भारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास

भुजंग रामराव बोबडे

    इतिहास या शब्दाचाअर्थ ‘असे घडेल’ असा आहे. पण इतिहासाचे कसे घडेल? म्हणजेच आजपर्यंतचा इतिहास कसा घडला, कसा लिहिला गेला आणि त्यात कोणत्या उणीवा आहेत याविषयी विचार होणे आवश्यक आहे. केवळ भारताचाच नोव्हे, तर संपूर्ण मानवजातीचा इतिहास पुन्हा लिहिणे आवश्यक आहे, असे विचारप्रवाह वाहू लागले आहेत.

    या संदर्भात मुंबई विश्वविद्यालयाचे “Dean of the Faculty of Arts” आणि याच विश्वविद्यालयाच्या Senate चे सभासद (Fellow) व ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. एल. बी. किणी यांचे विचार चिंतनीय आहेत. त्यांनी कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्रेतिहास परिषदेच्या चौथ्या अधिवेशनात प्राचीन विभागाचे अध्यक्षपद भूषविले आणि ‘आदिवासी संस्कृती व महाराष्ट्राचा इतिहास” त विषयावर विदवताप्रचुर अध्यक्षीय भाषण केले, (२६ जानेवारी १९६९). या प्रसंगी त्यांनी इतिहाससंबंधीही अत्यंत मौलिक विचार मांडले. ड़ॉ.केणी आपल्या भाषणात म्हणाले …. “महाराष्ट्राला इतिहास या विषयाचे वेड फार पूर्वीपासूनचे आहे. परंतु काळाबरोबरच या विषयाची पारंपारिक कल्पना पार वाद्ळून गेलेली आहे याची मात्र जावी तितकी जाणीव अद्दाप आपणाला व्हावयाची आहे. उदाहरणार्थ आजपर्यंत लिहिलेल्या अनेक इतिहासग्रंथात राजे, त्यांच्या नामावल्या यांचाच प्रामुख्याने समावेश केला गेलेला आहे. मला असे सांगावेसे वाटते की, वरीलप्रमाणे लिहिलेला इतिहास हा परिपूर्ण इतिहास नाही. एखाद्या तेजस्वी सम्राटाचे कार्य हे आधुनिक ऐतिहासिक दृष्टीकोनातून विचार करता इतिहास ग्रंथताचा एक गौण तपशील ठरतो.”

    “एखाद्या समाजाचा, प्रांताचा वा देशाचा इतिहास म्हणजे तत्कालीन सामाजिक, वैचारिक, आर्थिक, व राजकीय परिस्थितीच्या सर्वांगीण विकासाची हकीकत; त्या परिस्थितीचा परस्परांवर तत्कालीन व समाजजीवनावर होणारा परिणाम; यातून निर्माण होणारे साहित्य, कला व शास्त्र आणि या घटनांचे बुद्धिवादी मूल्यमापन म्हणजे इतिहास होय. सरदार पणिक्कारांनी इतिहास म्हणजे काय याची बिनचूक कल्पना आपल्या लिखाणात दिली आहे. ते म्हणतात “History has to deal with people, their political growth, Social and economic institutions, and their beliefs which moved them in the struggles through which they emerged.”(इतिहास म्हणजे लोक, त्यांच्या राजकीय विकास, त्यांच्या सामाजिक व आर्थिक संस्था, त्यांच्या श्रद्धा या सर्वातून उद्भवणारा परस्पर संघर्ष.) अशा प्रकारच्या आधुनिकरित्या लिहिण्यात आलेल्या इतिहासात लोकांचे रीतरिवाज, आचार-विचार, श्रद्धास्थाने व त्यामुळे निर्माण होणारे पेचप्रसंगांचे तपशील यांचा उल्लेख करणे योग्य ठरेल. किंबहुना इतिहास म्हणजे रानटी अवस्थेतून प्रगत, सुसंस्कृत, सभ्य मानवाचा जीवनप्रवास! साहजिकच अशा दृष्टीकोनातून लिहिलेल्या इतिहासात सामान्य माणसाच्या सामान्य संस्कृतीला असामान्य महत्व लाभलेले असते. म्हणुनच महाराष्ट्राच्या अतिप्राचीन इतिहासाला (सुरवात) दगडाच्या उपकरणांनी निसर्गाशी जुंझणा-या  व स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या नग्न किंवा अर्धनग्न मानवाच्या कहाणीने होते.”

