–प्रवीण बर्दापूरकर
जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून फार काही आभाळ कोसळलं आहे , असं समजण्याचं कारण नाही कारण पक्षातरं आता भारतीय राजकारणाचा अविभाज्य अंग झालेली आहेत . एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं हा मुद्दा नसून आता तरी काँग्रेस पक्ष खडबडून जागा होणार का नाही हा खरा मुख्य मुद्दा आहे . सध्या काँग्रेस पक्षाची एकूणच अवस्था अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी झालेली आहे . त्या भळाळत्या जखमेवर उपचार करायला काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी तयार नाहीत .
जितीन प्रसाद काँगेसमधून भाजपमध्ये गेले . म्हणजे त्यांचे सर्व समर्थक भाजपमध्ये गेले आहेत , असं नाहीत . एखादा नेता पक्षांतर करतो म्हणजे त्याच्या जाती-धर्माची सर्व मतं दुसऱ्या पक्षाकडे वळतात असा जो दावा केला जातो , त्यात काही तथ्य नसतं . कोणत्याच जाती-धर्माची शंभर टक्के मत कोणत्याच एका पक्षाच्या बाजूनं कधीच नसतात . जितीन प्रसाद सारख्या नेत्यांच्या पक्षांतरातून प्रश्न निर्माण होतो की , त्यांनी पक्ष का सोडला ? इतके वर्ष काँग्रेसवर असणारी निष्ठा एका रात्रीत का बदलली ? काँग्रेस नेते शशि थरुर यांनी छान म्हटलंय की ,’’पक्षांतर म्हणजे काही आयपीएलचा खेळ नव्हे .’’ ( जितीन प्रासाद यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घाव शशि थरुर यांच्या फारच वर्मी बसला असल्याचं त्यांच्या लेखातून दिसतं आहे ! )
भारतीय जनता पक्षाला पर्याय उभा करण्यात काँग्रेसला यश आलेलं नाही , हा मुद्दा आहे . किमान भाजपाला पर्याय म्हणून उभं राहावं यासाठी सर्व मरगळ झटकून टाकून सर्व शक्तिनिशी उभं राहावं , याचंही सोयरसुतकं एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसला आहे , असं अलीकडच्या काळात दिसलेलं नाही . लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाला वाटतं की , कोणत्याही एका पक्षाची निरंकुश सत्ता देशात नसावी ; त्या सत्तेवर विरोधी पक्षाचा प्राभावी अंकुश असावा म्हणूनच भाजपाला एक सशक्त पर्याय देशात उभा राहिला पाहिजे . ( पूर्वी असा पर्याय काँग्रेसला निर्माण व्हावा असं या गटाला वाटत असे . ) तो पर्याय म्हणून गेली आठ- दहा वर्ष भारतीय लोकशाहीविषयी आस्था असणारे हे लोक काँग्रेसकडे बघत आहेत आणि काँग्रेस मात्र आस्थेनं बघणाऱ्या या लोकांचा अपेक्षाभंग करत आहे . या निमित्तानं लोकांच्या आणि काँग्रेसमधीलही अनेकांच्या मनात प्रश्न हाच आहे की , काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या क्रायसिसमधून आधी मुक्त व्हावा . तशी गांधी कुटुंबाची तरी इच्छा आहे की नाही ? सोनिया गांधी यांच्या अलिकडच्या कोणत्याही निर्णयातून तसं दिसत नाही . पक्षावरची पकड किंचितही ढिली करायला त्या तयार नाहीत आणि पक्षात गांधी घराण्याला पर्याय देईल असं नेतृत्वही उभं राहायला तयार नाही .
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी अलिकडच्या दीड-दोन दशकात खूप काही चांगलं आणि वाईटही बोललं गेलेलं आहे ; अजूनही बोललं जातं . विरोधकांनी त्यांच्यावर टोकाची टीका केलेली आहे तर समर्थकांनी त्यांचं अतिसमर्थन केलं आहे . लोकशाहीविषयी आस्था असणाऱ्या लोकांनी राहुल गांधी ही भाजप आणि नरेंद्र मोदी यांना एक पर्याय असू शकतो , असं मत प्रदर्शन केलेलं आहे . मात्र राहुल गांधी स्वत: सुद्धा असा पर्याय म्हणून उभा राहण्यात अयशस्वी ठरलेले आहेत ; पक्षातीलही सर्व बुजुर्ग नेत्यांना एकमतानं राहुल गांधी हे पर्याय वाटत नाहीत . त्यामुळे पक्षात सतत कुरघोडीचं राजकारण सुरु आहे परिणामी कोणाचा पायपोस कुणात उरलेला नाही असं चित्र आहे . त्याला कंटाळून राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले ज्योतिरादित्य शिंदे आधी गेले , आता जितीन प्रसाद गेले…आणखी काही जातील .
