भटक्या – विमुक्तांच्या समृद्ध परंपरेचा अनमोल ठेवा    

 

-अविनाश दुधे

एकेकाळी गावगाड्यात महत्वाचं स्थान राखून असलेल्या भटक्या – विमुक्तांमधील अनेक जमातींना ब्रिटिशांनी १८७१ साली बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत कायदेशीररीत्या गुन्हेगार ठरवलं.  समृध्द ज्ञान, परंपरा आणि कौशल्य असलेल्या या जमातींची त्यामुळे परवड झाली. विदर्भातील आनंद कसंबे या पत्रकाराने या जमातींच्या विविधांगी परंपरा आणि त्यांच्या संघर्षाचे  व्हिडीओ डॉक्युमेंटेशन केलं आहे. भावी पिढ्यांसाठी तो अनमोल ठेवा असणार आहे.

………………………………………………

शालेय पाठ्यपुस्तकाच्या प्रारंभीच्या पानांमध्ये राष्ट्रगीत व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेसोबत ‘प्रतिज्ञा’ असते . ‘भारत माझा देश आहे . सारे भारतीय माझे बांधव आहेत . माझ्या देशावर माझे आहे . माझ्या देशातील समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ‘ ही  प्रतिज्ञेतील सुरुवातीची वाक्य जवळपास सर्वांच्या तोंडपाठ असतात. मात्र देशातील वेगवेगळ्या जाती- जमातींनी जोपासलेल्या ‘समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरा’ नेमक्या कोणत्या, हे आजच्या पिढीला दाखवायचं झाल्यास जरा कठीणच जातं. आता काही वर्षापूर्वीपर्यंत वेगवेगळ्या जाती जमातींची भाषा , पोशाख , खाद्यसंस्कृती, विवाहपद्धती, संगीत, नृत्य, मृत्युनंतरचे संस्कार यात खूप सारी विविधता होती. भारताची ही विविधता जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र होती . अलीकडच्या काही वर्षांत मात्र शिक्षणाचे प्रमाण व दळणवळणाची साधनं वाढल्यानंतर जवळपास सर्वच जाती- जमातीच्या प्रथा- परंपरांचं सपाटीकरण झालं आहे. नाही म्हणायला डोंगराळ प्रदेश , वाळवंटी भाग व घनदाट जंगलात राहणाऱ्या भटक्या जमातींनी  अजूनही काही प्रमाणात आपला वेगळेपणा टिकवून ठेवला आहे . मात्र  किरकोळ काही फरक वगळता आता जवळपास सर्वच जाती- जमातीतील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून पोशाख, विवाहपद्धती, धार्मिक विधी यात कमालीचा सारखेपणा आला आहे .

   महाराष्ट्रात भटके- विमुक्तांमध्ये समावेश असलेल्या जमातींमध्ये खूप साऱ्या समृध्द परंपरा आहेत. अजूनही त्यांनी त्या बऱ्यापैकी जपून ठेवल्या आहेत. काळाच्या धबडग्यात त्या परंपरा नामशेष होण्याअगोदर त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं महत्वाचं काम काही मंडळी करत आहे. यामध्ये यवतमाळचे पत्रकार व कलावंत आनंद कसंबे यांचा समावेश आहे. कसंबे यांनी भटक्या – विमुक्तांमधील जवळपास ३५ जमातींचा पारंपारिक व्यवसाय, जीवनपद्धती व त्यांचा जगण्याचा संघर्ष चित्रित करून ठेवला आहे. आगामी पिढीसाठी हा अनमोल ठेवा ठरणार आहे. महाराष्ट्रात जवळपास ३८ भटक्या व १४ विमुक्त जमाती आहे. या जमातीचं जगणं हे मुख्य प्रवाहातील जातींपेक्षा संपूर्णतः वेगळे आहे. या जमातींमधील वेगळेपणा व त्यांच्या प्रथा – परंपरांची सविस्तर माहिती देणारी पुस्तकं आतापर्यंत भरपूर आली आहेत . रामनाथ चव्हाणांचे ‘जाती आणि जमाती’ व ‘भटक्या विमुक्तांचे अंतरंग’  डॉ .ना . घो . कदम यांचे ‘महाराष्ट्रातील भटका समाज: संस्कृती व साहित्य’, लक्ष्मण माने यांचे ‘विमुक्तायन’, जयराम राजपूत यांचे ‘पडद्याआड’, त्रिंबक नारायण आत्रे यांचे ‘गुन्हेगार जाती’, डॉ. अनिल सपकाळ व डॉ. नारायण भोसले यांचे ‘महाराष्ट्रातील भटके- विमुक्त: सद्यस्थिती आणि आव्हाने’, श्रीकृष्ण काकडे यांचे ‘भटके विमुक्त समाज : भाषा आणि संस्कृती’, दिव्य मराठीच्या ‘रसिक’ पुरवणीचे संपादक प्रशांत पवार यांचे ‘३१ ऑगस्ट १९५२’ ही सारीच पुस्तके भटक्या-विमुक्तांचे जग समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. साप्ताहिक ‘चित्रलेखा’ ने २० वर्षांपूर्वी ‘महाजाती’ या लेखमालेत भटक्या-विमुक्तांतील अनेक जमातींची सचित्र माहिती अतिशय वेधक पद्धतीने प्रसिध्द केली होती.  आनंद कसंबे यांनी मात्र भटक्या- विमुक्त जमातीच्या जगण्याचं व्हिडीओ डॉक्युमेंटेशन केलं आहे . त्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भटकंती करून त्यांनी भटक्या-विमुक्त जमातीचं जगणं चित्रित केलं. गेली १० वर्ष ते याच कामात व्यस्त आहे. त्यांच्या या कामाचं महत्व लक्षात घेऊन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने काही वर्षांपूर्वी ‘भाकरीचा चंद्र’ या नावाने ३० भागांची मालिका प्रसारित केली होती.

