अय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा

-हेरंब कुलकर्णी

…………………………………………………………………………………………………

रूम नंबर २०२

श्रीकृष्ण रेस्टार्ंट बारामती

प्रवासी मुक्कामाला आला आणि त्याने चेक आऊट ३५ वर्षांनी केलयं …..

शेवटची ओळ नाही ना समजली ? नाहीच समजणार .कारण ती आहेच अगम्य

याचा अर्थ त्या हॉटेलात राहायला आलेला प्रवासी एकाच खोलीत ३५ वर्षे राहिला. ८ बाय १० च्या इवल्याश्या खोलीत. आणि आयुष्यभर फिरत होता सायकलवर

का ? परिस्थिती गरीब होती म्हणून का ?

मुळीच नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते प्राध्यापक होते.

होय.गोंधळ उडावा असच हे प्रकरण आहे. के.एस.अय्यर .बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सेवा केलेले आणि नुकतेच ५ महीन्यापूर्वी निधन पावलेले.

पूर्वी एकदा कवीमित्र संतोष पवार यांनी पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकीरी वृत्तीने जगणारा एक प्राध्यापक असल्याचे सांगितले होते मात्र सर गेल्यावर तपशीलवार माहिती कळली आणि या माणसाला आपण का शोधले नाही याची जन्मभर व्यापून उरणारी अपराधी बोचणी लागली. नुकताच बारामतीला शारदा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला गेल्यावर आवर्जून सरांनी ज्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात काम केले तिथे गेलो. तिथल्या उपप्राचार्य नेमाडे मॅडम,संजय खिलारे सर ,कार्यालय प्रमुख महामुनी,दिपक भुसे हे सारे अय्यर सरांविषयी भरभरून बोलत होते. आपल्याकडे माणूस जिथे राहतो नोकरी करतो तिथे त्याच्याविषयी चांगले बोलण्याची प्रथा नाही पण अय्यर सरांनी सर्वांचे टोकाचे प्रेम आणि आदर मिळवला होता. माझ्यासोबत तिथे आलेल्या मार्तंड जोरी या अभ्यासू शिक्षक मित्राने नंतर मग सरांची माहिती जमवायला मला खूप परिश्रमपूर्वक मदत केली.

आज प्राध्यापकांचे वाढते पगार त्यातून येत चाललेली सुखासीनता,त्यातून कमी होत जाणारी ज्ञानलालसा,मिळणार्‍या पैशातून बदलत जाणारी जीवनशैली आणि कमी होणारे सामाजिक भान यामुळे अपवाद वगळता प्राध्यापक वर्गाविषयी नाराजी व्यक्त होत असते.अशा काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादाने अविवाहित राहतो.केरळ मधून महाराष्ट्रात येतो. आपल्या इंग्रजी अध्यापनाने विद्यार्थ्यांना वेड लावतो आणि माणूस किती कमी गरजांत राहू शकतो याचा वस्तूपाठ जगून दाखवतो हे अविश्वसनीय वाटावे असेच आहे.इतके मोठे वेतन असूनही लॉजच्या ८ बाय १० च्या खोलीत एक कॉट.मोजकेच कपडे,एक कपाट आणि त्यात पुस्तके पुस्तके आणि पुस्तके एवढाच या माणसाचा संसार होता. आयुष्यभर सायकल वापरली.गरजा खूपच कमी.मार्तंड जोरी त्या लॉज च्या वेटर ल भेटले तेव्हा सर केवळ एकवेळ जेवत व एक ते दीड पोळी खात असे सांगितले.त्या वेटरला सुद्धा ते अहो जाहो म्हणून आदराने वागवत. इतक्या फकीरीत राहताना मग वेतन आयोग लागू झाल्यावर या माणसाने पगारवाढ देवू नका मला गरज नाही असे म्हणायचे.मग सहकारी चिडायचे.संघर्षाचा स्वभाव नाही.सर शांतपणे सर्वांचा आग्रह म्हणून पगार नाइलाजाने स्वीकारत.पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी ते नाइलाजाने स्वीकारताना सरांनी फरकाच्या ५०००० रुपये रकमेतून पुस्तके स्वीकारण्याची महाविद्यालयाला उलटी अट घातली. ही निस्पृहता होती.

सरांचा जन्म १९३३ साली केरळात झाला.वडील सैन्यात होते.शिक्षण राजस्थान बंगालमध्ये झाले.सुरवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली. कुटुंबातील सर्वजण सुखवस्तू आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून १९६८ साली शिक्षक झाले. कराडला नोकरी केली.नंतर बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अखेरपर्यंत राहिले.

त्यांच्यात हा साधेपणा व ध्येयवाद कशातून आला याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की हा गांधींचा प्रभाव आहे.महात्मा गांधींना लहानपणी ते भेटले होते.त्यातून गांधींचा खूप अभ्यास केला. गांधीवादी मूल्य नकळत जगण्यात उतरली. सर आंबेडकरांना आणि गाडगेबाबाबांना भेटले होते.आंबेडकरांची अनेक भाषणे त्यांनी ऐकली होती. त्यातून अभ्यासाची प्रेरणा जागली असावी. स्वातंत्रपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचे हे सारे साधेपण ध्येयवाद आला होता

