मी पुन्हा येईन ! ऑपरेशन फेल !

लेखक : ज्ञानेश महाराव

(संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)

———————————————

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचा जीव अति-गुंतलाय; त्यांच्या पटकथेनुसार घडले असते आणि निर्माता व दिग्दर्शकाच्याच सूचनांचा अवलंब झाला असता तर, एव्हाना महाराष्ट्राच्या सत्तेच्या ‘ड्रायव्हिंग सीट’वर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  आणि मागच्या ‘सीट’वर माजी मुख्यमंत्री फडणवीस ड्रायव्हरच्या आविर्भावात बसलेले दिसले असते. ‘कोरोना- लॉकडाऊन’ संकटामुळे उद्धव ठाकरे मुदतीत ‘विधान परिषद’चे सदस्य होऊच शकणार नाहीत ; परिणामी, त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागणार, याची खात्रीच या पटकथाकारांना होती. राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ यावी आणि कारभाराची सूत्रं राज्यपालांच्या हाती जावीत,असा त्यांचा डाव होता. तथापि ‘कोरोना’सारख्या जीवघेण्या संकटाच्या काळात अशाप्रकारे ‘महाविकास आघाडी सरकार’ला सत्तेवरून घालवणे, हे भयंकर ठरले असते आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल महाभयंकर घडले असते.

परंतु, नितीन गडकरी यांच्यासारख्या किमान विवेक जागृत असणाऱ्या नेत्यांमुळे ‘भाजप’-संघ परिवाराची संभाव्य बेइज्जत टळली. तरीही सत्ता- मुख्यमंत्रिपद गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काही उठाठेवी केल्यात, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे प्रत्यक्षातील उंची इतके जे पतन झालंय, ते भरून निघणे दुष्कर आहे‌. ज्या झाडाला लवकर फुले येतात; त्या झाडाला लवकर फळे येत नाहीत. तसेच, ज्या झाडाला फुले आणि फळे दोन्हीही लवकर येतात ; ती झाडं फार काळ जगत नाहीत. हा निसर्गनियम आहे. देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात फार लवकर यश मिळाले.  वयाच्या ऐन पंचविशीत ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापौरही झाले. त्या बळावर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार झाले. त्यानंतर दहा वर्षांनी विधानसभा विरोधी पक्षनेता आणि नंतरच्या पाच वर्षांनी राज्याचे मुख्यमंत्री, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या साऱ्याला ‘लिफ्ट’ वडील गंगाधरपंत फडणवीस आणि चुलती शोभाताई फडणवीस यांच्या आमदारकी आणि मंत्रीपदामुळे मिळाली. याच अनुषंगाने प्रश्न ‘भाजप’मधील इच्छुक उमेदवार प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्यावेळी विचारीत असतात. त्याच वेळी फडणवीस वेगवेगळ्या प्रचार सभांतून ‘शिवसेना’, ‘काँग्रेस’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ यांच्या पक्षातल्या प्रत्यक्षातील व कथित घराणेशाहीबद्दल बोलत असतात. नुकत्याच झालेल्या ‘विधान परिषद’ निवडणुकीतही त्यांच्या ‘आयटी सेल’ने ‘खडसे आणि मुंडे यांच्या घरात अगोदरच खासदार असताना आणखी पदं किती द्यायची ? ‘ असे प्रश्न ‘व्हायरल’ केले होते. परंतु, मुंडे-खडसे यांच्याच अथक मेहनतीने, संघर्षाने ‘भाजप’चा वाढ-विस्तार झाला, म्हणूनच  फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. तसेच, खडसे-मुंडे यांच्या घरात खासदारकी-आमदारकी  असतानाच फडणवीस मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, हे का विसरायचे ? दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीस यांना विखे पाटील, दानवे पाटील, नारायण राणे- नीतेश राणे या पितापुत्रांची आमदार-खासदार असणारी जोडी चालत नव्हती, तर पळत होती. पण खडसे-मुंडे यांच्या घरातले सासरा आमदार, सून खासदार आणि बहिणी आमदार-खासदार होणे चालत नव्हते. कारण देवेंद्रजी फडणवीस यांना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या शिकवणुकीप्रमाणे सर्वकाही ‘एकचालकानुवर्ती’ हवे होते. ‘आपले राज्य, आपला पक्ष’ आणि त्या पक्षाचा ‘मीच एक आणि एकमेव नेता ! पक्षात कुणी उपनेताही नको.’ हा त्यांचा हट्ट !

