मनोहर पर्रिकर… प्रेमात पडावे असे मित्र!

रघुनाथ पांडे
मनोहर पर्रिकर प्रेमात पडावे असे मित्र. आमची मैत्री कशी झाली, ते नाही कळत. पण गट्टी जमली. आमचे फक्त पटले नाही, ते एकाच विषयात. ते मासे खायचे आणि मी बघत बसायचो! पत्रकारांपासून ते दूर राहत. फार नाही,पण अंतर ठेवत. सगळे पत्रकार मित्रही असेच सांगायचे. माणूस साधा असला,तरी  बोलण्यात स्पष्ट…खूपसा फटकळ. मला ओळख करून घ्यायची होती. भारताचा संरक्षणमंत्री मराठी आहे, आणि आपली ओळखही नाही. तसे ते हात उंचावून, शेकहॅन्ड करून प्रतिसाद देत. हलके स्मित करीत; पण बोलत नसत.
एक दिवस संसदेतील त्यांच्या लाकडी केबिनमध्ये जाऊन बसलो. त्यांची वाट बघत. दुपारी दीडच्या दरम्यान ते आले. आल्या आल्याच जेवले पाहिजे, असे त्यांनी उपेंद्र जोशी यांना सांगितले. उपेंद्र, त्यांचा सचिव मागील काही महिन्यात माझा मित्र झाला होता. अनेकदा आम्ही बोलत असू. पण पर्रीकरांना भेटण्याचा योग येत नव्हता. उत्सुकता कमालीची होती.
उपेंद्रने माझी ओळख करून दिली. पर्रिकरांनी दोन मिनिटे माझ्याकडे असे काही रोखून पाहिले, की आपले काही तरी चुकले,असा माझा समज झाला. म्हणाले, तुम्ही लोकसभेतील पत्रकार गॅलरीत बसलेले मी अनेकदा पाहत असतो. त्यामुळे असे रोखून पाहिले; रिकॉल करत होतो. नाव,गाव, पत्ता, किती वर्षे? दिल्लीला आहेस,पूर्वी कोठे होता, आई-वडील… अशी सगळी चौकशी त्यांनी केली. खुर्चीतून उभे झाले आणि म्हणाले,चल घरी जाऊ..!’
  उपेंद्रने माझ्याकडे पाहिले. काहीच क्षण तिघेही एकमेकांकडे बघू लागलो. केबिनच्या बाहेर पडून संसदेच्या चिंचोळ्या दारातून बाहेर निघालो. काळ्या रंगाची अँबेसिडर उभी होती. प्रोटोकॉलनुसार त्यात नंबर लागणार नव्हता. कारचे दार उघडले, ते आत शिरले. दरवाजा बंद झाला. दुसऱ्या दरवाज्यातून उपेंद्र आत शिरला. तोही बंद झाला. कडक वर्दीतल्या एकाने सलाम ठोकला. कार हलली. पुढे निघाली तोच, क्षणभरात थांबली. डावीकडचा दरवाजा किलकिला झाला…हात बाहेर आला आणि चेहराही.
अरे, ये ना रघू…! -पर्रिकरांनी आवाज दिला.
आम्ही तिघेही मागे बसलो. थोडा एकबाजूने कोंबूनच होतो. कार त्यांच्या नवीन कोठीवर थांबली.
गेल्या गेल्या एका शानदार खोलीत ते काहीवेळ गेले. आतून, काही अधिकारी बाहेर निघाले. आम्ही जेवणाच्या टेबलवर!
शाकाहारी जेवण होते; पण चवीला मासे आणि अन्य काही पदार्थ होते. माझ्यापुढे ताट आले. त्यातही ते सगळे.
मी जेवायचं थांबलो. ताटाकडे बघून घुटमळू लागलो.
काय रे, उपवास की शाकाहारी..?
शाकाहारी- मी म्हणालो.
विदर्भातील जेवण इथे करू एकदिवस, ‘आज जे नको ते बाजूला ठेवून जेव.’
जेवण,गप्पा आणि न पाहिलेले सिनेमे, पुस्तकं, वर्तमानपत्र…अशा वेगळ्या गप्पा झाल्या. बंगल्यात घिरटी घालून निघणार, तोच त्यांनी एक कॉफीटेबल बुक हातात थोपविले. बघ, वाच आणि सांग, म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील छायाचित्रांचा संग्रह होता तो. येतो,भेटू असे सांगून निघालो.
एक कार मला ऑफिसपर्यंत सोडून द्यायला त्यांनी दिली.
