मुसळ आणि उखळ…

© राज कुलकर्णी

‘मुंबईत मुसळधार पाऊस’ ही बातमी पावसाळ्यात तर नित्याची असते ! पर्जन्यमान मोजण्याची पद्धती विकसित झालेली नव्हती तेंव्हा व्यवहारात खूप मोठा पाऊस याचे वर्णन करताना मुसळाएवढी धार असणारा पाऊस असे मानणे आपल्याकडे प्रचलित आहे. कारण पावसाच्या धारेची तुलना करण्यासाठी सर्वात मोठी अशी धारसदृष्य वस्तू म्हणजे मुसळच असावे ! हल्ली मुसळ हा शब्द केवळ पावसाच्या तुलनेसाठीच वापरला जातो. जसा पाऊस कमी होईल तसे मुसळ शब्दिक वापरातूनही हद्दपार होईल अशी स्थिती आहे.

दैनंदीन व्यवहारात मुसळ या वस्तूची ओळख एकटी कधीच नसते ! कारण मुसळासोबत सतत असते ते उखळ. दगडापासून उखळ, पाटा वरवंटा, जाते, खलबत्ता घडवणाऱ्या पाथ्रुड अथवा वडार समाजाबद्दल तसेच या वस्तू बनविण्याची पद्धत याची माहिती मागील आठवड्यात घेतली. तेंव्हा जाते आणि उखळ या दोन वस्तूंबद्दल स्वतंत्रपणे लिहिता येईल, असा विचार मनात होता.

उखळात धान्य कांडण्यासाठी विविध आकाराचे मुसळ वापरतात. आता वापर तेवढा होत नाही पण तीनचार दशकापर्यंत होत असे. मुसळ एक लाकडी आयुध अथवा बत्ता असून त्याचा एका बाजूस लोखंडी कडी असते. कोणते धान्य कांडायचे अथवा सडायचे यावर ते कोणत्या आकाराचे वापरायचे हे ठरवले जाते. उखळ पाथ्रुड समाज बनवतो तर मुसळ सुताराकडून बनवून घेवून लोहाराकडे जावून त्यास कडी बसवावी लागते !

मुसळ हे कृष्णाचा ज्येष्ठ बंधू बळीरामाचे आयुध असून, गमतीशीर बाब अशी की, मुसळाच्या उत्पत्तीची कथा विष्णू आणि भागवत पुराणाशी संबंधित आहे.म्हणजे त्याचा वापर जूना आहे. कथा अशी की, उन्मत्त झालेल्या यादवांनी एकदा ऋषींची चेष्टा करायची म्हणून एका मुलास स्त्रीवेष घालून , तो गरोदर असल्याचे सांगितले आणि ऋषींना विचारले या स्त्रीस मुलगा होईल की मुलगी ? ऋषींनी क्रोधीत होवून सांगितले की , हिला मुसळ होईल आणि तेच यादव कुलाचा नाश करेल. त्या मुलाचा स्त्रीवेष काढताच खरोखरेच त्या गुंडाळलेल्या कपड्यातून मुसळ बाहेर पडले. यादवांनी ते मुसळ जाळून त्याची राख केली आणि समुद्रात टाकली. पण या मुसाळाची कडी एका माशाने गिळली. तो मासा एका पारध्यास मिळाला. त्याने खाण्यासाठी मासा कापल्यावर त्याला मुसळाची कडी मिळताच , त्याने त्याचा बाण बनवला. तोच बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागून कृष्णाचा अंत झाला ! कथा मोठी रंजक आहे मात्र मुसळाचे अस्तित्व आणि त्याचे धार्मिक महत्व स्पष्ट करणारी आहे. मुसळाच्या जन्मापासूनच त्यास लोखंडी कडी असणे ही बाब अविश्वसनिय वाटते कारण धातूचा आणि त्यातही लोखंडाचा दैनंदिन जीवनात वापर हा बाब खूप अलीकडच्या काळातील आहे.

मुसळास असे धार्मिक महत्व असल्यामुळे कोणीही पाय लावत नाहीत. पण बहुदा मुसळ हे संकटकारक ठरल्यामुळे त्याची पुजा केली म्हणजे संकटनिवारण होते अशी मान्यता आहे. कोकणात तर मुसळादेवी या नावाने त्याची पूजा केली जाते. एखादे संकट असेल तर परातीत पाणी घालून त्यात मुसळ उभे केल्याने संकट दूर होते असाही समाज प्रचलित आहे. विवाह कार्यात ‘लाडाला घाणा घालणे’ नावाचा एक सोपस्कार असतो. त्यात नवग्रहांची पूजा झाल्यवर विवाह कार्य निर्विघ्न पार पडावे म्हणून मुसाळाची पूजा आवर्जून केली जाते.

मुसळ हे पुर्वी सुतार बनवत पण उस्मानाबादच्या आठवडी बाजारालगत असणा-या बुरूड समाजाच्या दुकानात ऑर्डर नुसार ते बनवून दिले जाते आणि त्याची किंमत रू ५०० ते ७०० पर्यंत असते अशी माहीती मिळाली.

मुसळाप्रमाणेच उखळ या वस्तूचा वापर देखील अंदाजे पाच हजार वर्षापेक्षा जास्त काळापासून भारतीय समाज करत आला आहे. लाकडी असल्यामुळे उत्खणनात मुसळ सापडणे कठीण पण सातवाहन कालीन पाटा वरवंटा, जाते यांच्यासोबत उखाळाचे अवशेष मात्र सापडले आहेत. उखळ ही प्रामुख्याने दोन प्रकारची आढळत. एक ज्यामध्ये कांडण्याचे काम उभे राहून केले जाते जे मसाले कुटण्यासाठी वापरतात. एमडीएच मसाल्याच्या जाहीरातीत ते दिसते आणि दुसरे म्हणजे आपल्या भागातील जमिनीत पुरलेले उखळ !

