निळूभाऊ, तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडा

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०१८

-प्रा.हरी नरके

निळूभाऊ फुले एकदा घरी आले होते. आई त्यांना बघताच प्रचंड संतापली. “या हलकट माणसाला कशाला घरी आणलं? उद्या आपल्या कॉंलनीला कळलं तर काय तोंड दाखवणार?” असा तिचा करडा सवाल होता.

मी म्हटलं, ते लगेच जाणार आहेत.त्यांना एक पुस्तक हवय म्हणून आलेत. तू चहा कर. चहा घेऊन ते जातील.” तर ती चहा पण करायला तयार नव्हती.

शेवटी तिनं चहा केला कसाबसा पण तो द्यायला ती बाहेर आली नाही. मी भाऊंना चहा नेऊन दिला.

भाऊ पण महावस्ताद.

ते म्हणाले, “आई, चहा एकदम फर्मास झालाय. बेस्ट. माझी आई करायची बघा असा चहा. तिचं पण नाव सोनाई होतं. परवा तुळशीरामभाऊ भेटला होता. तुमची चौकशी करीत होता.”

भाऊंनी थेट माझ्या सख्ख्या मामांचं नाव घेतल्यानं आई स्वयंपाक घरातून बाहेर आली.

त्यांना म्हणाली, “तुमची कशी वळख तुळशीरामशी?”

मग भाऊ त्यांची मामांशी कशी आणि किती जवळची मैत्री आहे ते सांगू लागले. भाऊंना आईच्या माहेरची खूपच माहिती होती.

ऎकता ऎकता आई बरीच निवळली.

मला हळूच म्हणाली, “तसा मानूस बरा दिसतोय.”

मग भाऊंना म्हणाली, “तुमच्या इतक्या चांगल्या मानसांशी वळखीपाळखी असताना असलं वंगाळवक्टं काम करू ने मानसानं. सोडा तो चुकीचा धंदा.”

भाऊ म्हणाले, “आई ते खोटं असतं. पोटापाण्यासाठी करावं लागतं.”

आई ताडकन म्हणाली, ” मी अडाणी बाय हाय. मला जास्तीचं काय कळत नाय. पण मी म्हन्ते एका सिनेमात खोटं असंल, दुसर्‍या सिनेमात खोटं असंल, पण सगळ्याच सिनेमात कसं काय खोटं असंल, सांगा बरं? दिसली बाई की लागला बाबा मागं, हे चांगलं नाय. माण्सानं इज्जतीनं – अब्रूनं राहावं. नाय चांगलं काम मिळालं तर पोटात काटं भरावंत. पण असलं वंगाळवक्टं काम करू ने. पोटासाठी अब्रू जात असेल तर उपेग नाय.”

पुस्तक घेऊन भाऊ जायला निघाले, तेव्हा ते गाडीत बसल्यावर आई त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना कळकळीनं म्हणाली, “मी काय म्हन्ते, आमच्या हरीच्या मायंदाळ वळखी पाळखी हायती. तुम्ही हे काम सोडा. तो पवारसायबांना नाय तर टाटा सायबांना सांगून चांगलं काम देईल तुम्हाला. पण तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडाच.”

भाऊ म्हणाले, “आधी तुम्ही पुढच्या आठवड्यातील माझी शूटींग बघायला या.खात्री करा. काम खरं असतं की केवळ नाटक ते स्वत:च्या डोळ्याने बघा. “

पुढं भाऊ आईला शुटींग बघायला घेऊन गेले. तेव्हा कुठं आईची खात्री पटली.

मग तिचा निळूभाऊंबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि ती भाऊंची फॅन झाली. इतकी की शेवटच्या आजारपणात तिनं निळूभाऊंना सांगितलं, “माझं एक काम करा. मी आता काय जास्त दिवस जगत नाय. मी गेले की माझं आयुष्यभराचं किडूक मिडूक सगळं विका. तुमच्या नी हरीच्या माहितीच्या फुले आंबेडकरांचं काम करणार्‍या संस्थांना सगळं देऊन टाका.”

आई गेल्यावर भाऊ तेव्हढ्यासाठी माझ्या गावी तळेगाव ढमढेरेला आले. आयुष्यभर शेतात मोलमजुरी करणार्‍या, मोलकरणीची धुण्याभांड्याची कामं करणार्‍या बाईचे दागिने ते किती असणार? ते सगळे विकून सामाजिक आणि शैक्षणिक काम करणार्‍या दहा संस्थांना भाऊंच्या हस्ते देणग्या देण्यात आल्या. तेव्हा भाऊ खरोखरचे भारावले. बोलताना त्यांचा गळा भरून आला. त्यांनी आईच्या कितीतरी आठवणी सांगितल्या. म्हणाले, “माझ्या मित्राच्या आईने मला खलनायकाच्या कामाबद्दल शिव्या दिल्याचा अनुभव मी आजवर अनेकदा सांगितलाय. मात्र मी तिचं नाव सांगत नसे. आज पहिल्यांदाच तिचं नाव सांगतो. सोनाईनं मला हे वंगाळवक्टं काम सोडा असं कळवळून सांगितलं होतं.