पुढे भेटी वाढल्या. त्यांनी मोबाईल नंबर दिला. यावर कधीही फोन कर. उचलला नाही,तर एसएमएस कर,असे त्यांनी सांगितले. पण मी असा संपर्क कधीही केला नाही. त्यांच्यातील अदब आणि कमालीची विनम्रता मला थेट फोन करायला परवानगी देत नसे. उपेंद्रला सांगून बोलत असे. ते बातमी देत नसत. संकेत देत, संदर्भ देत. पण हे आपल्यात असे सांगून गप्पा पुढे सरकायच्या. त्यांना गप्पा करायच्या असतील तर, उपेंद्रला सांगून निरोप द्यायचे. दिल्लीतील हिंदी वर्तमानपत्राच्या रिपोर्टर्सला वाटायचे हा एक सोर्स आहे. पण त्यांना मी काहीही संदर्भ देत नसे. हा किस्सा मी एक दिवस त्यांना सांगितला. तर म्हणाले, ‘बातमी मिळावी म्हणून गप्पा करत नाही,असे सांग.’
एका प्रजासत्ताक दिनाला  बराक ओबामा पाहुणे आले होते. मी रिपोर्टर म्हणून परेड बघायला जाणार होतोच. यावेळी माझ्या बायकोलाही यायचे होते. ऐनवेळेचा मामला होता. पास अत्यंत मर्यादित होत्या आणि कडक सुरक्षा व्यवस्था होती. आणखी एक पास मिळविण्याचे प्रयत्न केले. सफल झाले, पण पास दूरचा मिळणार होता. दुसऱ्या टोकावरचा! नियमानुसार पास मिळण्याची वेळ तशी उलटली होती. कार्यक्रमाला १२ तास शिल्लक असताना शेवटी, पर्रिकरांना एसएमएस केला.  दुसऱ्या मिनिटाला एका अधिकाऱ्याचा फोन आला. माहिती विचारली. तासभरात एका अत्यंत देखण्या लिफाफ्यात पास आला. लिफाफ्यावर व आतील पासवर आमची नावे होती. आसन व्यवस्था असलेला नकाशा होता. आमचे आसन कोणते त्यावर एका रंगाचे मार्किंग होते. सोनेरी रंगातील तिरंगा झेंड्याची  प्रतिकृती त्यात होती ..आणि एका बाजूला पर्रिकरांची सही होती. मला पाठविलेला पास, जिथे पाहुणे बसतात त्या मुख्य स्टेजसमोरील संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांच्या बॉक्समधील होता. निवडक ३० लोक. त्यात आपण, हा विचारच सुखावून गेला होता.
.. रात्र याच विचारात गेली. सकाळी तयारी करून निघालो तर, पावसाची रिपरिप सुरू होती. रस्ते बदलले होते. गर्दी तोबा होती. विविध गेटसमोर हजारोंची रांग होती. चिखलाने आमच्या ड्रेसचे हाल केले होते. ही बिकट वाट चालत पास घेऊन बॉक्सपर्यंत येईपर्यंत झेंडावंदन झाले होते…बॉक्समध्ये त्यानंतर एन्ट्री नव्हती.
हताशपणे दुरून तो सोहळा अनुभवला. तो पास जपून ठेवला. ते सगळेच अविस्मरणीय होते.
दोन दिवसांनी त्यांनी बोलाविले. झाला प्रसंग सांगितला. काहीही बोलले नाहीत. यावेळी वैदर्भीय जेवण होते.. तर्रीबाज आहे की नाही?, एवढेच बोलले.
त्यानंतर भेटी अनेक झाल्या, पण दिल्ली सोडल्यानंतर कमीच. मी नागपूरला परतलो; कालांतराने ते गोव्याला. दोन वेळा नागपुरात भेटलो आणि एकदा फोनवर. तोच संवाद शेवटचा. जीव ओवाळून टाकावा असा.
घरी वर्तमानपत्र टाकणाऱ्याचे नाव मनोहरराव पालीकर होते. मोबाईलमध्ये मनोहर पी. असे नोंदविले आहे. दोन दिवस पेपर टाकले नाहीत म्हणून, एका सकाळी संतापून फोन लावला. झरझरा बोलत सुटलो. पलीकडून काहीही आवाज नव्हता.
म्हणालो, आता सगळी पेपर्स द्या.
राग शांत झाला.
तेव्हा पलीकडून हसत हसतच आवाज आला, ‘रघू,चिडू नकोस हवं तर गोव्याची पेपर्स पाठवितो…’
मी मोबाईल स्क्रिनवरील नाव पाहिले.
सॉरी म्हटले. तुम्हाला चुकून लागला.
बरं झाले, या निमित्ताने बोललो तरी!
ये इकडे कधीतरी. खूप दिवस झाले,भेटलो नाही.
यावर काहीही बोलू शकलो नाही. इतका अपराधीभाव मनात दाटून होता.
आता तर,प्रश्नच नाही!!
आता नंबरही डिलीट करीन..
-(लेखक ए एम न्यूज या लवकरच सुरु होत असलेल्या मराठी वृत्त वाहिनीचे संपादक असून दिल्ली येथे लोकमतचे विशेष प्रतिनिधी होते)
9818213515
Previous articleतर पानिपत झालेच नसते…..
Next articleराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर वामनराव जोशी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.