बंटी और बबली: शामत और क़यामत

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*******

छोटे-छोटे शहरों से, खाली भोर-दुपहरों से

हम तो झोला उठाके चले..

बारीश कम-कम लगती है.. नदियां मद्धम लागती हैं

हम समंदर के अंदर चले..

हे परफेक्ट ‘स्मॉल टाऊन’ स्वप्न आहे. त्यात समंदरचा उल्लेख म्हणजे मायानगरी मुंबईबद्दलचं आकर्षण आहे. ‘मोठं बनण्याचं’ स्वप्न पाहणाऱ्या, देशातल्या प्रत्येक तरुण-तरुणीला मुंबईत येऊन करियर करायचं असतं. त्यांच्या भाषेत भल्या-भल्यांची ‘छुट्टी करायची’ असते. त्यात त्यांचं काही चुकत असेल तर एवढंच की, त्यांनी ती स्वप्नं नादानीने पाहिलेली असतात. त्यांची तयारी नसते. आणि मग काय होतं हे या सिनेमात अतिशय मनभावन पद्धतीने दाखवलंय, आणि त्यात गाण्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

एखाद्या सिनेमाच्या गाण्यांवर – फक्त गाण्यांवर एक लेख लिहायचा म्हणजे धाडसच. पण मी ज्या गाण्यांबद्दल लिहिणारे ती एवढी बेहतरीन आणि बेशक़ीमती गाणी आहेत की मला लिहितांना जेवढा मज़ा येणारे, तेवढाच आनंद तुम्हाला वाचतांना होणारे.. ही गाणी गुलज़ारने लिहीलीयेत. मी ती गाणी पूर्ण लिहिणार नाही, नाहीतर त्यातच लेख संपेल. फक्त त्यातल्या खास ओळींचा उल्लेख करेन. जो गुलज़ार हे लिहितो,

जीने केलिये सोचा ही नहीं दर्द सम्हालने होंगे

मुस्कुराओ तो मुस्कुराने के कर्ज़ उतारने होंगे

तोच ‘बंटी और बबली’मध्ये लिहितो,

इश्क़ां दे फ्लेवर घने..फ्लेवर घने..

नखरों के ज़ेवर बनें.. ज़ेवर बनें..

किंवा

बडा बडा कोयले से नाम फलक पे लिखना है..

चांद से होके जो सडक जाती है, उसी पे आगे जाके अपना मकां होगा..

किती ही गोड निष्पाप स्वप्नं!

म्हणून आज गुलज़ार!

भूमिकेच्या मानसिकतेचा अभ्यास करून, मानवी संवेदनांना शब्द देण्यात गुलज़ार पारंगत आहे. ‘बंटी और बबली’ हे स्मॉल टाऊनच्या बेसावध, नादान तरुणाईचं स्वप्न आहे. आपला देश अनेक स्मॉल टाऊन्सचा मिळून तयार झालाय. खऱ्या अर्थाने मोठी शहरं-मेट्रो सिटीज फक्त एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. मुंबई तर अनेक स्मॉल टाऊन्सची मिळून तयार झालीये. त्यात मधेच तुरळक मेट्रो सिटीजचे एलिट क्लास आहेत, पण बाकी सगळी स्मॉल टाऊन्सची भेळ. आणि तरीही मुंबईतल्या लोकांना ‘स्मॉल टाऊन्स’च्या नावाने नाकं मुरडण्याची बिमारी आहे. ती सगळ्याच मेट्रो सिटीजना असते.

मुंबईत जायचं आणि तिथे काहीतरी भव्य-दिव्य करायचं, खूप पैसा कमवायचा, हे स्वप्नं डोळ्यात घेऊन पळून आलेली दोघं. त्यांच्या प्रवासाची सुरुवातच लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या गाण्याने,

छोटे-छोटे शहरों से, खाली भोर-दुपहरों से…

अशी होते..!! त्यातलं ‘धडक-धडक’ ऐकून किती पोरांनी मनातल्या मनात मुंबईचं तिकीट काढलं असेल कोणजाणे. पण पूर्ण सिनेमा पाहिल्यावर ते कॅन्सलही केलं असेल.

त्यातली पुढची ओळ तर केवळ गुलज़ारच लिहू जाणे..

हम चले, हम चले ओये रामचंद्रsss..

यातला हा ‘रामचंद्र’ दिल्ली, एमपीत अनेक म्हणी, मुहावऱ्यात भेटतो. “XX में नहीं धागा और रामचंद भागा” ही म्हण तर प्रत्येक मुजोर, ‘बडबोल्या’साठी सर्रास वापरली जाते.

त्यानंतरचा कथेचा प्रवास कवेत घेत गाणी येतात. स्मॉल टाऊन्सच्या तरुणांची एक खासियत असते. मुंबई हे मूळ स्मॉल टाऊन असल्यामुळे इथल्या मूळ मराठी तरुणांत पण ती असते. एकतर त्यांच्यात एक अतिशय गोड असा ‘स्ट्रीट स्मार्टनेस’ असतो. त्यांना कुठूनही फेकलं तरी ते चार पायांवर पडतात. मेट्रोजमधल्या लोकांच्यात आलेला विचित्र सावधपणा त्यांच्यात नसतो. म्हणून ते काहीही ‘कर गुजरतात!’ त्यांच्यात सावधपणा नसला तरी ‘बेरकीपणा’ असतो. ते स्वत: काहीही करतील, पण फसवले जाणार नाहीत, नक्की. हा बेरकीपणा गाव सोडून शहरात आलेल्या माणसात असतोच, साहजिक आहे ते. हा पूर्ण सिनेमा म्हणजे स्मॉल टाऊनच्या तरुण-तरुणीत असलेल्या बेरकीपणाची कथा आहे. ताजमहाल पण विकून टाकणारा यातला बंटी जेव्हा प्रेमात पडतो, तेव्हा गातो,

