नियतीला पूर्वसंकेत

साभार: कर्तव्य साधना

आज २७ मे: पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ५६ वा स्मृतिदिन…त्यानिमित्त १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या त्यांच्या ऐतिहासिक भाषणाचा हा अनुवाद. सोबत पंडितजींच्या त्या संपूर्ण भाषणाचा  Video ही दिला आहे. नक्की ऐका.

………………………………………………………………………….

खूप-खूप वर्षांपूर्वी आपण नियतीला एक संकेत दिला होता, आणि आज ती शुभ घटिका आलेली आहे; ज्यावेळी आपण त्या प्रतिज्ञेची जरी संपूर्णतः नसेल तरी अधिकांशतः पूर्तता करणार आहोत. आज मध्यरात्रीचा टोला होताच भारत एका नवीन जीवनात, नव स्वातंत्र्यात जागृत होईल. जुने त्यजून नाविन्याकडे प्रयाण करण्याची ही घडी इतिहासात फार अभावानेच येत असते. आणि त्यावेळी एका युगाचा अंत होत असताना एका राष्ट्राच्या दडपलेल्या आत्म्याला बोल स्फुरतात. अशा या शुभप्रसंगी भारत, भारतीय नागरिक व साऱ्या मानवजातीची सेवा करण्याचा संकल्प करणे उचित ठरेल.

इतिहासाचा हा अरूणोदय होत असताना भारतमाता एका अविरत शोधाला सुरूवात करीत आहे, आणि पथहीन शतके तिच्या यशापयशाच्या भगिरथ प्रयत्नांनी भरुन दैदिप्यमान झालेली आहेत. सुख-दुःख समतुल्य राखीत असताना ना तिची आपली शोधक नजर अंधुक झाली, ना तिला कधी आत्मशक्ती देणाऱ्या त्या उदात्त तत्वांचा विसर पडला. भारतमातेचे हे अनुसंधान पर्व सुरू होत असताना आज सर्व दुर्भाग्याचा अस्त होवो. आजचा हा विजयोत्सव हे येऊ घातलेल्या यशाच्या अनेक सुसंधींच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. या सुसंधींचा वेध घेऊन भविष्यातील आव्हानांना पेलण्यासाठी आपण ज्ञानवान व धैर्यवान तर आहोत ना?

स्वातंत्र्य आणि सत्ता जबाबदारींना जन्म देतात. सार्वभौम भारतीय नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या या सार्वभौम संसदेवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या या दिनापूर्वी आपण गुलामगिरीचे जोखड वाहिले  Neharuव साहिले आहे. आणि आपली हृदये त्या कटू स्मृतींनी विव्हळलेली आहे. त्यांतील काही वेदना आजही आपली सोबत करीत आहेत. तरीही  मी म्हणेन की भूतकाळ सरलेला आहे व हे भविष्य आहे जे आपणाला साद देत आहे.

हे भविष्य चैन विलासाचे नसून अविरत प्रयत्नांचे आहे, जेणेकरून आपण जाहीर केलेल्या प्रत्येक प्रतिज्ञेची व विशेषतः जी प्रतिज्ञा आज आपण घेत आहोत त्याची आपल्याकडून परिपूर्ती व्हावी. भारताची सेवा ही लाखो पिडीत जणांची सेवा आहे. त्यामध्ये दारिद्रय, अज्ञान, रोगराई, आणि असमान संधी यांचे निर्मूलन करण्याचा समावेश होतो. प्रत्येक डोळ्यातील आसवे जाऊन तिथे हसू पसरवणे हे आपल्या पिढीतील थोर लोकांचे आजवरचे मुख्य उद्दिष्ट राहिलेले आहे. खरेतर हे आपल्या आवाक्यापलिकडचे कार्य आहे, परंतु जोपर्यंत समाजात अश्रू आणि व्यथा आहेत, तोपर्यंत आपले कार्य पूर्ण होऊ शकत नाही.

आणि त्यामुळे आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी आपल्याला खडतर प्रयत्न करावेच लागतील. ही स्वप्ने भारतासाठी असली तरी खऱ्या अर्थाने ती साऱ्या जगतासाठी आहेत. कारण या काळात सर्व राष्ट्रे व त्यांतील मानवप्राणी एकमेकांशी असे काही जोडले गेले आहेत की जर त्यांतील कुणी एकही शांती शिवाय राहू शकते असे वाटत असेल तर ते अशक्य आहे. कारण शांतीचे विभाजन होऊ शकत नाही. हाच नियम स्वातंत्र्य आणि समृद्धी  यांना देखील लागू पडतो. आणि हो तोच नियम लागू पडतो या अखिल, अखंड जगतातील संकटांनाही!

साऱ्या भारतवासीयांना त्यांचे  प्रतिनिधी या नात्याने या साहसी कार्यात श्रध्देने व आत्मनिष्ठेने सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. ही वेळ नाही वृथा कुत्सित टीका करत बसण्याची! नाही दुर्विचार वा दोषारोपाची! आपल्याला स्वतंत्र भारताचा एक भव्य महाल बांधायचा आहे; ज्यात तिची सर्व लेकरे राहू शकतील.

