महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाचनसंस्कृती

– हेमंत खडके

विषयाच्या शीर्षकात एक गोष्ट गृहीत धरलेली दिसते.ती म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी एवढी पुस्तके वाचतात, की त्यांची एक वाचनसंस्कृती निर्माण झाली आहे ! खरे म्हणजे वाचन संस्कृती असा भारदस्त शब्द वापरावा, एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुस्तके वाचत नाहीत. म्हणजे आधीच्या पिढीतील खूप वाचत होती आणि आताच्या पिढीत ते प्रमाण कमी झाले असेही नाही. नाही म्हणायला विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यांनी ‘गाईडवाचनसंस्कृती ‘मात्र बरीच विकसित केली आहे.’ परीक्षार्थींच्या कल्याणा गाईडलेखकांच्या विभूती ‘ अशा दयाबुद्धीने जोवर विद्यार्थ्यांना गाईडा उपलब्ध करून देणारे आहेत तोवर त्यांना परीक्षेसाठीही पुस्तके वाचायची गरज नाही .(गाईडलाही माझा विरोध नाही .त्यांचा दर्जा चांगल्या पुस्तकांच्या खालोखाल असावा, म्हणजे झाले. पण तसे चित्र अपवादानेच दिसते )

या सर्वसाधारण चित्राला अपवाद आहेत. मात्र ते अपवादच ! आवडीने वाचन करणारे काही तुरळक मोजके विद्यार्थी आहेत. ते वेगवेगळ्या शाखांचे आहेत .त्यांच्यात कला शाखेचे विद्यार्थी कमीच. त्यांना वाचनाची आवड फार आधीपासून म्हणजे बहुधा बालपणापासूनच लागलेली असते.त्यांच्या वाचनात विविधता असते. त्यांचे साहित्याचे व जीवनाचेहीआकलन बरे असण्याची शक्यता असते.मात्र हे विद्यार्थी सुट्या बेटांसारखे असतात.त्यातून एक सलग भूप्रदेश निर्माण होऊन त्यावर वाचनसंस्कृती गुण्यागोविंदाने नांदते आहे ,असे चित्र दिसत नाही .

प्रथम विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागापासून सुरुवात करू. तिथे मी गेल्या तेवीस वर्षांपासून शिकवतो.मी स्वतः वाचनाच्या नादापायी दोन तीन नोकर्या सोडून आवडीने मराठीचा शिक्षक झालो.त्यामुळे कोण काय वाचतो किंवा विद्यार्थी काय वाचतात याची मला नेहमीच उत्सुकता लागून असते. नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना माझा पहिला प्रश्न असतो, की तुम्ही आजवर अभ्यासक्रमाबाहेरचे काय वाचले आहे? पूर्ण वर्गातून क्वचित एक-दोन विद्यार्थ्यांनी एखाद – दुसरे पुस्तक वाचलेले असते .बहुतेकांना तर अभ्यासक्रमातील पुस्तकेही सांगता येत नाहीत. बी. ए. चे विषय सांगताना ते मराठी वाङ्मयाला MLTआणि समाजशास्त्राला SOS म्हणतात. वाचलेल्या एखाद-दुसऱ्या पुस्तकांत ‘ श्यामची आई ‘ किंवा ‘अग्निपंख ‘ यांचा क्रमांक बराच वर आहे. वाचलेल्या पुस्तकांवर ते फार काही बोलू शकत नाहीत .आवडलेले पुस्तक का आवडले यावर ते फार समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. दैनिकांच्या वाङ्मयीन पुरवण्या त्यांना माहीत नसतात.नियतकालिके, दिवाळीअंक ,मासिके तर फारच दूर ! या सर्व दुष्काळी वातावरणात भगवान फाळके किंवा अभिजित इंगळे हे दोन वाचनवेडे विद्यार्थी म्हणजे काळ्याकुट्ट ढगाच्या रूपेरी कडाच !

