भाजप -सेनेला मस्ती महागात पडू शकते

श ही मोठी विचित्र गोष्ट असते. ती जसा अफाट आत्मविश्‍वास देते, तसंच असलेल्या-नसलेल्या ताकदीबाबत अवाजवी भ्रमही निर्माण करते. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या राज्यातील नेत्यांची अवस्था सध्या अशीच झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातील १२ कोटी जनता राज्याच्या सत्तेचा मंगलकलश आपल्या हाती देण्यासाठी अगदी सज्ज होऊन बसली आहे, असा ठाम समज झाल्याने जागावाटपाच्या विषयात या दोन्ही पक्षांचे नेते अगदी हातघाईवर आले आहेत. अगदी २५ वर्षांची युती तोडण्यापर्यंतची भाषा बोलली जाऊ लागली आहे. परवाच्या विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दोन हात हवेत चालणारा भाजपाचा रथ थोडाफार जमिनीवर आल्याने कदाचित टोक गाठलं जाणार नाही. मात्र त्यांच्या आपसातील रस्सीखेचीने वातावरण खराब झालं आहे, हे निश्‍चित.


 सत्ता मिळाली की, माणसं मस्तीत येतात, पण सत्तेच्या चाहुलीनेही ते डोकं फिरल्यासारखे वागतात, हे यानिमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळाले. आता ही गोष्ट खरी आहे की, भाजपा-सेना महायुती म्हणून एकत्रित लढली तर महाराष्ट्रात यावेळी त्यांची सत्ता येणार, यात दुमत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची कर्तबगारीच एवढी मोठी आहे, स्वत:च अवलक्षण करून घेतले नाही, तर भाजपा-सेनेच्या सत्तासोपानाच्या मार्गात काही अडथळे येतील असं वाटत नाही. वेगवेगळे ओपिनियन पोल व सर्वेक्षणही हेच सांगताहेत.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा-सेनेसाठी अनुकूलता असली तरी लोकसभा निवडणुकीसारखं वातावरण अजिबात नाही. एकेक गोष्ट समजून घेतली, तर ते लक्षात येईल. लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाने सहा महिने आधीपासून सुरू केली होती. स्वत: नरेंद्र मोदींचे दौरे फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. उमेदवारांची नावेही खूप आधी निश्‍चित झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीचा विचार केला, तर भाजपा-सेनेत गोंधळच गोंधळ दिसतो आहे. निवडणूक २८ दिवसांवर आली आहे, पण भाजपा लढणार असलेल्या दोन तृतीयांश मतदारसंघात भाजपाचे उमेदवार कोण असणार, याचा पत्ता नाही. कुठल्याही मोठय़ा नेत्याचे दौरे नाही. तेव्हासारखी जबरदस्त वातावरणनिर्मिती नाही. नाही म्हणायला संघटनात्मक स्तरावर तयारी सुरू आहे, पण कोणता घोडा मैदानात दौडवायचा आहे, हेच स्पष्ट नसल्याने पक्ष पदाधिकार्‍यांमध्येही कमालीचा संभ्रम आहे. मोदींचा करिष्मा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा नाकर्तेपणा, यावरच सारी मदार आहे. मात्र केवळ या जोरावर भरभरून यश मिळवू या भ्रमात जर भाजपा असेल, तर त्यांच्या वाट्याला निराशा येण्याची शक्यता अधिक आहे. उदाहरण म्हणून पाहू, विदर्भात भाजपाचे सध्या १९ आमदार आहेत. त्यात पूर्व विदर्भातील १४ तर पश्‍चिम विदर्भातील ५ आमदार आहेत. पश्‍चिम विदर्भाचा जर विचार केला तर यवतमाळ, अमरावती या मोठय़ा जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार नाही. बुलडाण्यात दोन, तर अकोला व वाशीममध्ये केवळ एक आमदार आहे. तिकडे नागपूर जिल्हा व पूर्व विदर्भात जरा बरी परिस्थिती आहे. मात्र ज्या पद्धतीने भाजपा या निवडणुकीची तयारी करत आहे, ते पाहता या जागांमध्ये भरभरून वाढ होईल का, याबाबत शंकाच आहे. आज निवडणुकीला केवळ चार आठवडे उरले असताना अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात भाजपा अमुक एक जागा जिंकेल, हे छातीठोकपणे