भुईसपाट मंदिराचे भूमीपूजन

-ज्ञानेश महाराव

——————————————-

   *भारताप्रमाणेच जगातले सगळेच देश* समस्त मानवांच्या जीवावर उठलेल्या ; लोक-वर्दळ, वाहतुकीला ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या ; ‘कोव्हिड-19’ ऊर्फ ‘कोरोना-व्हायरस’चा बंदोबस्त करणाऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो शास्त्रज्ञ या ‘लस’ निर्मितीसाठी दिवस-रात्र झटत आहेत. या ‘लस’ चाचणीसाठी शेकडो लोकांनी आपल्या शरीराची प्रयोगशाळा केलीय. प्रसंग ‘आत्मनिर्भर’तेने संकटाला सामोरं जाण्याचा आहे. मुहूर्त काढून आत्मप्रौढी दाखवण्याचा नाही.

      दवाखाने पेशंटने ओसंडलेले आणि देवखाने भक्तांविना ओसाड, अशी गेले चार महिने हालत आहे. या स्थितीचा शेवट कधी होणार, ते ठाऊक नाही. अशा वातावरणात, अयोध्येत ५ ऑगस्टला ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण’चे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा मुहूर्त काढण्यात आलाय. हे गावात महामारी सुरू असताना, घरातलं मंगलकार्य उरकण्यासारखं आहे. अयोध्यावासी ‘कोरोना’ग्रस्त आहेत. त्यांची संख्या वाढती आहे. तरीही  ‘पुढच्या शंभर वर्षांत भूमीपूजनाचा मुहूर्त नाही,’ अशा थाटात हे मंगलकार्य उरकण्याची लगबग सुरू आहे. ‘लॉकडाऊन’मुळे देशाची अर्थव्यवस्था भुईसपाट झालीय,’ या मुद्द्यावरील चर्चेने जनमत ‘भाजप’ विरोधात जाऊ नये, यासाठी हा लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. चिनी घुसखोरीचा मुद्दा मागे पडला ; तसा नेपाळच्या ‘वादग्रस्त नकाशा’चा मुद्दा पुढे करण्यात आला. तो मुद्दा जसा निवळला, तसे ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माणा’चे भूमीपूजन चर्चेत आले. हा ‘इव्हेंट’ झाला की ‘हिंदूराष्ट्र निर्माण’चा शंखनाद केला जाईल ;  किंवा ‘कुरापती पाकिस्तान’ला गोमूत्र पाजण्याची भाषा केली जाईल. ‘कथित’ राष्ट्रवादाच्या तरतरीसाठी भक्त मंडळींना अशा ‘राष्ट्रीय’ तथा ‘कंट्री’ नशेची आवश्यकता असावी, या धारणेने हा खेळ चाललाय. तो धोकादायक आहे.

    असाच खेळ ‘भाजप-संघ परिवारा’ने ३० वर्षांपूर्वी खेळून ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील ‘बाबरी मशीद’ जमीनदोस्त केली. तो सत्तेवर डोळा ठेवून खेळलेला खेळ होता, हे त्यापुढच्या काळात स्पष्टच झाले. तथापि, तो खेळ सत्ता मिळवण्यासाठी होता; आता ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण’च्या भूमीपूजनाने सुरू होणारा खेळ, हा सत्ता टिकवण्यासाठी आहे. ‘कोरोना- लॉकडाऊन’ ने देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असताना, बेरोजगारांत १३ कोटींनी वाढ झाली असताना; देशाच्या बिकट काळात, देशातल्याच अल्पसंख्याकांना वाकुल्या दाखवणाऱ्या गोष्टी करून, देशाला आणखी गर्तेत लोटणारा ; आक्रमक, असहिष्णू  शेजारील राष्ट्रातील अविवेकी शक्तींना अधिक ताकद मिळवून देण्याचा हा ‘संघ- भाजप परिवार’ प्रणित ‘मोदी सरकार’चा हा ‘राष्ट्रवाद’ बघून सच्च्या राष्ट्रभक्तांनी लाजेने खाली माना घातल्या असतील. कारण अशा खोडसाळ राष्ट्रवादाने धर्मांधता वाढते. तथापि, हा धर्मांधतेचा भस्मासुर आपल्या डोक्यावर हात ठेवण्यास कमी करणार नाही; हे मुस्लीम नेत्यांसारखेच धर्माचे राजकारण करणाऱ्या हिंदू नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.

