तर पानिपत झालेच नसते…..

 उत्तर भारतात अफाट पराक्रम गाजवत मराठी साम्राज्य निर्माण करणारे  सेनापती मल्हारराव होळकर यांचा आज जन्मदिवस . त्यानिमित्ताने पानिपत युद्धाचा नव्याने घेतलेला वेध …

-संजय सोनवणी

सर्वसंहारक पानिपत युद्धाला १४ जानेवारी २०१२ रोजी २५१ वर्ष झाली आहेत. तरीही या शोकांतिकेचा सल मराठी मन-मानसावरुन अद्यापही गेलेला नाही. ज्या वीरांनी या अकल्पनीय अशा युद्धात रक्त-प्राण सांडले त्यांना आदरांजली अर्पण करत  मुळात हे युद्ध झालेच का? या प्रश्नाचा उहापोह येथे करायचा आहे.

अब्दाली पाचव्यांदा चालून आला. खरे तर मराठ्यांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा २३ एप्रिल १७५२ रोजीच केला होता. त्यानंतरही १७५६ मध्ये अब्दाली चवथ्यांदा चालुन आला होता, मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी तिकडे फिरकलेही नाहीत. एका अर्थाने तो करारभंग होता. पाचव्यांदा अब्दाली चालून आल्यानंतर मात्र स्वत: भाउसाहेब पेशवा आणि स्वत: विश्वासरावांनी उत्तरेकडे मोहीम काढावी यामागे नेमके काय कारण होते? रघुनाथरावांना, ज्यांना अटकेच्या मोहिमेमुळे उत्तरेची व तिकडील राजकारणाची जाण होती त्यांना का पाठवले नाही? अटक मोहिमेत रघुनाथराव कोटभरचे कर्ज करुन आले म्हणून त्यांना उत्तरेकडे पाठवायला नानासाहेब पेशवे तयार नव्हते, असा निर्वाळा शेजवलकर देतात. पण ते खरे आहे काय?

आणि कोणाला उत्तरेच्या मोहिमेवर पाठवायचे याचा खल करुन भाऊसाहेबांची नियुक्ती करत भाउ उत्तरेत पोहोचेपर्यंत तिकडे शिंदे-होळकर काय करत होते?

हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि येथे या प्रश्नांची थोडक्यात उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तरे तपासायची आहेत.

बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी शिंदेंचा झालेला अपघाती मृत्यू हा  एकार्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. उत्तरेत जरी शिंदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली तरी कोणत्याही सरदाराला डोईजड होऊ द्यायचे नाही म्हणून त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी याही बाबतीत वापरले होते. प्रत्यक्षात शिंदे आणि होळकर यांच्यात वैमनस्य निर्माण होईल अशा घटना घडूनही (उदा. कुंभेरीचा वेढा आणि त्यात झालेला खंडेराव होळकरांचा मृत्यू आणि तरीही शिंदेंनी केलेला तह) होळकर आणि शिंदे उत्तरेतील पेशव्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी, कसे का होईना एक राहिलेले दिसतात. खरे तर दत्ताजीच्या मृत्यूमुळे शिंदेंची बाजू कमजोर झाली होती. जनकोजी तरुण आणि अनुनभवी व त्यात जखमी होता. तरीही मल्हारराव होळकरांनी सुरजमल जाटाचीही मदत घेत शिंद्यांसह १४ जानेवारी १७६० ते २८ फ़ेब्रुवारी १७६० या काळात गनिमी काव्याने वेगवेगळ्या पद्धतीने चढाया करत पार सिकंदराबाद ताब्यात घेत अब्दालीच्या नाकावर टिच्चून चौथाई वसुल केली.

अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता हे सर्वच इतिहासकारांनी नोंदवले आहेच. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. त्याचा इतिहास उपलब्ध आहे तो असा…”अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे – होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली की, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला अब्दालीस मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे – होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली – मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुच ठेवली होती. १२ जून रोजी होळकर लिहितो, ” गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले.” ( मराठी रियासत – खंड ४ )”

पानिपत युद्धाचे नवीन भाष्यकार संजय क्षीरसागर यांनी जे वरील भाष्य केले आहे ते मननीय आहे. प्रा. मधुकर सलगरे यांनीही पानिपत युद्धाबाबतची जी साधने वापरली आहेत त्यातूनही वरील विचारांना व माहितीला पुष्टी मिळते.