जितीन प्रसाद यांनी पक्षांतर केल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेलं मतप्रदर्शन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जरा गंभीरपणे घ्यायला हवं , असं कितीही म्हटलं , तरी तसं घडणार नाही , अशीच या पक्षाची अलीकडच्या काळातली वाटचाल राहिलेली आहे . वीरप्पा मोईली हे काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत . ‘काँग्रेसवर आता एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे’ , असं त्यांनी म्हटलं आहे . वीरप्पा मोईली यांच्या म्हणण्यामध्ये निश्चितचं तथ्य आहे पण , अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी वीरप्पा मोईली पुढाकार का घेत नाही हाही एक कळीचा मुद्दा आहे . एकटे वीरप्पा मोईलीच कशाला काँग्रेसमध्ये कथित बंडाचा झेंडा घेऊन उभे असलेले २३ नेतेही गांधी घराण्याला सक्षम पर्याय देऊ शकतील , हा दिशेने काही कृतिशील आहेत असं काही दिसत नाही . नुसतीच पत्रकं काढायची आणि प्र्त्यक्षात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनीच पक्षाच्या नेतृत्व पदी कायम राहावं अशी गुळमुळीत भूमिका हा २३ नेत्यांचा गट घेत असतो . याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण यापैकी एकही नेता त्यांच्या राज्यापुरता तर सोडाच पण , गेला बाजार त्यांच्या लोकसभा मतदार संघापुरता स्वयंभू नाही . या नेत्यांसाठी कठोर शब्द वापरतो , असे ‘बाजारबुणगे’ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पर्याय उभा करु शकतील , अशी कोणतीही शक्यता नाही . श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कालखंडापासून ‘गांधी’ नावाच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आणि नेत्यांनी अवलंबून राहावं , सत्ता मिळवावी,. सत्ता उपभोगावी अशी एक मानसिकता तयार झालेली आहे . त्या मानसिकतेच्या बाहेर हे तेवीसच काय पण काँग्रेसचे देशभरातील कुणीही नेते येऊ शकतच नाही . त्यामुळे काँग्रेस पक्षाची ही विकलांगी वाटचाल अशीच चालू राहणार आहे असं म्हणण्याशिवाय आता प्रत्यव्याय उरला नाही .
भारतीय जनता पक्षानं उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केलेली आहे , हा जितीन प्रसाद यांच्या पक्षांतराचा आणखी एक अर्थ आहे . ज्या ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असतात तिथे दोन-तीन वर्ष आधी निवडणुकांची तयारी सुरु करण्याची भाजपाची एक रणनिती असते . त्यानुसार अन्य पक्षातील जमतील तेवढे दिग्गज किंवा गणंग नेते भाजपामध्ये ओढून आणण्याचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा प्रयत्न असतो . तसाच प्रयत्न उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या जितीन प्रसाद यान फोडून करण्यात आलेला आहे .
काँग्रेस पक्ष असा विकलांग झाला असताना आपल्या देशाचं राजकीय चित्र काय असू शकतं ? या स्तंभातून अलिकडच्या काळात लेखन करीत असताना भाजपाला अराजकीय पर्याय उभा राहू शकत नाही असं प्रतिपादन केलं होतं . लोकशाहीविषयी संवेदनशील असणार्यांनी त्या संदर्भात मतप्रदर्शन केलेलं आहे आणि त्यापैकी बहुतेकांना अराजकीय पर्याय अमान्य आहे हे स्पष्टपणे दिसतं आहे . मग काँग्रेस व्यतिरिक्त भाजपाला कोणता पर्याय असा प्रश्न जर कोणाच्या मनात आला तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्ष विरुद्ध भाजप असं एक राष्ट्रीय (?) राजकीय चित्र निर्माण होण्याची असू शकते . ओरिसात बिजू जनता दल नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे उभा आहे . ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड काबीज करुन भाजपला जबरदस्त चपराक लगावलेली आहे . उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी ठोस अस्तित्व राखून आहे . तमीळनाडूत अण्णा द्रमुक आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुक असे दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष पक्ष आहेत . तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातले पर्याय पुरेसे स्पष्ट झालेले आहेत . काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आहे . आज भाजपसोबत असले तरी नितीश कुमार येत्या निवडणुकीत भाजपची साथ सोडतील अशी चिन्हे आहेत . देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये हे असे प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय म्हणून उभे राहू शकतात .

बरदापुरकर सर यांनी वास्तववादी विश्लेषण केले आहे,