देखना मेरे सर से आसमां उड गया है

देखना आसमां के सिरे खुल गये हैं जमीं से

प्रेमात पडणं हे त्याच्यासाठी इतकं जगावेगळं आहे की तो म्हणतो-

इस सदी में कभी ये हुआ ही नहीं

इथे गुलज़ारचं कौतुक वाटतं. गुलज़ार स्वत: स्मॉल टाऊनचा बाशिंदा आहे. तिथली माणसं कितीही, कशीही असली तरी त्यांच्यातला एक मोहक सच्चेपणा यात दिसतो. हे एकुलतंएक romantic love song. दोघं नाकापर्यंत प्रेमात बुडालेत हे सांगणारं.

मुंबईला यायला निघालेली नायिका म्हणते,

हम ही जमीं, हम आसमां

खसमानु खाये बाकी जहां

चार बुकं शिकलेली, थोडं इंग्रजी येणारी ही पोरगी पुढे गाते,

चांद का टीका मथ्थे लगाके

रातदिन तारों में जीनावीना इझी नहीं..

आहा.. आहाच..

आजा उडिये चल उडिये

आजा उडिये, उड विखीये..

चल झेप घेऊ.. भरारी घेऊन पाहू.. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, ‘नच बलिये!’ त्यातली स्वप्नं तरी किती मासूम.. तुला बांगड्या घेऊन देईन, झांजर घेऊन देईन.. कारण आपण जातोय ते प्रेमिकांचे गाव आहे.. इथे ‘हर कदम ये ख्वाबों का बिछौना है’.. पण तरी एक जाणीव आहेच हं..

रात यहां पे होती ही नहीं है

ये सडक तो सोती ही नहीं है..

हाच तो स्मॉल टाऊनच्या लोकांत मुंबईत येतांना जागृत झालेला स्ट्रीट स्मार्टनेस! हे गाणं नीट शेवटपर्यंत ऐकलं तर त्याच्या शेवटची एक गद्य लाईन मुंबईचा हिसका दाखवणारी आहे.

“दिल्ली से मुंबई आनेवाली ट्रेन Platform No १२ के बदले, Platform No ३६ पे आयेगी!”

ओह्ह..

एवढ्या मोठ्या स्टेशनमधून मुंबईत अक्षरश: ओतले जाणारे स्वप्नील डोळ्यांचे तरुण! पण हा सिनेमा काही देशभरातल्या तरुण पोरा-पोरींना ‘मुंबईत या’ अशी फूस लावणारा नाहीये, उलट ‘येऊ नका’ हेच सांगणारा आहे. आणि मुख्य म्हणजे तो आपला आजचा विषय नाहीये. ‘इन दोनों की जोडी, जोडी शामत और क़यामत’ या गुलज़ारने केलेल्या वर्णनाबरहुकुम, दोघांनी, ‘लूट लिये दुनिया को ठेंगा दिखाय के’ ही यातली गंमत आहे. बिनतोड यशस्वी झालेला हा सिनेमा, गुलज़ारची गाणी नसती तर एवढा यशस्वी होता ना!

अहो जाताय कुठे?? मिठाई अभी बाकी है..

“मेरी अंगडाई ना टूटे तू आजा..!”

 

उफ्फ..!! किती म्हणजे कित्ती खुलं आणि मादक निमंत्रण आहे! केवढा कमी टाईम दिलाय जालीमनं! मेरी अंगडाई ना टूटे, तू आजा! ही गुलज़ारची क़माल आहे. या गाण्याने अनेक तोहफे दिलेत. ‘बवाल मच गया,’ ‘रायता फैल गया,’ हे वाक्प्रचार दिल्ली, एमपीची वेस ओलांडून देशभर पसरले. पण ‘तिच्या’ बोलण्याला उपमा कसली देतोय गुलज़ार??

तेरी बातों में क़िमाम की खुशबू है!

आफ़रीन.. मर्हबा..!! दारू पिऊन घरी जातांना तोंडाचा वास घालवण्यासाठी पान खायचे असते, एवढेच माहित असलेल्या मेट्रो सिटीच्या प्रेक्षकाला ही लाईन ऐकून, क़िमामचं पान खाल्ल्यासारखी घेरी आली असेल. पानाच्या टपरीवर उभा राहून पान खाणारा तरुणच हे बोलू शकतो. इतकं सहज, इतकं दिलक़श लिहायचं असतं का रे मित्रा?? याच गाण्यात शेवटी ‘दरीबे कलां’पर्यंतचा जो प्रवास आखलाय ना गुलज़ारने, तो आपल्याला पण ‘पुरानी दिल्ली’त घेऊन जातो. अर्थात यात संगीताचा, कलाकारांचा सहभाग नाकारता येत नाही, पण मुळात गाणंच नसतं चांगलं तेव्हा कलाकाराने कितीही तीर मारले तरी ते वायाच जातात हे आपण अनेकदा पाहिलंय.

कठीण लिहिणं फार सोपं असतं, सोपं लिहिणं कठीण असतं.

‘हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू, हाथ से छुके उन्हें रिश्तों का इल्जाम ना दो,’

हे कदाचित फार सहज लिहिलं असेल गुलज़ारने.. पण तेवढ्यात सहजतेने त्याने ‘बंटी और बबली’मधे लिहिलं, “आंखे भी क़माल करती हैं,

(मिथिला सुभाष नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

Previous articleगज़ल-फळांनी लगडलेली फांदी…
Next articleमधुबाला: आईये मेहरबां
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.