निकोला टेस्ला… जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ..

-डॉ नितीन हांडे उर्फ डावकिनाचा रिच्या

टेस्लाचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का.. चूक तुमची नाही.. अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही.. कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन भेटतो, मात्र टेस्ला नाही. ज्याच्यामुळे आपल्या घरातील सर्व विद्युत उपकरणे सुरू आहेत त्या टेस्लाचे नाव उपेक्षित आहे.

१० जुलै १८५६ रोजी क्रोएशिया ( तेव्हाचे ऑस्ट्रिया) मध्ये मुसळधार पावूस पडत होता.. मध्यरात्री विजांचा कडकडाट. होत असताना एक बालक जन्माला आला.. ज्याने आयुष्यभर आपल्या मर्जीप्रमाणे शब्दशः विजेला खेळवले.. पाद्री वडील आणि निरक्षर गृहिणी आईच्या पोटी जन्माला आला निकोला टेस्ला.

टेस्ला त्याच्या आईचे खूप कौतुक करतो.. घरात काही बिघडू दे, त्याची ही निरक्षर आई ते दुरुस्त करायची.. टेस्ला म्हणतो शोधक आणि कल्पक वृत्ती ही त्याला खात्रीने केवळ आईकडून भेटली आहे, वडिलांकडून नाही. वडिलांशी त्याचे जास्त पटायचे नाही. पाद्र्याची पोरं पाद्री व्हावीत असे त्याच्या बापाला वाटायचे. त्यात ह्याचा एकमेव भाऊ अपघातात मेला, मग जी काही आशा ती याच्यावर. पण हा लहानपनापासूनच अवलिया. तो काय बापाच्या हाती लागतो.

पोरगं एवढं अफाट होत की बाईंनी अवघड मोठी मोठी गणितं फळ्यावर द्यावीत आणि ह्याने काही सेकंदात तोंडीच उत्तर द्यावं. बाईंना वाटायचे हे चीटिंग मारत असणार. मार खायचा पण शानपणा करायचा सोडायचा नाही. त्या काळात शाळा पूर्ण झाली की नियम होता एक वर्ष सक्तीची सैन्यात नोकरी करायची .. हे गाभड.. तिथेपण कल्टी मारली आणि एक वर्ष जंगल दऱ्यापर्वतात शिकार करत फिरल. आणि मग घरी आल. बाप म्हणतोय हो पाद्री.. पोरगं म्हणतं.. नाय मला अजून शिकायचं हाय.

त्यात त्याला झाली पटकी.. जगलं असं वाटना.. नऊ महिने हातरूनातचं.. जेव्हा बाप बोलला तुला सगळ्यात भारी इंजिनिअरिंग कॉलेजला टाकतो.. तेव्हा कुठे पोराने तव्हारी धरली आणि नीट झालं. पण तिथं बी नीट शिकावं ना.. एका वर्षात चार विषय पूर्ण करायचे तर बाबाने नऊ केले. पहाटे तीन ते रात्री अकरा रोज एवढं अभ्यासात गर्क.. कॉलेजने ह्याच्या वडिलांना पत्र पाठवलं की असच सुरू राहिले तर पोरगं मरल तुमचं.

एवढी मेहनत करत होत म्हणल्यावर गुरूच्या पुढे जाणारच ना. मास्तर ला गेलं कौतुकाने नवीन आयडिया सांगायला.. आणि मास्तरच्या डोक्यावरून गेले म्हणून त्याने ह्याला काढले येडयात.. मग हा भाऊ झाला नाराज.. आणि जुगाराकडे वळला. त्यात पार डूबला ( दोन्ही अर्थाने). स्कॉलरशिपचे पैसे, फीचे पैसे सगळे घालवले त्यात. ( नंतर वसूल पण केले म्हणा)… तर अशी आकाबाई आठवली त्याला आणि पदवी न घेताच घरी यावं लागलं.