    थोड्याच दिवसापूर्वी माझे एक विद्वान मित्र मला हसत हसत म्हणाले कि, “अहो प्राचीन इतिहासना? म्हणजे दगडधोंड्याचा इतिहास.” हे त्यांचे उद्गार ऐकून थोडे आश्चर्य वाटले व मनात विचार येऊन गेले कि, दगडधोंडेच! पण इतिहासाच्या दालनात दगडांना अनन्यसाधारण महत्व असते, हे विसरून चालणार नाही. याच दगडधोंड्यांच्या घडणीमध्ये आपणाला तत्कालीन जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते. फक्त पाहणाऱ्याला हवी ऐतिहासिक दृष्टी आणि बौध्दीक कुवत. ती ज्याला नाही, त्याला दगडधोंडयात दडलेली सत्य उकलणार नाहीत आणि असा विद्वान इतिहासाची मात्र माती करील याबद्दल शंका नाही, इतिहास हे शास्त्र आहे. शास्त्राला संकुचित मर्यादा असूच शकत नाहीत. जितक्या लवकर इतिहासतज्ञ हे सत्य मनावर बिंबवून अध्ययन करतील तितके इष्ट …. तरीपण एक गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही ती म्हणजे, इतिहासतज्ञांचे व्यक्तीस्वातंत्र्य व प्रतिष्ठा हे आजच्या युगातील एक महान सत्य आहे व महाराष्ट्रीयन इतिहासकार याबाबत सरकारचे बाहुले बनणार नाहीत अशी दक्षता घेणे अत्यंत अगत्याचे आहे.” अशा रीतीने डॉ.एल.बी.केणी ह्यांनी इतिहासतील अनेक उणिवांवर आणि इतिहासक्षेत्रातील संकूचित मनोवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.

इतिहासाची आणखी एक व्याख्या केली जाते ती म्हणजे, “गतकालीन मानवी जीवन व महत्वाच्या घटना यांचा कालानुक्रमे केलेला शास्त्रोक्त अभ्यास” परंतु या व्याख्येप्रमाणेही सुधारलेला आढळत नाही. आजच्या इतिहासात केवळ काही महत्वाच्या घटनांचाच तेवढा विचार होतो. सामान्यांना स्थान असलेले खरेखुरे मानवी जीवन त्यांच्या शास्त्रशुध्द अभ्यास प्रदर्शित होत नाही.

    ‘सामान्यांना इतिहासात स्थान असावे’,याचा अर्थ असा मात्र नव्हे कि, प्रत्येक व्यक्तीचे चरित्र, नि चारीत्र्य इतिहासात यावयास हवे. सामान्य व्यक्तीचा इतिहास याचा अर्थएवढाच कि, जी महत्वाची घटना बहुसंख्य समाजाच्या जिव्हाळ्याची आहे; बहुजनांच्या भावना व आशा आकांक्षा जिच्याशी निगडीत आहेत, जी बहुसंख्य समाजावर परिणाम करणारी आहे; मानवाला मार्गदर्शक व स्फुर्तीदायक आहे अशा घटनेला इतिहासात महत्वाचे स्थान असावे. थोर व पराक्रमी व्यक्तींना इतिहासात मुळीच स्थान नसावे असाही याचा अर्थ नाही. शेवटीं थोर व पराक्रमी व्यक्ती इतिहास घडवीत असतात. परंतु इतिहासात केवळ राजा राणी, राजपुत्र व राजकन्या याची प्रेमकहाणी व विवाह नोंदणी नसावी. मोठ्या व्यक्तीची छोटी कृत्येही इतिहासजमा, पण छोट्या व्यक्तीच्या मोठ्या कृत्यांना इतिहासात स्थान नाही. ह्या ‘उच्च्सतेचे’ प्रत्येक पैलुंचे प्रतिबिंब पडावे. बहुसंख्य समाजाची सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती तेथे यावयास हवी. आर्थिक परिस्थिती मांडताना केवळ राजाच्या खजिना भरलेला असला अथवा शासनाने मोठ-मोठी बांधकामे केली म्हणजे त्या देशात समृद्धी नांदत होती व लोक फार सुखी होते असे समजणे नेहमीच योग्य होणार नाही. उदा. शहाजहान बादशहाने नेत्रदीपक इमारती बांधल्या म्हणून त्याचे राज्य समृद्ध व प्रजा सुखी होती असा एकेकाळचा ऐतिहासिक समज गैरसमज ठरला. शेतकरी वगैरे सामान्य समाजावर डोईजड कर लादून शहाजहानने त्या विशाल इमारती बांधल्या असून असंख्य प्रजा समाधानी नव्हती हे प्रकाशात आले आहे. पाचशे वर्षानंतर स्वातंत्र्य  भारतातील प्रचंड धरणे, वेगवान विमाने, विशाल इमारती, इतर क्षेत्रातील प्रगती पाहून व इतर गोष्टीची बहारदार वर्णने वाचून स्वातंत्र्य मिळताच भारतात सुख समृद्धी नांदू लागली व सर्व लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या जिवनावश्यक गरजा पूर्ण झाल्यात असे लिहिले तर ते बरोबर होईल काय?

