भर रस्त्यावर .. पुरुष कवीची स्त्रीवादी कविता

• मनोहर जाधव, तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०१४
——————————————————————————————————————- men

कधी झाडाच्या, कधी भिंतीच्या आडोशाला
तर कधी एखादा कोपरा पाहून पुरुष मुतत असतात बिनदिक्कत
खरं तर आडोसा घेण्याऐवजी ते रस्त्यापासून थोडे दूर जातात
किंवा काही मुततात भर रस्त्यावर घाईघाईत

बेसावध सहजपणे चाललेलं असतं हे
यात काही शिष्ट संकेतभंग आहे
असं वाटत नाही कोणालाही

लोकांना हे अंगवळणी पडलेलं असतं
इतकं की लोकही म्हणजे सगळे पुरुष
असं करतच असतात वेळोवेळी

कधी मुतणाऱ्याची धार दिसत असूनही
लोक पाहिलं न पाहिल्यासारखं करतात
किंवा तिकडे नीट पाहत जात असतात रस्त्यानं

एखादा पुरुष मुतून झाल्यावरही भर रस्त्यावर
हलवतो शिस्न हाताने वरखाली
पुरेवर मुतलो याची खात्री पटवण्यासाठी स्वत:शी
कोणत्या शिष्टाचारात हे बसते
याची त्याला फिकीर नसते
तो पुरुष असल्यामुळेच तर बेफिकीर
शरीरधर्म प्रत्येकालाच असतात हे कबूल
म्हणून पुरुष मुतत नाही आपल्या बायको-मुलींसमोर
इतरांच्या मुली-बायका खिजगणतीत नसतात पुरुषाच्या

एक बिनधास्त मुततोय हे पाहून
दुसरा उभा राहतो त्याच्या शेजारी बिनबोभाट जाऊन
मग तिसराही दोघांच्या बाजूला उभा राहतो तयारीत येऊन…

पुरुषाला वाटत नाही लाज
सार्वजनिक ठिकाणी मुतण्याची
काही गोष्टींची लाज पुरुषाला मुळी वाटतच नाही

पुरुष रोखून बघतो बाईच्या छातीकडे
पुरुष लक्षपूर्वक पाहतो
कुत्रीवर चढणाऱ्या कुत्र्याकडे
पुरुष फेकतो जळती सिगारेट अर्धवट पिऊन
पुरुष थुंकतो पचापचा पानतंबाखू खाऊन
पुरुष हासडतो शिवी आई-बहिणीवरून
पुरुषाला लाज वाटतच नाही काही गोष्टींची

पुरुष निगरगट्ट बेशरम मुजोर
पुरुष, पुरुष असूनही भलताच कमजोर…

• मनोहर जाधव, तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०१४
……………………………………………………………………………………………………………………………………

