नानाच्या निमित्ताने नवीन सुरुवात करूया!

रूपेरी पडद्यावरील नायक प्रत्यक्षात क्वचितच नायकासारखे वागतात. चेहर्‍याची रंगरंगोटी करून कॅमेर्‍यासमोर वेगवेगळे भावाविष्कार साकारणार्‍या कलाकारांना खर्‍या आयुष्यातील माणसांची दु:ख भिडताहेत आणि त्यामुळे त्यांच्या हातून काही आश्‍वासक कृती घडते आहे, असंही अभावानेच आढळते. रूपेरी पडद्यावरच्या तारे-तारकांचं एक वेगळंच स्वतंत्र बेट असतं. भले त्यांचं ते जग कचकड्याचं असो, पण ते त्यातच रमलेले असतात. सामान्य माणसांच्या जगात काय घडतेय याची त्यांना खबरबातही नसते आणि असली तर काही देणे-घेणे नसते. काही कलाकार मात्र याला अपवाद आहेत. आपण ‘स्टार’ असलो तरी ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजासोबत आपली काही बांधिलकी आहे, असं ते मानतात. नाना पाटेकर हा त्यापैकी एक. आनंदवनासहित वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांची मदत करणारा नाना परवा नागपुरात होता. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांना दिलासा देण्यासाठी मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांकडून जमा केलेले १५ लाख रुपये घेऊन तो आणि मकरंद अनासपुरे आला होता. यावेळी दोघेही अगदी मनापासून बोललेत. नाना म्हणाला, ‘या वीस-पंचविशीतील तरुण मुलींचे पांढरे फटफटीत चेहरे पाहून मला बोलवत नाही. हे चेहरे आता सतत डोळ्यासमोर येतील. जावयाने आत्महत्या केल्यानंतर माझी मुलगी विधवा होऊन घरी आली असती, तर तिचं फटफटीत कपाळ बघून माझं काय झालं असतं.. कल्पनाही करवत नाही. ही याNana मुलींची दु:खं कल्पनेपलीकडची आहेत. एरवी माझा कंठ दाटून येत नाही, पण हे दु:ख वेगळंच आहे. मला स्वत:चीच लाज वाटते. एवढी वर्ष या विषयाकडे माझे दुर्लक्ष का झाले, माझे मलाच कळत नाही.’ मकरंद अनासपुरेही पोटतिडकीने बोलला. ‘विदर्भातील शेतकर्‍यांची अवस्था पाहिली की माझे मलाच अपराधी वाटते. सारेच बोलण्यापलीकडचे आहे. काय बोलायचे कळत नाही. शहरात १५ हजारांचा बूट, पाच हजारांचा शर्ट घेणारी लोकं आहेत. शेतकर्‍यांना मात्र हेक्टरी १,५०० रुपये मदत केली जाते. हे सगळं चित्र पाहिलं की प्रचंड अपराधी वाटतं. त्या भावनेतूनच अपराध फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही दिलेली मदत म्हणजे आभाळ फाटलं असताना ठिगळ लावण्याचा प्रकार आहे याची कल्पना आहे. मात्र आता हे प्रयत्न निरंतर चालणार. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवा, त्यांचं कुटुंब आता एकटे असणार नाहीत. आम्ही आता त्यांच्यासोबत असणार आहे. आतापर्यंत खूप नुकसान झालं आहे. ते भरून काढणं शक्य नाही, पण यापुढे ते होणार नाही यासाठी प्रय▪करणं आपल्या हाती आहे,’ असे मकरंद म्हणाला. नागपुरातील ‘जनमंच’ ही संस्था, तिचे अध्यक्ष अँड़ अनिल किलोर, संपादक व लेखक श्याम पेठकर, प्रख्यात नाट्यकर्मी हरीश इथापे, शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून झालेल्या या कार्यक्रमामुळे खूप दिवसानंतर शेतकर्‍यांच्या दु:खाची भीषणता ठसठशीतपणे महाराष्ट्रासमोर आली.