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर नितीन गडकरी हेच राज्यातील ‘भाजप’चे नेते होते. पण ‘भाजप’च्या आताच्या केंद्रीय नेतृत्वाच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत; त्यांचे स्पर्धक असल्याने ते आडवे येणारच नाहीत ,असे मानून देवेंद्र फडणवीस यांचा ‘भाजप’मधल्या बहुजन नेत्यांना संपविण्याचा धुमाकूळही गेली सहा वर्षे सुरू आहे‌. या कत्तलीसाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद प्राप्त होईपर्यंत आपली नखे अस्तनीतच ठेवली होती. पण मुख्यमंत्री होताच त्यांनी ‘बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा’ ही इच्छा बोलून दाखवणाऱ्या एकनाथ खडसे यांचा आणि ‘भावी गृहमंत्री’ होण्याची इच्छा बाळगणाऱ्या विनोद तावडे यांचा कार्यक्रम केला. पंकजा मुंडे यांना ‘चिक्की’त  घोळवले. सोबत ‘खीर खाऊन’ही वरिष्ठ आणि आपण नामानिराळे राहावेत, यासाठी म्हणून प्रकाश मेहतांना मंत्री पदाच्या घागरीसह बुडवले. साक्षीदार शिल्लक राहायला नको, म्हणून बावनकुळे, बडोले, राम शिंदे यांचाही बाडबिस्तरा बांधून दिला‌. राजकारणात नवी पिढी अधिकारावर आली, की जुन्या पिढीची गठडी वळली जाते. ते स्वाभाविक आहे. महाजन- मुंडे यांनीही प्रदेश ‘भाजप’वर कब्जा मिळवताना अण्णा जोशी, फरांदे, अण्णा डांगे, वामनराव परब, मधु देवळेकर, पुंडलिक दानवे यांना वृद्धाश्रम दाखवला होता. महाजन-मुंडे गेल्यावर गडकरींनी तेच केले. तेच फडणवीस करीत आहेत. पण पूर्वसुरी आणि फडणवीस यांच्यातील फरक आवर्जून नोंद घेण्यासारखा आहे. फडणवीस यांच्यात स्वकेंद्रितपणा तर आहेच. पण त्यापेक्षा अधिक मध्यमवर्गीय व खास करून, बहुजन-अभिजन असे सुडाचे राजकारणही आहे. त्यासाठी सत्ता साधन होती ; तशीच साध्यही होती. म्हणूनच ते ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे म्हणाले नाहीत; तर त्यांचा कंठशोष ‘मी पुन्हा येईन’ असा होता. अर्थात, हा ‘मी पणा’ सत्ता संसर्गामुळे आलेला नाही.