नियतीने ठरवलेला तो दिवस उगवत आहे. आणि भारत पुन्हा उभा राहिलेला आहे संघर्ष व निद्रेच्या बंधनातून मुक्त; जागृत, स्वतंत्र व महत्तम! तरीही भूतकाळाचे काही पाश आजही आपल्याला लपेटून आहेत. आणि प्रत्येक वेळी घेतलेले संकल्प सिद्ध करताना आपणाला कित्येक कार्ये पूर्तीस न्यावयाची आहेत. तथापि भूतकाळाने हा निर्णायक टप्पा पार पाडलेला आहे. कृतीयुक्त जगण्यास प्रेरक, लेखण्यांना जिवंत करणारा असा नवीन इतिहास आज आपणांसाठी घडलेला आहे.

भारत, आशिया व साऱ्या जगासाठी ही एक निर्णायक घडी आहे. पूर्वेच्या आसमंतात एक स्वतंत्रतेचा तारा उगवलेला आहे. नवीन आशा पल्लवित झालेल्या आहेत. कल्पिलेले असामान्य ध्येय मूर्त साकार झालेले आहे. या ताऱ्याचा अस्त कधीही न होवो आणि त्या आशा सदैव अढळ राहोत. हे स्वातंत्र्य आपण साजरे करीत आहोत. धुक्याचे ढग जरी असतील भवती, सोबत करतील दुःखद स्मृती, समस्यांचे वेढे अवतीभवती. जबाबदारीचे ओझे असतेच स्वातंत्र्या सोबती. परंतु अबद्ध पण शिस्तबद्ध नागरिक त्यांचा जिकिरीने सामना करतात.

या दिवशी आम्हाला सर्व प्रथम स्मरतात ते या स्वातंत्र्याचे शिल्पकार, आपले राष्ट्र पिता. भारताच्या अती प्राचीन आत्म्याच्या या प्रकट स्वरूपाने आपल्या हातातील स्वातंत्र्याची मशाल उंच करून आमच्या भोवताली पसरलेला दाट तिमीर दूर केला. आम्ही नेहमीच त्यांचे अपात्र अनुयायी राहिलो व त्यांचा संदेश न मानता भरकटत राहिलो. परंतु यापुढे आम्हीच नाही तर येणाऱ्या सर्व पिढ्या त्यांचा संदेश स्मरणात ठेवतील व आपल्या हृदयात भारतमातेच्या या परमोच्च विश्वासाने व अफाट शक्तीने भरलेल्या विनयशील व धैर्यवान सुपुत्राची छबी जतन करतील. कितीही जोरदार वादळ आले तरीही ती धगधगती मशाल आम्ही विझू देणार नाही.

त्यानंतर आम्ही स्मरण करतो ते सर्व अज्ञात स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक ज्यांनी कुठलाही मोबदला वा आत्मस्तुतीचा विचार न करता आपले जीवन या भारतासाठी अर्पण केले. आम्ही आमच्या त्या भावंडांचे देखील स्मरण करतो जे राजकीय सीमा बदलल्याने आपल्यापासून दूर गेले व आज या स्वातंत्र्यात सहभागी न होता आल्याने अत्यंत व्यथित झालेले आहेत. काहीही झाले तरीही ते आमचे आहेत व राहतील आणि सुख दुःखात आम्ही एकमेकांच्या सोबत राहू.

भविष्य आम्हाला साद देत आहे. आपण त्या दिशेने प्रयाण करावे का? आणि त्या दिशेने आपले काय प्रयास असतील? स्वातंत्र्य व सुसंधी तळागाळात, शेतकरी व कामगार वर्गापर्यंत पोहोचविणे; दारिद्रय, अज्ञान व रोगराई यांच्या मूळावर घाला घालून ते नष्ट करणे; समृद्ध, लोकतांत्रिक व पुरोगामी राष्ट्र बांधणी आणि प्रत्येक स्त्री पुरूषांचा न्याय्य हक्क व परिपूर्णता अबाधित राहावी म्हणून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्था उभारणी…

अनेक दुसाध्य कार्ये आपणापुढे आहेत. जोपर्यंत आपण आपली प्रतिज्ञा पूर्ण करीत नाही, जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिक नियतीच्या योजनेप्रमाणे बनत नाही; आपल्याला विश्रांती नाही. या महान देशाचे नागरिक आपण सर्वजण उन्नतीच्या काठावर उभे आहोत, आणि त्याला साजेशी जीवन पद्धती आपणाला जगायची आहे. जरी आपले विविध धर्म असले तरीही भारताची लेकरे म्हणून प्रत्येकाला समान हक्क, अधिकार व कर्तव्ये असतील. आपण जातीयवाद वा संकुचितपणा यांस प्रोत्साहन देऊ शकत नाही. कारण ज्या देशातील नागरिक विचाराने व कृतीने संकुचित असतात तो देश महान होऊ शकत नाही.

जगभरच्या विविध राष्ट्रांना व लोकांना आपण अभिवादन करीत आहोत व त्यांच्यासोबत शांतता, स्वातंत्र्य, लोकशाही यांच्या बांधणीसाठी सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेत आहोत. आणि आपल्या सर्वात प्रिय, अती प्राचीन, अनादि अनंत व नित्यनूतन भारतमातेला आपण आदरपूर्वक अभिवादन करूया आणि तिच्या सेवेसाठी सदैव बांधिल राहण्याचा संकल्प करूया.

जय हिंद.

Previous articleविचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ
Next articleशरद पवारांच्या मनात काय ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here