अलीकडे नेत्यांपासून माध्यमांपर्यंत सर्वांसाठी ‘रुटीन’ झालेला शेतकरी आत्महत्येचा विषय यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला. नाना आणि मकरंदच्या ‘स्टार’पणामुळे का होईना पांढरपेशांची निगरगट्ट कातडी थोडी थरथरली. चंगळवादामुळे संवेदनशीलतेवर निबरपणाची पुट चढलेल्या माणसांना नानाप्रमाणेच ‘एवढी वर्ष शेतकरी किड्यामुंग्यासारखा मरतो आहे आणि मी स्वस्थ बसलो आहे. मला काहीच कसं वाटत नाही,’ हा प्रश्नही यानिमित्ताने पडला. ‘जनमंच’च्या कार्यक्रमाची ही उपलब्धी आहे. विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या १९९४ मध्ये नोंदली गेली. तेव्हापासून ५० हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सरासरी काढली तर रोज दहा शेतकरी स्वत:ला संपवितात. एखाद्या दुष्काळात, रोगराईत, दंगलीत किंवा अगदी युद्धातही एवढी माणसं मरत नाही. या आत्महत्यांकडे तटस्थपणे पाहणार्‍या सर्वांना आपल्या माणूसपणाची लाज वाटावी, एवढं हे सगळं भयानक आहे. शेतीच्या विषयात उदासीन असलेल्या येथील व्यवस्थेमुळे अव्याहत सुरु असलेल्या या आत्महत्या म्हणजे एक प्रकारचं मूक हत्याकांडच आहे. गेले २१ वर्ष विदर्भाच्या-महाराष्ट्राच्या उरावरची ही ठसठसती जखम आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद आता आलेत, पण शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू झाल्यापासून या विषयात तळमळीने, तडफेने काम करणारे खूप लोक आहेत. नामवंत शेतकरी आंदोलक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी हजारो आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी भेट देऊन शेतकरी आत्महत्येमागचं वास्तव जाणून घेतलं. विदर्भाच्या कानाकोपर्‍यात आणि महाराष्ट्रातही जिथे संधी मिळेल तिथे विदर्भाच्या शेतीची आणि शेतकर्‍यांची दैन्यावस्था का झाली, हे वानखडे बेंबीच्या देठापासून सांगतात. ‘एका साध्या सत्यासाठी..’ या पुस्तकात त्यांनी शेतकरी आत्महत्येमागची नेमकी कारणमीमांसा केली आहे.संजीव रासपायले यांनी हे पुस्तक इंग्रजीत अनुवादित केल्यानंतर पी. साईनाथसारखा देशातला अग्रणी पत्रकार हा विषय समजून घ्यायला विदर्भात आला. नंतर त्यांच्याच प्रयत्नाने २००६ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. हा विषय अतिशय परिणामकारकपणे महाराष्ट्राला समजावून सांगण्यात चंद्रकांत वानखडे यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांचंही योगदान मोठं आहे. १९९४ पासूनच्या प्रत्येक आत्महत्येची नोंद त्यांच्याकडे आहे. माध्यमं आणि प्रशासनाकडे हा विषय सातत्याने लावून धरण्याच्या त्यांच्या चिकाटीने जगभरातील पत्रकार व दिल्लीपासून मुंबईपर्यंत शेकडो शासकीय अधिकार्‍यांना विदर्भाच्या खेडोपाडी यावं लागलं. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार बी. टी. देशमुख, मधुकरराव किंमतकर, सोमेश्‍वर पुसतकर यांच्या सिंचन अनुशेषाच्या लढाईचंही एक वेगळं महत्त्व आहे. विजय जावंधिया, शिवसेना नेते दिवाकर रावते, आ. बच्चू कडू, गजानन अमदाबादकर, रवी तुपकर, विजय विल्हेकर, आ. वीरेंद्र जगताप अशी अनेक माणसं आपापल्या पद्धतीने व आकलनाने ‘मिशन’ म्हणून या विषयात काम करत आहेत. अमरावतीतील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरराव वैद्य कित्येक वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय करत आहेत. शेगावचं गजानन महाराज