    सामाजिक जीवन सांगतानाही उच्च वर्गानाच प्रमाणाबाहेर महत्व मिळाले. उदा. सतीप्रथा व स्त्रीयांना पुनर्विवाहबंदी ह्या अनिष्ट प्रथा केवळ उच्चवर्णीय ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यात असून सुमारे शेकडा नव्वद लोकात ह्या दोषास्पद प्रथा नव्हत्या, तरीदेखील सतीप्रथा व पुनर्विवाहास बंदी याविरुद्धच्या चळवळींना व सुधारणांना इतिहासात प्रमाणाबाहेर स्थान मिळाले. पण संपूर्ण भारतीय समाजात असलेली अस्पृश्ता व जातीप्रथा फारच थोड्या इतिहासकारांना दिडली. तात्पर्य, श्रीमंत उच्चवर्णीय ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या सामाजिक चालीरीतील गुणदोष म्हणजे त्या काळाच्या संपूर्ण समाजातील गुणदोष इतिहास ठरावयास नकोत.

    त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात जागतीक कीर्तीचे चार विद्वान निपजले म्हणजे त्या देशाची शिक्षणात खूपच प्रगती झाली असेही म्हणता येणार नाही. भारतात शेतकरी-कामकरी समाज जर एकूण लोकसंख्येच्या शेकडा नव्वद असेल तर देशातील एकूण अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर, न्यायाधीश, वकील, प्राध्यापक वगैरेतही त्यांचे प्रमाण शेकडा नव्वद होईल आणि सर्व जातीमध्ये शिक्षितांचे प्रमाण समाज होईल तेव्हाच शिक्षण सामन्यापर्यंत पोचले असे म्हणता येईल.

