फिर भी दिल है हिंदुस्थानी!

– संजय आवटे
—————————–
राजकपूरसारख्या निळ्या डोळ्यांच्या जादूगारानं आपल्या पोतडीतून जे बाहेर काढलं, ते त्या काळाचं अपत्यच तर होतं! नेहरुंनी दाखवलेलं स्वप्न, तीच निरागसता, साध्या माणसाच्या मनातला उत्तुंग आमविश्वास हे सगळं तेव्हा सिनेमात येत होतं. कृष्णधवल पडद्यावरच्या प्रतिमांना नेहरु युगानं शब्द दिले. शब्दाला अर्थ दिला. अर्थांना रंग दिले.
‘मेरा जूता है जापानी, 
ये पतलून इंग्लिशस्तानी, 
सर पे लाल टोपी रुसी, 
फिर भी दिल है हिंदुस्थानी’
असं ‘श्री ४२०’ मध्ये म्हणणारा राज कपूर ही नेहरुंची ‘आयडिया ऑफ इंडिया’च तर होती. नासेर आणि टिटोंसोबत अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी करत ‘आंतरराष्ट्रीयवाद’ सांगणारे आणि तरीही आतून भारतीय असलेले नेहरुच असे स्वप्न देऊ शकत होते.
एरव्ही, ‘श्री ४२०’ हा सिनेमा कधीचा? जागतिकीकरणापूर्वीचा आणि पहिली सार्वत्रिक निवडणूकही अद्याप व्हायची होती, तेव्हाचा. त्यावेळी हे शब्द सुचावेत, यामागची प्रेरणा स्वाभाविक होती.
‘चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी’, असं मुकेशच्या आवाजात ऐकताना, लोकांनी ते किती रिलेट केलं असेल!
भारत म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे भारत, हे नेहरु सांगत होते आणि या अद्वैतानं प्रत्येकजण तीच उमेद घेऊन जगत होता. आपापतः भारतही त्याच अंगभूत उमेदीनं झेपावत होता. ‘हम सिंघासन पर जा बैठे, जब जब करे इरादे’ हा आत्मविश्वास त्यातूनच तर येत होता! वाट खडतर आहे, पण आपण ती पार करु, या उमेदीनं भारतीय निघालेले होते. याच वाटेवरुन चालण्याचा प्रयत्न सिनेमा करत होता.
‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा’ हे गाणं ज्या ‘धूल का फूल’मध्ये आहे, त्याचे दिग्दर्शक यश चोप्रा जाहीरपणे म्हणाले होते, “हा सिनेमा आला १९५९ मध्ये. तेव्हा मी २७ वर्षांचा होता. पण, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता या नेहरुंच्या मूल्यांनी आम्हा तरुणांना अक्षरशः झपाटून टाकले होते. तीच स्वप्नं आम्हीही बघत होतो!” ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिलेले ‘जागते रहो’, ‘आवारा’ अथवा बी. आर. चोप्रांचा ‘नया दौर’बघा. तीच आशा. तीच उमेद. हे तर काहीच नाही. १९५४ च्या ‘जागृती’ मध्ये मोहम्मद रफीच्या आवाजात ‘हम लाये है तुफान से किश्ती निकाल के,  इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के…’ हे गाणं सुरु होतं. आणि, गांधी-नेहरुंच्या प्रतिमा कॅमेरा झूम करुन दाखवू लागतो. कोणत्या वादळातून ही नौका इथवर आणलीय, हे त्या पिढीला नीटपणे माहीत होतं. सिनेमा तेच चित्रित करत होता.