मी त्यांना भेटलो की कायम तक्रार करायचो, “आई, हरीने काय मला अद्याप नोकरी मिळवून दिली नाय बघा.

खळखळून हसायची सोनाई.”

भाऊंसोबत एकदा गुलबर्ग्याला चाललो होतो. आमची गाडी एका पेट्रोलपंपावर थांबली होती पेट्रोल घेण्यासाठी. इअतक्यात एका धोतर,फेटा अशा वेशातल्या म्हातार्‍याने निळूभाऊंना बघितलं. तो धावतच आला. हात जोडले. म्हणाला, “निळूभाऊ, खाली उतरा.”

पावसाचे दिवस होते. खाली जमीन ओली होती. आजूबाजूला चिखलही होता. मी त्यांना म्हटलं, खाली उतरायला वेळ नाही. आम्हाला दूर जायचंय. तुम्ही असेच बोला.”

पण म्हातारा काय ऎकायला तयारच नव्हता. “निळूभाऊ, गाडीतून खाली उतरा” असा धोसरा त्यानं घेतेलेला.

भाऊ खाली उतरले.

त्या म्हातार्‍याने भाऊंना साष्टांग दंडवत घातला. त्याचा सदरा, धोतर सारे कपडे चिखलाने माखले. भाऊ त्यांना उठवत म्हणाले, “अहो, असं करू नका.तुम्ही मला वयाने वडील आहात. मी तुमच्या पाया पडायला पाहिजे.”

म्हातारा म्हणाला, “वयानं मी मोठा असनही. पण कामानं तुम्ही बापय. आज माझ्या म्हातारीला दाखवणारेय, मला खुद्द निळूभाऊ भेटले म्हणून. कपडे धुता येतील.पण माझी आयुष्यभराची इच्छा होती तुम्हाला साष्टांग दंडवत घालायची, ती आज पूण झाली. आता मरायला मोकळा झालो बघा.”

जानेवारी १९८९ मधली गोष्ट. आम्ही विषमता निर्मुलन शिबिराला निपाणीला गेलो होतो. सकाळची वेळ होती. पत्रकार उत्तम कांबळे, लेखक दादासाहेब मोरे नी मी पायी बोलत चाललो होतो.

आठदहा वर्षे वयाची दोन मुलं रस्त्यात खेळत होती. एक म्हणाला, “आज मी शाळेत जाणार नाय.”

दुसर्‍यानं विचारलं, “का बरं?”

पहिला म्हणाला, “तुला माहितीय का आज आपल्या निप्पाण्णीस्नी कोण यायलंय? निलू फुले येणाराय. निलू फुले. लई भारी मानूसाय. आज शाळंला बुट्टी अस्तेय माझी.”

आम्ही ऎकतच राहिलो. आज या घटनेला ३० वर्षे झाली, पण त्या बाल चाहत्याची देहबोली, त्याचा आवाज आणि निळूभाऊंबद्दलची आत्मियतेची भावना याला तोड नाय.

भाऊसोबत एकत्र प्रवास ही फार मोठी पर्वणी असायची. मनसोक्त गप्पा व्हायच्या. एकदा जीपमधून आमचा प्रवास चालू होता. भाऊ पुढे, ड्रायव्हरशेजारी बसलेले होते. त्यांना येताना बघून एका ट्रॅफिक हवालदाराला इतका आनंद झाला की त्याने भाऊंना जोरदार सॅल्यूट मारला. आम्ही सारे हसू लागलो. कारण त्या हवालदाराने नुक्तेच एका मोटरसायकलवाल्याकडून घेतलेले वीस रूपये त्याच्या हातात तसेच होते. त्या नोटेवर अंगठा दाबून त्याने सॅल्यूट मारलेला होता. क्षणार्धात ती चूक त्याच्या लक्षात आली. त्याने जीभ चावली. तो खजील झाला. त्याने शिट्टी मारली आणि आमची गाडी थांबवली. धावत आला नी म्हणाला, ” फुलेसाहेब, चूक झाली बघा. तुमच्यासारख्या माणसासमोर माझं भांडं फुटलं बघा. पुन्हा असं करणार नाय.”

भाऊ मिश्किलपणे म्हणाले, “काय करणार नाय, सॅल्यूट करणार नाय की नोटा घेणार नाय?”