     याचे भान ‘बाबरी’ भुईसपाट करताना लक्षात ठेवले नाही. म्हणून परकीय आक्रमकांनी भारतीय धर्म-संस्कृतीवर किती क्रूरपणे हल्ला केला, त्याचा साडेचारशे वर्षं असलेला ऐतिहासिक पुरावा अवघ्या साडेचार तासांत भुईसपाट केला गेला. या वादग्रस्त वास्तूत साडेचार दशकं ( ४५ वर्षं ) रामलल्ला विसावला होता. त्याचा लालदास नावाचा पुजारी होता. तिथल्या रामचबुतऱ्यावर हिंदू भक्तिभावाने नतमस्तक होत होते. आत हिंदू देवताची मूर्ती असल्याने मुस्लीम तिथे नमाज ‘अदा’ करीत नव्हते. ती ‘काफीर’ वास्तू होती. मशिदीचे मंदिर झाल्याचा तो सज्जड पुरावा होता. म्हणजे, पाडले ते मंदिर होते. त्याला ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून ‘भटी-मीडियामास्टर्स’नी हिंदूंच्या आततायीपणाला बगल दिली. पण अशा चलाखीने सत्य बदलत नाही‌. वाद जमिनीच्या मालकी हक्काचा होता. तो आठ महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे समाधान होईल, अशा प्रकारे न्यायनिवाडा करून सोडवला.

       उद्ध्वस्त ‘बाबरी’च्या जागी मुस्लीम मशीद उभारणार नव्हते आणि नाहीत. कारण इस्लाम धर्मशास्त्रानुसार, ‘बाबरी’ शहीद झालीय. इस्लाममध्ये पुनर्जन्माला स्थान नाही. फार तर ‘जन्नत'(स्वर्गा)चा परवाना मिळतो. हिंदूंमध्ये पुनर्जन्माची लालूच दाखवीत, पाप-पुण्याची ‘तागडी’ हलती ठेवणारी देव-दैव-दानाची तगडी भटी व्यवस्था आहे. त्यानुसारच, ‘राम जन्मभूमी मंदिराच्या निर्माणा’चा नव्हे, तर ‘पुनर्निर्माणा’चा पाळणा प्रधानमंत्रींच्या हस्ते भूमीपूजन करून हलवला जात आहे. या सोपस्कारात सत्ता स्वार्थी राजकारणात हिंदूंची भरकटलेली सहिष्णुतेचीही पुनर्स्थापना झाली पाहिजे.

    *सहिष्णुता हा हिंदुत्वाचा अविभाज्य भाग आहे. या सहिष्णुतेचा गळा घोटणारे सत्ताधारी होतील, पण त्याने ‘हिंदुत्व’ समर्थ होऊ शकणार नाही.* भारतात हिंदू बहुसंख्याक आहेत. म्हणून सर्वधर्म समभावाच्या नावाखाली त्यांची उपेक्षा, अवहेलना होत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही, याची जाणीव देण्याइतपत हिंदुत्वाचे जागरण अवश्य व्हावे. मात्र त्यासाठी गोमूत्र प्यावे आणि वेद-उपनिषदांची साक्ष काढीत ‘कोरोना हटाव’चे उपाय सांगावेत, हा अधर्मचा हैदोस कशासाठी?

     एका हातात धर्मग्रंथ आणि दुसऱ्या हातात तलवार, असा हिंदुत्वाचा प्रचार प्रत्यक्षातीलच नव्हे, तर भाकड पुराणकथातल्या कुठल्या राजानेही केलेला नाही. अविवेकी, अत्याचारी, आक्रमक,आक्रस्ताळी धर्मांधता बाळगणारा- दाखवणारा हा हिंदू असूच शकत नाही. ‘ते तसे वागतात, म्हणून आपणही तसेच होऊ,’ म्हणणारे आपण होऊन आपला धर्म सोडत असतात. याची जाणीव समस्त हिंदूंनी ‘राम जन्मभूमी मंदिरा’चे भूमीपूजन होत असताना ठेवली पाहिजे!

