माझ्या आयुष्यातील रिमार्केबल महिला

-नीलेश कमलकिशोर हेडा

मी फेसबुकवर बराच सक्रिय असलो तरीही वैयक्तिक जीवनाबद्दल लिहण्याचा संकोचच करतो. आज मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचं औचित्य असल्याने माझ्या आयुष्यातल्या एका रिमार्केबल महिलेबद्दल लिहायला हवं. कुणाला प्रेरणा वगैरे घ्यायची असेल, तर नक्की घ्या. तिला कधी भेटायचं असेल तर निसंकोच सांगा.पंधरा वर्षांआधी ती पहिल्या मजल्यावरुन खाली पडली. तेव्हा ती १९ वर्षांची होती. खाली बांधकामाच्या गिट्टीचा ढीग होता. पाठीच्या दोन मणक्याला, ज्याला लुंबार व्हर्टीब्रा म्हणतात (L3, L4) क्रॅक गेली. कमरेखालचा संपूर्ण भाग जागीच पॅरालाइज झाला. ज्याला शास्त्रीय भाषेत Paraplegia म्हणतात. जिथे ही घटना घडली तिथून ३०० कि.मी. दूर नागपूरच्या चांडक नर्सिंग होममध्ये तातडीनं तिची रवानगी केल्या गेली.

डॉ. राजेंद्र चांडक हे भारतातल्या काही अत्यंत हुशार आर्थोपेडिक सर्जनपैकी एक. त्यांनी सांगितलं की, ‘जर पुढच्या काही तासांमध्ये वेदना सुरु झाल्या नाही तर हीच पुढचं आयुष्य व्हिल चेअरवर जाणार’. त्यावेळी मी तिच्या जवळ नव्हतो. त्यामुळे हे सगळं मला नंतर कळलं. जगण्याची तीव्र इच्छा असेल तर चमत्कार घडतात. पुढच्या चोवीस तासात प्रचंड वेदना सुरु झाल्या. जसजशा वेदना वाढत गेल्या तसे चांडकजी आनंदित होत होते. वेदनांचा अर्थच हा आहे की, बंद झालेला जीवनाचा प्रवाह सुरु होतो आहे. वेदनांमधून सृजन होते. खलील जिब्रान आठवला – Pain is the bitter potion by which the physician within you heals your sick self.चांगला डॉक्टर हा चांगला फिलासॉफर सुद्धा असतो. नंतर चार पाच डॉक्टरांच्या चमूने एक अवघड शस्त्रक्रिया केली. पायाच्या हाडाचा एक छोटासा तुकडा तासून काढला.दोन धातूच्या पट्ट्या व स्क्रूच्या मदतीने तो दोन्ही मणक्यांना लावला. त्या पट्ट्या अजूनही आहेत, त्या शेवटपर्यंत राहणार. हळुहळू व्हीलचेअर वरुन मॅडम एक एक पाऊल टाकायला लागल्या. हिलींग ही जरी शारीरीक प्रक्रिया असली तरी आधी ती मनात निर्माण व्हायला हवी असते. कणखर मनात शरीराला हील करण्याची अंतर्निहीत शक्ती असते. कधी कोणाच्या साथीने , कधी काठीच्या आधाराने टाकलं जाणारं एक एक पाउल गती घ्यायला लागलं. मॅडम बऱ्या झाल्या. मात्र काही गोष्टी आयुष्यभर सोबत राहणार. सद्या तरी मेडिकल सायंसजवळ त्याचे उत्तर नाही. त्या पोस्ट ट्रामॅटीक गोष्टींना आत्मसात करुन घ्यावं. यथावकाश लेखक महोदय मॅडमच्या आयुष्यात आले. तेव्हा लेखक महाशय पीएच.डी. करत होते. मध्यप्रदेशातील नर्मदेच्या काठी ‘सावन का महिना पवन करे सोर….’वगैरे गाणी वगैरे गाऊन झालीत. फेब्रुवारी २००७ मध्ये लेखकाला पीएच.डी.अवार्ड झाली. त्यानंतर काही महिन्यातच ०७-०७-०७ रोजी दोघेही विवाहबद्ध झालो!