तो म्हणाला, “साहेब, तुम्हाला शब्द देतो, आजपासून मी लाच घेणार नाय.”

पुढं गेल्यावर मी विचारलं, “भाऊ, तो हवालदार खरं बोलला की खोटं?”

भाऊ म्हणाले, “खात्रीनं सांगतो, तो यापुढे खरच लाच नाय घेणार.”

पूर्णवेळ सामाजिक काम करणार्‍या कार्यकार्यकर्त्यांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी सामाजिक कृतज्ञता निधी उभा करण्याची कल्पना पुढे आली. निळूभाऊंनी पुढाकार घेतला. त्यासाठी डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ, तनुजा, सदाशिव अमरापूरकर, असे सगळे दिग्गज “लग्नाची बेडी” या नाटकाचा प्रयोग राज्यभर करीत फिरले.

त्यावेळी तो हवालदार भाऊंना येऊन भेटला. नाटकाचा प्रयोग बघितल्यावर त्याने भाऊंना भेटून काय सांगावं, ” साहेब, मी माझ्या आख्ख्या कॉंलनीला नाटकाला घेऊन आलोय. सगळी तिकीटं मी  काढलीयत. लई पुण्याचं काम करताय तुम्ही. मी तुमची मागची भेट व्हायच्या आधी जे पैसे खाल्ले होते, त्यातनं ही तिकिटं काढली नी विषय संपवला बघा. त्यानंतर मात्र मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला. तुम्ही माझ्या सायबांकडं, सहकार्‍यांकडं जरूर चौकशी करा.”

एकदा बालगंधर्वला एका शैक्षणिक कार्यक्रमाला भाऊ आलेले होते. आम्ही चहा घेत बोलत बसलो होतो. त्याकाळात पंजाब प्रश्न पेटलेला होता. एक अनोळखी माणूस भाऊंजवळ आला नी त्याने विचारले, ” निळूभाऊ, हा प्रश्न सोडवायचा मार्ग काय?”  भाऊ अतिशय गंभीर झाले, नी बोलायला लागले. तो माणूस मात्र न ऎकताच निघून चालला होता. भाऊंनी त्याला बोलावले नी म्हणाले, ” काय हो, एव्हढा गंभीर प्रश्न विचारता आणि न ऎकताच निघुण जाता हे काय गौडबंगाल आहे?”

तो म्हणाला, “सिंपल आहे. तुमच्याशी बोलत असतानाचा मला फोटो हवा होता. मी प्रश्न विचारला,फोटो निघाला.माझे काम झाले. आता कशाला थांबा.”

भाऊ हसले नी म्हणाले, “अस्सल पुणेकर असणार!”

तो हो म्हणाला.

दुसरा कोणी असता तर चिडला असता.पण भाऊ अतिशय खिलाडूवृत्तीचे होते.

टिळक स्मारकला भाऊंच्या “सखाराम बाईंडरचा” प्रयोग होता. त्याकाळात सखारामचे सगळे प्रयोग हाऊसफुल्ल असायचे. मेक अप चालू असताना एक चटपटीत इसम मेकअपरूममध्ये आला. भाऊंना भेटला आणि त्याने एका कोर्‍या कागदावर भाऊंची सही मागितली. मेक अपमन म्हणालादेखील की, “अहो, एखाद्या पुस्तकावर किंवा वहीत तरी सही घ्यायची, हा सुटा कागद हरवून जाईल.”

भाऊंनी सही दिली आणि विसरूनही गेले. त्या प्रयोगाचे भाऊंचे मानधन [नाईट] मिळाले की लगेच ते एका अनाथ मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला भाऊ देणगी म्हणून देणार होते. त्या संस्थेचे पदाधिकारी प्रयोगाला आलेले होते. प्रयोग संपल्यावर ते पदाधिकारी भाऊंना भेटले. भाऊंनी निर्मिती संस्थेच्या मॅनेजरला बोलावले नी मानधन मागितले.

तो म्हणाला, “आज तुमच्याकडूनच आम्हाला काही रक्कम येणे आहे.”

भाऊ चक्रावले. म्हणाले, “असं कसं काय?”