कविता वाचली की काही जण नाके मुरडतील. मूत्रविसर्जन कवितेचा विषय होऊ शकतो का, असेही म्हणतील. ज्या गोष्टी खाजगी आणि वैयक्तिक आहे, त्या अशा सार्वजनिक आणि अक्षरबद्ध कशाला करता, असेही कुणी म्हणेल. त्यांना आपण सांगूया की साहित्यात तपशील महत्वाचा नसतो, त्यामागचे तत्त्व महत्त्वाचे असते. इथे ‘विसर्जन’ महत्त्वाचे नाही, त्यामागची पुरुषीवृत्ती कवीला सांगावायची आहे.
कवितेत पहिल्या तीन कडव्यात पुरुषी कृती आहे. पुरुष लघुशंका आटोपून घेतात. पुरुषांच्या लघुशंकेच्या क्रियेबद्दल कवीने वेगवेगळ्या छटा व्यक्त केल्या आहेत. कुणी भिंतीचा आडोसा घेतात, कुणी कोपरा शोधतात, तर कुणी घाईघाईत भर रस्त्यावर बिनदिक्कत करतात. पर्वा तर जाऊ द्या, जनलज्जा तर सोडा; मन:लज्जाही पाळत नाहीत. त्यातून पुरुषांचे स्वभाव व वृत्ती दिसतात. ही क्रिया पुरुष ‘बेसावध’ व ‘सहजपणे’ करतात. त्यातून त्यांची बेफिकिरी कशी दिसते, यावर कवी भाष्य करत जातो.
‘लोकही म्हणजे सगळे पुरुष असं करत असतात वेळोवेळी’, असे म्हणून कवीने त्यातील सार्वत्रिकता आणि व्यापकता सांगितली आहे. हे सगळेच जण करत असतात, असे जेव्हा कवी म्हणतो, तेव्हा कवीला त्या कृतीचा तपशील सांगावयाचा नाही, तर सांस्कृतिक भाष्य करावयाचे आहे.
चांगली कविता म्हणजे केवळ कागदावर उमटलेली अक्षरे नसतात. चांगली कविता म्हणजे केवळ वैयक्तिक अनुभव नसतो. चांगली कविता एक सांस्कृतिक निर्मिती असते आणि सांस्कृतिक भाष्यही असते. इथे कवीने ‘माणूस’ हा शब्द वापरला नाही तर ‘पुरुष’ वापरला आहे. माणूस हा ‘मानव’ या अर्थी शब्द असून तो मूल्यवाचकही आहे, तर ‘पुरुष’ हा लिंगवाचक आहे आणि सांकल्पनिक अर्थवाचक आहे. कवितेच्या संदर्भात तो पुरुषी वृत्ती, पुरुषप्रधान संस्कृती या अर्थी वापरला आहे.
आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे, त्यामुळे पुरुष वाट्टेल तसे वागू शकतात. असे वागण्याचा आपला हक्कच आहे, असे ते मानून चालतात. म्हणूनच ही ‘विसर्जन’ कृती करण्याची त्यांना लाज, संकोच काही वाटतच नाही. ही कुण्या एकाची क्रिया नसते, तर सर्वाचीच तशी असते. कवी म्हणतो :
लोकांना हे अंगवळणी पडलेलं असतं
इतकं की लोकही म्हणजे सगळे पुरुष
असं करतच असतात वेळोवेळी

