माणूस मुळात हलकट आहे की माकड आहे?

-उत्पल व्ही.बी.

गांधीजी : मला कधीकधी असं वाटतं की आपण फेल गेलो.
मी : अरे वा! वेलकम टू द क्लब…मला तर असं नेहमीच वाटतं!
गांधीजी : _______
मी : ओह, तुम्ही सिरीयसली बोलताय!
गांधीजी : हो.
मी : का हो, काय झालं? मदन मोहनचं गाणं लावू का एखादं? गेल्या वेळी तुम्हाला आवडलं होतं. गाणं ऐकत बोलू. गाण्यामुळे माहौल तयार होतो एकदम.
गांधीजी : नको. राहू दे.
मी : बरं, पण काय झालं ते तर सांगा.
गांधीजी : अरे, कुठल्या विचारांनी आणि ध्येयांनी प्रेरित होऊन आम्ही एवढा लढा दिला… संघटना उभारल्या. आणि आता हे काय?
मी : हे काय म्हणजे?
गांधीजी : अरे काय म्हणजे काय? तुला दिसत नाही की काय काय चाललंय ते? लोक एकमेकांच्या उरावर बसायचे बाकी आहेत फक्त.
मी : हां…अहो त्याला वैचारिक मतभेद म्हणतात. टीव्हीवर चर्चेचे कार्यक्रम घेणाऱ्यांना जसं पत्रकार म्हणतात तसंच आहे हे.
गांधीजी : मला कळत नाही…इतका राग आणि द्वेष कसा काय आला रे लोकांमध्ये? तूसुद्धा बघ किती कडवटपणे बोलतोयस…
मी : याचं एक उत्तर मार्क झुकरबर्गकडे आहे.
गांधीजी : हं. पण ते निमित्त झालं ना. मुळात प्रश्न वृत्तीचा आहे.
मी : बरोब्बर! फुल मार्क्स टू यू! आता तुम्हाला बहुधा आवडणार नाही, पण एक सांगतो.
गांधीजी : सांग की.
मी : माणूस हा मुळातच हलकट प्राणी आहे अहो. तुम्ही जे म्हणता ना अहिंसा, सत्य, प्रेम वगैरे ते फार कष्ट करून शिकावं लागतं हो. ते काय असं घेऊन येत नाही माणूस. आणि मग माणसाच्या आयुष्यात आपलं कुटुंब, आपली आळी, आपली पेठ, आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश, आपली भाषा, आपला धर्म, आपली जात, आपला पक्ष, आपली विचारधारा, आपले नायक, आपले मित्र, आपले शत्रू असलं काय काय येऊन चिकटत जातं. माणसाचं माकड करायला अजून काय हवंय?
गांधीजी : तू आधी ठरव.
मी : काय?
गांधीजी : माणूस मुळात हलकट आहे की माकड आहे? कारण माझ्या माहितीप्रमाणे माकड हलकट नसतं. आणि हलकट जो कुणी असेल तो माकड नसावा.
मी : वा! तुमचा मूड परतल्याचा आनंद आहे. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. निवांत राहा. ज्या काय मारामाऱ्या व्हायच्या आहेत, जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे.
गांधीजी : तुला हे परवडू शकतं. मला कसं परवडेल?
मी : न परवडायला काय झालं? तुम्ही महात्मापणाचं वगैरे फार ओझं घेऊ नका बरं. तसंही तुमचं फॉलोइंग आता कमी झालंय. फेसबुक-ट्विटरवर वगैरे येऊन दोन वाक्यात शंभर वर्षं जुन्या विषयाचं विश्लेषण करू शकलात किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे एक बाजू घेऊ शकलात तरच फॉलोअर्स मिळण्याची आशा आहे.
गांधीजी : ओझं महात्मापणाचं नाही रे. ती लोकांनी दिलेली पदवी आहे नुसती.
मी : मग?
गांधीजी : ओझं मनुष्यत्वाचं आहे. माणूसपणाचं. ज्या ओझ्यामुळे, खरं तर प्रेरणेमुळे – मी काम करत आलो, निर्णय घेत आलो…ते हे ओझं आहे.
मी : हं….मग अवघड आहे तुमचं.
गांधीजी : मग…काय करू म्हणतोस?
मी : तुम्ही सर्टिफाईड देशभक्त किंवा सर्टिफाईड विद्वान वगैरे का नाही होत? ते ओझं पेलता येतं. हे मनुष्यत्व वगैरे पेलणं अवघड आहे.
गांधीजी : पण ते आवश्यक आहे. शिवाय तिथे एक फायदाही आहे.
मी : कोणता?
गांधीजी : इथे माकड होण्यापासून वाचण्याची शक्यता जास्त दिसते.

-9850677875

Previous articleसुहास्य वदनी सुषमा स्वराज !
Next articleअभिनेत्री स्वरा भास्करने घेतलेला रवीश कुमार यांचा इंटरव्यू
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.