मॅनेजर म्हणाला, ” आज, तुमच्या नावे ५० तिकीटं दिलीयत ना? “

बुकींग विंडोवरच्या कर्मचार्‍याने भाऊंची चिठ्ठी दाखवली. त्यावर लिहिलेले होते, “ही चिठ्ठी घेऊन येणार्‍या माझ्या मित्राला दुसर्‍या व तिसर्‍या रांगेतली ५० तिकीटे द्यावीत व तिकीटाचे पैसे माझ्या आजच्या मानधनातून वळते करून घ्यावेत.” चिठीतले अक्षर अनोळखी होते, पण भाऊंची सही मात्र खरी होती. कोर्‍या कागदावर भाऊंची सही नेलेल्या पुणेरी भामट्याने भाऊंना हातोहात गंडा घातलेला होता. भाऊंनी मॅनेजरकडे पुढच्या प्रयोगाचा अ‍ॅडव्हान्स मागितला. त्यात खिशातली काही रक्कम टाकली आणि त्या अनाथ मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना पाकीट देऊन टाकलं. भाऊंनी हयातभरात हजारो संस्थांना असे लक्षावधी रूपये देणगीदाखल दिले पण त्याचा उच्चार कधीही केला नाही.

त्यानंतरची आठवड्याभरातली गोष्ट. निळूभाऊ आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासमवेत मी औरंगाबादला गेलो होतो. एका पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी गाडी थांबलेली असताना तिथं काम करणार्‍या मुलांनी निळूभाऊ आणि लागूंना बघितलं. ते हरखले. धावत धावत आले. भाऊ त्यांच्याशी गप्पा मारायला लागले. एकाने भाऊंची सही मागितली. त्याच्याकडे कागदच नव्हता.

भाऊंनी पेट्रोलच्या पावतीच्या मागे सही दिली. मी त्यांना टिळक स्मारकातल्या कोर्‍या कागदावर दिलेल्या सहीची आठवण करून दिली. पण भाऊंनी हसतहसत त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाले,” हरी, एक अनुभव वाईट आला खरा, पण म्हणून काय तोच आयुष्यभर उगाळत बसायचा? त्या मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघ. त्याच्यापुढे त्या वाईट अनुभवाची काय पत्रास?”

मुलांनी डॉ. श्रीराम लागूंना सही मागितली. डॉक्टरांनी सही दिली नाही. त्या मुलांनी खूप आग्रह केला, हात जोडून विनंत्या केल्या पण डॉक्टर आपल्या नकारावर ठाम राहिले. मला खूप वाईट वाटलं.

मुख्यमंत्री श्री.विलासराव देशमुख भाऊंचे चाहते होते. महाराष्ट भूषण पुरस्कार भाऊंनी स्विकारावा असा आग्रह करणारा त्यांचा फोन भाऊंना आला तेव्हा मी भाऊंच्या घरी होतो. भाऊ त्यांना नम्रपणे म्हणाले, ” अहो, तुम्हा चाहत्यांचं अमाप प्रेम मला मिळालंय. खरंतर माझ्या योग्यतेपेक्षा मला खूप काही जास्तीचं मिळालंय. मी अभिनेता म्हणून कोणती समाजसेवा केलेलीय? तो माझा उदरनिर्वाहाचा पेशाय. त्याला कसला महाराष्ट्रभूषण देताय. आपल्या राज्यात या पुरस्काराला पात्र असलेले, सारं आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी उधळून दिलेले शेकडो लोक आहेत. त्यांना हा पुरस्कार द्या. आम्हा सेलीब्रिटींना तशीही खूप प्रसिद्धी मिळते. लायकीपेक्षा ज्यादा पैसा मिळतो.पुरस्कारही मिळतात. पुरस्कार द्यायचे तर त्या लोकांन द्या.विलासरावांनी भाऊंना खूप आग्रह केला, पण भाऊ बधले नाहीत.

शेवटी विलासराव थकले. म्हणाले, “ठीकाय.पण आता तुम्ही सांगाल त्यांनाच आम्ही हा ;पुरस्कार देऊ.”

भाऊंनी तात्काळ त्यांना नाव सुचवलं, “राणी आणि अभय बंग या दोघांना द्या महाराष्ट्रभूषण.” भाऊ मुख्यमंत्र्यांना पुढची पंधरा मिनिटं त्या दोघांचं काम सांगण्यात रंगून गेले होते.

भाऊंनी कधीही अभय बंगना हे सांगितले नाही. मी तिथं नसतो तर मलाही ते कळले नसते. मीच हा प्रसंग लिहिला, त्यावर बोललो.

एकदा मात्र भाऊंनी विलासरावांना संतापून फोन केला. म्हणाले, “काय चाललंय, तुमच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं? विश्वकोशाच्या अध्यक्षपदावर तर्कतीर्थ, रेगे, रा.ग.जाधव अशा दिग्गजांनी कामं केली तिथं तुम्ही एका वर्तमानपत्री लेखण करणार्‍या बाईंना नेमता? त्यांची पात्रता काय तर सामान्य बालवाड्मय, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एका दुय्यम दर्ज्याच्या अभिनेत्रीची आई.”

