“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”

नीलांबरी जोशी

स्टीव्हन स्पीलबर्गच्या १९८२ साली आलेल्या “इ.टी.” या चित्रपटानं तोपर्यंतच्या सर्व चित्रपटांचं रेकॉर्ड मोडून highest grossing film of all time पर्यंत मजल मारली होती. पण याच चित्रपटासाठी सत्यजित रे यांनी स्टीव्हन स्पीलबर्गवर दावा ठोकावा असा सल्ला त्यांच्या एका चाहत्यानं फोनवर दिला होता. तो चाहता दुसरातिसरा कुणी नसून प्रसिध्द विज्ञानकथा लेखक आर्थर सी क्लार्क होता. कारण? “द एलियन” या सत्यजित रे यांच्या कथेत आणि “इ.टी.”च्या पटकथेत विलक्षण साम्य(!) असल्याचं क्लार्क यांचं म्हणणं होतं. सत्यजित रे तेव्हा “द एलियन”वर चित्रपट काढण्यासंबंधात हॉलिवूडच्या निर्मात्यांशी बोलणीही करत होते..!

१९८३ साली “इंडिया टुडे” मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वत: सत्यजित रे यांनी स्पीलबर्गचे “क्लोज एनकाऊंटर्स आॉफ द थर्ड काईंड“ आणि “इ.टी.” हे दोन चित्रपट आपल्या “द एलियन” या कथेशिवाय शक्य नव्हते असं विधानही केलं होतं. स्पीलबर्गनं हे म्हणणं फेटाळलं होतं. “द एलियन” या रे यांच्या बंगालमधल्या कथेत एक एलियन येऊन एका लहान मुलाशी दोस्ती करतो असं कथानक होतं…!

**********

सत्यजित रे आणि “इ.टी.” वगैरे आठवण्याचं कारण म्हणजे नेटफ्लिक्सवरची “रे” ही मालिका. या मालिकेत चार कथा आहेत. सुमारे ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कथा आज मनात इतक्या खोलवर जाऊन भिडतात, त्यावर आपण विचार करायला लागतो यावरुन परत एकदा सत्यजित रे यांच्या आपण प्रेमात पडतो.

त्यातली मला सर्वात जास्त आवडलेली कथा म्हणजे “फरगेट मी नॉट”. “मिर्झापूर” या मालिकेनं गाजलेल्या अली फाजलनं यात महत्वाकांक्षी आणि आत्मकेंद्री इप्सित रंगवला आहे.. ! एका अत्यंत बुध्दिमान पण दुसऱ्यांचा सतत वापर करुन घेणाऱ्या माणसाची तो ज्या भोवतालच्या माणसांना दुखावतो ती माणसं काय अवस्था करु शकतात ते यात दिसतं. स्मृतीभ्रंश या विकाराकडे इप्सितची वाटचाल कशी होते ते पहाणं उत्कंठा वाढवत नेतं.

या कथेवरुन मला आठवला तो इनग्रिड बर्गमनचा “गॅसलाईट”. इनग्रिडच्या मावशीनं तिच्यासाठी सोडलेली संपत्ती हडपण्यासाठी एक लोभी माणूस तिच्यात स्वत:बद्दल शंका निर्माण करतो असं “गॅसलाईट”चं कथानक आहे. अगदी कुसुम मनोहर लेले या नाटकातही हीच ट्रिक वापरलेली दिसते. साधं कुलूप लावून बाहेर पडल्यावर जोडीदाराला “कुलूप नीट लावलंस ना..” असं जर सतत विचारलं तर तो जोडीदार संभ्रमात पडतो. असा स्वत:बद्दल संभ्रम निर्माण झाला तर मेंदूत गोंधळ सुरु होतो. याच प्रकारच्या ट्रिक्स “गॅसलाईट”मध्ये आहेत.. तोच प्रकार “फरगेट मी नॉट”मध्ये वापरला आहे. हे तंत्र गुन्हेगारांच्या interrogation मध्येही वापरलं जातं.

“फरगेट मी नॉट” या कथेच्या सादरीकरणात काही त्रुटी जाणवतात. पण एकूण त्याचा जबरदस्त परिणाम मनावर होतो. जाता जाता, या कथेतला इप्सित बायकोबरोबर जो चित्रपट पहायला जातो तो दृश्यम..! “दिसतं तसं नसतं.. ” हे “फरगेट मी नॉट”चंही “दृश्यम”प्रमाणे एक सूत्र आहेच..

**********

हे झालं स्मृतीभ्रंश या मनोविकाराचं. या मालिकेतल्या “हंगामा क्यूं है बरपा” या कथेत kleptomania हा मनोविकार असलेली व्यक्ती दिसते. हातोहात एखादी वस्तू चाळा म्हणून उचलून आणणाऱ्या काही व्यक्ती आपल्याभोवती असतात. तोच हा विकार. हॉटेलमधला एखादा चमचा, मित्रांकडे गेल्यावर शोपीसमधला एखादा छोटा गणपती.. वगैरे सहजपणे काहीजण उचलतात. दरवेळेला तर ती मूल्यवान वस्तूंची चोरी असते असंही नाही..!

“हंगामा..” ही कथा बऱ्याच अंशी रेल्वेत घडते. हिचकॉकचे “द लेडी व्हॅनिशेस” आणि “स्ट्रेंजर्स आॉन अ ट्रेन” हे दोन चित्रपट अपरिहार्यपणे आठवतात. मनोज बाजपेयीनं यात कमाल केली आहे.. !

रे या मालिकेतली “स्पॉटलाईट” ही कथा फारशी आवडली नाही..!

**********

रे या मालिकेतल्या “बहुरुपिया” या कथेत खूप दिवसांनी केके दिसला. त्याच्या व्यक्तिरेखेवरुन रॉबर्ट डी नीरो / स्कॉर्सेसीचा “टॅक्सी ड्रायव्हर” आठवला. त्यातला डी नीरो जसा उपेक्षित / एकाकी आहे तसाच यातला इंद्राशिश. जगानं सतत नाकारलेली माणसं मनातून कशी बदला या भावनेकडे सहजी झुकतात ते यात दिसतं. हिचकॉकच्या “सायको”मधला नॉर्मन बेटसही असाच सिनिकल होत जातो. “टॅक्सी ड्रायव्हर”प्रमाणेच “बहुरुपिया” या कथेत आरशांचा वापर सतत दिसतो. कोणत्याही परिस्थितीत माणसानं स्वत:च्या अंतरंगात माणसानं डोकावून पहायला हवं हे दृग्गोचर होत जातं..! “बहरुपिया” या कथेचा शेवट डोळ्यात अंजन घालणारा आहे. तो twist पडद्यावरच पहावा..!

या चारही कथांमधला एक समान धागा म्हणजे सातत्यानं “अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..” याची जाणीव होते. आपण कितीही ठरवलं तरी नियतीनं आखून दिलेल्या रेषांवरच प्रवास चालतो.. आणि … संपतोही..!

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

…………………………

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleनिकोला टेस्ला… जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ..
Next articleनिळूभाऊ, तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.