पाकिस्तानच्या बॉर्डरवरून…

-अविनाश दुधे

दिनांक -२३ जून २०२१

पाकिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या Tyakshi व Turtuk या गावांना आज जाऊन आलोत. या गावांची वेगळीच कहाणी आहे. बाल्टिस्तानचा भाग असलेली ही गावे १९४७ ते १९७१ पर्यंत पाकिस्तानाचा भाग होती. १९७१ च्या युद्धात भारताने या दोन गावांसह Chalunkha, Thang व आणखी काही गावे जिंकून घेतली.

फाळणीचा भोग वाट्याला आलेल्या कोणत्याही गावांसारखीच या गावांची कहाणी आहे. कागदावर आखली गेलेली सीमारेषा त्या गावांतील लोकांसाठी आयुष्यभर ठसठसती जखम ठरते आहे. Tyakashi, Turtuk या गावांच्या वाट्यालाही ही वेदना आली आहे.

रक्ताच्या नात्याचे सगेसोयरे अवघ्या २-३ किलोमीटरवर आहे. पण कित्येक वर्षे उलटलीत त्यांचा चेहराही पाहता येत नाही. त्यांना भेटायचं असल्यास पासपोर्ट, व्हिसाची भानगड पूर्ण करून वाघा बॉर्डरमार्गे लाहोर-इस्लामाबाद-स्करदू असे २५०० किमी अंतर पार करून त्यांना जिवलगांना भेटता येतं. मात्र यासाठी येणारा खर्च येथे कोणाला परवडत नाही. त्यामुळे कोणीही तो द्रविडी प्राणायाम करत नाही.अलीकडे मोबाईल आल्यापासून व्हाट्स अपवर संपर्क करता येतो. पण सीमेलगतचे गाव असल्याने येथील मोबाईल सेवा वारंवार खंडित केली जाते. येथील लोक कोणाशी बोलतात, यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असते.

Tyakshi चे मुखिया (नंबरदार) हाजी अब्दुल कादीर ७८ वर्षाचे आहेत. त्यांना पाकिस्तान-भारत दोन्ही देशाचे नागरिक असण्याचा अनुभव त्यांना आहे. ते सांगतात-‘माझा सख्खा भाऊ व अनेक नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. येथून १० किमीवर ते राहतात. पायी जरी निघालो तरी दोन तासात पोहचता येते. पण १९७१ नंतर त्याची भेट नाही. शेवटी काही वर्षांपूर्वी तो गेला.आमची भेट झालीच नाही.’

अब्दुल कादीर म्हणाले, ‘आमच्या दोन्ही देशाच्या सरकारकडून काही अपेक्षा नाही. फक्त वर्षातून एखाद्या वेळी तरी आमच्या नातेवाइकांना भेटता यावं. वयाच्या ७७ व्या वर्षी दुसरी काही अपेक्षा नाही.’ कादीर यांच्या डोळ्यातील पाणी येथील नागरिकांची व्यथा सांगून जात होती.

येथे अशा कहाण्या अनेकांच्या आहेत. १९७१ मध्ये कोणाची पत्नी, कोणाचा नवरा, कोणाचे आई-वडील इकडे किंवा तिकडे राहून गेले. नंतर भेटीचे सारे मार्गच बंद झालेत. या दोन्ही गावातील अनेक लोक पूर्वी पाकिस्तान सरकारच्या सेवेत, सैनिकांत होते. ते तिकडेच राहिलेत.

या गावाच्या सीमेवर भारत-पाकिस्तानचा कडक पहारा आहे. अब्दुल कादीर येथील जुन्या सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारातून समोरच्या पर्वतरांगेकडे बोट दाखवून सांगतात- हा डोंगर पाकिस्तानच्या ताब्यात, तर…बाजूचा भारताच्या. येथील प्राथमिक शाळेची जुनी इमारत १९६९ पाकिस्तान सरकारने बांधली होती. पुढे१९७१ मध्ये भारत सरकारने याच इमारतीत शाळा सुरू केली.

