फराळ मनाला आणि बुद्धीलाही हवा असतो

-मुग्धा कर्णिक

दिवाळी गेली, त्यामुळे दिवाळीबद्दल काही लिहिले तर भावुक लोकांच्या भावनाबिवना दुखावण्याचा प्रश्न तेवढासा तीव्र व्हायचा नाही. त्यामुळे आता दिवाळीचा फराळ करणार्‍या आणि परंपरा सांभाळणार्‍या साध्यासुध्या स्त्रिया या विषयाचे विश्लेषण करायला हरकत नाही.

………………………………………………………………..

एक जाहिरात अलिकडेच आली होती. सून तयार फराळ आणून बरण्यांतून भरताना तिचा नवरा म्हणतो- हे काय, असलं काही आईला आवडायचं नाही. तिला स्वतःला फराळ करायला खूप आवडतं. तिला हे तू केलेलं अजिबात चालणार नाही. तेव्हा सून सांगते, सासूबाईंना माहीत आहे आणि त्यांची संमती आहे. या दिवाळीला फराळ करण्याचा वेळ त्या स्वतःला हवा तसा घालवणार असं त्यांनीच कबूल केलंय. मग ती तिच्या सासूबाईंसाठी काढलेली तिकिटं वगैरे सांगते- जो जाहिरातीचा भाग असतो.

ही जाहिरात खरंच खूप भावली.
घरोघरच्या मध्यमवर्गीय स्त्रिया घरादारासाठी फराळ करणे यासाठी रात्रीचा दिवस करून आणि कंबरडे मोडून घेऊन मोठमोठाले डबे भरून दिवाळीचे सात-आठ ठरलेले पदार्थ करण्यात दिवाळीच्या आधीचे काही दिवस घालवत असत.

पूर्वी घर-चूल-मूल याच महामंत्राने जीवन कंठणार्‍या स्त्रिया एकत्र कुटुंबात होत्या. दुसरे काहीच व्यवधान नाही आणि पाचसहा बायका एकत्र काम करताना हा सारा प्रकार जमवण्यासारखा होता. परातींच्या हिशेबाने सगळे पदार्थ करणे, त्यांची वाटावाटी करणे हा कदाचित काहीजणींसाठी विरंगुळा, मन रमवण्याची एक संधी असू शकली असती.

साठ-सत्तरच्या दशकानंतर जसजशी कुटुंबे स्वतंत्र होऊ लागली, स्त्रियांच्या कमाईची गरज पडू लागली आणि स्त्रिया घरची नि बाहेरचीही आघाडी सांभाळू लागल्या तसतशी सणवार हे एक जबरदस्तीचे ओझे होऊ लागले हे निदान काही बायकांना निश्चित पटेल. परंपरा सांभाळण्याचा बडीवार माजवणार्‍या, पितृसत्ताकात मुरलेल्या स्त्रियांना हे पटणार नाहीच.

परंपरा सांभाळण्याचा किंवा तोडण्याचा मुद्दा घडीभर बाजूलाच ठेवू. दिवाळीचा फराळ या गोष्टीत गुंतलेल्या कष्टांचा, व्यर्थतेचा आणि त्याचबरोबर बदललेल्या आर्थिक स्थितीचा विचार आपण स्त्रियांनी करायलाच हवा.

एक म्हणजे ही साताठ पदार्थांचा फराळ करण्याची परंपरा तशी अगदीच अलिकडची. पैसेवाल्या, जमीनदारी, खोती असलेल्या घरांतून असा फराळ होत असे. पण शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजातच काय गरीब पुरोहितांच्या घरांतही पोहेदिवाळी असे. मळणी करण्याचा मौसम म्हणजे दिवाळीचा मौसम. नव्या धान्याचा उत्सव. कोकणासारख्या भातपिकाच्या प्रदेशात पोहेदिवाळी असे. गूळपोहे, दूधपोहे, दहीपोहे, चिंचेच्या कोळातले पोहे, ताकातले पोहे आणि फार भारी म्हणजे फोडणीचे किंवा दडपे पोहे रोजच्या रोज ताजे करून खाण्याचा उत्सव. तळणीच्या पदार्थात बोरं- म्हणजे तांदळाच्या पिठात गूळ कालवून बोराएवढे गोळे तळून काढत. जिथे भात नाही तिथं गव्हाच्या पिठात गूळ कालवून बोरं. हे असलं साधंसुधं गोडाधोडाचं खाऊन पुन्हा अंगमेहनत होतीच. बोरं खाऊन पोरं खूष. दारावर येणार्‍या मागत्यांनाही तीच दिवाळी- पसाभर पोहे आणि ओंजळभर बोरं. हे सारं आता पुरतं विस्मरणात गेलं.

आज आपल्याकडे जीवनशैली पार बदलली. विकारांचा हल्ला बदलला. आपण सणांच्या खादाडीत बदल केला तो आर्थिक सुबत्तेला साजेसा केला, बदलत्या जीवनशैलीशी पूर्ण विपरीत असा. विशेषतः स्त्रियांचे कष्ट वाढवणारा आणि खाणार्‍यांची तब्येत बिघडवणारा.

स्वतंत्र झालेल्या चारपाच माणसांच्या कुटुंबातल्या बायका जवळपास एकट्याने फराळासाठी राबतात आणि अनेकदा तब्येती बिघडवून घेतात याचा आपण विचार करायला हवा ना?

एक तर ते सारे परातींच्या हिशेबातले पदार्थ तुपातेलात तळलेले, मळलेले, पांढर्‍या साखरेत घोळलेले असतात. काही काळापूर्वी खाण्याची विविधता कमीच होती तेव्हा त्यांचे अप्रूप होते. आता परंपरा म्हणून तेच ते तेच ते करत कंबरडे मोडून घेताना निदान या पदार्थांची आरोग्याच्या दृष्टीने काय पत आहे ते तरी तपासून घ्यायला हवे. आणि हे काम सध्या तरी स्त्रियांनीच करायचे आहे.