नाटकाचा पहिला अंक संपला. पण अजून संघर्ष संपला नाही. पहिलं बाळंतपण. मणक्यातल्या प्लेट्स. सिजेरियनचे वाढतं प्रमाण आदी गोष्टी डोक्यात असल्याने कसं होईल याची चिंता होती . नागपूरला पुन्हा एकदा डॉ. चांडकजीकडे घेऊन गेलो. अनेक वर्षांनी तिला बघून डॉक्टर उडालेच. म्हणाले, ‘आज मेरे लिये खुशी का दिन है, मेरा एक क्रिटीकल पेशंट ना सिर्फ रिकव्हर हुआ बल्की शादी करके प्रेग्नंट भी है. और पती भी क्या ढुंडा है, माशा अल्लाह’ (Emphasis is mine!) हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. ते म्हणाले, ‘डिलेवरी नार्मल होगी. कोई चिंता की बात नही’. प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात आम्ही दोघेही इगतपुरीला दहा दिवसांसाठी विपश्यना करायला गेलो. परतल्यानंतर तिने विपश्यनेत सातत्य ठेवलं. बरोबर नवव्या महिण्यात गोंडस पोरगी जन्मली. विपश्यना बेबी. धम्मा बेबी. अरण्या उर्फ चिनी. जच्चा बच्चा एकदम चंगे. डिलेवरी एकदम नार्मल! नंतर काही वर्षांनंतर दुसरी प्रेग्नन्सी. ती सुद्धा नार्मल. अगाथा उर्फ मिठीबाई!

पण अजून कहाणी बाकी आहे. प्रेग्नन्सीनंतर मॅडमला अमेरिन चित्रपटाची तारिका जेन फोंडाच्या व्यायामाच्या डान्स व्हिडीओबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. रोज सकाळी एक तास न चुकता तो व्यायाम ती करायची. त्यामुळे तिच्या मसल्सची स्ट्रेंथ सुद्धा खूप वाढली. मात्र एक दिवस डान्स करता-करता मॅडम पाय घसरुन पडल्या. अन गुडघ्यातील एक नस ज्याला शास्त्रीय भाषेत Anterior Cruciate ligament (ACL) म्हणतात, ती तुटली. मी लगेच जेन फोंडाच्या सगळ्या डिव्हीडी आधी गायब केल्या. बाई तू अमेरिकेतच काय करायचं ते कर, आम्हाला त्रास देऊ नकोस. पुन्हा चांडकजी. डॉ. राजेंद्र चांडकसारखा डॉक्टर मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही. या माणसाने आजवर हजारो लोकांना जीवनदान दिलं असेल. ते म्हणाले, ‘शस्त्रक्रिया करता येईल, मात्र आपण शस्त्रक्रिया करायची नाही. तू फक्त जीम आणि फिजिओथेरपी कायम ठेव. आपण शस्त्रक्रियेचा निर्णय कधी तरी भविष्यात घेऊ. थोड्याश्या वेदना आपल्या आयुष्यात असायला हव्या त्याने आयुष्याला अर्थ मिळतो’. I, who do not believe in God, saw him and said, ‘this man is like god’.


काल नागपूरला तिला घेऊन गेलो होतो. शस्त्रक्रियेची तारीख देतील, असं वाटलं. पण पुन्हा तेच. ‘अत्यंत गरजेची असते तेव्हाच शस्त्रक्रिया करायची. सद्या गरज नाही. तुझ्या आयुष्यातला मोठाच टप्पा पंधरा वर्षांआधी तू पुर्ण केलेला आहे. हे टेंडानचं रप्चर त्यापुढे काहीच नाही. तू फक्त जीम आणि फिजिओथेरपी कायम ठेव. कॅल्शियम घे, व्हिटॅमिन डी घे आणि मस्त रहा’.नेहमी आशावादी असावं. आयुष्यात येणाऱ्या अपघातांकडे समतेने बघायचं. मनावर विश्वास ठेवायचा. बिघडलेली व्यवस्था स्थिरस्थावर करण्याची जबाबदारी त्या व्यवस्थेचीच असते. त्या व्यवस्थेला केवळ पोषक वातावरण आपण निर्माण करुन द्यायचं. आणि खलील जिब्रान तर आपल्या सोबत आहेच – “Much of your pain is self-chosen. It is the bitter potion by which the physician within you heals your sick self. Therefore trust the physician, and drink his remedy in silence and tranquility: For his hand, though heavy and hard, is guided by the tender hand of the Unseen, And the cup he brings, though it burn your lips, has been fashioned of the clay which the Potter has moistened with His own sacred tears.’
रुचीता निलेश हेडा यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

(लेखक अभ्यासक, संशोधक आहेत)

9765270666

Previous articleजातींचे गॅंगवॉर
Next articleअश्लील उद्योग मित्र मंडळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here