नागपूरकर भोसल्यांकडे त्यांच्या पूर्वजांनी ‘फडणवीशी’ म्हणजे ‘कारकुनी’ केली होती ; सत्ता राबवली आणि गाजवली होती; त्याचा वंशपरंपरेने चालत आलेला हा प्रभाव आहे. मध्ययुगीन सरंजामी व्यवस्थेच्या व्यवहारानुसार, सत्ता मुघली असो; बहामनी असो वा इंग्रजांची असो ; ‘कुणीही जमवा, कुणाशीही हात मिळवा आणि सत्तेत राहा !’ हा व्यवहार फडणवीस तंतोतंत करतात. अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी मांडलेला चार दिवसांचा पाट ; त्यानंतर राजभवनावरच्या रोजच्या चकरा आणि उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य होऊ नयेत, यासाठी हस्ते- परहस्ते निर्माण केलेले अडथळे, हे ‘मी पुन्हा येईन’ यासाठीचा मध्ययुगीन सरंजामी व्यवस्थेतून अंगीभूत झालेला सत्ता हव्यास होता आणि आहे. अशा छोट्या-मोठ्या कारणांमुळेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या ‘इमोजी’ चिन्हाचा विषय बनलेत. त्यांच्यावर ‘सोशल मीडिया’तून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. ‘काँग्रेस’ पक्ष हा स्वातंत्र्यापासून गेली सत्तर वर्षे विरोधी पक्ष व विरोधी मतांचा टीकापात्र होता आणि आहे. परंतु, फडणवीस हे महाराष्ट्रातील असे पहिले विरोधी पक्षनेते आहेत की, ज्यांच्यावर सत्ताधाऱ्यांपेक्षाही अधिक टीका होते आणि होणार आहे ! त्यांना स्वपक्षातून होणाऱ्या टीकेलाही सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या झाडाला अल्पावधीत फुले-फळे आलीत. जशा की फळभाज्याच ! अशी झाडं फार काळ तगून राहात नाहीत. *राजकारणात आधी कमरे इतके गाडून घ्यावे लागते. तेव्हा कुठे कमरेवरील उंची लोकांना दिसते. पण  गाडून घेतलेली काया किती? याचा विचार न करता माझीच उंची मोठी असावी, दिसावी, हा हट्ट काही दिवसांपुरता ठीक असतो. तथापि अकलूज, जामनेर,  लोणी, भुदरगड, कणकवली, जवखेडा- भोकरदन इथले गणे-गणपे  घेऊन ‘मी, मी आणि मीच’ काहीकाळ म्हणता येईल. सदासर्वकाळ नाही ! हे वास्तव ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अजून लक्षात आलेले नाही. म्हणूनच त्यांना देवेंद्रजी ‘सज्जन’ वाटतात. असे सज्जनतेचे सर्टिफिकेट देणारे चंद्रकातदादा हे  खडसे, पंकजा मुंडे, मेधा कुलकर्णी, राम शिंदे, विनोद तावडे, बावनकुळे यांना सज्जन वाटतात का?

………………………………………………………………………

मटका किंग रतन खत्रीचे माहात्म्य

‘महात्मा’ ही ओळख होण्यासाठी किमान लोकहिताचा, लोककल्याणाचा विचार-आचार असावा लागतो. तशी अट ‘धर्मात्मा’ होण्यासाठी नसते. म्हणूनच द्रौपदीला परस्पर द्यूताला लावून ‘महाभारत’ घडविण्यास कारण ठरलेला युधिष्ठिर हा ‘धर्मराज’ होतो ; तर जुगाराचा नाद लावून लाखो संसार उद्ध्वस्त करणारा ‘मटका किंग’ रतन खत्री हा हिंदी चित्रपटवाल्यांसाठी ‘धर्मात्मा’ होतो. नुकतेच, मुंबईत वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालेल्या रतन खत्रीच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मात्मा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता; तर ‘रंगीला रतन’ या हिंदी चित्रपटाचा रतन खत्री  सहनिर्माता होता. १९६५ ते ७५ या काळात इंदिरा गांधी यांच्या राजवटी बरोबरच देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. कामगार, विद्यार्थी आणि  सरकारी नोकर यांची आंदोलनं जोरात होती. त्याचबरोबर काळाबाजार, स्मगलिंग आणि भाववाढ यांनी उच्छाद मांडला होता. यातील ‘दोन नंबरी’ धंद्यात हाजी मस्तान, युसूफ पटेल यांच्या जोडीने ‘मटका किंग’ रतन खत्री याचे नावही चर्चेत होतं. या साऱ्याला आळा घालण्यासाठी १९७५ ते ७७ या काळात देशात ‘आणीबाणी’चा अंमल सुरू झाला. त्यात राजकीय व आंदोलक नेत्यांप्रमाणे हाजी मस्तान, युसूफ पटेल, रतन खत्री हे ‘दोन नंबरी’ही गजाआड होते.