या गावात भारतीय सैनिकांचा कॅम्प आहे. भारतीय सैन्याने या गावाला जवळपास दत्तकच घेतले आहे. येथे भारतीय सेनेने आर्मी वेल्फेअर स्कुल सुरू केले आहे. या शाळेत शिकून अनेक स्थानिक मुलं डॉक्टर झाली आहेत. प्रशासनातही अनेक मुलं-मुली आहेत.

भारतीय सेनादल येथील नागरिकांसाठी केवळ शाळाच चालवत नाही तर अस्थायी स्वरूपाची पण नियमित पैसे मिळतील, असे अनेक कामे त्यांना उपलब्ध करून देते. येथील शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका नजमा म्हणाल्या, ‘भारतीय सैन्याचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आमच्या नवीन पिढीचे आयुष्य बदलत आहे, त्यामागे केवळ भारतीय सेनादल दल आहे.’ येथील अनेकांची ही भावना आहे.

Turtuk येथे बाल्टिस्तान राजघराण्याच्या तीन शाखांपैकी एका शाखेचे विद्यमान राजे मोहम्मद खान यांची त्याच्या ४०० वर्ष जुन्या महालात (ज्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे) भेट झाली. त्यांचा महाल आता पार मोडकळीस आला आहे. जुने वैभवही लयास केले आहे. मोहम्मद खान स्वतःच आता स्वतःच्याच संग्रहालयात गाईडची भूमिका बजावून शे-पाचशे रुपये कमावतात.

खान यांनीही पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशाच्या नागरिकत्वाचा अनुभव घेतला आहे. कोणता देश अधिक आवडला, असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘साहेब, भारत असो वा पाकिस्तान किंवा इतर कुठलाही देश, तो आपल्यासाठी काही करत नसतो. आपल्या उपजीविकेसाठी आपल्यालाच मेहनत करावी लागते.’

‘१९४७ पूर्वी बाल्टिस्तान च्या प्रदेशाला ब्रिटिशांनी भरपूर स्वायत्तता दिली होती. १५ ऑगस्ट ४७ पासून वर्षभर आमचे पूर्वजच राजे होते. मात्र ४८ मध्ये जिनांनी भारताची भीती दाखवून आमचा सुंदर प्रदेश ताब्यात घेतला. तेव्हा आम्हाला आमची स्वायत्तता कायम राहील, असे सांगितले होते, पण ते कागदावरच राहिले. नंतर खूप जाचक कायदे आमच्यावर लादले. त्या तुलनेने भारताचा, येथील सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांचा अनुभव छान राहिला.’

बाकी येथील मुस्लिम जनता अतिशय प्रेमळ व अतिथ्यशील वाटली. अनेक वर्षे जगापासून संपूर्ण तुटलेल्या अवस्थेत ते होते. त्यामुळे त्यांच्या जुन्याकाळातील जगण्याच्या अनेक खाणाखुणा गावात आढळतात. पाण्यावर चालणारी पाणचक्की, चारा, कापून आणलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक घरासमोर दगडांची रास रचून बंदिस्त शेड तयार करण्यात आले आहे. २०१० पासून हा परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

बाल्टिस्तानी स्त्री-पुरुष व लहान मुले दिसायला अतिशय देखणे व गोड आहेत. पुरुष उंचेपुरे व बांधीव शरीरयष्टीचे आहेत.स्त्रिया अतिशय लाजाळू आहेत. बाहेरील व्यक्तींसोबत त्या कमी बोलतात. मुले चटपटीत आहे.

बाकी संपूर्ण लडाखप्रमाणे निसर्गाची मेहेरनजर येथेही आहे. लडाखमध्ये अत्यंत रंगाचे अनेक विभ्रम दाखवणाऱ्या पर्वतरांगा, नितळ, स्वच्छ पाण्याने वाहणाऱ्या नद्या व झरे असतात. मात्र सीमेवरील गावांना आणखी एक वरदान लाभलंय. येथे हिरवा रंगही भरभरून आढळतो. सफेदीसारखे आकाशाला भिडणारे वृक्ष, गव्हाची हिरवीगार शेती व जर्दाळूची झाडे या गावाच्या सौन्दर्याला चार चांद लावतात.

(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

Previous article‘बिर्याणी तो सिर्फ झांकी है…’
Next articleपँगाँग लेकचं स्वर्गीय सौंदर्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.