बाचं टुमन सुरूच.. पाद्री बन. पण ह्याच्या डोक्यात वीज घुसलेली.. पाच सहा वर्ष मिळेल ती काम करत असच पॅरिसला कामाला गेला. तिथं चार्ल्स बॅचलरने याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला बोलला तुझी जागा इथ नाय भावड्या… अमेरिकेला जा एडिसन पाशी…. चार्ल्स हा एडिसन चा चांगला मित्र होता. त्याने टेस्ला कडे एडिसन साठी एक शिफारस पत्र दिले ज्यात लिहिलं होत “आयुष्यात मी दोन जीनियस पाहिले. एक तू आणि एक हा पत्र घेऊन आलेला टेस्ला.”

थॉमस अल्वा एडिसन. विजेवर बल्ब पेटवणारा शास्त्रज्ञ.. आणि अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा संचालक. एडिसनने थोड्या अवधीत ओळखले की “ये लंबी रेस का घोडा हैं.” त्याने त्याला अवघड अवघड काम दिली. ती टेस्लाने पार पाडली. दोघांनी मिळून एक वर्ष भर खूप छान काम केले.

एडिसन वीज पोचवताना डीसी करंट वापरायचा. ज्याला मर्यादा होत्या. पॉवर स्टेशन पासून केवळ एक किमी अंतरावर वीज या पद्धतीने पोचायची. खर्चपण खूप यायचा. आणि या विजेवर मोठमोठ्या मशीन चालवणे शक्य नव्हते. टेस्लाने कॉलेज मध्ये असतानाच त्यावर पर्याय म्हणून एसी करंटने (जी पद्धत आपण आज वापरतो) वीज वितरित करायचे शोधून काढलं होत ( मास्तरशी पंगा ह्याच्या मुळेच झाला होता) टेस्लाने एडिसनला दाखवले. एडिसन हादरला. हे पोरगं तर लय पुढचं. आजवर एडिसन ने केलेले सगळे मोडीत निघणार होते.. एडिसनने मुद्दाम त्याचे म्हणणे मूर्खपणाचे आहे असे सांगून विषय संपवला.

एक दिवस एडिसनने टेस्लाला आव्हान दिले की हा बिघडलेला जनरेटर नीट केलास तर तुला ५०००० डॉलर देतो. याने चिक्कार मेहनत करून दुरुस्त केले.. आणि हक्कानी पैसे मागितले.. एडिसन म्हणाला “येड्या तुला अमेरीकन इनोद कळणा व्हय. ते तर मी असंच म्हणलं हुत ” टेस्ला चा खटका पडला. राजीनामा येडीपुत्राच्या (एडिसन) तोंडावर फेकून गडी बाहेर पडला. बोलला आता माझीच कंपनी टाकतो तुला टक्कर द्यायला.

पण त्याला कोणी स्पॉन्सर भेटेना. शेवटी एडिसनच्याच ठेकेदाराकड दोन वर्ष खड्डे खणायचे काम केले. त्या काळात आपल्या शोधाचे पेटंट नोंदवले. दोन वर्षानंतर टेस्लाला स्पॉन्सर मिळाला आणि त्याची पण कंपनी सुरू झाली. एडिसनला माहीत होत की आपली पद्धती कालबाह्य होईल, जर याची मार्केट मध्ये आली. त्याने मग खूप कीडे करणे सुरू केले. या दोघात झालेले भांडण “करंट वॉर” म्हणून प्रसिद्ध आहेत.

ही Documentary वेळ काढून नक्की पाहा-Nikola Tesla vs Thomas Edison EPIC NEW Documentary-https://bit.ly/2T2W5Ir

टेस्लाने एडिसनचे स्पॉन्सर फोडायला सुरुवात केली आणि एडिसनने ह्याचे पंख छाटायला.एसी करंट किती धोकादायक आहे हे दाखवण्यासाठी एडिसन रस्त्यावर मुक्या प्राण्यांना करंट देऊन मारायचे जाहीर प्रात्यक्षिक दाखवू लागला. लोकांत दहशत पसरू लागली. नीच पणाचा कळस म्हणजे मृत्यूची शिक्षा झालेल्या कैद्याला एसी करंट देवून मारायची शिफारस केली. २००० वॉल्टचा एसी करंट देऊन शिक्षा अमलात सुद्धा आणली गेली.. “पाहा किती धोकादायक आहे एसी करंट” अशी एडिसन पुरस्कृत भरपूर प्रसिद्धी केली गेली. हे कमी म्हणून की काय… कायदेशीर घोडा लावून टेस्लाची कंपनी गाळात घालायचा पण प्रयत्न झाला… पण कोंबडे किती झाकले तरी उजाडायचे राहते का?