‘आणीबाणी’ संपल्यावर ते तिघेही यथावकाश जेलमुक्त झाले. पण ते पूर्वीपेक्षा अधिक हुशार झाले. हाजी मस्तानने प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या साथीने दलित- मुस्लीम ऐक्याचे राजकारण सुरू केले. युसूफ पटेल बांधकाम व्यवसायात घुसला आणि रतन खत्री मटक्याचा बेकायदेशीर उद्योग नेकीने करीत अधूनमधून वृत्तपत्रातून ‘नशीबवान’ म्हणून नाव-फोटोसह झळकू लागला. मटका हा खोटा, बेकायदेशीर धंदा. द्यूत, जुगार, सोडत, लॉटरी, बेटिंग या त्याच्या पुढच्या-मागच्या आवृत्या. पण त्यात मटक्याचा व्याप मोठा. एक रुपयापासून खेळला जाणाऱ्या या मटक्याने ‘लक्षाधीश’ दुर्मिळ असणाऱ्या काळात दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. १ ते शून्य आकडे आणि ३ आकड्यांची संख्या एवढ्यावर रतन खत्रीने मटक्याचे नेटवर्क देशभर निर्माण केले होते. रतन खत्री हा भारत-पाक फाळणीत कराचीतून मुंबईत आलेला    सिंधी तरुण. पण डोकेबाज. १९६० मध्ये कल्याण भगत याने मटक्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला. तेव्हा रतन खत्री त्याच्याकडे व्यवस्थापक होता. भगतचा मटका ‘कल्याण’ नावाने ओळखला जायचा. १९६४ मध्ये रतन खत्रीने ‘वरळी मटका’ नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. वरळी पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये रतन खत्रीच्या मटक्याचे कार्यालय होतं. तिथून सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत दर ३ तासांनी मटक्याच्या निकालाचे आकडे फुटायचे. त्या बिल्डिंगखाली अधून-मधून पोलीस गाडी घ्यायची. थोडी धावपळ व्हायची. पण ‘आपल्या सुरक्षेसाठीच पोलीस आलेत,’ अशा थाटात रतन खत्री पोलिसांबरोबर जाताना दिसायचा. दोन-तीन दिवसांनी त्याला अटक केल्याची आणि न्यायालयाने त्याची सुटका केल्याची बातमी एकाच वेळी वृत्तपत्रातून यायची‌. त्याच्या सुटकेसाठी ॲडव्होकेट राम जेठमलानी यांनी कोर्टात युक्तिवाद केलेला असायचा. ‘खेळातल्या पत्त्यांची हाताळणी करणं किंवा पत्त्यांतून निवडक पत्ते काढणं, हा गुन्हा नाही,’ हे ॲडव्होकेट जेठमलानी कोर्टाला पटवून द्यायचे. न्यायाधीशांना ते पटायचं आणि रतन खत्री याची सुटका व्हायची.

हेच राम जेठमलानी ‘जनता पक्षा’च्या मोरारजी देसाई यांच्या सरकारात आणि पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात कायदामंत्री होते. असो. ५२ पत्त्यांतील राजा, राणी, गुलाम आणि जोकर, हे पत्ते बाजूला काढून राहिलेल्या ४० पत्त्यांतून ३ पत्ते काढून आकडा जाहीर केला जायचा. उदाहरणार्थ- दुरी, पंजा, सत्या आल्यास त्याची बेरीज १४ होते. यातील शेवटचा आकडा ४; म्हणून या आकड्याला दहा रुपयाला ९० रुपये मिळतात. हे आकडेही मटक्याच्या भाषेत ४ म्हणजे ‘चौका’, ६ = छक्का , ७ = लंगडा, १० = मेंढी किंवा जिलबी असे होतात. ३ एक्के किंवा ३ नव्वे असे आकडे आल्यास त्याला ‘संगम पाना’; तर २,२,४ किंवा २,२,८ असे आकडे आल्यास त्याला ‘डी.पी. पाना’ म्हणतात. १,३,९ किंवा २,४,९  या आकड्याला ‘सिंगल पाना’ म्हणतात. ‘संगम पाना’ला एक रुपयाला शंभर रुपये मिळत; तर ‘डी.पी. पाना’ला एक रुपयाला २५० रुपये मिळत. या आमिषातूनच अधिक पैसे लावण्याचा मोह मटका खेळणार्‍यांना व्हायच्या. यात अनेक जण कर्जबाजारी झाले.  घर ,जमिनी विकून कंगाल झाले. दारूचं व्यसन एक वेळ सुटू शकत़ं; पण मटक्याचं व्यसन सुटता सुटत नाही. यातून  पैसे देण्यावरून पूर्वी हाणामाऱ्या व्हायच्या. या साऱ्याबाबत त्याकाळात प्रमोद नवलकर, श्रीकांत सिनकर व ‘दोन नंबरी’ धंद्यांवर लिहिणाऱ्या अनेकांनी खूप तपशिलात लेखन केले आहे. या सगळ्यांनी ‘मेन बाझार’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रतन खत्रीच्या मटक्याला अधिक खात्रीचा म्हटलंय.