    इतिहासातील आणखी एक उणीव म्हणजे काही ऐतिहासिक सत्ये इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेली (किंवा सोडलेली) दिसून येतात. सामान्य समाजाने राष्ट्रहितासाठी केलेली धडपड नि देशसेवेतील त्याची महत्वपूर्ण भागीदारी यांची नोंद इतिहासाने घ्यावयास हवी. कारण, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील सामान्य व्यक्तीच्या प्रगतीवर व प्रत्नावर अवलंबून असते. सामान्य व्यक्ती स्वदेशाची नि:स्वार्थ सेवा करीत असते. आपल्या सेवेचा मेवा मिळेल किंवा आपणाला प्रसिद्धी मिळेल याचीही तिला आशा नसते. भारतातील अनेक स्वराज्य व स्वातंत्र्य  संघर्षात व चळवळीत ज्या हजारो सामान्य कुटुंबाची राखरांगोळी झाली त्याची गणना तरी कोणी केलेली आहे काय? इतिहासाला त्यांची नवे तरी ज्ञानात काय? याउलट श्रीमंत व सुशिक्षित घराण्यातील व्यक्तीना देशभक्तीच्या नावाखाली लहान-सहन संकटे आलीत किंवा दोन चार वर्ष कैद झाली तर त्यांची भव्यवर्णने करून त्यांच्या नावाने इतिहासाची पाने भरली जातात. ते स्वतंत्र्यकारी ठरतात. इतिहासात हा पक्षपात का? त्यामुळे सामान्य माणसासमोर सामान्य माणसाच्या स्वार्थत्यागाची व देशभक्तीची उदाहरणे तुम्ही ठेवणार कशी? बहुसंख्य सामान्य समाजाला इतिहासात स्थान मिळाले नाही तर सामन्यांचा स्वाभिमान,शौर्य आणि साहस कसे जागे होईल? आजचे विद्दार्थी इतिहास शिकतात ते आपल्या पूर्वजांची माहिती मिळवण्यासाठी. त्यांच्याविषयी आदर वाटतो म्हणून. पण इतिहास जर धर्मभेद, वर्णकलह, वर्णभेद, जातीमत्सर आणि समाजातील विशीष्ट वर्गाचीच खोटी माहिती दिसायला लागली तर विद्दार्थाना इतिहासाबद्दल आदर व आपुलकी कशी वाटेल?

    भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील सामान्य बहुसंख्य समाज म्हणजे सर्वजातीय कृषक समाज होय. कृषक हा भारताच्या पाठीचा काना आहे. भारताचा कृषकांचे पुढारीहि भरपूर आहेत. (पण कैवारी मात्र क्वचितच आढळतात) आजपर्यंत कृषकाकडे व त्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्षच केल्या गेले. आजकालचे काही तोतये इतिहाससंशोधक ‘ताजमहाल हा अमक्याचा राजवाडा नि कुतुबमिनार तमक्याने बांधला’, असल्या वादात व ‘संशोधनात’ मश्गुल आहेत. तर; काहींनी ‘भारताच्या इतिहासात भारतीयात राष्ट्रीयतेच अभाव आहे’ ‘हे सत्य’शोधून काढले. पण खरी राष्ट्रीयता असणारा बहुसंख्य समाज इतिहासाच्या बाहेर आहे हे त्यांना कळत नाही व कळत असले तरी वळत नाही. या समाजाला इतिहास समाविष्ट करण्याचा साधा प्रयत्न हि हे इतिहाससंशोधक करीत नाही. राष्ट्रीयता एकात्मता, नि:स्वार्थ राष्ट्रसेवा व भारतीय संस्कृती या सत्वाची आदर्श उदाहरणे भारतीयांसमोर ठेवायची असतील तर भारतीय कृषकांच्या संशोधित इतिहास लिहावयास हवा. भारतभूचा खरा सेवक शेतकरी आहे मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा अथवा पंथाचा असो. अक्षरक्ष: इंच इंच भारतभूवरत्यांचे खरे प्रेम आहे. तो या प्रेमाचे पोवाडे गात नाही किंवा त्यावर काव्यही करत नाही कारण, खरे प्रेम अबोल असते.मत आपल्या मुलावरील ममता किंवा मुल आपल्या मातेवरील प्रेम बोलून दाखवीत नसते. भूमातेवर शेतकऱ्याचे मातेप्रमानेच प्रेम असते. मातीच्या कानाकाणांशी शेतकऱ्याचा व त्यांच्या कुटुंबांचा रात्रदिन संबंध येतो. शेतकरी शेतात कष्ट करतो, घाम गळतो आणि रक्ताचे पाणी नि हाडाची काडे करून शेतीला खतपाणी घालतो. अशाप्रकारे भूमातेच्या वाटेल त्या इच्छा तृप्त करून तिला प्रसत्र करतो. नवनिर्मिती करून देशाच्या संपतीत भर घालतो. अत्यंत प्राचीन काळापासून आजपर्यंत कोणत्याही राजसंस्थेला सर्वात जास्त उत्पत्र शेतीपासून व शेतकऱ्यापासून मिळत आलेले आहे. कृषकांच्या कमी गरजा व काटकसर यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रीय संपत्तीचा विनाश होत नाही. कमीतकमी मोबल्यात देशहितार्थ जास्तीतजास्त त्याग करणारा वर्ग शेतकऱ्यासारखा वर्ग शेतकरीच. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांची देशभक्ती व महती अधिक दिसायला लागते. शेतकरी, कामकरी व सैनिक हे सामान्य लोक देशाचे आधारस्थंभ समजण्यात येतात.