“तुम्ही महिला नेमलीत याबद्दल मात्र तुम्हाला धन्यवाद. पण आपल्या राज्यात कितीतरी मोठ्या विदुषी आहेत. तुम्ही पुष्पा भावे, विजया राजाध्यक्ष, अरूणा ढेरे यांना नियुक्त करायचं होतं ना? सांगा तुमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना म्हणावं अभिनेत्रीशी असलेली व्यक्तीगत मैत्री आणि ज्ञानव्यवहार यातला फरक ज्यांना कळत नाही ते सांस्कृतिक कार्याचे नाहीत तर सांस्कृतिक दारिद्र्याचे मंत्री असतत.” भाऊंना एव्हढं संतापलेलं मी पहिल्यांदाच बघितलं. भाऊ सीएमना आणखीही काही बोलले पण ते इथं लिहिणं योग्य होणार नाही. ते  रंगिले मंत्री आणि त्यांचे आदर्श सांस्कृतिक पराक्रम याबद्दल भाऊ बोलत होते. भाऊंचा नैतिक दबदबा असा होता की विलासरावांनी ती नियुक्ती तात्काळ रद्द केली.

मात्र ते मंत्री हे विलासरावांच्या अवघड जागेचे दुखणे होते. त्या मंत्र्यांच्या ह्या”च” पाह्यजेत च्या बालहट्टापुढे मुख्यमंत्र्यांना नमते घ्यावे लागले. त्यानंतर मात्र भाऊंनी कधीही विलासरावांचा फोन घेतला नाही. कट्टी म्हणजे कट्टी.

भाऊंचं वाचन चौफेर होतं. त्यांच्या हातात कायम एकतरी वैचारिक ग्रंथ असायचाच. शूटींगच्या दरम्यान भरपूर मोकळा वेळ मिळायचा. एक शॉट झाला की पुढच्या सीनची लाईट अ‍ॅरेंजमेंट करायला वेळ लागायचा. भाऊ पुस्तकात डोकं खूपसून त्यात बुडून जायचे. भाऊंनी हजारो पुस्तकं वाचलेली होती. पुस्तकांच्या गर्द रानात भाऊ हरवले की त्यांना तिथून बाहेर काढणं केवळ अशक्य असायचं. पुस्तकं आणि सामाजिक विचार या दोन छावण्या हा आम्हाला जोडाणारा पोलादी सांधा होता.

भाऊंना विद्रोही तुकारामवर चित्रपट काढायचा होता. माझ्या “सत्यशोधक केशवराव विचारे समग्र वाड्मय” या पुस्तकाच्या प्रकाशनाला भाऊ आणि आ.ह.साळूंखेसर सोबतच होते.

त्यांच्या याबाबतच्या तासनतास झालेल्या चर्चा आजही माझ्या स्मरणात आहेत.

त्यांनी खूप प्रयत्न केले पण निर्माता मिळाला नाही.

“कोण म्हणतो टक्का दिला?” हे संजय पवारचं नाटक भाऊंना इतकं आवडलं की त्याचे शंभर प्रयोग भाऊंनी स्वखर्चाने लावले. नविन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी भाऊ कितीही पदरमोड करावी लागली तरी आनंदाने करायचे.

निळूभाऊ पत्नी रजनी यांच्यासह

माझे एक परिचित कार्यकर्ते महात्मा फुले-बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शालेय मुलामुलींच्या परीक्षा घ्यायचे. मी त्यांना भाऊंकडे घेऊन गेलो. भाऊंनी त्यांना  भरीव निधी तर दिलाच पण स्वत:च्या सहीने त्यांनी महाराष्ट्राला जाहीर अपिल केले. त्या उपक्रमाला भाऊंनी सर्वतोपरी मदत केली. मात्र पुढे आमच्या या परिचितांनी काम कमी पण त्याच्या नावे गल्ला गोळा करण्याची रोजगार हमी चालू केली. मी भाऊंना तसे बोललो. ते म्हणाले, ” हरी, सामजिक कार्यात प्रामाणिक लोक ५०% जरी असते ना तरी एव्हाना आपली चळवळ खूप पुढे गेली असती. काही लोक मदतीचा गैरवापर करतीलही पण आपण दुसरी योग्य व्यक्ती/संस्था शोधून मदत करीत राहायचं.”

फिल्मी दुनियेतल्या फसवणूकीचे भाऊ असंख्य किस्से सांगायचे.

जितेंद्र अगदी नविन असताना त्याला व्ही.शांताराम यांनी ब्रेक दिला. त्याकाळात ३ किंवा ५ वर्षाचा करार केला जायचा. जितेंद्रला पाच वर्षांसाठी रूपये २० हजारवर शांतारामबापूंनी करारबद्ध केले.

त्याचा पहिलाच चित्रपट गाजला. त्याला अनेक नव्या ऑफर आल्या.