असे का घडले ? हे एकाएकी घडले की ही एक हळूहळू घडत जाणारी प्रक्रिया आहे ? कारणे शोधायची तर विषय फार वाढत जाईल. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी… पण एवढे निश्चित की केवळ विद्यार्थी दोषी नाहीत.कुटुंब, पालक,शिक्षक, समाज, शिक्षणव्यवस्था, संस्थाचालक, शासन, प्रसारमाध्यमे,साहित्यसंस्था — असे सर्वच घटक कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. स्वतः दिवसभर व्हाट्सॲपवर असणारे पालक व फेसबुकवर असणारे शिक्षक जेव्हा मुलांना ‘वाचाल तर वाचाल ‘ असा चावून चोथा झालेला भंपक उपदेश करतात तेव्हा त्यातला ढोंगीपणा विद्यार्थ्यांच्याही लक्षात येतोच. घरासाठी कोट्यवधी रुपये खर्चून त्यात लाखोंचे फर्निचर भरणाऱ्या पालकांनी आयुष्यात कधी हजार रुपयांची पुस्तके घेतली नसतील किंवा मोठ्ठा पगार घेणारे शिक्षक-प्राध्यापक घरात मराठीचा एखादा शब्दकोशही ठेवत नसतील, तर अशा वातावरणात मुले वाचनाकडे वळतील तरी कशी? शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये सर्वत्र गुणांची चढाओढ. त्यामुळे टक्केवारी वाढेल तेवढेच वाचा; अवांतर वाचनात वेळ वाया घालवू नका ,असे सांगणारे करियरग्रस्त सर्वत्र वाढले आहेत .अभ्यास, टक्केवारी ,स्पर्धा, यश ,पॅकेज यांच्या घाण्याला आपण विद्यार्थ्यांना बैलांसारखे जुंपले आहे .त्यातून त्याला तोंड वर काढायला फुरसत मिळत नाही .चांगल्या कंपनीत प्लेसमेंट होऊन चांगले पॅकेज बळकावले की मग झाले आपले जीवन सार्थक! न्हाले आपले उंदीर पिंपात !! आपण मुलांना – विद्यार्थ्यांना तयार करत नाही तर भविष्यकाळात वापरता येतील अशी एटीएम कार्डे तयार करत आहोत. अशा जीवनशैलीत वाचनाचा संबंध येतो तरी कुठे? आणि अशा महाबाजारू वातावरणात वाचनाशिवाय अडते तरी कोणाचे ?कॉन्व्हेंट कल्चरमुळे विद्यार्थी इंग्रजीकडे वळले आणि आज ते मराठी वाचत नसले तरी इंग्रजी खूप वाचत आहेत असे तरी चित्र दिसते का? तिथेही अपवाद वगळता बोंबाबोंब !

चर्चा न वाचणाऱ्यांपेक्षा वाचणाऱ्यांवर केंद्रित करू. जे विद्यार्थी वाचतात ते काय वाचतात ? कथा-कादंबर्या जास्त वाचतात.तुलनेने वैचारिक साहित्य आणि कविता कमी. कविता लिहिणाऱ्यांची संख्या बरीच आहे पण तेसुद्धा कवितेची परंपरा किंवा चांगली कविता समजून घेण्यासाठी फार वाचत नाहीत.कवितेत अर्थ लावण्याची जबाबदारी वाचकांवरही पडते.डोक्याला थोडा ताप द्यावा लागतो. त्या तुलनेत कथा – कादंबऱ्यांचे निवेदक ही वाचकांची जबाबदारी बऱ्याच अंशी सोपी करतात. म्हणजे डोक्याला ‘शाट ‘ लावून घ्यायचे काम नाही, असे तर मानसशास्त्र यामागे नसेल? जे वाचतात त्यातही काही लॉजिक, सूत्र किंवा उद्दिष्ट नाही. जीवन, साहित्य, माणसे, समाज, संस्कृती, समजून घेण्याची खूप खोल जिज्ञासा म्हणून वाचणारे अतिशय कमी. यात थोडा वयाचाही भाग असावा.हाती येईल ते वाचायचे, ही वृत्ती जास्त .अर्थात यामागे आर्थिक कारणेही आहेत. जागतिकीकरणाच्या तांडवात दाखवेगिरीही बरीच वाढलेली दिसते. ती आधीही होती पण तिला फार संधी नव्हती. दिवाणखान्याला मॅचिंग होतील अशा रंगांची पुस्तके द्या, असे म्हणणारे ग्राहक या काळात नसतीलच असे नाही.

