घोंगडीमळणी

-मुकुंद कुळे

………………………………………………..

कितीही पाऊस असू दे, मस्त बुचडा बांधलेली घोंगडी डोक्यावर असली, की पूर्वी कोकणातला शेतकरीराजा खूश असायचा. कारण इरलीसारखी डोक्यावरून घोंगडी घेतली की त्याला का पावसाची पर्वा ? पाऊस आडवा-उभा कसाही कोसळू दे, डोक्यापासून ढोपरापर्यंत पांघरलेली घोंगडी, त्याचं पुरेपूर संरक्षण करायची. पावसाचं एक टिपूसही घोंगडीतून आत शिरत नसे. मेंढीच्या तंतूमय लोकरीपासून ही घोंगडी विणलेली असल्यामुळे, अळवाच्या पानावरून जसं पाणी झरून जातं नि पान कोरडंच्या कोरडं ठाक राहतं, अगदी तसंच या घोंगडीचं होतं… पाणी वरच्या वर असं निसटून जातं, की त्याची ओल आतल्या माणसाला जाणवतच नाही… आजकाल पावसात कुणी घोंगडी वापरतं की नाही कुणास ठाऊक? मला मात्र दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या घोंगडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही… आणि याचं कारण मात्र वेगळंच आहे.

… पावसाळा जवळ आला, की वर्षभरात विणलेल्या घोंगड्या घेऊन दरवर्षी धनगर समाज कोकणातल्या गावांत येत असे. कधी काळ्याभोर, तर कधी तांबुस-काळ्या रंगांच्या त्याने काखोटीला मारलेल्या घोंगड्या, म्हणजे जणू त्याच्या अंगभर पसरलेलं मेंढ्यांचं लटांबरच… या घोंगड्यांच्या विणीची आणि तंतुंची पारख करून बहुतेक जण पावसाळ्यासाठी नवीन घोंगडी घेत… महिलांसाठी बांबूच्या अर्धवर्तुळाकर सांगाड्यावर भिड्याची किंवा साह्याची (म्हणजे सागाची) पानं लावून इरली बांधलेली असायची. मात्र घरातल्या पुरुषासाठी, विशेषतः नांगर धरणाऱ्या पुरुषासाठी हमखास घोंगडी घेतली जात असे. कारण कितीही मुसळधार पाऊस असला, तरी केवळ घोंगडी डोक्यावर घेऊन, तो दोन्ही हातांनी नांगर व्यवस्थित धरू शकत असे… पण नवीनच विकत घेतलेली घोंगडी जशीच्या तशी वापराला काढण्याची पद्धत नव्हती. कुठलीही घोंगडी वापरण्याआधी तिची मळणी करावीच लागायची. कारण मळणीमुळे घोंगडीची विण अधिक घट्ट व्हायची नि परिणामी पावसाला अटकाव व्हायचा. मला ही घोंगडीची मळणीच भारी आवडायची.

मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो, की हमखास घोंगडीच्या मळणीची कसरत पाहायला मिळायची… कसरत यासाठी, की घोंगडी मळण्यासाठी गावच्या नदीच्या कातळातला छान खड्डा शोधला जात असे. या खड्ड्यात घोंगडी टाकून तिच्यावर थोडं थोडं पाणी टाकून ती पायाने मळली जात असे. पाणी घोंगडीत मुरायला लागलं की हळूहळू तिची खळ बाहेर पडायला सुरुवात होत असे आणि या खळीमुळेच घोंगडी आणि संपूर्ण खड्डा मटमटीत होत असे. परिणामी घोंगडी मळणाऱ्याची जणू तारेवरची कसरतच सुरू होत असे… एक पाय इकडे, एक पाय तिकडे असा सारा गंमतीचा मामला असे आणि जर तोल सांभाळता आला नाही, तर घसरून तो बुडावर धाडकन् आपटलाच म्हणून समजा… अर्थात मळणी करणारा पडण्याची अशी वेळ क्वचितच येत असे. कारण बहुतेकदा मळणी करणारे अनुभवाने शहाणे झालेले असत, ते हातात काठी घेऊनच मळणी करत. म्हणजे काठी दोन हातात घट्ट पकडून ती कातळावरच्या सुक्या भागात भक्कमपणे रोवत आणि मगच जोर काढून पायाने घोंगडी मळत. मात्र तरीही कधी कधी घोंगडी मळता मळता त्यांचे पाय निसटत आणि ते उताणी पडत… घोंगडीमळणीची ही गंमत पाहण्यासाठी लहानपणी कितीतरी संध्याकाळ मी नदीवर घालवलेल्या आहेत…

… आता गावाला गेल्यावर कधी नदीवर गेलं, तर कातळ दिसतो, कातळातले खड्डेही दिसतात, मात्र घोंगडीमळणी आता पूर्ण माळवलेली आहे… आता नांगऱ्यांच्या अंगावर घोंगडी दिसत नाही, तिच्याऐवजी प्लास्टिकचे रेनकोट असतात. असोत बापडे, मरणाच्या पावसापाण्यापासून शेतकरी राजाचा बचाव होवो, एवढं खरं!

(छायाचित्र गुगलवरून साभार)

(लेखक नामवंत पत्रकार व लोककला-लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –मुकुंद कुळे type करा आणि Search वर क्लिक करा.