एका निर्मात्याने त्याला एका चित्रपटासाठी एक लाख रूपये देऊ केले. जितेंद्र व्ही शांतारामांना भेटला. त्याने त्यांच्याकडे ह्या चित्रपटात काम करायची मला परवानगी द्या, मी तुमचे २० हजार रूपये तुम्हाला परत करतो अशी विनंती केली. शांतारामबापू म्हणाले, परवानगी देतो पण एका अटीवर, “तुला मिळणार्‍या एक लाखातले २० हजार रूपये तू घे, उरलेले ८० हजार रूपये मला आणून दे.”

मशाल चित्रपटात भाऊ दिलीपकुमारसोबत काम करीत होते. दिलीपकुमार त्याकाळातला महानायक. सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेला.

चित्रीकरणाच्या दरम्यान दिग्दर्शकाने एक दृष्य निळूभाऊंपासून सुरू केले. दिलीपकुमार संतापला. त्याने कट, कट म्हणून शूटींग बंद करायला लावले. दिग्दर्शकाने ते दृश्य निळूभाऊंच्या अंगाने महत्वाचे असल्याचे सांगूनही दिलीपकुमारने काहीही ऎकले नाही. शेवटी दिलीपकुमारपासून कॅमेरा सुरू करीत ते दृश्य घेतले गेले. भाऊ फक्त एव्हढंच म्हणाले, “माणूस कितीही प्रसिद्ध असला, मोठा असला तरी त्याच्यामध्ये जोवर खिलाडूपणा, दानत येत नाही, तोवर तो गरिबच!”

भाऊ अतिशय धाडशी होते. तीन प्रसंग असे मी जवळून अनुभवलेत.

औरंगाबादला अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रमावर सनातन्यांनी रासवटपणे हल्ला केल्या. डॉ. श्रीराम लागूंचे गायीबद्दलचे एक विधान तरूण भारताने विकृत स्वरूपात छापल्याने वाद झालेला होता.

हल्ला हिंसक होता. भयानक होता. पण भाऊ डगमगले नाहीत. त्यांनी धावत जाऊन डॉ. श्रीराम लागूंचा बचाव केला. भाऊंनी ती खुर्ची वरच्यावर धरली नसती तर लागूंचे डोकेच फुटले असते. भाऊ ज्या निर्धाराने त्या गुंडांना सामोरे गेले ती जिगर, ती हिंमत खरोखरच वंदनीय होती. त्या गडबडीत भाऊंना तीनचार काठ्या खाव्या लागल्या पण भाऊंनी लागूंना मार पडू दिला नाही.

दुसरा प्रसंग माझ्या घरीच घडला होता. माझे मित्र प्रा.गणेश राऊत यांचे एका मराठा मुलीवर प्रेम होते. तिची सम्मती होती. तिचेही गणेशवर प्रेम होते. पण घरचे पडले ९६ कुळी. मुलीचा भाऊ तर तलवारीच घेऊन फिरत होता. माझ्या घरी ते लग्न करायचे ठरले होते.

मी भाऊंना अडचण सांगताच भाऊ म्हणले, “मी स्वत: लग्नाला येतो. तू काहीही चिंता करू नकोस. तलवारीचा पहिला वार मी झेलणार.”

भाऊ लग्नाला आले. सगळा वेळ ते आमच्या सोसायटीच्या गेटवर उभे होते. त्यांना बघताच ही गर्दी जमली. भाऊ त्यांच्याशी गप्पा मरात बसले. तलवारवाले आले नी त्यांनी ती गर्दी बघितली नी ते आल्या पावली परत गेले.

सामाजिक प्रबोधन मंचातर्फे राज्यभरचा एक दौरा आयोजित केलेला होता. येणार्‍या निवडणूकीत जात्यंध आणि धर्मांधांना मतं देऊ नका हा मुद्दा घेऊन आम्ही राज्यातली सगळी शहरं फिरलो. त्यात ओपनिंग बॅट्समन मी असायचो. भाऊ, अमरापूरकर, लागू, नरेंद्र दाभोळकर हे कायम वक्ते आणि अमीर खान, नसिरूद्दीन शहा, शबाना आझमी, जावेद अख्तर, असे अनेक सेलिब्रिटी एकेका शहरापुरते यायचे. पुण्याहून सातारला आम्ही चाललो असताना खंडाळ्याजवळ हायवेवर एक टॅंकर पालथा झालेला होता. त्यात केमिकल्स होती. त्यातनं गॅस गळती होत होती. भाऊंनी गाडी थांबवली. जमलेल्या गर्दीला दूर पिटाळले. पण लोक कसले ऎकायला. भाऊ म्हणाले, “कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. दूर जा.” पण लोक काही हटेनात. मग भाऊंनी एक युक्ती केली. ते आम्हाला घेऊन लागू, अमरापूरकर यांच्यासमवेत टॅंकरपासून दूर निघाले. लोंढा त्यांच्या मागेमागे निघाला. पोलीस स्टेशनला जाऊन भाऊंनी दुर्घटनेची माहिती दिली. तिथल्या फोनवरून मी सातारा जिल्ह्याचे पोलीसप्रमुख श्री.सुरेश खोपडे यांच्याशी बोललो. भाऊ गर्दीशी गप्पा मारण्यात रंगले असतानाही मला विचारत होते, तो टॅंकर हलवायला मदत पथक आले की नाही? शेवटी जेव्हा तो टॅंकर क्रेनद्वारे उभा केला गेला तेव्हाच भाऊंनी निश्वास सोडला.