***
‘कलेनं, साहित्यानं मला घडवलं’, असं नेहरु म्हणत. टागोरांचा अमिट ठसा नेहरुंवर. म्हणूनच आयआयटी, आयआयएस उभ्या करतानाच संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, पुण्याची एफटीआयआय या संस्थाही नेहरु उभारत होते. उद्याचा भारत कोणत्या दिशेनं जाणार आहे, याची नेहरुंना कल्पना होती. स्वातंत्र्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी आण्विक ऊर्जा संशोधन मंडळाची बैठक नेहरु बोलावत होते. असे करणारे नेहरु एकटे नव्हते. जगात सर्वत्र तेच चालले होते. नेहरु त्या जगासोबत होते. इंग्लंडने असे प्रयोग सुरु केले होते. तिकडे फ्रान्सनेही त्यासाठी आपल्या प्रयोगशाळा अहोरात्र सुरु ठेवल्या होत्या. रशिया अजिबातच मागे नव्हता. हिरोशिमा-नागासकीवर आण्विक बॉम्बस्फोट करणारी अमेरिकाही समजून चुकली होती की, हा रस्ता खरा नाही. अणूचा उपयोग शांततामय कारणासाठी झाला पाहिजे, हे सर्वांना समजत होते. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने दुस-या महायुद्धात अणुबॉम्ब टाकून, बेटांवर वसलेली दोन टुमदार शहरं बेचिराख करुन टाकली. दीड लाख लोकांनी प्राण गमावले आणि कायमचे अपंगत्व कितींना आले, याची गणती नाही. दुस-या महायुद्धाने आण्विक सामर्थ्याचा विध्वंसक प्रत्यय दिला हे खरे, पण त्यानंतरच त्याच्या विधायक क्षमतेचा अंदाज जगाला येऊ लागला. जगदीशचंद्र बोस तेव्हा, नेहरुंनीच स्थापन केलेल्या, बंगळुरुच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’चे संचालक होते. त्यांनी या दिशेने काम सुरु केलेले असताना, तिकडे विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगत होत्या की आण्विक ऊर्जा ही उद्याच्या अर्थकारणाची कळ ठरणार आहे. वातावरण असे भारलेले होते. 
गांधींकडून नेहरुंकडे देशाची सूत्रे गेल्यानंतर गांधींच्या काही धारणांपासून देश दूर गेला. पण अंतिमत: आशय तोच होता, जो गांधींना हवा होता. १९२० आणि १९३० चे दशक जसे गांधींचे होते, तसेच ४० आणि ५० चे दशक नेहरुंचे होते. देशाच्या उभारणीच्या काळात सलग १७ वर्षे नेहरुंसारखे पंतप्रधान लाभणे हीच भारतासाठी मोठी जमेची बाजू होती. हॅरो, केम्ब्रिजमधून शिकलेले नेहरु ख-या अर्थाने आधुनिक आणि विज्ञानवादी होते. गांधींप्रमाणे नेहरुही बॅरिस्टर. त्यांच्यामध्ये साधर्म्याचे मुद्देही बरेच होते. भारताविषयीची दोघांची कल्पना सारखीच होते. धर्म, भाषा, वंश अशा वैविध्यांना कवेत घेणारा बहुपेडी भारत दोघांनाही खुणावत होता. दोघांनाही अहिंसा महत्त्वाची वाटत होती. आणि लोकशाही हाच एकमेव मार्ग आहे, याविषयी त्यांचे एकमत होते. डिसेंबर १९२९ मध्ये अवघ्या ४० वर्षांचे नेहरु काँग्रेसचे अध्यक्ष झाले. एका अर्थाने ते काँग्रेसचे पाश्चात्य जगातले दूत बनले होते. भारतीय स्वातंत्र्याचा संदेश नेहरुंनीच जगभर पोहोचवला. १९३७ आणि १९४६ च्या निवडणुकांमध्ये ते पक्षाचे ‘पोस्टरबॉय’ होते. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुच पंतप्रधान होणार हे नक्की होते.
१९२७ मध्ये युरोप दौ-यावर असताना, ब्रुसेल्समध्ये झालेल्या ‘कॉंग्रेस ऑफ ऑप्रेस्ड नॅशनॅलिटिज्’ला नेहरु उपस्थित राहिले. साम्राज्यवादविरोधी जागतिक परिषदेवर त्यांची निवड झाली. रशियन राज्यक्रांतीच्या दहाव्या वर्धापनदिन सोहळ्याला ते मॉस्कोत हजर राहिले. तसे खास निमंत्रण त्यांना होते. ‘केंब्रिज’मधल्या दिवसांपासून नेहरु समाजवादाकडे आकर्षित झाले होते. ब्रिटिश लेबर पार्टीच्या ते संपर्कात होते. जगाचे भान असलेल्या नेहरुंना काळाचे भान होते आणि जग कसे बदलते आहे, याचा अंदाजही होता! भारतावर प्रेम करतानाच, एक वैश्विक समंजसपण हवे, हे त्यांना समजलेले होते. अवघ्या मानवी समुदायाशी नेहरु संवाद करत होते. ‘राष्ट्रवाद ही नैसर्गिक आणि आरोग्यदायी अशी वाढ आहे. राष्ट्रवादाची हाक हृदयाला सतत हलवणार, हे आपण कबूल केले पाहिजे. मानवी मनाला त्याची सनातन ओढ आहे, हे लक्षात ठेऊन या भावनेला आपण वावही दिला पाहिजे. पण, मर्यादित क्षेत्रातच. कारण, अवघ्या मानवी समुदायाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे.’, असे नेहरु तेव्हाच सांगत होते. (आज जे मॅक्रॉन यांना अधोरेखित करावे लागते आहे!)