आता १३ मार्च रोजी अब्दालीशी तह झाला आहे. या तहानुसार नजीबाला त्याचा प्रदेश तसाच मिळनार असून दिल्लीची पातशाही व्यवस्था सुरजमल जाटाच्या इच्छेनुसार (म्हणजे अलीगौहर ऐवजी शहाआलमला पातशहा बनवणे) होणार आहे, हे पक्के झाल्यानंतर अब्दालीला भारतात राहण्याचे कारण उरले नव्हते. तसेच भाऊलाही उत्तरेत मोहीम करण्याचे कारण उरले नव्हते. आणि अब्दाली परत जायला निघालाही होता.

पण कदाचित भाऊला ही माहिती उशीरा मिळाली असावी. कारण तो १४ मार्च १७६० लाच उत्तरेकडे निघालाही होता. स्वत: पेशवा एवढे मोठे सैन्य घेवून उत्तरेकडे निघाला आहे हे समजताच नजिबाची भंबेरी उडने स्वाभाविक होते. रघुनाथराव पेशवा हा होळकरांच्या ऐकण्यातील होता, नजिबाचे प्राण त्यामुळेच वाचलेही होते. पण भाऊ हा होळकरांचा द्वेष्टा असल्याने अब्दाली निघून गेला तर, आपली खैर नाही हे माहीत असल्याने नजिबाने इस्लामची वाह-उलि-उल्लाहप्रणित दुहाई देत अब्दालीला थांबवून ठेवले.

अनुभवी होळकरांना या स्थितीचा अंदाज आला होता हे पुढील घटनाक्रमावरुन स्पष्ट होते. होळकरांनी तरीही फिसकटलेला तह कायम करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाऊंना चंबळेपार येवू नका, अशी गळ घातली. भाऊसाहेब चंबळेकाठीच थांबते तर कदाचित नजिबाला हायसे वाटून अब्दालीला त्याने परत जायची संधी दिली असती.

पण पेशवाईतले राजकारण येथे लक्षात घ्यायला हवे. रघुनाथराव पेशवा आणि होळकर यांच्यात सख्य आहे आणि रघुनाथरावांची राज्यतृष्णा पहाता होळकरांच्या मदतीने ते उत्तरेत स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करतील अशी भिती नानासाहेबांना सतत वाटत होती. भाऊची उत्तरेसाठीची नियुक्ती त्याचाच परिपाक. त्यामुळे होळकरांचा कोणताही सल्ला भाऊ ऐकणे शक्यच नव्हते आणि झालेही तसेच. पूर्ण पानिपत प्रकरणात भाऊंनी होळकरांचा एकही सल्ला न ऐकता नव्यानेच सेवेत रुजू झालेल्या इब्राहिमखान गारद्याचाच भरवसा धरला. तरुण जनकोजीलाही विचारात घेतले नाही. इब्राहिमखान प्रस्तुत गोलाची लढाई एक प्रकारे हाराकिरी ठरली. कारण गोलाच्या मागील बाजूचे सैन्य युद्धात कामी आलेच नाही. ते यावे यासाठी  युद्धाचा दुपारनंतरचा रांगरंग पाहून जी योजना करायला हवी होती ती भाऊने केलीच नाही. त्यामुळे युद्ध झाले ते फक्त इब्राहिमखान गारदी, हुजुरात, शिंदे-होळकर आणि सरदार विंचुरकरादी गोलाच्या पूर्व, दक्षिण आणि पच्छिम बाजूवर. उत्तर सुरक्षित राहीली…आणि उत्तरेच्या बाजूचे नियुक्त सरदार आणि सैन्य आधीच पळाले.
या युद्धाच्या तीन दिवस आधीपर्यंत (११ जानेवारी १७६१) भाऊसाहेब पेशवा अब्दालीशी तहाच्या वाटाघाटी करत होता. सरहिंदेची सीमा आणि दिल्लीच्या पातशहाची नियुक्ती या मुद्द्यांबद्दल तह अडकून बसला होता. युद्धखर्च हाही एक मुद्दा होताच. महत्वाची बाब अशी आहे की मुळात होळकरांनी व शिंद्यांनी १३ मार्च १७६० रोजी अब्दालीशी जो तह आधीच केलेला होता. त्यातील अटी जवळपास अशाच होत्या. त्या आधीच मान्य करत भाऊंनी संशयी स्वभाव बाजूला ठेवला असता तर त्याला सुखनैव सर्व तीर्थयात्राही करता आल्या असत्या आणि हवे तर बंगालवरही स्वारी करता आली असती. पानिपत घडलेच नसते!

पण या १३ मार्च १७६० च्या आधीच झालेल्या तहाबाबत इतिहासकार मौन बाळगत असतात हेही खरे!

(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत)

९८६०९९१२०५

Previous articleनेहरू आणि चीनचे सुरक्षा परिषदेतील स्थान
Next articleमनोहर पर्रिकर… प्रेमात पडावे असे मित्र!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.