आम्ही निघालो तेव्हा पोलीस स्टेशनच्या परिसरात किमान तीनचार हजारांचा जमाव जमलेला होता. त्या गडबडीत एका ट्रकने आमच्या नव्याकोर्‍या कारला धडक मारली नी आमची कार पार चेपटून गेली. नवे संकट उभे राहिले. त्यादिवशी आम्हाला जेवायला वेळ मिळाला नाही. आम्ही कसेबसे कोल्हापूरला पोचले नी थेट स्टेजवर गेलो. पण भाऊंच्या चेहर्‍यावर ना थकवा, ना नाराजी. भाऊंमध्ये जबरदस्त नेतृत्वगुण होते. आम्ही राजापूरला पोचलो तेव्हा समजले की तिथल्या एका राजकीय नेत्याची गॅंग आमच्या कार्यक्रमात गोंधळ घालणार आहे.

भाऊ डगमगले नाहीत. म्हणाले, “तुम्ही स्टेजवरून बोला, मी गेट सांभाळतो.”

सभा उधळायला नी गोंधळ घालायला आलेल्या पोरांना भाऊ हर्‍यानार्‍याचे चेंबूर नाक्यावरचे किस्से सांगत बसले. तुमच्या नेत्याने बायको कशी पळऊन नेऊन लग्न केलं होतं ते तुम्हाला सांगतो, असं म्हणून भाऊ त्यांना किस्से सांगण्यात रमले. पोरं सभा उधळायची विसरून गेली. शेवटी त्यांचा लिडर भानावर आला. म्हणाला आम्हाला आता फटके पडतील ना! भाऊ म्हणाले, काही काळजी करू नका नारायणरावांना सांगा निळूभाऊंनी अडवलं म्हणून. नारायणराव मला चांगलं ओळखतात.

भाऊ अतिशय निर्भय आणि नैतिक जीवन जगणारे होते. एकदा माझे औरंगाबादचे मित्र माझ्या घरी आले.त्यांना सत्यशोधक अधिवेशनात निळूभाऊ हवे होते. आम्ही भाऊंच्या पौडरोडच्या घरी गेलो. तर रजनीवहिनी म्हणाल्या, ते विश्रांतीसाठी पौडच्या फार्महाऊसला गेलेत. भाऊंना फुलांचे अतिशय वेड. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे असे खरोखरच मानणारे होते भाऊ. आम्ही फार्महाऊसला गेलो. ३० किलोमीटर गेलो तर तिकडचा कर्मचारी म्हणाला, भाऊ तर आत्ताच पुण्याला गेले. तुमची चुकामूक झाली असणार. आम्ही हिरमुसलो. मी त्याला निरोप दिला, भऊंना संगा हरी नरके येऊन गेले.

आम्ही गेटवरून परत फिरलो. तर तो कर्मचारी धावत धावत आला. म्हणाला, तुम्हाला भाऊंनी बोलावलंय.

झालं असं होतं की, लोक,चाहते भाऊंना सतत त्रास द्यायचे. त्यामुळे भाऊ घरी नाहीत असं कर्मचारी सांगून मोकळे व्हायचे. माझं नाव ऎकून भाऊंनी त्यांना मला बोलवायला पिटाळलं.

म्हटलं तर बाब किरकोळाय. उपटसुंभांपासून बचाव करायला अनेकजण असं करतात. पण भाऊ घरी नाहीत असं कर्मचार्‍याने आम्हाला सांगितलेलं असतानाही हरीला बोलवा असं सांगायला जी निर्भयता लागते ती फक्त भाऊंकडे असू शकते.

आम्ही घरात गेल्यावर भाऊंनी दिलगिरी व्यक्त केली. म्हणाले, अंगात ताप असल्याने मीच कर्मचार्‍यांना तसं सांगून ठेवलं होतं. दिलगिरी व्यक्त करतो. बोला काय काम काढलं?