हे वैश्विक समंजसपण तुमच्या पिढीकडं आहे. आमच्यावेळी क्रिकेटच्या मैदानात भारत हरला तर आपणच हरल्यासारखे वाटायचे आम्हाला. अगदी सुतकच घरात. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे तर जणू युद्ध. आता तुमच्या ‘आयपीएल’ मध्ये ‘चेन्नई सुपर किंग्ज’चा कॅप्टन धोनी असतो. तेव्हा त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा शेन वॉट्सन, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसीस आणि इम्रान ताहिर, इंग्लंडचा सॅम बिलिंग्ज, वेस्ट इंडिजचा ब्राव्हो हे सगळे त्याच टीममध्ये असतात. आणि, कोच असतो न्यूझीलंडचा! फिफा वर्ल्ड कपमध्ये आपला संघ नसल्याने, लोक ‘मेरी दुसरी कंट्री’सोबत थिरकताना दिसत होते. कोणी स्पेनसोबत होते, तर कोणी जर्मनीसोबत; कोणी मेस्सीच्या अर्जेंटिनासोबत, तर कोणी रोनाल्डोच्या पोर्तुगालसोबत, तर कोणी ब्राझीलच्या नेमारसोबत! देशाच्या सीमा किती धूसर होतात इथं. आणि, हे चांगलं आहे. कारण, देशभक्तीच्या नावानं उगाच गळे काढत बसण्यापेक्षा जगाशी नाते जोडणे अधिक महत्त्वाचे असते. राष्ट्रवाद महत्त्वाचा आहेच, पण आंतरराष्ट्रीयवाद त्यापेक्षा मोठा. आपण ‘माणूस’ असू तर देशाच्या सीमाही ओलांडता यायला हव्यात. नेहरु हे तेव्हाच सांगत होते.
***
नेहरुंचा एक चरित्रकार म्हणतो त्याप्रमाणे, नेहरु ही वेगळ्या प्रकारची व्यक्ती असती, तर भारतही तसाच वेगळ्या प्रकारचा देश झाला असता! ‘नेहरु आणि भारत’ हे समीकरण असे दृढ होते की नेहरुंच्या निधनापूर्वी एक वर्ष अगोदर अमेरिकेतल्या एका प्रख्यात पत्रकाराने ‘After Nehru, Who?’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. दुसरा एक अमेरिकी पत्रकार त्यावर म्हणतो, ‘नेहरुंनंतर काय? तर नेहरुच. नेहरुंनी सतरा वर्षात देशाची जी बांधणी केली, त्याच अधिष्ठानावर भारत पुढे-पुढे जात राहणार आहे!’ शशी थरुर म्हणतात त्याप्रमाणे, ‘लोकशाही संस्थांची उभारणी, भारतीयत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, अलिप्त राष्ट्र चळवळीला गती देणारे आंतरराष्ट्रीय भान हाच तो पाया आहे, जो नेहरुंनी दिला. त्यामुळेच अनेक खाचखळगे असूनही भारत दिमाखात पुढे जात राहिला.’ 
***
भारतीयांचं किती प्रेम असावं नेहरुंवर, या संदर्भातील एक गोष्ट रामचंद्र गुहा आपल्या ‘Patriots and Pakistan’ या पुस्तकात सांगतात. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नेहरु बंगालमधील खरगपूरमध्ये गेले होते. विविध जात-धर्म-भाषांचे लोक असणारं हे शहर. चार्वी, तुझ्या मामाचा मुलगा खरगपूर आयआयटीमध्ये शिकतो ना! नेहरुंनीच १९५१ मध्ये स्थापन केलेलं हे कॉलेज. त्याच्याकडून ऐकलं असेल तू खरगपूरविषयी. तर, नेहरुंच्या त्या सभेला प्रचंड गर्दी होती. तेलुगू भाषक महिलांचा एक ग्रुपही सभा ऐकायला आला होता. त्यातली एक महिला गरोदर होती. तरीही ती आली होती. नेहरुंना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी. सभा सुरु असतानाच त्या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. मग इतर महिलांनी तिच्याभोवती कडं केलं. तिचं बाळंतपण सुखरुप झालं. जन्माला आलेल्या बाळाचं नाव अर्थातच ‘जवाहर’ ठेवलं गेलं. नेहरु आणि भारत ही नाळ अशी आहे.