  भटक्या-विमुक्तांची जीवनपद्धती व त्यांच्या जीवनसंघर्षाचे जवळपास २०० तासांचे चित्रीकरण कसंबे यांच्या संग्रही आहे . त्यांच्या संग्रहात स्मशानात राहणारे ‘मसानजोगी’, एका गालात तार टोचून ती दुसऱ्या गालातून आरपार काढतांना रक्ताचा एक थेंबही न येऊ देणारे ‘छप्परबंद’, झाडावर चढून भिक्षा मागणारे ‘पांगुळ’, पूर्वजांच्या अनेक पिढ्यांचे रेकॉर्ड ठेवणारे ‘भाट’, नदीबैलाचे खेळ करणारे ‘नंदीवाले’, रामप्रहरी कंदील घेवून येणारे ‘पिंगळा’, जाते , खलबत्ता, पाटा-वरवंटा , देवाच्या दगडी मूर्ती तयार करणारे ‘वडार’, कुठलाही जिमन्शियम करू शकणार नाही अशा कसरती करणारे डोंबारी अशा अनेक जमातींच्या  पारंपरिक ज्ञान, कौशल्याचे चित्रीकरण आहे. ते पाहून थक्क व्हायला होतं. अलुतेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमाती पूर्वी देशभर भटकत असतं. त्याकाळचा समाजही त्यांना सन्मानाची वागणूक द्यायचा. मात्र ब्रिटिशांनी १८७१ साली बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत भटके जीवन जगणाऱ्या अनेक जमातींना कायदेशीररीत्या गुन्हेगार ठरवलं. तेथून त्यांच्या आयुष्याची परवड झाली . स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांची वणवण आणि वनवास थांबला नाहीय . भटक्या – विमुक्त जमातींना आपले हक्क मिळावे यासाठी अनेक संस्था – संघटना प्रयत्न करत असल्या तरी त्यांच्यापैकी अनेकांजवळ देशाचे नागरिक असल्याचे कागदपत्र सुद्धा नाहीत . पोलीस अजूनही काही गुन्हा घडला की कुठलीही चौकशी न करता त्यांना उचलून आणतात. भटक्या- विमुक्तांची ही करुण कहाणीही कसंबे यांच्या मालिकेत आली आहे . आनंद कसंबे यांनी या जमातींच्या जगण्यावर ‘भाकरीचा चंद्र’ हा चित्रपटही तयार केला आहे. याच नावाची यूटयूब मालिकाही ते तयार करत आहेत.

आनंद कसंबे यांचा संपर्क क्रमांक -९४२२१६६३१५

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

८८८८७४४७९६

Previous articleगुमराह: वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमक़िन..
Next articleउदार हिंदू मनाला घातली जाताहेत कुंपणे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.