मटक्यातले काळे, लॉटरीत पांढरे

  मटका, गरीब, कष्टकरी, कामगार वर्गातील लोकांबरोबर उच्चभ्रू , पांढरपेशे लोकही खेळत. कारण त्या काळात अधिकचा पैसा सहजपणे मिळवायचे मार्ग मर्यादित होते. ‘दलाली’ला आजच्यासारखी प्रतिष्ठा नव्हती. तथापि, मटक्याच्या बेकायदेशीर व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल होते, पण शासनाला काहीच लाभ होत नाही; उलट पोलीस दारूच्या अड्डेवाल्यांप्रमाणेच मटक्याच्या बूथवरून हप्ते घेतात म्हणून बदनाम झाले होते. यातूनच ‘सरकारमान्य लॉटरी’ची कल्पना पत्रकार नारायण आठवले यांनी पुढे आणली.  दैनिकातून  प्रसिद्ध होणाऱ्या ‘शुभांक’च्या माध्यमातून वृत्तपत्र व्यवसायाचं मटकेवाल्यांशी कनेक्शन होतंच; आजही आहे. असो. १९६२ ते १९७४ या काळात नारायण आठवले ‘दैनिक लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक आणि नंतर रविवारच्या पुरवणीचे प्रमुख होते. त्या काळात त्यांचं ‘अनिरुद्ध पुनर्वसू’ या टोपणनावाने लिहिलेले ‘भारूड’ हे सदर रविवारच्या पुरवणीतून गाजायचं- वाजायचं. त्यात ते सामाजिक, राजकीय, साहित्यिक विषयांवर लिहीत. एका ‘भारूड’ मध्ये त्यांनी ‘मटक्याच्या व्यसना’चा आढावा घेताना, मटक्याचा बेकायदेशीर धंदा रोखण्यासाठी ‘सरकारी मटका’ सुरू करावा, अशी सूचना करणारं लेखन केलं होतं. त्यात आकडा लावण्यासाठी आणि लागलेल्या आकड्याची रक्कम ‘कर वजा’ करून देण्यासाठी पोस्ट कार्यालयाचा वापर करावा; दररोज एकेका मंत्र्याने आकडा जाहीर करावा आणि ‘जॅकपॉट’चा आकडा मुख्यमंत्र्यांनी फोडावा; अशाही सूचना नारायण आठवले यांनी केल्या होत्या. त्यातूनच ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ हा सरकारी उपक्रम आकारास आला.