कधी मुतणाऱ्याची धार दिसत असूनही
लोक पाहिलं न पाहिल्यासारखं करतात
किंवा तिकडे नीट पाहत जात असतात रस्त्यानं
इथे कवीने पुरुषी कृतीला पुरुषप्रधान संस्कृतीत सहज मान्यता कशी मिळत जाते, हे सांगितले आहे. इथे बघणाऱ्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एक, त्यांना हे अंगवळणी पडलेले असणे. दोन, साऱ्यांनीच असे करत जाणे. तीन, पाहिलं न पाहिल्यासारखे करणे. चार, तिकडे नीट पाहत रस्त्याने जाणे. यापैकी कुणालाही मात्र ही गोष्ट ‘शिष्ट संकेतभंग’ वाटत नाही. खटकत नाही. उलट लघुशंका झाल्यावरही खात्री करून घेण्याची क्रिया केली जाते. तीही पुरुषी उद्दामपणाचेच दर्शन घडविते. लैंगिक वर्चस्व वृत्तीवर भाष्य करते. कारण पुरुषलिंग हे दोन मानवी क्रिया साधत असते: एक, शरीरधर्म विशिष्टता. दोन, लैंगिक कामपूर्ती. मात्र कवी काय म्हणतो पाहा:
एखादा पुरुष मुतून झाल्यावरही भर रस्त्यावर
हलवतो शिस्न हाताने वरखाली
पुरेवर मुतलो याची खात्री पटवण्यासाठी स्वत:शी
इथे पुरुषाने लिंग वरखाली करून खात्री करून घेणे, यातून दोन्ही क्रिया कवीने सूचित केल्या आहेत. आधी शरीरधर्म आणि नंतर लैंगिक प्रदर्शन. या दोन्हीवरही पुरुषांचीच सत्ता आहे. त्यामुळे तो घराबाहेर शरीरधर्माच्या नावाखाली छुपे लैंगिक प्रदर्शन करू शकतो.
आपली व्यवस्था आणि संस्कृती यावरचे हे कवीचे भाष्य आहे.
आपली समाजव्यवस्था अशा पुरुषी कृतीला, ती शिष्टाचाराला धरून नसली तरी त्याला मान्यता देत जाते, हे कवी सांगतो आहे. सार्वजनिक मान्यतेशिवाय या कृती टिकत नसतात. एकदा मान्यता मिळाली की मग जागोजागी लघुशंकागृहे उभारणे, त्याचाच वापर करणे, त्याविरुद्ध कुणी वागल्यास त्याबद्दल दंड करणे, अशा तरतुदी करण्याची गरज वाटत नाहीच. (मेघालयातील शिलॉंग शहरात मुतारीसाठीही दोन रुपये मोजावे लागतात, उघड्यावर लघुशंका केल्यास पाचशे रुपये दंड घेतल्या जातो. तिथे याचे पालन केले जाते. तिथे बहुसंख्य लोक खासी जमातीचे आहेत. या जमातीत मातृसत्ताक कुटुंब पद्धती आजही आहे. शिवाय तिथे इंग्रज बरेच वर्ष राहिल्याने या लोकांचे धर्मांतर झाले. ते आता ख्रिश्चन झालेत. हिंदू पुरुषप्रधानतेपासून ते दूर आहेत.)
कवीने पुरुषांच्या या कृतीतून त्यांचे ढोंग आणि दुटप्पीपणाही उघड केला आहे. शरीरधर्म म्हणून याचे समर्थन करणारे हे पुरुष कसे दुटप्पी वागतात ते पाहा :
शरीरधर्म प्रत्येकालाच असतात हे कबूल
म्हणून पुरुष मुतत नाही आपल्या बायको-मुलींसमोर
इतरांच्या मुली-बायका खिजगणतीत नसतात पुरुषाच्या
म्हणजे शिष्टाचाराचे पालन फक्त आपल्या कुटुंबासमोर करायचे. इतरांच्या मुली वा बायका त्यांच्या खिजगणतीत नाही. आपण केवळ आपल्या कुटुंबाला बांधील आहोत, समाजाला नाही, असेच पुरुष मानत असतो.
एक बिनधास्त मुततोय हे पाहून
दुसरा उभा राहतो त्याच्या शेजारी बिनबोभाट जाऊन
मग तिसराही दोघांच्या बाजूला उभा राहतो तयारीत येऊन…
कवीने कृतीची साखळीच उभी केली आहे. त्यामुळे हे दृश्य विशिष्ट म्हणजे क्वचित दिसणारे नसून नेहमीचे म्हणजे जनरल आहे, त्यात सर्व पुरुषांचा सहभाग आहे, हे सांगितले आहे.
ही बिनदिक्कत विसर्जन क्रिया आणि त्याचे विसर्जनाच्या निमित्ताने खात्री करून घेतानाची क्रिया यांचा संबंध कवीने त्याच्या लैंगिक आणि कामुक प्रतिक्रियेशी जोडला आहे. सिग्मंड फ्राइडने, लिंगप्रदर्शनाच्या मुळाशी दडपलेल्या कामवासना असतात, असे सांगितले होते. इथेही पुरुष शरीरधर्माच्या नावाखाली, विसर्जनाच्या निमित्त्ताने तेच करीत आहे.
पुरुष रोखून बघतो बाईच्या छातीकडे
पुरुष लक्षपूर्वक पाहतो
कुत्रीवर चढणाऱ्या कुत्र्याकडे
या निरीक्षणातून कवीने पुरुषी कामवासनेचे अप्रकट रूप दिसते. लैंगिक भावना चाळवणारे शरीरावयव आणि लैंगिक क्रिया; मग त्या प्राण्यांच्या का असेना, त्या बघण्यात पुरुषाला इंटरेस्ट असतो. त्याच्या अंतर्मनातील सुप्त इछेचे ते प्रकट रूप असते.