केवळ साधेपणासाठी कौतुक करावे असेही नव्हते तर सरांचे इंग्रजी विषयाचे अध्यापन हे अत्यंत प्रभावी होते. सर समजा अगदी गाडी वापरुन बंगल्यात राहिले असते तरी केवळ इंग्रजी शिक्षणासाठी त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना लक्षात ठेवले असते. त्यांच्या विद्यार्थांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली तेव्हा सरांची काही शिक्षक म्हणून वैशिष्ट्ये लक्षात आली.सर इंग्रजी साहित्यातील नाटक,कविता,समीक्षा सारख्याच सामर्थ्याने शिकवू शकत.विशेषत: समीक्षेवर खूपच प्रभुत्व होते.सलग घडयाळी 3 तास ते शिकवत. घडयाळी ८ तास शिकवण्याचेही रेकॉर्ड केले. इतकी नोकरी होऊनही प्रत्येकवेळी वाचन करून नोट्स काढूनच वर्गात जात. त्या नोट्स च्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना फुकट वाटत. सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून शिकवत नसत. १९९५ नंतर निवृत्तींनंतर त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले पुण्यात ३ दिवस ते अध्यापन करीत व ३ दिवस बारामतीत अध्यापन.मृत्यू झाला त्या महिन्यात ही ८३ व्या वर्षीही ते तास घेत होते.याची तुलना रविंद्रनाथांशीच फक्त होऊ शकते.असा आजन्म शिक्षक म्हणून राहिलेला आणि कधीह निवृत्त न झालेला हा शिक्षक होता. शेकडो PhD चे प्रबंध त्यांनी तपासून दिले.नेट सेट सुरू झाल्यावर मोफत मार्गदर्शन सुरू केले.इंग्रजीसोबत त्यांना अर्थशास्त्र,राज्यशास्त्र खेळ याविषयात विलक्षण गती होती.क्रिकेट चे तर १० वर्षापूर्वीचे तपशील ते अगदी सहज सांगत. सर रिकाम्या वेळेत सतत वाचन करीत.अगदी बँकेत,दवाखान्यात प्रतिक्षा करावी लागे तेव्हा तिथेही ते पुस्तक वाचत बसत.त्यांच्या लहानशा खोली फक्त पुस्तकांनीच भरली होती.त्यांनी मृत्यूनंतर ही पुस्तके विविध महाविद्यालयांना द्यायला सांगितली होती.सरांनी इंग्रजीत दोन पुस्तके व अनेक संशोधकीय पेपर्स लिहिले.

विद्यार्थ्यांवरचे प्रेम पुत्रवत होते.एम.ए.च्या प्रत्येक बॅच नंतर ते हॉटेलात निरोप समारंभ आयोजित करीत. मुलांना जेवण देत. नंतर ग्रुप फोटो काढून तो फ्रेम करून स्वत:च्या खर्चाने प्रत्येक मुलाला देत. महाविद्यालयात असताना त्यांना निरोपसमारंभात भाग घेता आला नव्हता हे त्यांना शल्य होते.त्यातून हे आले. या माणसाचे विद्यार्थी हाच त्यांचा संसार.पगारातील उरलेली सर्व रक्क्म पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या फीसाठी ते खर्च करीत.सरांच्या मदतीमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले असे सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत. त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय स्वरूपाची मदत केली हे त्यांच्या निस्पृह स्वभावामुळे कुणालाच कळले नाही.पण ती संख्या प्रचंड होती.

 

मला अय्यर सरांचे मोठेपण भारतीय गुरुपरंपरेशी जोडावेसे वाटते. या देशातील ऋषींच्या आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला असायचे पण ऋषीच्या जगण्यात फकीरी होती.ज्ञान हीच त्यांची ओळख असायची. कुठेतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्याने दीपवणारी ही भारतीय गुरूपरंपरा होती.अय्यर सर हे या परंपरेचे पाईक होते. भारतीय मनाला ही फकीरी भावते.महात्मा गांधी पासून राम मनोहर लोहिया,मेधा पाटकर अण्णा हजारेंपर्यंत भारतीय मन या फकीरीतल्या श्रीमंतीपुढे झुकते. अय्यर सरांनी पुन्हा ही परंपरा जिवंत केली,जगून दाखवली.

या माणसाने आपल्या या फकिरीच्या बीजावर प्रसिद्धीच पीक काढलं नाही. निष्कांचन, अनामिक राहून देवघरातील नंदादीपासारखा हा माणूस तेवत राहिला आणि एक दिवस विझून गेला. आपल्या आयुष्याच्या सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची कोणतीच अपेक्षा नव्हती. या त्यागातून मिळालेल्या नैतिक अधिकारातून आजच्या चंगळवादी समाजाला किंवा बांधिलकी विसरत चाललेल्या शिक्षणक्षेत्रावर कोरडे ओढण्याचा अधिकार मिळूनही त्यांनी तो वापरला नाही.स्वत:च्या जीवन तत्वज्ञानावर लेख लिहिले नाहीत की भाषणे केली नाहीत.ते फक्त जगत राहिले.त्यांच्या आदर्श बापुजींच्या भाषेत ‘मेरा जीवन मेरा संदेश ‘ पण समाज,शासन,विद्यापीठ म्हणून आपण या माणसाची नोंद घेतली नाही.

अय्यर सर गेले.ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या ८३ व्या वर्षीपर्यन्त त्यांनी शिकविले.त्या विद्यापीठाने किमान या अनामिक जगलेल्या आणि तन मन आणि धनसुद्धा विद्यार्थ्यांना अर्पण केलेल्या या दधीचि ऋषीचे चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक प्राध्यापक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे आणि ही प्रेरणा संक्रमित करावी.अन्यथा आइनस्टाईन म्हणाला होता तसे ‘ असा हाडामांसाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही ‘

   (-लेखक सामाजिक , शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

8208589195 

Previous articleफेल्युअर कोणाचं?
Next articleमुसळ आणि उखळ…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here