महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र- पुस्तक परीक्षण

-नंदकुमार मोरे

विचारवंताच्या ‘वैचारिक चरित्रलेखना’ची संकल्पना मराठीत फार रुजलेली दिसत नाही. साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले ‘मोनोग्राफ’ आणि कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानची संक्षिप्त चरित्रे या संकल्पनेच्या जवळ जाणारी आहेत. परंतु, ती ‘वैचारिक चरित्र’ म्हणता येतील असे त्यांचे स्वरूप नाही. यादृष्टीने डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले ‘महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र’ नावीन्यपूर्ण चरित्रलेखनाचा वस्तुपाठ आहे. हे चरित्र काळाच्या पटावरचे संदर्भ शोधत फुलेंच्या जडणघडणीचा सूक्ष्म शोध घेऊन लिहिलेले नावीन्यपूर्ण चरित्र आहे. या निमित्ताने त्यांनी ‘वैचारिक चरित्रलेखना’ची संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. जोतीराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते. त्यांची जडणघडण मूलत: एक कृतिशील विचारवंत म्हणून झालेली आहे. मोरे म्हणतात तसे, ‘जोतीरावांच्या कार्याबद्दल अतीव आदर बाळगणाऱ्यांनीसुद्धा जोतीरावांकडे एक समाजसेवक, तळमळीचा कार्यकर्ता या नात्यानेच पाहिले. जोतीराव हे एक ताकदीचे विचारवंत होते. त्यांचे कार्य हे केवळ सद्भावनेपोटी किंवा करुणेतून घडले असाच या मंडळींचा समज असावा. वस्तुतः जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. तसा त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही या वैचारिकतेशी जोडता येते.’ (प्रस्तावना) तसे जोडण्याचा प्रयत्न हे या चरित्रलेखनाचे प्रयोजन आहे. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील विशेषत: पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती फुलेंच्या वैचारिक जडणघडणीला कारणीभूत ठरली. या परिस्थितीची परखड चिकित्सा हे या चरित्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

सन १८१८ ला पेशवाई संपली. त्यानंतरच्या दशकात महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म झाला. पेशवाईच्या उत्तरार्धात महाराष्ट्राची सामाजिक स्थिती पराकोटीला गेली होती. पुण्यात तर ती क्लेशकारक बनली होती. या स्थितीत बहुजन समाजाचे कमालीचे शोषण चालले होते. शिवाय हा समाज पदोपदी अपमानाचे जीवन जगत होता. अशा वातावरणात महात्मा फुले यांची जडणघडण सुरू झाली. या वातावरणाचे चटके फुले यांना लहान वयातच बसू लागले होते. त्यातून त्यांचा मन:पिंढ घडत गेला. वडिलांच्या परिचित ब्राह्मण मित्राकडून जोतीरावांच्या शिक्षणाल खो बसला. वडिलांना त्यांचे शिक्षण बंद करावे लागले. पुढे पुन्हा ‘स्कॉटिश मिशनरी शाळेत’ प्रवेश मिळाला आणि तेथूनच त्यांना इंग्रजी भाषेसह युरोप-अमेरिकेतील नव्या बदलांचे ज्ञान झाले. मिशनऱ्यांनी सुरू केलेली हिंदू धर्मचिकित्सा कानावर पडू लागली. त्यांच्यातील विचारवंत घडण्याची प्रक्रिया येथूनच सुरू झाली. पुढे फुले यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अभूतपूर्व योगदान दिले. हे योगदान धर्मचिकित्सेसह समाजाची मूलगामी चिकित्सा करणाऱ्या नव्या विचारांचे आहे. त्यांनी दिलेल्या विचारधनावरच नवी समाजरचना घडू लागली. आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी फुल्यांनी केलेली बंडखोरी, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता व्यक्त केलेले विचार, आजही भारतीय समाजाला मार्गदर्शक आहेत. या विचारातूनच एकोणिसाव्या शतकात बहुजन समाजात स्थित्यंतराचे वारे वाहू लागले. या स्थित्यंतराचे महात्मा फुले बीनीचे शिलेदार बनले. अशा व्यक्तिमत्त्वाचा वेध त्यांच्या विचारांच्या आधारे या चरित्रग्रंथात घेतला आहे.