आपल्या मुलाला ‘टिपिकल वेस्टर्न’ करण्याचा प्रयत्न जवाहरलाल नेहरुंच्या वडिलांनी केला खरा, पण त्याच नेहरुंनी भारताचा शोध घेतला आणि भारताने नेहरुंना जन्म दिला.
नेहरु हे एक स्वप्न होते. एक आशा होती. निरागसतेला मिळालेला तो चेहरा होता. आधुनिकतेला दिमाख मिळवून देणारी ती सौंदर्यदृष्टी होती. हेच तर कारण होते, ज्यामुळे गांधींनी नेहरुंची निवड केली. स्वातंत्र्यानंतर देश घडवायचा तर अशा स्वप्नाळू नेहरुंची गरज आहे, हे व्यवहारी गांधींना उमजले होते. विकास अथवा नियोजन हे रुक्ष समाजशास्त्राने दिलेले कंटाळवाणे शब्द खरेच, पण नेहरुंनी त्याला कवितेचा स्पर्श दिला. आणि, पहिल्या दशकाचे हे काव्यच तर होते, ज्याने आशा आणि स्वप्न यांना जिवंत ठेवले. हे समजल्याशिवाय ‘आयडिया ऑफ इंडिया’ तर समजणार नाहीच. पण, आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे, हेही समजणार नाही.
बंगालचा दुष्काळ आणि फाळणी अशा आपत्तींचा सामना करणा-या देशाची कल्पना करा. निर्वासितांचे लोंढे आणि क्लेशकारक स्थलांतर यामुळे पिचून गेलेल्या देशाची तुम्ही कल्पना करा. या देशाचे काय झाले असते? निराशेच्या गर्तेत तो कोसळला असता. कदाचित हुकुमशाहीकडे गेला असता. मात्र, हा सारा हिंसाचार होऊनही नेहरुंच्या काळातील भारताला आशेचा निरागस स्पर्श झाला होता. भारतीयांना असे वाटत होते की, अशक्य ते आपण शक्य करुन दाखवले आहे. (साक्षात स्वातंत्र्य मिळवले आहे!) आताही आपण सर्व आव्हानांवर मात करु. ते नेहरु होते, ज्यांनी अवघ्या भारतीयांच्या मनात ही आशेची पणती प्रकाशमान केली होती. लहान मुलांना साजेलसी निरागस उत्कटता आणि कुतुहल त्यांनी सर्वदूर निर्माण केले होतेच, पण नागरिकत्वाच्या आत्मविश्वासासोबत एक आधुनिकताही दिली होती.
आजचा भारत हा नेहरुंचा भारत आहे! आणि, भारत अद्यापही घडतोच आहे. तो तुम्हालाही घडवायचा आहे. नेहरुंचा केवळ वारसा सांगून फारसा उपयोग नाही. त्यासाठी आजच्या भारतासमोरची आव्हानं समजली पाहिजेत. कारण, असा देश आपल्याला घडवायचाय, जो तुमचा आणि माझा असेल. जे तुमचं आणि माझं स्वप्न असेल. आकाश कपूर नावाचा लेखक आपल्या ‘इंडिया बिकमिंग’ या पुस्तकात म्हणतो,  Einstein once wrote of America that its people were always ‘becoming’, never ‘being’! अगदी त्याचप्रमाणे, भारतही रोज नव्याने घडतो आहे. भारताच्या उभारणीला नेहरु ‘अखंड चालू असलेली क्रांती’ असे म्हणत. ती अद्यापही सुरु आहे. 
*****
(लेखक ज्येष्ठ संपादक, उत्तम वक्ते आहेत)
9881256009
Previous articleनेहरू एकटे व एकाकी होते तेव्हा…
Next articleअचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.