स्पर्धा परीक्षांसाठी बसणारे विद्यार्थी वाचतात पण त्यांच्यातील बहुतेकांचा हेतू स्पष्ट असतो.पेपर सोडवण्यासाठी माहितीचे संकलन हा त्यांचा उद्देश एवढा प्रभावी असतो की, पुस्तके जीवन समजवून देतात किंवा आनंद देतात अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो! अशा एका वर्गावर मित्राचा आग्रह म्हणून मी एकदा तास घेतला. काही आगळ्या- वेगळ्या ,प्रेरणादायी आणि दिशादर्शक पुस्तकांचा त्यांना परिचय करून द्यावा, हा हेतू ठेवून मी बोलू लागलो. पहिल्या दहा मिनिटांत मी त्यांच्या नजरेतल्या अर्थाचा लसावी ( LCM ) वाचला. तो असा होता: सर, तुम्ही जी पुस्तके सांगत आहात त्यांवर स्पर्धा परीक्षेत काही प्रश्न येणार आहेत का ? नसतील तर पुस्तकांच्या थोरवीचे हे भावनिक भरताड आम्ही कशासाठी ऐकावे ? तिथेही एक विद्यार्थी अपवाद होता.त्याने माझा नंबर घेतला.मी सांगितलेली काही पुस्तके त्यानेही वाचली होती. मी अर्ध्या तासात माझ्या उफाळलेल्या पुस्तक प्रेमाचा मनातल्या मनात संहार करून विषयाचा उपसंहार केला आणि एका उद्विग्न मनस्थितीत घरी परतलो.

विद्यार्थ्यांपैकी एक आणखी गट वाचन करणारा आहे.तो म्हणजे महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांमधून (वक्तृत्व, वादविवाद, निबंध इत्यादी) भाग घेणारा . हे विद्यार्थी उत्साही असतात. त्यांचे वाचन इतर अनेकांनापेक्षा बरे असते. स्पर्धेच्या विषयाला धरून ते वाचतात किंवा नेटवरून तरी माहिती मिळवतात. त्यांचे आकलन बरे असते. सौंदर्याची त्यांची जाण कविता, शायरी, सुभाषिते, रुबाया यांच्या वापराने वाढलेली असते. यांपैकी काही विद्यार्थी विविध चळवळींशी जोडले जातात.अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीमुक्ती अशा चळवळी किंवा दलित- आदिवासींच्या विकासासाठी झटणाऱ्या विविध संस्था -संघटना ,अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला आणि नेतृत्वाला संधी मिळते. चळवळी किंवा संघटनांची वैचारिक चौकट समजून घेण्यासाठी हे विद्यार्थी वाचतात. त्यांच्यात महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर यांनी गतिमान केलेल्या परिवर्तनाच्या विचारांचा स्फुल्लिंग दिसतो. हे विद्यार्थी मार्क्स, एंगल्स, सिमॉन द बुव्हार् ,डी.डी.कोसंबी,शरद पाटील, आ.ह. साळुंखे, रावसाहेब कसबे यांच्या गंभीर ग्रंथांकडे आकृष्ट झालेले असतात.हा गट सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमधील प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून व्यवस्थेची परखड चिकित्सा करणारा असतो. या संघटनांच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चा या गटाचे वाचन आणि आकलन वाढवतात

काही हुशार मुले अभियांत्रिकी, वैद्यकीय, विज्ञान अशा शाखांमध्ये शिक्षण घेतात. ते स्पर्धा परीक्षाही देतात.त्यांना अवांतर वाचनाची खरेच आवड असते . त्यांतील काही मुले लिहीतही असतात (बहुदा कविता). मात्र अवांतर वाचनाचा परीक्षेत काय उपयोग? कविता लिहून तुला काय मिळणार? असे यक्षप्रश्न त्यांच्या धंदेवाईक दृष्टीच्या पालकांना किंवा क्वचित काही शिक्षकांनाही पडतात. आणि त्यांना आपली वाचनाची आवड दाबून टाकावी लागते. या प्रश्नांचा संबंध आपण आजच्या उपयुक्ततावादाने ग्रस्त युगप्रवृत्तीशी जोडू शकतो.या प्रवृत्तीचा मुख्य प्रश्न असा की, वाचनाची उपयुक्तता काय? या प्रश्नाच्या सावलीत सर्व कला- साहित्यव्यवहारच अनुत्पादक (unproductive)ठरवला जातो. आता या उपयुक्ततावाद्यांना कोणी समजावून सांगावे, की काही गोष्टींची उपयुक्तता ही सांस्कृतिक पातळीवरची असते. आणि ती तुमच्या मानण्यावर अवलंबून असते. त्यांचे मूल्य तुम्हालाच ठरवावे लागते. तसे पाहता ताजमहाल या वास्तूची तरी उपयुक्तता काय आहे?या वास्तूत गॅसचा ओटा, बेसिन, सिंक यांतले काहीच नाही.साध्या स्वैपाकाच्याही तो कामाचा नाही .मग त्याचे उपयोगिता मूल्य शून्य समजायचे का? रवींद्रनाथ ठाकुर यांच्या गीतांजलीतील गीते अन्न,पाणी, दूध, सॅनिटायझर, औषधे यांपैकी काहीच निर्माण करू शकत नाहीत. मग त्यांची उपयुक्तता शून्य मानायची का ? उपयुक्ततावाद्यांनी एक मात्र लक्षात घ्यावे, की देश-प्रदेशाची किंवा समाज – संस्कृतीची ओळख जेव्हा परक्यांना करून द्यावी लागते, तेव्हा तुम्हाला कला-साहित्य- तत्त्वज्ञान यांकडेच यावे लागते. भारतापुरते बोलायचे तर हा देश बुद्ध-गांधींच्या तत्वज्ञानाला, टागोर-प्रेमचंद यांच्या साहित्याला,रामायण- महाभारत या महाकाव्यांना, वेरूळ-अजिंठा यांसारख्या लेण्यांना; आणि बुलंद दरवाजा – ताजमहालांसारख्या वास्तूंना निर्माण करणारा देश म्हणूनच जगात ओळखला जातो.