महात्मा फुलेंची जडणघडण ज्या पुण्यात सुरू झाली, ते पुणे महाराष्ट्रातील इतर शहरांच्या विशेषत: मुंबईपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या सामाजिक वातावरणात जगत होते. मोरे म्हणतात तसे, ‘पुण्यातील लोक गेलेल्या राज्यवैभवाच्या आठवणींवरच जगत असावेत. जग बदलले आहे हे जणू त्यांच्या गावीही नव्हते.’ (१२) पुण्यात अतिशय कर्मठ वातावरण होते. अशा वातावरणात पुण्यातील ब्राह्मण समाजातील गोपाळ हरी देशमुखांनी मुंबईच्या ‘प्रभाकर’मध्ये ‘शतपत्रे’ लिहिली. मोरे म्हणतात तसे, या शतपत्रांनी ‘ब्राह्मणांच्या धर्माच्या व ज्ञानाच्या पिळाचा नक्षा उतरला.’ (१२) त्यामुळे जोतीराव फुले यांना या शतपत्रांनी एक पृष्ठभूमी तयार करून दिली. फुले यांनी आपल्या अखंडात याची नोंद करून ठेवली आहेच. ते म्हणतात, ‘आर्याजीची मति अतिअमंगळ। कथिली गोपाळ देशमुखे।।’ तत्कालीन परिस्थितीत आणि नंतरही लोकहितवादींचे हे लेखन फार महत्त्वाचे ठरले. सदानंद मोरे लिहितात, ‘पुण्यातील लोकहितवादींचे अस्तित्व हा फुल्यांना अनुकूल घटकांमधील एक होय. ख्रिस्ती मिशनऱ्यांचे विशेषत: स्कॉटिश मिशनच्या शाळेचे अस्तित्व हा दुसरा घटक होय. तरुणपणी कार्यारंभी समविचाराचे मित्र व सहकारी आणि तेही उच्चवर्णीय लाभणे हा तिसरा घटक आणि सावित्रीबाईंसारखी पतीच्या उद्दिष्टांशी व कार्याशी पूर्ण समरस होणारी पत्नी हा चौथा घटक होय.’ (१४) जोतीराव फुल्यांच्या जडणघडणीत त्यांचे शालेय जीवनातील मित्रच प्रारंभीचे सहकारी होते. त्यामध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरे विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघेही मित्र विशेष म्हणजे उच्चवर्णीय होते. या सर्वांनी आपल्या कामाची सुरुवात शिक्षणापासून केली. या मित्रांनी आपल्या ख्रिस्ती मिशनच्या शाळेपासून धर्मचिकित्सा ऐकलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे धर्मांबाबतची तौलनिक दृष्टी तयार झाली होती. या दृष्टीमुळेच हे मित्र सामाजिक कामांत एकत्र येण्यासाठी झाली. सदानंद मोरे यांनी फुलेंची घडणघडण या शाळेपासून सांगितली आहे. पुढे त्यांना अमेरिकन बंडखोर विचारवंत थॉमस पेन यांच्या पुस्तकांचे वाचन आणि पुण्यातील धर्मसुधारणावादी कार्यकर्त्यांच्या कामाची चिकित्सा कारणीभूत ठरली. त्यामध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या धर्मचिकित्सेपासून पुण्यातील अनेक घडामोडींचा फुलेंच्या जडणघडणीवरील परिणाम दाखवला आहे.