त्याचा लाभ ‘राज्य लॉटरीची एजन्सी’ घेणाऱ्या ‘मॅजेस्टिक’च्या तुकाराम कोठावळे यांना झाला. पण त्यापेक्षा अधिक लाभ रतन खत्रीला झाला. बक्षीसपात्र लॉटरी धारकाच्या रकमेतून ३३ टक्के रक्कम कर म्हणून सरकार वजा करते. म्हणजे, एक लाखाची लॉटरी लागली तर ६७ हजार रुपये मिळायचे. असे ‘बक्षीसपात्र लॉटरी तिकीट’ रतन खत्री ७० ते ७५ हजार रुपयांना मटक्यातील बेहिशेबी रक्कम वापरून विकत घ्यायचा आणि ते तिकीट सरकार जमा करून ६७ हजार रुपये ‘व्हाईट’ मिळवायचा. लॉटरीच्या सुरुवातीला बराच काळ वृत्तपत्रांतून निकाल यायचे. तशा जाहिरातीही यायच्या. त्यात लक्षाधीशांचे फोटो नावासह प्रसिद्ध होत. त्यात ‘विक्रमी नशीबवान’ रतन खत्री दिसायचा. याचा फायदा त्याला मटक्याच्या व्यवसायासाठी व्हायचा. १९९५ मध्ये मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मटक्यावर कडक बंदी आणली‌. पण तोपर्यंत खत्री या व्यवसायापासून दूर झाला होता. तथापि, या बंदीमुळे ‘मटका’ अधिक फोफावला. आता अनेक गावांच्या नावाने मटका सुरू आहे. ‘ऑनलाइन लॉटरी’लाही चांगले वळण आहे. अगदी लॉटरीच्या आकड्यांवरही  मटका खेळला जातो. बुद्धी- शक्ती- मेहनतीऐवजी ‘नशीब- तकदीर- किस्मत’ आजमावण्याची खोड लोकांत आहे, तोवर नानाप्रकारे मटका खेळला जाणार ! आणि मटका म्हटलं, की रतन खत्रीही आठवणार !  कारण ‘नशिबाने मिळणाऱ्या पैशाला नो कात्री ! जय बोलो रतन खत्री,’ अशी खात्री त्याने जुगाऱ्यांना दिलीय.

…………………………………………………..

रोजगार गमावलेल्यांना मदत द्या !

राजकारण असो वा अर्थकारण; सगळीकडे आकड्यांचाच खेळ चालतो. हा खेळ रतन खत्रीच्या ‘मटक्या’सारखाच फसवा असतो. त्याचा लाभ एखाद- दुसऱ्याला होतो, पण त्याचवेळी हजारो जण उद्ध्वस्त होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना-लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर देशाच्या ढासळलेल्या अर्थकारणाला मजबुती आणण्यासाठी ‘वीस लाख कोटी’ रुपयांचे ‘पॅकेज’  विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलंय. इथे त्याच्या तपशिलात जायचे नाही. कारण या ‘पॅकेज’मधला पैसा  ‘कोरोना- लॉकडाऊन’मुळे ज्यांचा रोजगार अचानक थांबला ; ज्यांना स्थलांतरित व्हावे लागलं ; ज्यांना महिन्याचा पगार कात्री लावून मिळाला किंवा मिळालाच नाही; त्यांच्यापर्यंत किती पोहोचणार, हा खरा प्रश्न आहे.

या ‘पॅकेज’मधील १०-२० टक्के म्हणजे २०-४० हजार कोटी रकमेला वहिवाटीनुसार, बुडीत खात्याचा चुना लागेलच किंवा ते माफ तरी केले जातील ! हीच रक्कम पॅकेजच्या कठोरपणे अंमलबजावणीने वाचवून, ती रोजगार गमावलेल्या गरीब, कष्टकरी, स्थलांतरितांना दिल्यास त्यांना संकटकाळात ‘अच्छे दिन’चा आनंद लाभेल. उद्योग- धंदेवाल्यांना ‘पॅकेज’चे ‘टॉनिक’ देऊन ‘कोरोना लॉकडाऊन’चा फटका बसलेल्या देशातील ८० टक्के लोकांचे फाटलेले खिसे शिवले जाणार नाहीत. त्यासाठी त्यांना थेट आर्थिक मदत केली पाहिजे, तरच त्यांना जगणं सुसह्य होईल. ही मदत देणे, हजारो कोटींच्या बँक कर्ज बुडव्यांना विदेशी पलायनासाठी मोकळीक देणाऱ्या सरकारसाठी अवघड बाब नाही.

अर्थव्यवस्था मजबूत करायची तर, जनतेचे खिसे आधी मजबूत असायला हवेत. हे काम सरकारचं आहे. ते केले पाहिजे.

९३२२२२२१४५

Previous articleकोरोनाची महामारी, धर्म आणि देवदेवदेव…
Next articleसंजय राऊत: भारतीय असंतोषाचे मराठी प्रतिक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here