न वाचणारे जास्त आणि वाचणारे कमी, यामुळे काही प्रश्न निर्माण होताना दिसतात.वाचनप्रेमी मुले आपल्या वयोगटाच्या बाहेर फेकली जातात. कारण समवयस्कांपेक्षा त्यांचे आकलन पुढचे असते. अशी मुले त्यांच्यापेक्षा वयाने प्रौढ असणाऱ्यांमध्ये मिसळून वैचारिक चर्चा करू शकतात, मात्र समवयस्कांमध्ये मिसळणे ही त्यांची भावनिक गरज असते, तिचे काय करायचे? अशी मुले मनाने एकटी पडतात. वाचनवेडी माणसे कधीकधी टिंगलटवाळीचाही विषय बनवली जातात.’ तुमचे ज्ञान पुस्तकी आहे, प्रत्यक्ष व्यवहार तुम्हाला कळत नाही. जीवनात पुस्तकांपेक्षा प्रॅक्टिकल महत्त्वाचे’ असे ‘वाचनलेस ‘संस्कृतीचे समर्थन करणारे कुत्सित तत्त्वज्ञान सोयीस्करपणे निर्माण केले जाते. (जास्त वाचनाने माणूस वेडा होतो,ही धारणाही याच कारणाने निर्माण झाली असेल का?) जणू काही पुस्तके वाचणाऱ्याला व्यवहारातले काही कळूच शकणार नाही ! जणू काही तो पुस्तकातील कल्पनांच्या साम्राज्यात रमल्याने जीवनाची वस्तुस्थिती त्याला समजूच शकत नाही !! बाबासाहेब आंबेडकर ,अब्राहम लिंकन, यशवंतराव चव्हाण ही माणसे पुस्तकांसाठी वेडी होती. वरील आरोप या माणसांवर करण्याची कुणाची हिम्मत होईल का ?

एम.ए.च्या वर्गातील एक अनुभव तर धक्का देणारा आहे. शिक्षकाने आपला विषय समजावून सांगताना अवांतर वाचनातील पूरक संदर्भ देऊन विषय स्पष्ट करावा आणि रसिकतेची जोड देऊन तो फुलवावा,अशी धारणा बाळगणारा मी एक शिक्षक आहे. एका तासात माझ्या विवेचनाला बर्ट्रांड रसेलच्या मांडणीचा आधार द्यावा म्हणून’ सुखी माणसाचा सदरा’ (मूळ ग्रंथ : Conquest of Happiness – अनुवाद : करुणा गोखले )या ग्रंथातील विचारधन मी उधळायला लागलो. थोडा रसेल सांगून झाला असेल .एक प्रौढ विद्यार्थिनी मला थांबवून म्हणाली,” सर हे रसेलचे विचार आपण नंतर पाहू… आधी आपला सिलॅबस संपवू ” हे माझ्यासाठी अनपेक्षित होते. मी शांतपणे ‘ ठीक आहे ‘ म्हणून अभ्यासक्रमातील घटकांकडे वळलो. अर्थात हे उदाहरण अपवादात्मकच. माझ्या अध्यापनातील संदर्भसंपृक्ततेवर खुश असणारे विद्यार्थीच मला जास्त भेटले; पण अपवादात्मक रीतीने का होईना, महाविद्यालयीन वाचनसंस्कृतीला मिळालेले हे विचित्र वळण काळाचा महिमा म्हणून वाचकांच्या लक्षात आणून द्यावेसे वाटते