———————-

भाजपेयींचे प्रदर्शन, शिवसेनाप्रमुखांचे सुदर्शन

    गझनीच्या महंमदाने १७ वेळा स्वारी करून प्रत्येकदा सोमनाथाचे मंदिर फोडले. तशाच आक्रमणाची साक्ष असलेल्या बाबरी मशिदीत ‘रामलल्ला’ विसावला असताना, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ‘रामलल्ला’ला वाऱ्यावर आणले. यात शौर्य कसले ? हा धर्मद्रोहीपणा ‘राम राम’ म्हणत ‘बाबरी’ भुईसपाट करणाऱ्यांच्या अंगात गझनीचा महंमद संचारला होता म्हणून घडले का ,याचा विचार ‘भाजप’चे ‘ब्रह्म’ जपणाऱ्यांनी आजवर कधीच केला नाही! म्हणूनच ‘कोरोना- लॉकडाऊन’ सारख्या ‘जागतिक महामारी’तही हा ‘राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन’चा घाट रचण्यात आला. हे ‘बाबरी’ पाडण्याचे कारस्थान ‘विष्णू अवतारी’ नरेंद्र मोदी यांच्याच कार्य-कल्पकतेने घडले, अशा थाटात हा ‘भूमीपूजना’चा ‘इव्हेंट’ भक्तमंडळी वाजवत आहेत. तर,त्यावेळी जे तिथे उपस्थित होते, ते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, साध्वी ऋतंबरा हे हयात आघाडीचे नेते सध्या लखनऊच्या ‘विशेष अयोध्या कोर्टा’त ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या दाव्यात जबान्या देत आहेत.

    प्रत्यक्षात ‘बाबरी’ भुईसपाट करायला लोक पुढे सरसावताच, ‘भाजप-संघ परिवारा’च्या नेत्यांनी सारी जबाबदारी झटकून रणांगणातून सटकण्याची जी चपळाई दाखवली, ती हिंदुत्वाचा गर्व बाळगणाऱ्या सर्वांनाच धक्का देणारी होती; चीड आणणारी होती. तिचा ‘आँखों देखा हाल’ मी तेव्हा अयोध्येत पाहिला आणि तेव्हा ‘चित्रलेखा’तून सविस्तर लिहिलीही!  जणूकाही ‘बाबरी’च्या ढिगाऱ्याखाली ‘भाजप’चे भवितव्यच गाडले जाणार ; या भयाने ही नेते मंडळी वागत-बोलत होते. ‘भाजप’चे तेव्हा ‘राष्ट्रीय’ उपाध्यक्ष असलेल्या (वाजपेयी सरकारच्या काळात ते बिहारचे राज्यपाल झाले) सुंदरलाल भंडारी यांनी तर ‘बाबरी पाडण्याचे काम शिवसैनिकांनी केले,’ असे सांगून हात झटकले. हा भेकडपणा होता; तसाच तो ‘शिवसेना’ला बदनाम करण्याचा नीचपणाही होता. खरंतर, ‘होय! आम्ही ‘बाबरी’ उद्ध्वस्त करण्यासाठीच सकल हिंदू जनतेच्या वतीने अयोध्येत उतरलो होतो. ‘काँग्रेस’च्या मुस्लिमांच्या लांगूलचालनी राजकारणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हे सगळे करण्याची ‘राष्ट्रीय’ आवश्यकताच होती. आम्ही लोकांची इच्छा प्रत्यक्षात आणली. त्याचे परिणाम भोगायला आम्ही तयार आहोत!’ असे ‘भाजप- संघ’ परिवाराच्या नेत्यांनी ठासून सांगायला पाहिजे होते. पण त्यांनी ‘रणछोड रामदासी’ प्रदर्शन घडवले ; तर रणवीराचे सुदर्शन बाळासाहेब ठाकरे यांनी घडवले.

   *’मशीद पाडणारे आमचे कुणी नव्हते ; ते ‘शिवसेना’चे होते,’ हे भंडारी यांनी म्हटल्याचे कळताच, ‘त्या शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो !’* असे स्पष्ट शब्दांत जाहीर करून बाळासाहेब ठाकरे यांनी, आपले ‘शिवसेना’प्रमुख म्हणून  हिंदुत्वाशी असलेले इमान किती सच्चे-पक्के आहे, याची साक्ष दिली.