पुरुष फेकतो जळती सिगारेट अर्धवट पिऊन
पुरुष थुंकतो पचापचा पानतंबाखू खाऊन
पुरुषाला लाज वाटतच नाही काही गोष्टींची
पुरुषाला लाज वाटत नाही, यासाठी आणखी निरीक्षणे कवी जोडतो. ते म्हणजे त्याचे व्यसन. पान तंबाखू खाऊन कुठेही पचापचा थुंकणे. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिणे. शिवाय ती अर्धवट जळलेली असताना फेकणे. या सगळ्यातून पुरुषी वृत्ती तर दिसतेच, शिवाय तो पर्यावरणाबद्दलही किती बेफिकिर आहे हे कवी नोंदवतो.
आठव्या कडव्यातून कवीने पुरुषी क्रियांतून दुर्गुणांची यादीच दिली आहे. (ती आपण शोधायची आहे.) पाहा: ‘बाईच्या छातीकडे लक्षपूर्वक पाहणे’ (अनैतिकता) ‘कुत्र्यांच्या लैंगिक क्रिया न्याहाळणे’ (लैंगिकता) ‘जळती सिगारेट अर्धवट पिऊन फेकणे’ (बेमुर्वतखोर वर्तन), ‘पानतंबाखू खाणे’ (व्यसन) ‘आई-बहिणीवरून शिवी हासडणे’ (विकृत भाषिक आविष्कार)…या सर्व वर्तनावरून कवीने ‘पुरुषाला लाज वाटतच नाही काही गोष्टींची’ असा निष्कर्ष कवीने काढला आहे.
या कवितेत पुरुषी वर्तनाची केवळ निरीक्षणे नाहीत, तर अनुभव आहे. निरीक्षणे तर्काने मांडली की लेखन गद्यप्रधान होते, आणि अनुभवबंधातून साकारली की ती काव्यप्रधान होते. पहिल्यात तर्क असतो, दुसऱ्यात संबंधांची गुंतागुंत असते. भावानुभव असतो. त्यामुळे हे वैचारिक भाष्य असले तरी मुळात ती एक चांगली कविता आहे.
पुरुष निगरगट्ट बेशरम मुजोर
पुरुष, पुरुष असूनही भलताच कमजोर…
या ओळीने कवितेचा शेवट केला आहे. त्यात पुरुषाला कमजोर म्हटले आहे. यात वरवर एक विरोधाभास वाटतो, की एवढे सगळे करणारा उद्दाम पुरुष कमजोर कसा? आणि जर पुरुष कमजोर आहे तर मग तर तो उद्दाम कसा? इथे कवीने उपरोधाने म्हटले आहे. मुळात पुरुष कमजोर असल्यानेच तो ते लपवण्यासाठी उद्दाम वागतो आहे. पुरुषासारखा पुरुष असून असे वागतो आहे, म्हणजे तो भलताच कमजोर आहे, असे कवीला म्हणावयाचे आहे. पुरुषाबद्दल आपल्या संस्कृतीचे गृहीतक आहे. की पुरुष स्त्रीपेक्षा ताकदवान, श्रेष्ठ, मर्द. त्याची मर्दुमकी हे त्याचे कर्तृत्व.. वगैरे. मात्र असा ‘श्रेष्ठ पुरुष’ मग जबाबदारीने का वागत नाही? मग तो कसला ताकदवान? तो तर भलताच कमजोर.
स्त्रीवादी चळवळ पुरुष सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. पुरुष सहभागाचे एक रूप म्हंजे आत्मस्वीकृती, पुरुषपणाची आत्मस्वीकृती. जी इथे आहे. अनेक कवयित्रींनी स्त्रीवादी भूमिका घेतली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीवर टीका केली आहे. पुरुषांचा दुटप्पीपणा आणि ढोंग उघडे पाडले आहे. मात्र पुरुष असून कवितेत स्त्रीवादी भूमिका मनोहर जाधव या कवीने घेतली आहे.
समतेची भूमिका घ्यायची तर ती समाजासोबतच स्त्रीबाबतीत तशीच असली पाहिजे, अशी कवीची भूमिका इथे प्रकटली आहे. अशा कवींची संख्या समाजात वाढणे म्हणजे स्त्रियांबद्दल सामाजिक न्यायाची भूमिका घेणे होय. ती अधिक व्यापक व समृद्ध करणे होय. स्त्रियांना सामाजिक न्याय देण्यासाठी आधी पुरुषी संस्कृती स्त्रियांनी उघड करायची असते, तर पुरुषांनी तिची कबुली द्यायची असते. या कवितेत कवीने पुरुष म्हणून ही जबाबदारी घेतली आहे, त्याबद्दल कवीचे खूप कौतुक केले पाहिजे. अनेक कवी स्त्रियांबद्दल केवळ कळवळा व सहानुभूती व्यक्त करतात, पण त्यामागे असलेल्या संस्कृतीचा वेध घेऊन ते तिला जबाबदार धरत नाही. समतेची भूमिका घेणाऱ्या या कवीने मात्र इथे पुढचा टप्पा गाठला आहे. आता चळवळीतल्या कवींनी इकडे लक्ष द्यावे. प्लीज!

सोमवार, दि. २३ मार्च २०१५, पूर्वप्रसिद्धी : सर्वधारा, अमरावती, एप्रिल -मे-जून, २०१५
———————————————————————————————————————————————————————
प्रा. देवानंद सोनटक्के, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर. संपर्क- ९८६०२६३१६३, [email protected]

Previous articleकोर्ट २
Next articleमर्यादापुरुषोत्तमाच्या देशात …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here