त्यानंतर भाऊ आम्हाला त्यांची शेती, बाग दाखवायला घेऊन गेले. त्यांच्या बागेत तीनशे प्रकारचे डेलीया होते. किमान पन्नासेक प्रकारचे गुलाब. अजब संग्रह. भाऊ हाडाचे शेतकरी आणि माळी होते.

म्हणाले, अरे माझा ताप पळाला.चला आता मीही तुमच्या सोबत पुण्याला येतो. भाऊंसोबत हजारो किलोमीटरचा प्रवास केला. अनुभवांचे एक पुस्तक होईल.

मी भाऊंच्या हस्ते अनेक पुरस्कार घेतले. अगदी माझ्यासाठी भाऊ पार रत्नागिरीला आले होते.

संत तुकारांच्या नावाचा पुरस्कार घेतल्यानंतर भाऊंनी पुरस्कार घ्यायचे बंद केले होते.

केवळ माझ्या आग्रहाखातर त्यांनी दोन अपवाद केले. एक, त्यांना पुणे विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्कार द्यायचे ठरवले. भाऊंची संमती घ्यायची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली.

भाऊ काही तयार होईनात. मी शेवटचे अस्त्र काढले. म्हटलं, भाऊ, तुम्ही चौथी नापास आहात. तुम्हाला एक विद्यापीठ सर्वोच्च पुरस्कार देतेय हे उदाहरण अल्पशिक्षितांना किती दिलासा देऊन जाईल याचा विचार करा. बाण अचूक लागला, भाऊ तयार झाले. त्यावेळचे विद्यापीठाने त्यांना दिलेले मानपत्र मी लिहिलेले आहे. मी हा माझ्या जीवनातला सर्वोच्च सन्मान समजतो. त्यानिमित्ताने मी भाऊंशी चारतास सलग गप्पा मारल्या. भाऊंच्या त्य मुलाखतीमधून अनेक नवे मुद्दे पुढे आले.

दुसरा अपवाद म्हणजे तमाशासम्राट दादू इंदुरीकर यांच्या नावे मुंबईतील आमच्या मित्रांनी भाऊंना पुरस्कार द्यायचे ठरवले. पुन्हा संमती घ्यायची जबाबदारी माझ्यावर आली. तेव्हा भाऊ खूप आजारी होते. ते भाऊंचे शेवटचे आजारपण ठरले.

भाऊ झोपूनच होते. मी गेलो नी भाऊंना तरतरी आली. ते उठून बसले. त्यांना बोलताना धाप लागत होती. त्याही अवस्थेत भाऊ माझ्याशी अडीच तास बोलले. ते त्यांचे शेवटचे बोलणे ठरले. त्या रात्री भाऊ कोमात गेले. त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये ठेवावे लागले. काही दिवसांनी १३ जुलै २००९ला भाऊ दवाखाण्यात असतानाच गेले. भाऊंचा जन्म १९३० चा. भाऊंना ७९ वर्षांचे सफल आयुष्य लाभले.

जाण्यापुर्वी त्यांनी दादूच्या नावाचा पुरस्कार स्विकारायला एका मित्राला मुंबईला पाठवले.

त्या शेवटच्या गप्प्पांमध्ये ते मला काय सांगत होते?

ते मला म्हणाले, ” हरी, माझे बहुधा हे शेवटचे बोल आहेत. मला माझा शेवट निकट दिसतोय. जाताना मी निराश नाही. गांधी, लोहिया, फुले, आंबेडकर फेल जाणार नाहीत.

त्यांच्या विचारांचे राज्य येणारेय. नक्की येणारेय. मी मधू लिमये, एसेम, नानासाहेब, जॉर्ज फर्नांडिस यांना फार जवळून बघितलंय. शरद यादव, नितिशकुमार, लालू, मुलायम यांच्या कामांवर माझा विश्वास आहे. ते चुकतात पण दुरूस्तीही करतात. समाजवादी विचार अमर आहे. हिंदुत्ववाद्यांची चिकाटी, कामातलं सातत्य आणि आपल्या विचारांसाठी त्याग करण्याची वृत्ती आपण घेतली पाहिजे. आपसातले मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. आपलं म्हणजे, माणसं दोन आणि गट मात्र तीन अशी गतय. सनातन्यांचा विजय होता कामा नये. नाहीतर सगळं परिवर्तन मातीमोल होईल.

वो सुबय तो आयेगी. नक्की येणारेय.”

मी चकित झालो होतो. जातानाही माणूस इतका आशावादी. इअतका ठाम!

निळूभाऊ, तुमच्या स्मृतींना क्रांतिकारी सलाम!

..……………………..….

(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत)

 [email protected]

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here