मराठीसाठी इष्टापत्ती ठरलेली रावतेंची निराशा !

-प्रवीण बर्दापूरकर  

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना साक्षी ठेवत हृदयाला हात घालणारी भावनात्मक भाषा वापरुन आणि काहीशी झोंबरी टीका केल्यानंतर अखेर मराठी विद्यापीठ तसंच मराठी भाषा भवनासाठी मुंबईतील एन मोक्याचा , मरिन ड्राईव्हवरचा भूखंड देण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे . उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या , वादग्रस्त सचिन वाझे यांचं ( अपेक्षेप्रमाणे ) आणखी वादग्रस्त होणं , मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांचा मासिक हप्ता (?) मागितल्याचा केलेला दावा आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चोहोबाजूंनी उठवलेलं रान , यात सत्ताधारी पक्षाची होरपळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांच्या भाषणाकडे आणि त्यातून मराठी विद्यापीठाच्या प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या  मागणीला मिळालेल्या मान्यतेकडे दुर्लक्षचं झालयं .

दिवाकर रावते हे शिवसेना आणि ठाकरे घराण्याचे निष्ठावंत आहेत . ज्यांना दिवाकर रावते यांची शिवसेना आणि ठाकरे घराण्यावरची निष्ठा माहीत आहे त्यांना हे चांगलं ठाऊक आहे की , उद्या सेना भवनाच्या कोपऱ्यात जरी उभं केलं तरी दिवाकर रावते , शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाच्या संदर्भात स्वप्नातसुद्धा  कटू , वैर किंवा बंडखोरीचा भाव मनी बाळगणार नाहीत . कारण त्यांचा डीएनए सेना आणि ठाकरे आहे . ते प्रदीर्घ काळापासून विधान परिषदेचे सदस्य आहेत . भाजप-सेना युतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते . त्याआधीही काही काळ त्यांनी मंत्रीपद सांभाळलेलं आहे , रस्त्यावर उतरुन घाम गाळत कार्यरत असणारा हा नेता आहे , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी केली नसेल त्यापेक्षा जास्त पायपीट बाळासाहेब ठाकरे यांचं पत्र , वडाचं झाड आणि १० हजार रुपयांची रोख मदत देण्यासाठी दिवाकर रावते यांनी केलेली आहे .

शिवसेनेची प्रतिमा जरी शहरातील मध्यमवर्गीय पक्ष अशी असली तरी दिवाकर रावते यांची काळ्या मातीशी असणारी बांधिलकी अतूट आहे. ऑटोरिक्षाचे परवाने मराठी युवकांनाच मिळावेत असा धाडसी निर्णय घेणारे पारिवहन मंत्री म्हणून  दिवाकर रावतेच होते आणि राज्यातील आदिवासी युवतींना एस.टी. महामंडळात चालक म्हणून नियुक्त्या मिळाव्या म्हणून धडपडणारेही दिवाकर रावते होते . दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलींना बसचा मोफत प्रवास परवाना मिळावा म्हणूनही पुढाकार घेणारे दिवाकर रावतेच होते . असं बरंच काही चांगलं दिवाकर रावते यांच्याविषयी लिहिता येईल . मात्र , त्यापेक्षाही मराठी विद्यापीठाचा प्रश्न ज्या पद्धतीने दिवाकर रावते यांनी मार्गी लावला त्याला दाद द्यायला हवी .

दिवाकर रावते यांचं मराठी प्रेम सर्वज्ञात आहे . मराठी विद्यापीठ आणि मराठी भाषा भवन  हा प्रश्न ते गेली अनेक वर्षे आधी शिवसैनिक आणि मग  आमदार , मंत्री म्हणून मांडत आलेले आहेत .उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश झाला नाही म्हणून दिवाकर रावते यांनी मराठीकडे होत असलेल्या सरकारच्या दुर्लक्षावर टीका केली , मंत्रीपद न मिळाल्याची निराशा विषादपूर्ण शब्दांत व्यक्त केली , वगैरे टिकात्मक प्रतिक्रिया वाचनात आल्या . तसं असेल ते फार कांही गैर नाही तरी ती निराशा , मराठीसाठी इष्टापत्ती ठरली आहे , असा सकारात्मक विचार करायला हवा . दिवाकर रावते यांनी हे विधान परिषदेतले भाषण सरकारवर टीका म्हणून केले असलं , मंत्रीपद मिळालं नाही म्हणून आलेल्या निराशेतून केलं असलं गृहीत धरलं तरी , ते आहे मोठं बोचरं व खुमासदार . निराशा व्यक्त करतानाही एखादा प्रश्न कसा लावून धरावा याचं चपखल उदाहरण म्हणून या भाषणाकडे बघायला हवं . त्यात शासकीय स्तरावर होणारी मराठी अवहेलना आहे आणि त्याबद्दलची खंत त्यांनी बोचर्‍या शब्दात मांडली आहे . विद्यापीठ आणि भाषा भवनाचा मुद्दा लावून धरताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांना काय सांगू , असा निरुत्तर करणारा सवाल करून सत्ताधारी पक्षाला खिंडीतही पकडलं .  दिवाकर रावते यांचं विधानपरिषदेलं ते संपूर्ण भाषण ऐकण्यासारखं आहे ; जिज्ञासूंनी ते भाषण अवश्य ऐकावं . त्याची लिंक अशी- https://youtu.be/mskqHa_uQE0  .