महात्मा फुले यांच्या कार्याची खरी सुरुवात सन १८५१ ला पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या शाळेपासून झाली. ही भारतातील मुलींची पहिली शाळा होती. येथून पुढे महात्मा फुले यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी अविश्रांत आणि सर्वस्व पणाला लावून केलेल्या अनेकविध कामांचा नव्या दृष्टीने शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे. महात्मा फुले करीत असलेले सुधारणावादी काम, त्यात त्यांना येत राहिलेल्या अडचणी, अडथळे आणि त्या-त्या परिस्थितीत त्यांनी घेतलेले निर्णय त्यांचे वैचारिक व्यक्तिमत्व घडण्यास कारणीभूत ठरत गेले. त्यांना पहिला झटका घरातच मिळाला. त्यांनी सुरू केलेले स्त्रियांच्या शिक्षणाचे कार्य त्यांचे वडिल आणि भाऊबंधांना आवडले नाही. त्यातून त्यांना वडिलांनी घराबाहेर काढले. ‘काम की घर’ या टोकाच्या निर्णयात जोतीरावांनी घराचा त्याग करून ‘काम’ स्वीकारले. त्यांच्या बंडखोर व्यक्तिमत्वाचा परिचय या पहिल्या प्रसंगातच होतो.

महात्मा फुले यांच्या वैचारिक उभारणीची चर्चा करताना तत्कालीन काळात पुण्यात समाज सुधारणेचे जे काम चालले होते त्याचीही वस्तुनिष्ठ चिकित्सा मोरे करतात. पुण्यातील हुजुरपागा किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काढलेल्या शाळा केवळ सवर्णांसाठी होत्या. या शाळांचे वास्तव सांगताना ते लिहितात, ‘फुल्यांच्या शाळेनंतर जवळपास अर्धे शतक उलटून गेल्यावर विठ्ठल रामजी शिंदे आपल्या परित्यक्ता बहिणीला – जनाक्काला घेऊन कर्व्यांकडे प्रवेश मागण्यासाठी गेले; तेव्हा कर्व्यांनी ब्राह्मणेतरांच्या मुलींना प्रवेश द्यायची वेळ अद्याप आलेली नाही. असे म्हणून बहिणभावांची बोळवण केली.’ या आणि अशा प्रसंगांशी फुल्यांचे काम ताडून पाहता ते अधिक प्रभावीपणे समोर येते. अशा प्रसंगांबरोबर फुल्यांबाबत चाललेले सांस्कृतिक राजकारणही मोरे अधोरेखित करतात. उदाहरणार्थ, जोतीरावांच्या कार्याची दखल इंग्लडमधील जॉन स्टुअर्ट मिलने घेतली. परंतु, मिलपासूनच कामाची प्रेरणा घेऊन स्त्रीशिक्षणाचे काम करणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या पूर्वसूरींच्या कामाचा उल्लेखही केलेला नसल्याची जाणीव करून देतात. हे राजकारण अनेक बाबतीत घडत होते. फुलेंचे ‘तृतीय रत्न’ नाटक दक्षिणा प्राइज कमिटीला सादर केल्यानंतर त्याला अनुदान का देण्यात आले नाही, याची चर्चा ते करतात.

महात्मा फुलेंवरील विविध प्रभाव शोधताना संत तुकारामांचा प्रभाव त्यांच्या ‘अखंड’ रचनेतून विस्ताराने शोधला आहे. अभंगावरून घेतलेला हा रचनाप्रकार पाहता जोतीराव आपले पूर्वसूरी कसे शोधत होते याचा शोध घेतात. हे सांगताना मोरे लिहितात, ‘ब्राह्मण्याची चिकित्सा करणाऱ्या जोतीरावांना तुकोबा आपले पूर्वसूरी वाटले असल्यास विशेष नाही. त्यानींच पहिल्यांदा शिवाजीकडे शेतकऱ्यांचा राजा व तुकोबांकडे शेतकऱ्यांचा संत या रूपात पाहून त्यांची तशी मांडणी केली.’ (२७) अशा पद्धतीने नवी मांडणी करणारी विलक्षण बुद्धिमत्ता आणि दृष्टी जोतीरावांकडे होती. ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारे नाटक ‘तृतीय रत्न’ ही जोतीरावाची पहिली रचना होय. ज्ञान हाच माणसाचा तिसरा डोळा असल्याने या नाटकाचे मूळ नाव ‘तृतीय नेत्र’ असावे, असे मोरे म्हणतात. या नाटकातील नेमक्या गोष्टी उद्‌धृत करून ते जोतीरावांच्या द्रष्टेपणाचे दर्शन घडवतात.