     आता राज्यात सत्ताधारी ‘महाविकास आघाडी’त ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’च्या जोडीने ‘शिवसेना’ असल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत भूमीपूजन सोहळ्याला जाणार की नाही, या चर्चेतून ‘शिवसेना’च्या ‘हिंदुत्ववादी’ भूमिकेची मापं काढली जात आहेत. तथापि, हे प्रसंगी भ्याडपणा दाखवणाऱ्यांने मर्दुमकीची उठाठेव करण्यासारखे आहे. हे ‘रामकारण’ नाही ; ‘हरामकारण’ आहे.

———————-

क्रौर्याची मशीद, सत्तास्वार्थींचे मंदिर

   अयोध्येत ‘हिंदूसभा’च्या नेतृत्वाखालील आखाडावाले साधू मंडळी १९४८ पासून ‘राम जन्मभूमी मंदिर’च्या हक्कासाठी लढत होते. १९८४ मध्ये ‘इंदिरा गांधी हत्या’च्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप’ भुईसपाट झाला. ‘भाजप’चे फक्त दोनच खासदार निवडून आले. वाजपेयी-अडवाणी हेदेखील पराभूत झाले. यानंतर दोनच वर्षांत ‘शहाबानो पोटगी केस’चा निकाल ‘शरियत’ विरोधात गेल्याने मुस्लीम कट्टरतावाद्यांनी ‘संसद भवन’वर मोर्चा काढण्यापर्यंत मजल मारली. या कट्टरवाद्यांपुढे राजीव गांधी यांचं ‘काँग्रेस सरकार’ नमलं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला. मुस्लीम मतांसाठीच्या या काँग्रेसी राजकारणाला शह देण्याचा आव आणत, ‘भाजप’ने ‘विश्व हिंदू परिषद’च्या माध्यमातून अयोध्येतल्या मंदिर-मशीद वादात शिरकाव केला. ‘राम मंदिर वही बनायेंगे,’ म्हणत लालकृष्ण अडवाणी यांनी देशभर ‘रथयात्रा’ काढली.

     या रथयात्रेत नरेंद्र मोदी होते. १९९० मध्ये अयोध्येत ‘मंदिर निर्माण’च्या ‘कारसेवे’साठी गेलेल्या ‘रामभक्तां’वर तेव्हाच्या ‘मुलायमसिंह यादव सरकार’ने कसा गोळीबार केला आणि त्यांना वाळूच्या पोत्यांत भरून कसे शरयू नदीत टाकले, ते मोदींनाही ठाऊक आहे ! तरीही मुलायमसिंह यादव यांची ‘समाजवादी पार्टी’तून मुलगा- अखिलेश यादव याने हकालपट्टी केल्यापासून मुलायमसिंह हे नरेंद्र मोदींचे मित्र झालेत.

     ‘बाबरी’ भुईसपाट झाल्यापासून गेल्या २७ वर्षांत ‘भाजप- संघ- विहिंप’च्या नेत्यांनी ‘बाबरी’ पाडल्याबद्दल मुस्लिमांची किती वेळा क्षमायाचना केलीय, याचा हिशेब लागत नाही. अशाच क्षमायाचनेसाठी वाजपेयी यांनी लोकसभेत आणि सिकंदर बख्त यांनी राज्यसभेत अश्रू ढाळले आहेत. ‘बाबरी’ पडल्यामुळेच देशाला दंगली, बॉम्बस्फोट, गोध्रा रेल्वे अग्निकांड आणि त्याचा प्रतिशोध, याला सामोरं जावं लागलं. त्याचा परिणाम हिंदू समाज आणि देशही आज भोगत आहे. या अग्निकुंडातून अटलजी, अडवाणीजी हे प्रधानमंत्री- उपप्रधानमंत्री झाले. नरेंद्र मोदी गुजरातचे १२ वर्षें मुख्यमंत्री राहिले‌. गेली ६ वर्षे ते प्रधानमंत्री आहेत. *या सार्‍या अग्निदिव्यातून हिंदूंना काय मिळाले ? शिव्याशाप आणि रक्तपात ! दंग्यात, बॉम्बस्फोटांत हजारो हिंदू मारले गेले. हजारो आजही तुरुंगात सडताहेत. यापैकी  कुणाचीही अयोध्येत ‘राम जन्मभूमी मंदिर’ निर्माण झाल्याने सुटका होणार नाही. मेलेले जिवंतही होणार नाहीत !* तरीही भूमीपूजन होणार ! ‘राम जन्मभूमी मंदिर’ तर झालेच पाहिजे.