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाचनसंस्कृतीची सद्य:स्थिती आहे ही अशी आहे ! अशा वातावरणात फार अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःच अपेक्षाभंगाच्या दुःखाला आमंत्रण देण्यासारखे आहे… पण दिलेल्या विषयाचा एक अपरिहार्य भाग म्हणून काही अपेक्षा व्यक्त करतो: एक मराठीचा शिक्षक या नात्याने मला मनापासून वाटते की विद्यार्थ्यांनी आवांतर वाचन खूप करावे. सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लेखन वाचावे. “आम्हाला पुस्तक काय वाचायला सांगता, आम्ही जीवन वाचतो” असा युक्तिवाद करणाऱ्या महाभागांनाही मला सांगावेसे वाटते की,जगताना वाट्याला आलेले जे जीवन आपल्याला वाचायला मिळते, त्याला खूप मर्यादा आहेत. मुळात एका माणसाच्या जीवनालाच खूप मर्यादा आहेत. मी प्राध्यापक असेल तर डॉक्टरचे जीवन अनुभवू शकत नाही. मी डॉक्टर असेल तर इंजिनियरचे आयुष्य मला माहीत असणार नाही. वाचनाच्या माध्यमातून मात्र आपण एकाच वेळी अनेकांची जीवने अनुभवू शकतो. अनेक प्रदेशांचा घरबसल्या प्रवास करू शकतो. त्रिखंड पालथे घालू शकतो. एकाच जीवनात अनेक जीवने जगायची संधी म्हणजे वाचन ! घरी आरामखुर्चीत बसून जगाचा भूगोल निवांतपणे न्याहाळण्याची निवांत सोय म्हणजे वाचन ! कुठलीही मोठी किंमत न देता बसल्याजागी उग्र – भीषण आणि कोमल – सुंदर जीवनाचे दर्शन घेण्याची संधी म्हणजे वाचन ! हे जग आहे तरी कसे आणि माणसे जगतात तरी कशी, ही जिज्ञासा कमीत कमी श्रमात पूर्ण करण्याची सुंदर पद्धत म्हणजे वाचन ! जगाला आणि स्वतःलाही ओळखण्याचे सर्वात सोपे साधन म्हणजे वाचन ! उच्च प्रतीचे मनोरंजन आणि सखोल ज्ञान मिळवण्याची हमखास खात्री म्हणजे वाचन ! म्हणून विद्यार्थ्यांनी तर वाचन करावेच पण सर्वांनीच वाचन करावे. आज शेकडो पुस्तकांच्या पीडीएफ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यांतील निवडक पुस्तके तरी वाचली पाहिजेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तर झपाटल्यासारखे वाचावे. ललित साहित्यासोबतच वैचारिक साहित्यही वाचावे. ललित साहित्यातून तुम्हाला मानवी भावभावनांचा परिचय होईल, तर वैचारिक वाङ्मयातून तुमची तर्कबुद्धी तेजतर्रार होईल. यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक समतोल आकार प्राप्त होईल. अशी मुले समाजमाध्यमांवरील एखाद्या ‘भडकाऊ ‘ पोस्टने भडकणार नाहीत त्यांना सामाजिक सलोख्याचे महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या हाती सहजासहजी दगड येणार नाहीत.ते बिनडोकपणाचे प्रदर्शन करत दंगली घडवणार नाहीत. युनेस्कोच्या घटनेच्या शेवटच्या प्रकरणातील पुस्तकांची सनद सांगून हा लेख संपवतो. ही सनद सांगते की, ” युद्धाची सुरुवात माणसांच्या मनात होत असते. त्यामुळे शांतीची संरक्षण – यंत्रणा माणसांच्या मनातच उभारली पाहिजे. मैत्री आणि सद्भावाचे बौद्धिक वातावरण निर्माण करण्यात पुस्तकांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे पुस्तके ही शांतीची एक प्रमुख संरक्षण यंत्रणा ठरतात “

आपण वाचन संस्कृतीच्या माध्यमातून ही यंत्रणा प्रबळ केली पाहिजे. आमेन.

(साभार:. सुदेश हिंगलासपूरकर,संपादक. ‘शब्द रुची’ )

(लेखक नामवंत समीक्षक व वक्ते आहेत)

९८२२८४११९०

Previous articleअरुणा सबाने : विजा झेलणारं झाड !
Next articleसूर्यापेक्षा तब्बल २१५० पट मोठा तारा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here