शिवाजी महाराजांवरीलवरील पोवाडा ही महात्मा फुले यांची एक महत्त्वाची रचना. या पोवाड्यातून त्यांनी महाराजांची खरी प्रतिमा समोर आणली. मोरे म्हणतात तसे, ‘शिवाजी हा शूद्रांचा राजा असून, त्याने शूद्रातिशूद्रांचे राज्य स्थापन केले अशी जोतीरावांची खात्री १८५५ मध्येच झाली होती, यात शंका नाही. शिवचरित्रविषयक याच सूत्राचा विस्तार जोतीराव शिवछत्रपतींवरील पोवाड्यात करतात’ (३२)  अशा पद्धतीने प्रारंभापासून स्वतंत्र विचार करण्याची जोतीरावांची दृष्टी घडत गेल्याचे दिसते. फुले प्रचंड चिकित्सक असल्याने त्यांनी कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारली नाही. त्यातूनच त्यांचा स्वतंत्र मन:पिंढ घडत गेलेला दिसतो. अशा चिकित्सक दृष्टीमुळेच बहुजन समाजासाठी नायक, प्रतिनायक घडवतांना त्यांनी कमालिची बुद्धिमत्ता वापरलेली आहे. मोरे लिहितात तसे, परशरामासी झोंबे महाबळी।। एकवीस वेळी लागोपाठ।। या ओळीत महार-मांगांचा क्षात्रसमूह हाच महाबळी असला तरी वामनावतारात विष्णूने कपटाने पराभूत करून पाताळी दडपलेला बळीराजा या समूहाचे प्रतिनिधित्व व प्रतीकात्मक महानायक होऊ शकतो. हे लक्षात आल्यावर जोतीरावांनी १८७३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकात बळीला नायकत्व दिल्याचे दिसून येते.’ (३४) नायक प्रतिनायक घडवताना त्यांनी, कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा। छत्रपती शिवाजीचा।। असे म्हणून शिवचरित्रामध्येही आपली मांडणीची चौकट ढळू दिलेली नाही. त्यातूनच त्यांनी या काव्यात रामदास, दादोजी कोंडदेवांचे शिवाजी महाराजांबाबाचे गुरुत्व नाकारले आहे. त्याचबरोबर तत्कालीन काळात पोवाड्यासारखी रचना आणि सोप्या बाळबोध मराठी शब्दांचा वापर करून आकृतिबंध आणि भाषा वापराबाबतही ते स्वत:ची भूमिका कायम ठेवतात. याबाबतच्या टीकेला ते भीक घालत नाहीत. त्यामुळेच मोरे असे सांगतात, ‘जोतीरावांनी शेतकरी, दलित आणि स्त्रियां यांचा कैवार घेऊन साहित्य निर्मिती केली असल्याने ते आजच्या ग्रामीण, दलित आणि स्त्री साहित्याचा मूलस्त्रोत ठरतात यात वाद नाही. परंतु, ही निर्मिती करताना त्यांनी जो मूल्याशय प्रकट केला, त्यावरून त्यांना आधुनिक मराठी साहित्याच्या जनकत्वाचा मान द्यावा लागतो.’ (३७)