संस्थान यासाठी कुठलाही गाजावाजा न करता आर्थिक मदत करते. विदर्भातील सर्व माध्यमं आणि पत्रकारांनीही अतिशय ताकदीने हा विषय लावून धरला. अशा पद्धतीने कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न करता काम करणार्‍यांची यादी खूप मोठी आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून राज्य व केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. स्वामिनाथन, नरेंद्र जाधव, टाटा सामाजिक संस्थेपासून वेगवेगळे आयोग आले. त्यांचे अहवाल आले. राज्य व केंद्राचे पॅकेज आले. कर्जमुक्ती झाली. मात्र आत्महत्या थांबायला तयार नाहीत. नेमकं अमुक केलं म्हणजे आत्महत्या थांबतील, असा कुठला एक जादूई इलाज नाही. सिंचनाच्या सोयीपासून शेतमालाला भाव, शेतीला पूरक जोडधंदे, शेतीविषयक धोरणात बदल असे अनेक उपाय कार्यकर्ते व अभ्यासक सुचवितात. राज्यकर्ते मात्र काही ठोस करायला तयार नाहीत. (ज्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक आत्महत्या झाल्यात आणि ‘शेतकर्‍यांची दफनभूमी’ अशी विचित्र ओळख ज्या जिल्ह्याला मिळाली आहे तेथील नेत्यांनी शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी अभावानेच खिशात हात घातला आहे.) विरोधात असताना शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं भांडवल करणार्‍यांना सत्तेत बसल्यानंतर काहीच करावसं वाटत नाही, ही या विषयाची शोकांतिका आहे. खरंतर कुठलीही किचकट समस्या सरकार नावाची यंत्रणा सोडविते, हे जगात कुठेच फारसं घडत नाही. समाजालाच या विषयात पुढाकार घ्यावा लागतो. नाना पाटेकरच्या दौर्‍याने अशी सुरुवात झाली तर त्याचा दौरा सार्थकी लागला असं म्हणता येईल. ‘हा विषय एका दौर्‍याचा नाही. मी वारंवार येथे येईल. तुमच्यातला एक होऊन काम करेल,’ असे अभिवचन नानानी दिलं आहे. आपल्याकडे कुठल्याही विषयाला चालना देण्यासाठी एक करिष्माई चेहरा हवा असतो. नाना हा चेहरा नक्कीच होऊ शकतो. विदर्भात शेतकरी आत्महत्याविषयात काम करणार्‍या संस्था-संघटना, कार्यकर्ते, पत्रकार, नेते यांनी या संधीचा फायदा घेऊन ठोस कार्यक्रम निश्‍चित केला पाहिजे. नाना काही चमत्कार घडवू शकणार नाही. त्याच्या येण्याने एकदम आत्महत्या थांबतील, असेही होणार नाही,पण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आत्महत्या करणार्‍या कुटुंबांचं उर्वरित जीवन नक्कीच सुसह्य करता येईल. नाना म्हणाला त्याप्रमाणे त्या कुटुंबांना आपल्यासोबत उर्वरित समाज आहे. तो आपल्याला मरू देणार नाही, हा आत्मविश्‍वास देता येईल. केवळ आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सुटणार नाही याची नानासह या विषयात काम करणार्‍या सर्वांनाच जाण आहे. मात्र आता शेतकर्‍यांच्या दु:खाच्या करुण कहाण्या आळविण्यापेक्षा एक ठोस कार्यक्रम आखला पाहिजे. श्रेय, मानापमान याचा विचार न करता या विषयात काम करणार्‍या सर्वांनी एकत्रित येऊन अँक्शन प्लान तयार करून विदर्भातील शेतकरी आत्महत्या विदर्भच थांबवू शकतो, हे दाखवून दिलं पाहिजे.
अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Previous articleएक शोकान्त उन्माद
Next articleअसलेपण – नसलेपण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.