    प्राचीन काळापासून आजपर्यंत भारताची सत्ता कोणत्याही देशी-विदेशी वंशाच्या हातात गेली असली तरी शेतकऱ्याची त्यांच्या शेतावरील सत्ता कोणत्याही सत्ताधीश सहजासहजी बदलू शकत नाही. कारण प्राकृतिक आप्तीमुळे इतर व्यावसायिक आपले प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात राहावयास जातात, परदेशातसुद्धा जातात. परदेशात जास्त पगार मिळत असला तर ‘जननी जन्मभूचे’ पोवाडे गाणारे अनेक सुशिक्षित जननी आणि जन्मभूमीहि कायमची सोडतात, शेतकरी मात्र प्राण गेला तरी आपल्या भूमीविषयीचा जिव्हाळा, ममता व स्वामित्व सोडायला तयार नसतो.तो खरोखरच इंच इंच भूमीसाठी लढतो. शेतकरी आपल्या भूमीतच जन्मतो, तेथेच जगतो व तेथेच मरतो असे शेतकऱ्याचे भूमातेशी रक्ताचे नाते आहे.

    देशासाठी उत्तम सैनिकसुद्धा सर्वजातीय शेतकरी-कामकरी वर्गच पुरवीत आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या सहानुभूती व सहकार्यामुळे भारतातील अनेक राजांना यश मिळाले नि त्यांची राज्ये वैभवास चढलीत. बहुसंख्य सामान्य शेतकऱ्यांचे महत्व ओळखून त्यांची मदत मिळविल्यामुळेच मौर्य किंवा गुप्त यांच्यासारखी वैभवशाली साम्राज्ये उदयास आलीत. शेतकऱ्यांच्या सहर्ष व सक्रीय सहक्रार्यामुळेच शिवाजीच्या स्वराज्याचा सूर्य उगवला. शेतकऱ्याचे महत्व ओळखून महात्मा गांधीनी त्यांची मदत मिळविल्यामुळेच १९२० नंतर काँग्रेसच्या चळवळीस विशाल स्वरूप आले. असंख्य शेतकरी तरुणांनी स्वातंत्र्य  चळवळीच्या होमात स्वप्राणांची आहुती दिल्यामुळेच भारताला स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन घडले. पण त्यांना इतिहासात कोण विचारतो? तसेच शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी राजसत्ता त्यांचे सहकार्य गमावताच नष्ट झालेली आढळून येईल यावरून कृषकांचा संशोधित इतिहास लिहण्याची नितांत आवश्यकता लक्षात येईल. भारताच्या व जगाच्या इतिहासात ही फार मोठी उणीव आहे.

जनसामान्यांना आपला खरा इतिहास माहित नसल्यास त्यांच्याकडून त्याच त्या चुका पुनःपुन्हा घडतात हे भारताच्या इतिहासावरून स्पष्ट होते. यापुढे हे घडू नये म्हणून प्रत्येक विद्यापीठाने शेती आणि संस्कृतीचा इतिहास हा विषय आवश्यक बनवावा आणि इतिहासातील उपरोक्त उणीवा सारख्या अनेक उणीवा दूर करून तरुणांना इतिहासाचे सत्यदर्शन घडवावे. भारताचा व संपूर्ण मानव समाजाचा असा नवा इतिहास लिहण्याचा व शिकविण्याचा प्रयत्न इतिहास लेखक व प्राध्यापक करतील हीच अपेक्षा.

(लेखक गांधी रिसर्च फाउंडेशन येथे कार्यरत आहेत)

९४०४९५५२२६

Previous articleस्पर्धा परीक्षेच्या दिंडीचा वारकरी- प्रा. अमोल पाटील
Next articleमेघदूताच्या आषाढधारा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here