सदानंद मोरे यांनी जोतीरावांची वैचारिक जडणघडण त्यांच्या लेखनातून शोधण्याचा नावीन्यपूर्ण प्रयत्न केला आहे.  ‘ब्राह्मणांचे कसब’ हे पुस्तक महाराष्ट्रातील कुणबी, माळी, मांग, महार यांना परम प्रीतेने अर्पण करताना ते बहुजनांमध्ये पूर्वापार रुजलेले पोवाडा आणि अभंग हे आकृतिबंध जाणीवपूर्वक स्वीकारतात. ‘ब्राह्मणांचे कसब’ हा फुले यांच्या विचाराचा एक पुढील टप्पा म्हणून पाहता येतो. या पुस्तकातून ते अज्ञान, अंधश्रद्धा यांच्यावर आधारलेल्या कर्मकांडापासून शूद्रातिशूद्रांना बाजूला होण्याबद्दल आणि लग्नादी कार्यक्रमांमधून ब्राह्मणांना बाजूला करण्याबद्दल नवा विचार देतात.  त्यानंतर ते ‘गुलामगिरी’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहितात. मोरे या ग्रंथाला ‘जोतीरावांची महाकृती’ म्हणतात. हे पुस्तक आणि सत्यशोधक समाजाची स्थापना सन १८७३ या एकाच वर्षी झाली आहे. जोतीरावांचा हा संवादरूपी ग्रंथ अनेकांच्या मनातील प्रश्नचा गुंतावळा सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरला. या ग्रंथाला अर्पणपत्रिकेबरोबर अपेक्षापत्रिका आहे. अमेरिकेमध्ये गुलामांची दास्यत्वापासून मुक्तता करणाच्या कामात औदार्य, निरपेक्षता आणि परोपकारबुद्धी दाखवलेल्या लोकांपासून आपल्या देशबांधवानी प्रेरणा घ्यावी आणि आपले शूद्र बांधवास ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामांत पुढे यावे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

या पद्धतीने जोतीराव फुले एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या विचारांना नवी धार देत जातात. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तव्यकठोरता पुढे येत जाते. कारण ते नव्या सुधारणांबाबत इतके आग्रही आहेत की, सत्ताधारी इंग्रजांनाही सैल सोडत नाहीत. त्यांनी हंटर आयोगापुढे दिलेली साक्ष यासंदर्भात पाहता येते. शिवाय ‘शेतकऱ्याचा आसूड’मध्ये ते ब्रिटिश सरकारला भेकड म्हणून त्यांच्यामुळे शेतकऱ्याची झालेली परवड सांगतात. शेतकऱ्याच्या जीवावर गोरे अधिकारी करीत असलेले ऐशआराम ते समोर आणतात. सदानंद मोरे यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ची विस्ताराने चर्चा करून या ग्रंथातील फुले यांच्या परखड विचारांची सविस्तर मांडणी केली आहे. फुलेंवर एका गटाकडून जातीयवादी असा आक्षेप घेतला जातो. परंतु, ते तत्कालीन काळातील ब्राह्मणांचाही विचार करणारे मानवतावादी सुधारक होते. त्यासंदर्भाने त्यांनी नि:पक्षपातीपणे काम करणाऱ्या ब्राह्मण अधिकाऱ्यांची केलेली प्रशंसा पाहता येते. शिवाय आधुनिक पद्धतीने लग्न लागल्यानंतर गावी जाणाऱ्या वधूस दानधर्म करण्याचा सल्ला देतात. तो देताना, ‘शूद्रादि अतिशूद्रांपासून ख्रिस्ती, मुसलमान, पार्शी, ब्राह्मण वगैरे मानव बांधवांपावेतों कोणीची आवडनिवड न करिता त्यांच्यातील पोरक्या मुली-मुलांस व अंधपंगूस शक्यतेनुसार दानधर्म करत आपल्या गावी जावे’ असे म्हणतात. ब्राह्मण कुटुंबातील विधवा मातांना आपल्याकडे प्रसूतीची सोय करतात. अशा गोष्टीवरून ते खऱ्या अर्थाने मानवतावादी विचारवंत असल्याचे स्पष्ट होते. याबाबत मोरे लिहितात, ‘जोतीराव कोत्या संकुचित जातवादी विचारांचे असते तर ती ब्राह्मण जातीची अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा घेऊन त्यांनी त्या बाबतीत उदासीन राहून फक्त शूद्रातिशूद्र जातींमधील स्त्रियांच्याकडे लक्ष दिले असते.’ (७४) अशा मांडणीतून फुलेंची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन काळात बहुतांश समाज शेतीवर उदरनिर्वाह करीत होता. सत्ताधारी इंग्रजांचेही शेतीकडे लक्ष नव्हते. त्यामुळे शेतीचा प्रश्न योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहिले. त्याचे हेतुत: वाचन महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर केले. महाराजा सयाजीराजांसमोर केलेल्या वाचनाचा परिणाम पुढे महाराजांच्या कार्यातून प्रतीत होतो.