चिखलीच्या आमच्या वाड्यातील अगदी समोरील ओसरीच्या एका बाजूला प्रथम जमिनीत घट्ट पुरलेले जाते, त्याचा खुंटा आणि तो ठोकण्यासाठीचा एक ठोम्ब्या असे. त्याच्या शेजारीच जमिनीत पुरलेले उखळ होते आणि आजही ते तसेच आहे. याच उखाळाच्या मागील बाजूस एक भले मोठे उखळ ठेवलेले असे, जे ब-यापैंकी वजनदार होते ! बाजरी , साळी, डाळ कांडण्यासाठी या मुसळाचा तर चटणी कांडण्यासाठी लोखंडी पहारीचा वापर केला जात असे ! किल्लारीचा १९९३चा भूकंप होण्यापूर्वी आजी गावी असेपर्यंत या वस्तू होत्या मात्र त्या नंतर त्या केव्हा गायब झाल्या माहित नाही.

मुसऴाशी संलग्न असणा-या उखळ या शब्दाची उत्पत्ती ही वेदकालीन ‘उखा’ या शब्दापासून असून यज्ञ वेदीजवळ धान्य ठेवण्यासाठी उखा हे मातीचे पात्र निर्माण करत असत. त्यापासून उखळ हा शब्द बनला असावा. धान्य खाण्यायोग्य बनविण्याच्या प्रकीयेशी निगडीत या शब्दाचा वापर केला जात असल्यामुळे धान्याची रास करण्याच्या कृतीला ‘खळे’ म्हणतात. खलबत्यातील खल हा शब्द याच्याशी संबधित आहे. मुसळाचा संबंध बलीरामाशी व कृष्णाशी जसा आहे तसा उखाळाचा देखील एक संदर्भ आहे. भागवत पुराणानुसार यशोदेने बाळकृष्ण खूप खोड्या करतो, इकडे तिकडे फिरतो म्हणून पाणी आणायला जाताना त्यास एका मोठ्या दगडी उखळास बांधले ! मात्र त्या बाळकृष्णाने त्या उखाळास ओढत अंगणात आणले आणि अंगणातील दोन मोठे वृक्ष त्यामुळे उन्मळून पडले. विशेष म्हणजे ते दोन्ही वृक्ष शापित देव होते आणि ते उन्मळून पडल्यामुळे त्यांना पृथ्वीलोकातून मुक्ती मिळाली अशी श्रद्धा आहे !

उखळ आणि मुसळ या दोन्ही वस्तू दैनंदिन वापराच्या असल्यामुळे दैनंदिन भाषेवर त्यांचा खूप मोठा परिणाम दिसून येतो. मराठीत मुसळधार पाऊस या म्हणी प्रमाणे उखळ पांढरे होणे, मुसळाने टिरी बडवणे म्हणजे स्वतःचे कौतुक करून घेणे , इतरांचे कुसळ दिसणे मात्र स्वतःचे मुसळ न दिसणे म्हणजे , स्वतःचे दोष न पाहता इतरांचे पाहणे, उखळात घातले तर मुसळातून निघणे म्हणजे उद्धट असणे अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत .

उखळ आणि मुसळ यांच्या उपयोग प्रतिमेची थेारवी ही संताच्या रचनेतही आढळतो. संत सखुबाई सारख्या स्त्रीसंताबरोबरच एकनाथांनीही अध्यात्मिक प्रतिमा म्हणून उखळ आणि मुसळ काव्यात गुंफले आहे …

विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥
देह हें उखळ मन हें मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥
एका जनार्दनीं कांडन कांडितां । ब्रह्मा सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥

तर तुकोबांनीही,

इंद्रियांचा चळ । देहाचा संभळ ।
मनाचा उखळ । कांडतसे ।।

असे वर्णन केले आहे, जे कांडणे या क्रियेची सांगड मानवी मनातील घुसळणीची अध्यात्मिक अनुभूती देणारे आहे.

उखळ आणि मुसळ यांनी संताप्रमाणेच आधुनिक काळातील कविंनाही मोहीत केले आहे. माझा कवी मित्र नारायणनच्या ‘प्रेमाचा जांगड गुत्ता’ या दीर्घकवितेने महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले. त्याची सुरवातच या वस्तूंचा वापर आणि त्यातून कवितेत त्याने साधलेला भावार्थ अफलातून आहे. प्रेमात कधी अशी अवस्था होते की जणू उखाळतच तोंड खुपसले आहे हे सांगताना तो म्हणतो ..

प्रेमाचा जांगड गुत्ता गं,जीव झाला हा खलबत्ता गं ! उखळात खुपसले तोंड प्रिये,मुसळाचा तुंबळ रट्टा गं !!

मानवाच्या खाद्य संस्कृतीत मोलाचा घटक असणारे आणि सामान्य गृहीणी पासून बळीराम, कृष्णासारखे देव, एकनाथ तुकोबासारखे संत महात्मे नि नारायण सारख्या कविंना अभिव्यक्त होण्यासाठी उपयुक्त ठरणारे उखळ आणि मुसळ आज प्रत्यक्ष वापरात नसलेतरी आपले भावविश्व वृद्धीगंत करत आहेत, हे वास्तव आहे!

(लेखक नामवंत अभ्यासक व वक्ते आहेत)

9404535386

Previous articleअय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा
Next articleसुहास्य वदनी सुषमा स्वराज !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.