पंकजा मुंडेंसाठी ‘रिकामटेकडा’ सल्ला !

माणिक मुंढे

………………………….
पंकजा मुंडेंचं अभिनंदन. जिंकलेत धनंजय मुंडे पण अभिनंदन पंकजा मुंडेंचंच करायला हवं. कारण काही काही पराभव माणसाला विजयापेक्षा जास्त गरजेचे असतात. तो त्यांनी कष्टानं मिळवला म्हणून अभिनंदन. निवडणुकीपुर्वी मी परळी भागात होतो. त्यावेळेस काही जणांनी विचारलं पंकजाचं काय होईल? मी चॅनलला काम करतो, त्यामुळे अजून तरी असा समज की ह्यांना जरा जास्त कळतं किंवा माहिती असतं. मी म्हणालो, काही सांगता येत नाही पण विचारलंच तर सांगतो, पंकजा पराभूत होणं त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. का?

गेल्या 10 वर्षापासून पंकजा मुंडेंचं राजकारण बघतोय, ऐकतोय पण असं एकदाही वाटलं नाही त्यांच्यात काही तरी आश्वासक आहे. त्यांनी अशी एकही भूमिका घेतलेली आठवत नाही की ज्यामुळे हुरळून जायला होईल. किंवा राजकीय मोठेपणा दिसला नाही की ज्यानं डोळे दिपून जातील. उदा. द्यायचं तर कालचंच घेऊया. पराभवानंतर पंकजा मुंडे माध्यमासमोर आल्या आणि त्यांनी नम्रपणे पराभव स्वीकारल्याचं सांगितलं. धनंजय मुंडेंचं त्यांनी नाव सुद्धा घेतलं नाही. क्षणभर मला वाटलं मी त्यांच्या जागी असतो तर काय केलं असतं?

संध्याकाळ होता होता त्याचं उत्तर राम शिंदेंकडून मिळालं. ज्या रोहीत पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला, त्यांना घरी नेऊन विजयाचा फेटा बांधला. स्वत:च्या आईकडून रोहीतचं औक्षण केलं. रोहीतनेही नम्रपणे शिंदेंच्या आईचे पाय धरले. दोन शब्द आभाराचे मानले. पंकजा मुंडेंना हे सगळं धनंजयबद्दल करता आलं नसतं? करता आलं असतं पण त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जय-पराजयापेक्षा काही संस्कार मोठे लागतात. एवढ्या कडवट वातावरणात पंकजानं धनंजयचं औक्षण केलं असतं तर बघणाऱ्यांचेही डोळे पानावले नसते ? पराभवातही पंकजाचं मोठेपण दिसलं नसतं? दिसलं असतं पण हे सगळं करण्यासाठी उसना मोठेपणा नाही चालत, तो पंकजा आणणार कुठून ?

पंकजा काळाकडून किंवा आजुबाजूच्या नेत्यांकडून काहीच शिकत नाहीत असं मला कायम वाटत आलंय. अगदी त्या ढ विद्यार्थीनी आहेत असं म्हटलं तरी चालेल. उदा. बघुया. आता यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणारच असं वाटत असतानाच 95 साली त्यांचा पराभव झाला. त्यावेळेस मी लातुरला कॉलेजला होता. त्याच वेळेस भाजपाकडून गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे ज्या रेणापूर मतदारसंघाचं गोपीनाथराव नेतृत्व करायचे तो विलासरावांच्या मतदारसंघात यायचा. मुंडे-देशमुखांची मैत्री सर्वश्रृत होती. गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होताच त्यांचा पहिला जंगी नागरी सत्कार लातूरमध्ये झाला. तो केला पराभूत झालेल्या विलासरावांनी. त्याबद्दल थोडी काँग्रेसकडून नाराजीही व्यक्त केली गेली पण पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन काही गोष्टी करायला लागतात. ती करण्याची धमक आणि मोठेपणा विलासरावांनी दाखवला.

दुसरा एक प्रसंग शरद पवारांचा. पवारांच्या गोटातल्या एका पत्रकारांनी सांगितलेला हा प्रसंग. खरंखोटं तेच जाणो. ते म्हणाले, शरद पवारांना मी एकदाच थरथर कापताना बघितलं, ते प्रचंड अस्वस्थ होते आणि तो काळ होता गोवारी हत्याकांडाचा. गोपीनाथ मुंडेंनी ज्याप्रमाणं आरोप करायला सुरुवात केली होती आणि त्याला जो प्रतिसाद महाराष्ट्रात मिळत होता त्यावेळेसचा. आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा महत्वाचा भाग. पवारांची स्थिती समजण्यासारखी आहे. पण ज्यावेळेस त्याच गोपीनाथ मुंडेंचा कथित अपघाती मृत्यू झाला, त्यावेळेस लोकसभेच्या पोटनिवडणुकीत बीडमधून त्यांच्या मुलीसमोर पवारांनी उमेदवार दिला नाही. का ? काही काही गोष्टी संस्काराचा भाग असतात. पंकजा मुंडेंना असं धनंजय सोबत वागण्याची किती तरी वेळा संधी आली ती त्यांनी का नाही घेतली ? धनंजय मुंडे मात्र अशी संधी नेहमी घेताना दिसतात. फॉर्म भरण्याच्या अगोदरही ते गोपीनाथ गडावर आले आणि आमदार झाल्यावरही. पंकजा कधी धनंजयचे वडील पंडीतअण्णा मुंडेंच्या समाधीवर गेल्या किंवा त्यांच्याबद्दल कधी काही बोलल्या ? माझ्या तरी ऐकण्या बघण्यात नाही.