या पुस्तकाबरोबर शेती केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी ‘इशारा’ ही पुस्तिका लिहिली. मोरे म्हणतात, ही पुस्तिका शूद्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी असली तरी तिचा लक्ष्य संदर्भ न्या. महादेव गोविंद रानडे हा आहे.’ (६५) सुधारणावादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडेही म. फुले चिकित्सक दृष्टीने बघत. ते सतत सावध असलेले दिसतात. म्हणूनच ग्रंथकारांच्या सभेचे निमंत्रण आपण स्वीकारू शकत नसल्याचे धीटपणे कळवतात. त्यांनी लिहिलेल्या पत्रात रानडेंच्या कामाविषयी ते संशय व्यक्त करतात. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. याबाबत त्यांनी ठाम अशी भूमिका घेतली होती. त्याबद्दल सदानंद मोरे लिहितात, ‘उच्चवर्णीयांनी काढलेल्या या संस्थामुळे शूद्रांच्या चळवळीचा जोर कमी होईल व प्रगतीचा वेग खूंटेल, अशी जोतीरावांनची भीती होती. शूद्रातिशूद्रांना आपले मूलभूत मानवी अधिकार मिळवण्यासाठी आता त्यांच्या मदतीची वा सहानुभूतीची गरज नाही, अशी पूर्ण स्वावलंबनाची भूमिका  जोतीरावांनी घेतली होती. त्यामुळेच रानड्यांच्या प्रार्थना समाजात सामील होण्याऐवजी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म अथवा सत्यशोधक समाजाची स्थापना केली.’ (६६) अशा पद्धतीने जोतीरावांच्या विचारांची दिशा कशी घडत गेली याचा शोध मोरे यांनी घेतला आहे.

तत्कालीन समाजसुधारक, इतिहास संशोधक, अभ्यासक या सर्वांबद्दलच जोतीराव सतर्क होते. त्यांच्या कामांचे ते कठोर परीक्षण करीत आणि परखडपणे मत प्रदर्शन करीत. त्यांच्या या भूमिकेचा नेमकेपणानी शोध प्रस्तुत पुस्तकात घेतलेला आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी त्यांचे असलेले संबंध अनेकांना खुपत होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल जोतीरावांना नितांत आदर होता. तो त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’च्या उपोद्घातात लिहिला आहे. जोतीरावांचे योगदान महाराजांनीही चांगले जाणले होते. त्यामुळेच त्यांच्या अखेरच्या आजारापर्यंत ते त्यांना मदत करीत राहिले. सदानंद मोरे लिहितात तसे, ‘अद्‌भुत आकलनशक्तीची देणगी लाभलेल्या या तरुण राजाला जोतीरावांचे म्हणणे आणि महत्त्व कळायला वेळ लागला नाही.’ मोरे यांनी सयाजीरावांच्या कार्याची दिशा बघून असे म्हटले आहे की, ‘सयाजीरावांनी नंतर ज्या प्रकारे राज्यकारभार केला आणि सामान्य जनतेचे हित पाहिले, त्यावरून त्यांच्यावर जोतीरावांच्या उपदेशाचा काही एक प्रभाव पडला होता, असे निश्चितपणे म्हणता येते.’ (७०) म्हणजे सयाजीमहाराजांनी फुलेंकडून जे घ्यायचे होते ते घेऊन प्रत्यक्ष राज्यकारभारात बदल घडवून आणले होते. म्हणून ज्याप्रमाणे जोतीरावांना विरोधाला समोरे जावे लागले होते, त्याप्रमाणेच सयाजीरावांच्या सुधारणवादी कामांवर टीका होत होती. इतिहासचार्य राजवाड्यांनीच ‘बडोद्यातील समाजसुधारणा’ हा लेख लिहून सयाजीरावांचा मार्ग चुकला असल्याची टीका केली होती. यासंदर्भातील राजवाड्यांची टोकाची मते येथे उद्‌धृत करण्यात आली आहेत. ‘शूद्रातिशूद्रांना शिकवल्यास समाजाची स्थिती खाली डोके वर पाय अशी होऊन विनाकारण गोंधळ माजेल. अव्यवस्था होईल असा इशारा दिला होता. शिवाय ‘आधी ब्राह्मण-क्षत्रिय वर्ग राजकीयदृष्ट्या सर्व अथवा बऱ्याच प्रकारे समर्थ होऊ द्या आणि मग अतिशूद्रादिवर्गाला समर्थ करण्याच्या खटपटीला लागा’ असा प्राधान्यक्रम राजवाड्यांनी सुचवला आहे.’ (७१) यातून तत्कालीन मानसिकता लक्षात येते. फुले या मानसिकतेल टक्कर देत होते.

