरेच चित्रपट मिळू लागले. ‘गर्म हवा’ चित्रपटाबद्दल उत्कृष्ट संवाद, कथा, पटकथा असे तिन्ही राष्ट्रीय पुरस्कार कैफींना मिळाले. तोपर्यंत झंकार, आखिरे-शब, आवारा सज्दे हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाले होतेच. नंतर चित्रपटगीतांचा ‘मेरी आवाज सुनो’ हा संग्रहही आला.

शबानांच्या जन्मानंतर कैफी आजमी यांच्या पत्नी शौकत आजमी यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाची नोकरी केली. पृथ्वीराज कपूर यांनी रिहर्सलच्या वेळी शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली. शबानांचे बालपण थिएटरच्या परिवारात गेल्याने त्या निष्णात अभिनेत्री होणे निश्चित होते. एकदा शौकत पृथ्वी थिएटरसोबत टूरवर जात होत्या आणि त्यांनी कैफी साहेबांना काही पैशांच्या बंदोबस्ताची विनंती केली. रेल्वे चालू झाल्यावर कैफी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले. ही त्या काळात मोठी रक्कम होती. शौकत आश्चर्यचकित होत्या की, एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परतल्यानंतर त्यांना कळाले की, कैफींनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतच्या पगाराची आधीच उचल केली होती. कैफींनी पैसे कोठून आणले हे सांगताच शौकतजींच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. मात्र त्याच वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा निमिषार्धासाठी पाणावल्या सारख्या वाटल्या. पुढच्याच क्षणाला ते दोघेही हास्यविनोदात दंग झाले. त्या दोघांनी आयुष्यभर आर्थिक अडचणी हसत खेळत झेलल्या. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक नज्म लिहिली. हीच नज्म आपली लेक शबाना आजमीच्या ‘अर्थ’चित्रपटासाठी त्यांनी मोठ्या प्रेमाने देऊ केली. हे गीत होते, ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो…’
आपल्या पत्नीचेच पैसे उचल घेऊन तेच तिला हातखर्चासाठी दिल्याच्या त्या घटने दिवशी कैफीं आजमींना आपली प्रिय पत्नी शौकत हीच्या काळजातलं ते दुःख दिसलं असावं जे डोळ्यांच्या कडांवरून हलकेच विरून ओठावरील स्मितात विलसलं असावं. त्या भावना त्यांनी हळुवारपणे शब्दबद्ध केल्या !

शबाना चित्रपटात चमकू लागली तेंव्हा आपण तिला विशेष काही देऊ न शकल्याचे शल्य कैफींना होते. शबानाच्या एका वाढदिवशी त्यांनी तशी कविताही लिहिली होती.
अब और क्या तेरा बिमार बाप देगा तुझे?
बस एक दुआ कि खुदा तुझको कामयाब करे
वो टाक दे तेरे आँचल मे चाँद और तारे
तू अपने वास्ते जिस को भी इन्तेखाब करे’….
खुदाने ही दुआ ऐकली. शबानाच काय तिने ज्याला इन्तेखाब (पसंद) केले त्याच्याही (जावेद अख्तर) झोळीत देवाने तारेच तारे टाकले. जावेद साहेबांनीही आपल्या सासर्‍याबद्दल एक कविता लिहिलेली –
‘अजीब मर्द था वो..
मुहब्बतों का गीत था, बगावतों का राग था,
कभी वो फूल था, कभी वो सिर्फ आग था’…

१० मे २००२ ला कैफी सर्वांना सोडून गेले. ‘मेरी आवाज सुनो’ सांगत गेले… या देशासाठी जानोतन फिदा करीत गेले. आपल्यासारखे चाहते फक्त ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ म्हणत राहिले.
कैफी म्हणाले होते –
गुर्बत की ठंडी छावों में याद आयी उसकी धूप
कद्रे-वतन हुई हमे तर्के-वतन के बाद
इन्साँ की ख्वाहिशों की कोई इम्तहाँ नही
दो गज जमीन चाहिए दो गज कफन के बाद..’
(परदेशात गेल्यावर देशाची किंमत कळते. तिथल्या शीतल छायेत देशातील प्रिय उन्हाची आठवण येते. माणसाच्या इच्छांची काही सीमा नाही. त्याला दोन मीटर कफनाचा कपडा दिला तरी तो दोन फूट जागा पुरण्यासाठी मागतो.)

कालच कैफींचा जन्मदिवस होता तेंव्हा त्यांनी लिहीलेली गाणी फेर धरून समोर उभी राहिली, आता डोक्यातून ती लवकर जाणार नाहीत आणि समजा गेलीच तर काही सुप्त इच्छा जागृत करून जातील…आपल्याही इच्छा काही कमी नाहीत. चांगली माणसं कितीही जगली तरी वाटतं, अजून काही दिवस ते हवे होते….

माणसाचे जगण्याचे अनुभव जितके टोकदार असतात तितकी त्याची लेखणी प्रतिभाशाली असते !

https://sameerbapu.blogspot.com/2018/05/blog-post_30.html

संदर्भ –
अर्ज किया है – कैफी आझमी
कैफी आझमी – प्रदीप निफाडकर

नोंद – ‘अर्थ’ चित्रपटामधील गीताबद्दल आपलं महानगर दैनिकात प्रकाशित झालेल्या एका लेखातली माहिती अशी – कैफी आजमी टाटा हॉस्पिटलमध्ये कुणालातरी भेटायला गेले होते तेव्हा कॅन्सरग्रस्त नवरा आणि त्याची पत्नी यांच्या हसतखेळत वागण्यावरून त्यांना या गाण्याची ओळ सुचली होती.

Previous articleसॉक्रेटीसः पहिला सत्याग्रही
Next articleसाहित्य पंढरीचा विठ्ठल- लोककवी विठ्ठल वाघ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here