धनंजय तर सोडाच पण त्या कुठल्याच महत्वाच्या प्रसंगी एखादी परिपक्व राजकीय भूमिका घेताना दिसल्या नाहीत. अगदी त्यांच्या मानलेल्या सगळ्या भावांचा पराभव झाला तरी. म्हणजे महादेव जानकरांचं देवेंद्र फडणवीसांनी जवळपास राजकारण संपवत आणलं, त्यावर त्या गप्प? ज्या खडसेंनी आयुष्यभर गोपीनाथरावांना सगळ्या प्रसंगात साथ दिली, त्यांचं तिकिट कापल्यानंतर, त्यांच्या कन्येचा पराभव होत असताना पंकजा गप्प कशा काय राहातात? लांबचं जाऊ द्या, ज्या बीड जिल्ह्यात जवळपास 13 हजार महिलांचे गर्भाशय काढले, ज्यात ऊस तोड कामगारांच्या बायकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे त्यावर महिला बालकल्याण मंत्री म्हणून काही ठोस पावलं उचलली? इथं रक्ताच्या भावाबद्दल ऐन मतदानाच्या तोंडावर जो क्लीपचा ड्रामा केला तो किती हिणपातळीचा होता हे कळत नव्हतं ? गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं भावनिक राजकारण त्या वर्षानुवर्षे कशा काय रेटतात, त्यांचा त्यांना थकवा कसा येत नाही ? देव जाणे.

ज्या ओबीसींचं त्या नेत्या असल्याचं सांगतात, त्यांच्या समांतर आरक्षणाचा एवढा मोठा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला असताना त्यावर त्या काही तरी बोलल्या? कुठली भूमिका घेतली ? ज्या वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून दावा करतात त्यांच्या वाढीव आरक्षणासाठी काही मोर्चे निघाले त्यावर पंकजांनी काही भूमिका घेतली ? चूक आहे, बरोबर आहे काही तरी भूमिका घेतली ? मग त्याच लोकांनी तुम्हाला घरी बसवलं तर चुकलं कुठं ? तुम्ही पावरफुल आहात तर ते बाष्काळ भाषणात नाही तर कामातून दिसलं पाहिजे. पावर ही वापरल्याशिवाय वाढत नसते हे पंकजांनी गोपीनाथरावांकडूनही शिकू नये ?

काही मुंडे भक्तांनी आतापासून पंकजा मुंडेंना कसं विधान परिषदेवर घेतलं जाईल आणि तिथून त्या पुन्हा कशा कॅबिनेट मंत्री होतील ह्याच्या वावड्या सोडल्या जातायत. त्या खऱ्याही होऊ शकतात. भगवानबाबा एवढ्याबाबतीत पाऊ शकतात. त्यात बिचाऱया भक्तांचा काही दोष नाही. एकतर्फी प्रेम करणाऱ्यांची अवस्था अशीच असते. पण पंकजा मुंडेंना स्वत:च्या राजकीय भविष्याची काळजी असेल तर हे आत्मघातकी वळण त्या घेणार नाहीत. त्या खऱ्या संघर्षकन्या असतील आणि स्वत:ला लोकनेत्या म्हणून घ्यायचं असेल तर त्या ‘वरून’ न येता पुन्हा लोकांमध्ये जातील आणि तिथूनच परत येतील. पराभवाच्या दुसऱ्या दिवसाची जी सकाळ असते तिच्यासारखा शिक्षक नाही. पण त्यासाठी त्यांनी ज्या मैदानावर पराभव झाला त्या मैदानावर मुक्काम ठोकायला हवा. 80 वर्षांच्या शरद पवारांकडून एवढी गोष्ट तरी पंकजा शिकतील ?

(लेखक टीव्ही 9 मराठीचे कार्यकारी संपादक असून लेखाचा चॅनलशी काही संबंध नाही)

Previous articleविमी- बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री
Next articleदेवाच्या काठीला आवाज नसतो !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.