मराठा सेवा संघ बदलतो आहे?

महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.


 या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला.

           हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, ‘लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,’ असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleइस्रोचं अभिमानास्पद यश आणि इस्रोप्रमुखांचा देवभोळेपणा
Next articleराज्यसभा, विधानपरिषदेच्या जागांचा लिलाव होऊ द्या!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.