मुसलमानांच्या मुसक्या बांधताना !

अजीम राही नवाज

आम्ही पंक्चर काढणारे
रेगड्या ओढणारे
फाटकी तुटकी खेटरे जमा करणारे
वरातीत उजेड वहाणारे
तोरणदारी शामियाना उभारणारे
एसटीच्या टपावर
मानेचा मणका मोडणारे
ओझे टाकणारे हमाल
रसवंतीसमोरील पाचटासारखे
पांच वर्षांनी काढला जातो आमच्यातील रस
रस काढण्याच्या
पिढयानपिढयांच्या
कथा देखील सुरस.
. . . . .

सलीम,कलीम,अजीम, सत्तार,गफ्फार
नांव उच्चारताच
पोलिसांची बदलणारी देहबोली
खुलेआम शेलक्या भाषेचा वापर
माथ्यावर फोडले जाते
न केलेल्या चुकांचे खापर
छळवणूक,पावलोपावली अडवणूक
शिव्यांची लाखोली वाहताना
सुखावणारा जात्यंमधला परंपरागत द्वेष
इज्जतीचे धिंडवडे निघतात गल्लोगल्ली
प्रत्येक ठिकाणी वागणूक सारखी
गावगाड्यापासून तर थेट दिल्ली
. . . .

नावांचे तर सोडा
रंगावरुनही छळले जातो आम्ही
दिसली हिरव्या झेंड्याची गाडी
की, पोलिसांच्या भुवया उंचावतात.
टोप्या ,दाढ्यांवर साशंक नजरा रोवलेल्या
जुलुसात, उरुसात झाडाझडती
अट्टल गुन्हेगांरांसारखी ठरलेली
आमच्यासाठीच खाकी वर्दीची माया ठरलेली

. . . . .

संदलचा उंट सजला
कव्वाल कव्वाली वदला
इदसाठी मोहल्ले सजायला लागले की
शंकाकुशंकांचे नाग सळसळायला लागतात
संशयाचे किडे वळवळायला लागतात
आनंदाच्या क्षणांवरही घारीसारखी पाळत
रसातळाला गेला आता
उत्साह सणांमधला परंपरागत

. . . .

मान्य , काही आमच्यात आहेत
काही तुमच्यात
वांगी सडकी
एकात्मतेची फोडणी देताना
कशाला रेटता भूतकाळातली कारणे रडकी.
फाळणीच्या नांवावर
दोन देशात रेघ ओढणारे
आम्ही मानत नाहित आमचे
आमचे बापजादे नव्हते
घरफोड्या जिनाहचे चमचे.
पारतंत्र्याचा काळोख सरल्यावर
रेल्वेरुळे खुली झाल्यावर
सरसावली नाहीत
आमची निष्ठावंत पावले परक्या भूमीकडे

. . . . .

पुढ्यात पाचटासारखे जिणे
प्रतारणांचा ढीग कमी होण्याऐवजी
होत आहे त्यात दिवसेंदिवस वाढ
एकदिवस उकिरड्यावर विसावणे अटळ
या विशाल देशाची आम्ही अडचण
या सहिष्णू देशातली अडगळ
पात्रात येऊन पडतोय प्रतिशोधाचा खकाणा
लाटणार्यांनी लाटली सत्तेची खीर
तिकडे जाणार्यांचेही झाले वाटोळे.
बोकांडी बसला वाद अंसार,मुहाजीर

. . . . .

नकाराचं पाणी
नाकापर्यंत थडकलय
जीव घेतल्याशिवाय रहाणार नाही
प्राण कंठाशी आणण्यार्या आचक्या
गैरसमजांच्या दोर्या सोडा सैल
कुठवर बांधता मुसलमानांच्या मुसक्या.


मासिक
आपले वाड.मय व्रृत्त
जानेवारी ,२०२० वरुन साभार.

Previous articleगांधी: लेखकांना वेड लावणारा महात्मा
Next articleशिवमुद्रेसोबत येणाऱ्या जबाबदारीचे भान असलं पाहिजे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.