दिवाकर रावते यांच्यासारखा ज्येष्ठ आणि अभ्यासू नेता जर मंत्री मंडळात असता तर अनेक प्रसंगात उद्धव ठाकरे यांना मदतच झाली असती आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरले नसते , हेही या भाषणातून लक्षात येतं . वादग्रस्त सचिन वाझेची नियुक्ती , त्या प्रकरणी विधानसभेत टीका झाल्यावरही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात न बोलणं , काही सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशा अनेक विषयांवर दिवाकर रावते यांनी ‘हे करु नका’ किंवा ‘करायला हवं’ असा परखड सल्ला दिला असता याबद्दल शंका नाही .

पत्रकारितेत आल्यापासून म्हणजे गेल्या ४२ वर्षांपासून विविध पातळीवर ‘ मराठी भाषा , विद्यापीठ आणि भवन ‘ हा प्रश्न किती मान्यवरांनी लावून धरला आहे , हे मला चांगलं ठाऊक आहे . डॉ . वि . भि . कोलते  , कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ते ज्येष्ठतम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ , मित्रवर्य श्रीपाद भालचंद्र जोशी ते राजन गवस , दीपक पवार , अनिल गोरे , प्रेमानंद गज्वी अशी ही मराठीसाठी तळमळणारी असंख्य  नामवंतांची  मांदियाळी आहे .  चिंध्या पांघरुन मराठी भाषा मंत्रालयाच्या पायरीवर कशी दीनवाणी उभी आहे , हे कुसुमाग्रजांनी सरकारला परखडपणे सुनावलेलं आहे . साहित्य आणि संस्कृती विषयक विविध सभा-संमेलनात  या मागणीचे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत . अनेक पत्रकार आणि संपादकांनी मराठी भाषेला डावललं जाण्याचा मुद्दा अनेकदा लावून धरलेला आहे ; त्यासाठी आंदोलनही केलेलं आहे . अशात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे . ( त्यांचा उल्लेख विधान परिषदेतील भाषणात ‘देशमुख’ ऐवजी ‘देशपांडे’ असा दिवाकर रावते यांच्याकडून झाला आहे ! ) राजकीय आघाडीवर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच विधिमंडळाच्या पातळीवरही हा प्रश्न लावून धरणारात  ग . दि . माडगूळकर, ना . धों . महानोर , व्यंकप्पा पत्की आणि आता दिवाकर रावते अशी ही  दीर्घ नामावली आहे . त्यामुळे या विद्यापीठ किंवा भाषा भावनाची मागणी पूर्ण होत असल्याचं श्रेय कुण्या एकट्या मराठी सारस्वतानं घेऊ नये . साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन ‘सख्खे सहोदर’ आणि समाज माध्यमावर ‘शेवटचे अंत्यदर्शन’ अशी मराठी साहित्याची ‘सेवा’ करणाऱ्या चिटकोरांनी  तर मराठी विद्यापीठाला जागा मिळाल्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न दूरदूरुनही करु नये !

तरी दिवाकर रावते यांच्या या भाषणामुळे अखेर मराठी विद्यापीठाच्या जागेचा प्रश्न सरकार पातळीवर  मार्गी लागला आहे , असं सध्या तरी दिसतं आहे . उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा निर्णय घेतल्यानं मराठी भाषा , संस्कृती आणि मराठी माणसासाठी शिवसेना कांहीच करत नाही हा भ्रम किंचित का असेना दूर होण्यास मदत होणार आहे . मात्र  , घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात सरकार दरबार ते प्रशासन असं खूप मोठं अंतर असतं . चाळीस वर्षे होत आली तरी पैठणच्या संत विद्यापीठाचा प्रश्न मार्गी लागला नाहीये , शिक्षणात मराठी भाषा सक्तीची झालेली नाही , मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही , असं ( अस्मितेचं म्हणून का असेना ) खूप काही सांगता येईल . सरकारकडून घोषणा होतात आणि पुढे लवकर  काही हालचाल होत नाही हा अनुभव नेहेमीचाच आहे .

दिवाकर रावते यांना याची कल्पना नाही असं म्हणता येणार नाही . त्यामुळे भाषा संकुल कसं असावं ,  प्रशासकीय यंत्रणेचे स्वरुप काय असावं , नवतंत्रज्ञानाशी  मराठीचा मेल कसा घालावा यासाठी पुन्हा समित्या स्थापन करण्याचा घोळ न घालता मरिन ड्राइव्हवरची जागा तातडीने ताब्यात घेऊन येत्या १ मे रोजी भूमिपूजन करून एका वर्षाच्या आंत या घोषणेची अंमलबजावनी कशी त्वरेने मार्गी लागेल याची जबाबदारी दिवाकर रावते यांनी स्वीकारायला हवी . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  त्यांचेच आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामाची शैली तडफदार आहे , याचा वापर करुन घेत मराठी विद्यापीठ व भाषा संकुल अस्तीत्वात येण्याचं जगभरातल्या मराठी जनतेचं स्वप्न साकार कसं होईल हे पेलण्याची जबाबदारी आता दिवाकर रावते यांच्यावर आली आहे . ही जबाबदारी कोणत्याही मंत्रीपदापेक्षा मोठी आहे , हे दिवाकर रावटे यांनी लक्षात घ्यावं .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

बघा आणि ऐका दिवाकर रावतेंचा संताप

Previous articleमहाराष्ट्रात ‘भूषण’ दुष्काळ ?
Next articleगाईड : आज फिर जीने की तमन्ना है…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.