महात्मा फुले परिवर्तनाच्या कामासाठी आयुष्यभर कार्यमग्न होते. अनेक उपक्रम आणि लेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले काम पुढे रेटले. महाराष्ट्रातील अनेक भागात सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते निर्माण केले. संपूर्ण काळच भुरसटलेल्या विचारांने जगत असताना फुल्यांनी नवविचारांची ज्योत पेटवली. अनेकांचे प्रहार अंगावर घेतले. शूद्रातिशूद्र समाजांबरोबर स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून देण्यात यशस्वी झाले. आपली भूमिका सर्वदूर पोहोचवण्यासाठी मूलभूत लेखन केले. त्यांच्या कार्याबाबत सदानंद मोरे लिहितात, ‘जोतीरावांना मराठी भाषेचे व्याकरण समजत नाही असा आक्षेप घेऊन विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी जोतीरावांनी उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता हे सर्वज्ञान आहे. पण जोतीरावांनी भाषेतील कर्ता-क्रियापदांपेक्षा प्रत्यक्ष व्यवहारातील कर्ता-कर्म-क्रियापदांकडे लक्ष देऊन त्यात घडवून आणलेली उलथापालथ अधिक महत्त्वाची होती. त्यांनी महाराष्ट्रास विद्रोहाचे व्याकरण शिकवले- ज्यात उद्देश्य आणि विधेय यांची उलटापालट झाली; लिंगभेदभावास छेद मिळाला.’ (८०)

एकूणच या पुस्तकातून काळाच्या पट समोर ठेऊन महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे. त्यांच्या विरोधात काम करणाऱ्यां प्रवृत्तींचे सडेतोड विश्ललेषण केले आहे. महात्मा फुले विलक्षण बंडखोर आणि निडर वृत्तीचे होते. तसेच त्यांचे विचार सर्जक आणि धाडसी होते. परंपरेची चिकित्सा करून नवा आणि स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती समाजाला कशी आकार देऊ शकते, याचाच हा शोध आहे. सदानंद मोरे यांनी एक विचारवंत म्हणून फुले यांची जडणघडण शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या प्रयत्नातून त्यांनी विचारवंताच्या ‘वैचारिक चरित्रलेखना’चे नवे प्रतिमान घडवले आहे. अभ्यासकांना ते नक्कीच दिशादर्शक ठरेल.

Previous articleमानवजात ‘अव्दितीय’ आहे का?
Next articleहिंदुत्वाचे अनौरस शौर्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.