भाजपमध्येच नाहीतर अन्य सर्वच पक्षांत साधारणपणे ज्येष्ठ नेत्यांना सांभाळून घेण्याची कसरत प्रत्येकचं मुख्यमंत्र्याला करावी लागते . राज्याचं मुख्यमंत्रीपद एकच असतं आणि इच्छुक अनेक असतात , हा राजकारणात येणारा नेहमीचाच अनुभव आहे . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नाथाभाऊ यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं . अघोषित असं दुस-या क्रमांकाचं स्थानही त्यांना देण्यात आलं . मात्र , ते स्थान सांभाळण्याचं राजकीय कौशल्य मात्र नाथाभाऊंना दाखवता नाही आलं , हे लक्षात घेतलं पाहिजे . मुख्यमंत्री हे पद सन्मानाचं असतं , घटनात्मक असतं आणि त्या पदावर बसणारी व्यक्ती कुणीही असो तिचा तो सन्मान राखला जाणं अतिशय आवश्यक असतं ; परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा नंतरही जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा अनेकदा एकेरी उल्लेख करुन नाथाभाऊंनी भाजप आणि प्रशासनातल्याही अनेक वरिष्ठांची नाराजी ओढावून घेतली होती . दुसरा एक भाग असा आहे की , नाराजी किंवा खदखद किंवा असंतोष लपवून राजकीय खेळ करत जाणं हे मुरब्बी राजकारण्याचं लक्षण असतं . हे गुण एकनाथ खडसेंमध्ये नाहीत , हे ते महसूल मंत्री झाल्यानंतर अनेकदा सिद्ध झालं . ‘पांडुरंगाची इच्छा होती की मी मुख्यमंत्री व्हावं’ , ‘महाराष्ट्राची इच्छा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा’ अशी होती’ अशी वक्तव्ये त्यांनी अनेकदा केली . राजकारण कधीच एका सरळ रेषेत जात नसतं . तिथे शह/काटशह ,डाव/प्रतिडाव असतात . कधी उघडपणे तर कधी शांतपणे प्रतिस्पर्ध्याला चिरडून टाकण्याची ती एक प्रदीर्घ आणि संयमी प्रक्रिया असते . एखाद्या तेल लावलेल्या पैलवानं सगळीकडून अलगद सुटत ईप्सित साध्य करणारा यशस्वी राजकरणी ठरतो ( पक्षी : शरद पवार ! ) .
(महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून एकनाथ खडसे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची सुतराम शक्यता नाही , याचं कारण (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदाचे अनेक प्रबळ दावेदार सध्याच आहेत . आता त्यात नंबर एकवर अजित पवार राहतात का सुप्रिया सुळे हे भविष्यात दिसेलच . त्यामुळे (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांनी आत्मघातच केला आहे , असं म्हणावं लागेल . भाजपाच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात (महा)राष्ट्रवादी काँग्रेसला जे जे काही बोलता येत नाही ते ‘आतलं’ बोलण्यासाठी एक ‘पोपट’ आता (महा)राष्ट्रवादीला गावलेला आहे . भाजप व देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात एकनाथ खडसे जी काही टीका करतील त्याचा फायदा उठवण्याचा (महा)राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल . खडसे यांना पक्षात प्रवेश देण्यामागे (महा)राष्ट्रवादीचा तोही एक एक राजकीय कावा असणारच आणि तो असायलाच हवा आणि त्यात गैर कांहीच नाही कारण तो राजकारणाचा स्थायी भावच असतो .