सत्याचा विजय इथे पण झाला. टेस्लाच्या पद्धतीला मान्यता मिळाली.. एवढेच नाही तर प्रसिद्ध नायगारा धबधब्यावर जनित्र बसवून वीज निर्मितीचे काम टेस्लाला मिळाले. खूप मोठा प्रोजेक्ट एडिसन च्या कंपनीच्या हातून गेला.. परिणामी एडिसनची संचालक पदावरून गच्छंती झाली. नायगाराचे काम मिळणे हा टेस्लाच्या आयुष्यातील हा परमोच्च बिंदू.. त्याचे बालपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार करणारे.

१८९५ मध्ये ह्याच्या ऑफिसला आग लागली आणि तिथून पुढे सगळे उलट होत गेले. ह्याने बनवलेल्या डिझाईन वर मार्कोनी ने रेडिओ बनवला. (ज्याचे पेटंट आधी मार्कोनी कडे होते मात्र नंतर ते टेस्ला कडे देण्यात आले आहे.) ही बाब त्याला खूप निराशा देणारी होती.

वायरलेस वीज पुरवठा करण्याचा त्याचा अतिमहत्वाकांक्षी आणि खर्चिक प्रकल्प सुरू होता. स्पॉन्सरला समजले की ह्याला वीज फुकट वाटायची आहे, त्याने अंग काढून घेतले. आणि टेस्ला अक्षरशः रस्त्यावर आला.

तिथून पुढे त्याचे आयुष्य अतिशय हलाखीचे गेले. नंतर त्याचे अनेक प्रयोग अपूर्ण राहिले. मेंदूमधल्या भावनांचे फोटो काढायचे होते त्याला ते अपूर्ण राहिले. तो अश्या एका अस्त्रावर काम करत होता की आपल्या देशाच्या सीमेवर प्रवेश करणाऱ्या शेकडो विमानांना केवळ विद्युत स्तंभ वापरून नष्ट करायचे. पण तेही पूर्ण झाले नाही. १९४३ साली तो मेला, हे समजले तेव्हा त्याची सारी कागदपत्रे अमेरिकन सरकारने ताब्यात घेतली. (हिटलर च्या हाती पडू नये म्हणून)

तसा हा पण जीवनात कोणत्या पोरीच्या हाती पडला नाही. जरा तिरसट होताच.. कुणाचे कान टोचलेले पाहिले की ह्याच्या पोटात ढवळायचे. दागिने पाहिले की मळमळ व्हायची. कापूरचा वास आला तरी जाम आजारी पडायचा. महिलांपासून तर दोन हात दूरच राहायचा.. त्यामुळे त्याने लग्न केले नाही. म्हणायचा, मी आयुष्य विज्ञानाला वाहिले आहे. ( हे बरे आहे आधी लग्न करून मग ध्येयप्राप्तीसाठी बायकोला सोडून देण्यापेक्षा)

शांततेचे नोबेल जगभरातील अनेक गांधीवाद्यांना मिळाले आहे मात्र स्वतः गांधीना नाही, त्याच प्रकारे टेस्लाचे डिझाईन वापरून रेडिओ बनवणाऱ्या मार्कोनीला नोबेल मिळाले मात्र टेस्लाला नाही.. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रकाश पोचवणारा हा जिनीयस प्रसिध्दीच्या झोतात कधी आलाच नाही.

[email protected]

(लेखक वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध याबाबत अतिशय वेगळ्या शैलीत लेखन करतात . डावकिनाचा रिच्या या नावाने फेसबुकवर ते जे लेखन करतात त्याचे हजारो चाहते आहेत .‘ज्ञानाचा प्रवाहो चालिला…’हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Previous articleआदित्यनाथ : योगी की हट्टी योगी ?
Next article“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.