सांगण्याची हिंमत भाजपातही नाही. गडचिरोली, बुलडाणा, अकोला, वाशीममध्येही हीच परिस्थिती आहे. उमेदवार कधी निश्‍चित होतील, हे भाजपात कोणालाच माहीत नाही. आपण जे कोणी उमेदवार देऊ, त्याला जनता डोळे झाकून मतदान करेल, या समजुतीत भाजपा आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे जनतेनं तसं मतदान केलं. त्यामुळेच ज्या सेना-भाजपा उमेदवारांचा पराभव निश्‍चित मानला जात होता, ते तेव्हा तरुन गेलेत. अगदी डमी म्हणविल्या जाणार्‍या रामदास तडससारख्यांचीही लॉटरी लागली. विधानसभेत तसं होईल, असं दिसत नाही. याचं कारण काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल प्रचंड नाराजी असली तरी त्यांच्या अनेक आमदारांनी आपले मतदारसंघ चांगले बांधून ठेवले आहेत. सरकारची कामगिरी कशीही असो, त्यांनी आपल्या मतदारसंघावर आणि त्यातील विविध घटकांवर व्यवस्थित लक्ष दिले आहे. भरपूर पैसा खेचून आणून कामेही भरपूर केली आहे. त्यांना हरवायचं असेल, तर तेवढेच तगडे उमेदवार लागणार आहे. येथे भाजपा-सेनेची बोंब आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार कामाला लागून चार-पाच आठवडे उलटले आहेत. येथे यांचे उमेदवारच पक्के नाही. काँग्रेसवर २४ तास टीका करणार्‍या भाजपाला त्यांचीच लागण झाली आहे. विदर्भातील अनेक मतदारसंघात यासाठी उमेदवार पक्का नाही, की गडकरींना म्हणे निर्णय घ्यायला अजून वेळ नाही. अलीकडे काँग्रेसप्रमाणे यांच्याही याद्या दिल्लीला जायला लागल्या आहेत. भाजपाची ही स्थिती, तर शिवसेनेत काही वेगळं चित्र नाही. शिवसेना हा तसाही एका राजकीय पक्षापेक्षा दबावगट म्हणूनच जास्त काम करतो. उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय मोदी लाटेला द्यायला तयार नसले, तरी वास्तव तेच आहे. त्या निवडणुकीत मोदी लाट नसती, तर आज राज ठाकरेंची अवस्था आहे, ती उद्धव ठाकरेंची असती. वल्गना करणं खूप सोपं आहे, पण शिवसेना खरंच किती पाण्यात आहे, हे जरा उद्धव ठाकरेंनी तटस्थपणे तपासले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत त्यांच्या करिष्म्याच्या जोरावर आणि त्यांच्या जाण्यानंतर मोदींच्या लाटेमुळे शिवसेनेची ताकद दिसते. ही ताकद वाढावी यासाठी शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणी होते आहे किंवा उद्धव ठाकरे त्यासाठी कुठले प्रय▪करत आहेत, असं कधी दिसलं नाही. शिवसेनेत टिपिकल सुभेदार संस्कृती आहे. जे खासदार, आमदार म्हणून निवडून आले आहेत, ते आपला मतदारसंघ तेवढा जपतात. आपल्या जिल्ह्यात आपल्याशिवाय दुसरं नेतृत्व उभं होणार नाही, या विषयात शिवसेनेच्या नेत्यांनी डॉक्टरेट घेतली आहे. यासाठी अनेक उदाहरण देता येईल. बुलडाणा, अमरावती, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांत हे प्रकार आहेत. त्यामुळे पक्षात गटबाजीही मोठय़ा प्रमाणात आहे. या अशा स्थितीमुळे शिवसेनाही खूप काही नेत्रदीपक यश मिळवेल, हे खात्रीने नाही सांगता येतं शिवसेनेचे सध्या विदर्भात केवळ आठ आमदार आहे. ही संख्या वाढवायची असेल, तर त्यांना भाजपाची साथ तर आवश्यक आहेच, पण त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे.

तसं झालं नाही, तर महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीत आम्हीच मोठा भाऊ राहणार, हे वाक्य उद्धव ठाकरेंना निवडणुकीचा निकाल आल्याबरोबर विसरावे लागणार आहे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleभारत होतोय नोमोफोबियाचा शिकार
Next articleमनोवेधक मंगळ ग्रहावरची अभिमानास्पद झेप
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.