     तथापि, ‘बाबरी मशीद’ ही जशी इस्लामी आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष देत होती ; तशीच, ‘राम जन्मभूमी मंदिर’ हे ‘भाजप- संघ’ परिवाराच्या सत्तास्वार्थी,अधर्मी लबाडपणाची आठवण जागती ठेवणार आहे!

———————-

महाराष्ट्रभूषण’साठी शाहिरांची सज्जता

‘चित्रलेखा’च्या मागील (डिजिटल )   अंकात ‘लोकशाहीर’ अण्णा भाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्ताने त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करावे, असे आवाहन ‘आजकाल’मधून राज्य शासनाला केले होते. त्यात २०१५ पासूनचा या पुरस्काराचा अनुशेष भरून काढण्यासाठी, ‘संयुक्त महाराष्ट्र’ राज्य निर्मितीला ६० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल अमर शेख, आत्माराम पाटील या शाहिरांप्रमाणे ‘लोकसेवक’ केशवराव धोंडगे, प्राध्यापक एन. डी. पाटील आणि डॉक्टर बाबा आढाव यांनाही ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे, असा शासनाला आग्रह केलाय.

    या आग्रहाला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळाला. शाहिरांच्या ऐतिहासिक कार्याची उजळणी झाल्याने शाहीर मंडळींत नवचैतन्याची  लाट उसळलीय. सत्याग्रहाच्या सिद्धतेची तयारी सुरू झाली आहे. तथापि, सत्तेची उलटापालट झाली तरी, खुर्चीच्या उबेने शासकांची चतुराई अधिक फुलते. त्यानुसार, अण्णाभाऊंची थोरवी गात ‘शिवसेना’ नेते-आमदार *सुनील प्रभू* यांनी अण्णाभाऊंना ‘भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे’, अशी मागणी केली. त्याआधी ‘काँग्रेस’ नेते व सांस्कृतिकमंत्री *अमित विलासराव देशमुख* यांनी ‘राज्य सरकारने अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावे, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी,’ असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. यामागे साऱ्यांच्या भावना प्रामाणिक आहेत. पण कर्तव्याचे काय ?

      अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ द्यावे, यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. ही मागणी ‘मराठा सेवा संघ’ने गेली २० वर्षे लावून धरलीय. देशात १९९९ मध्ये ‘वाजपेयी सरकार’ होते, तेव्हा ‘शिवसेना’तर्फे मंत्री मनोहर जोशी यांनी ‘महात्मा जोतिराव फुले यांचा ‘भारतरत्न’ने गौरव करावा,’ असे निवेदन प्रधानमंत्रींना भेटून दिले होते. पुढे मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष झाले आणि त्यांनी लोकसभेत वि. दा. सावरकर यांचे तैलचित्र लावून घेतले. पण महात्मा फुले यांचा ‘भारतरत्न’ने गौरव व्हावा, यासाठी  काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही.

    हा इतिहास पाहता, अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ करण्यासाठी कागदी घोडे नाचवण्याचा खेळ थांबवावा. नियत साफ असेल, तर अण्णाभाऊंना  ‘महाराष्ट्र भूषण’ने गौरवित करून, जे आपल्या हातात आहे, ते आधी करून दाखवा! ‘महाराष्ट्र भूषण’ने  अण्णाभाऊंची थोरवी वाढणार नाही. पण सरकार बदलातला थोरपणा नक्कीच दिसेल ; तो दाखवा !

(लेखक साप्ताहिक चित्रलेखा चे संपादक आहेत.)

9322222145

Previous articleसोनिया गांधींचं तोंडदेखलं शहाणपण !
Next articleसोमेश्वर यारा, तुम बहोत याद आओगे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here