परिचयात एक कुटुंब आहे. नवरा मधुमेही, बायको मधुमेहाच्या उंबरठ्यावरची, दोन्ही मुले जाडीजाडी- पण ते दिवाळीचे पदार्थ करायलाच हवे हे मानेवरचे जू काही बाई खाली ठेवत नाहीत. चार पदार्थ घरी करायचे, चार बाहेरून मागवायचे- हे झाले नाही तर घरात काहीतरी विपरीत घडेल ही अंधश्रद्धा. साखरेतले पदार्थ खरे तर या संपूर्ण कुटुंबाने वर्ज्य करायला हवेत. पण नाही. मग सण कसला. याला विरोध केला तर नवर्‍यावर फुरंगटून बसणार. हे बदलायला हवं हे पटवून घेणेच नाही.

परवा एक पुरुष ओळखीच्या बाईला सांगताना ऐकलं, ए ताई, घरी ये ना फराळाला. बायकोने चिक्कार करून ठेवलंय. आम्ही कुणी खात नाय. करायचं म्हणून करते. सांगून ऐकत नाय. तुला खाऊन चालतंय तर तू तरी ये… ती म्हणाली, मग शेजारीपाजारी वाटून टाका. तर म्हणाला, कुणाला देणार नाय, सगळे नालायक आहेत शेजारी. म्हणून ओळखीच्यांना घरी बोलवतोय. ये तू. ती म्हणाली, अरे बाबा, घरचा फराळ झाला थोडा, आता तुझ्याकडं येऊन काय करू.

दिवाळीत घरी आलेले पाहुणे म्हणतात- अहो, तेवढं फराळाचं देऊ नका. नुसता चहा चालेल बघा. फराळ नको.
आजकाल तयार फराळ मिळतो, अनेक सामान्य परिस्थितीतल्या स्त्रिया फराळ तयार करतात. त्यांच्याकडून मोजकाच

फराळ विकत आणावा खुशाल. आणि नेमकाच खावा. अनेकदा यातला फराळ वाईट दर्जाच्या तेलात किंवा वनस्पती तुपात केलेला असतो म्हणून स्वतः करायची खटपट असते. हे खरंय की वनस्पती तुपातले पदार्थ खाऊच नयेत. पण वाईट तेलातले तळणही टाळायलाच हवे. याला उपाय गरजू बायकांना घरी बोलावून सामान देऊन फराळ करवून घेणे. (आणि हो त्यात जातपात पाहू नये.) आणि भाराभर करूही नये. पूर्वी खाण्यापिण्याची वानवा होती तेव्हा टिकणारे पदार्थ करून ठेवणे रास्त होते. आताही काही पदार्थ दिवाळीसाठीच नव्हे तर नेहमीसाठीही वरचेवर करायला हरकत नाही. कुरमुर्‍यांचा, पातळ पोह्यांचा, भाजक्या पोह्यांचा चिवडा हे दिवाळीसाठीच नव्हे तर रोजच्या मधल्या वेळच्या चबिनचार्‍यासाठी जरूर घरात ठेवावेत. पण बाकी डबेच्या डबे भरून, चकल्या, कडबोळी, शंकरपाळ्या, करंज्या-कानोले, लाडू करणे हे फारसे आरोग्यदायी नाही.

याच फराळाची मोठी मागणी अमेरिका वगैरे देशात स्थिरावलेल्या भारतीयांकडून असते. भलीमोठी उलाढाल असते. पण तेही जेव्हा मागवतात तेव्हा दोन ते तीन खाण्यांत संपेल एवढेच मागवतात. आज ही उलाढाल चौदा कोटींच्या घरात आहे. पारंपरिक खाण्याची हौस अशा रीतीने समाजातील दुर्बळ स्त्रियांना हात देत असेल तर चांगलेच आहे.

पण घरोघरच्या स्त्रियांनी तो सर्व उटारेटा करणे आणि त्यात स्वतःच्या प्रकृतीबरोबरच घरच्यांच्या प्रकृतीचीही वाट लावून घेणे हे एक प्रकारे दिवाळीत अकलेचे दिवाळे एवढेच म्हणेन.

शरीर जपाल तर मन-बुद्धीही जपाल. हे स्त्रियांनी लक्षात घ्यायलाच हवे. त्यागमूर्ती बनून, जागरणे करून, दिवाळीचा फराळ करणे यात फार काही थोरवी नाही. त्याऐवजी, एकदोन चांगली पुस्तके वाचा. दिवाळी अंक वाचा, संगीत ऐका, चित्रपट, नाटके पहा, फिरायला जा, एखाद्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला भेट द्या किंवा मदत करा. मुलाबाळांसोबत, आईवडिलांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत चांगला वेळ घालवा. फराळ मनाला आणि बुद्धीलाही हवा असतो.

ही दिवाळी तर गेली- पुढल्या दिवाळीला वेगळे काय करता येईल याचा विचार करा.
विवेकाची जपणूक स्त्रियांना हर प्रकारे करायची आहे. स्त्रीच्या पारंपरिक भूमिकेत विवेकाची जपणूक जवळपास होतच नाही. त्यामुळे परंपरांना मोडणे वा मुरड तरी घालणे महत्त्वाचे ठरते.

(–साभार: आपलं महानगर)

Previous articleस्वप्ने त्यांना साद घालतात
Next articleफॅशिस्ट मुस्कटदाबी फार काळ टिकत नसते.
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here