फेल्युअर कोणाचं?

-उत्पल व्ही .बी.

मी : काहीही, म्हणजे काहीही…काहीही चाललंय.
गांधीजी : काय झालं आता?
मी : अहो, हा माझा शाळेपासूनचा मित्र आहे.
गांधीजी : बरं मग?
मी : आणि आता हा शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करतो की अर्णब गोस्वामी कसा भारी पत्रकार आहे वगैरे…
गांधीजी : बरं मग?
मी : अहो बरं मग काय? अर्णब गोस्वामी पत्रकारितेला लाज आणणारा मनुष्य आहे…
गांधीजी : बरं मग…
मी : पुन्हा बरं मग??
गांधीजी : अरे ऐकून तर घे… मी असं म्हणत होतो की बरं मग तू त्याच्याशी बोललास का तुला काय वाटतंय त्याबद्दल?
मी : नाही…बोलून काय होणार? परिस्थिती अशी आहे की कुणाला काही ऐकायचंच नाहीये… आणि भलतेच विनोदी तर्क देत बसतात हो.
गांधीजी : म्हणजे मग तू गप्प बसलास तर…
मी : हो… सध्या तोच मार्ग बरा वाटतो.
गांधीजी : शब्दांविषयी तुझं काय मत आहे?
मी : हा काय प्रश्न आहे?
गांधीजी : सांग तर.
मी : शब्द म्हणजे…शब्द आपण वापरतो बोलण्यासाठी. मनातलं सांगण्यासाठी.
गांधीजी : पण ते सगळं काही व्यवस्थित पोचवतात का?
मी : वा! ‘जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे’ आठवलं. इर्शाद कामिल. वा! वा!
गांधीजी : जागे व्हा…जागे व्हा.
मी : हो, झालो.
गांधीजी : बरबादीचं कारण काय असावं?
मी : काय?
गांधीजी : विस्तृतता नाही हे असू शकेल?
मी : अर्णब गोस्वामी पत्रकारितेला काळिमा आहे हे सांगायला विस्तृतता कशाला हवीय?
गांधीजी : मित्रा, तुला बदल हवाय की नको?
मी : हवाय..
गांधीजी : मग तो एका वाक्याच्या प्रतिक्रियेतून होईल असं तुला खरंच वाटतं? झालेला गुंता मला मान्यच आहे. व्हॅल्यू सिस्टीम तुझ्या भाषेत ‘गंडलीय’, आजचे सत्ताधारी, त्यांचे भान हरवलेले समर्थक आणि पत्रकार यांच्याशी व्हॅल्यूजच्या बेसिसवर मतभेद व्हावेत असं पुष्कळ आहे. पण प्रश्न असा की करायचं काय?
मी : धिस इज अ मिलियन डॉलर क्वेश्चन….
गांधीजी : अरे, तुझा शाळेतला मित्र आहे ना? मग त्याच्याशी बोल ना सविस्तर आजच्या पत्रकारितेविषयी. तुला काय खटकतंय त्याच्याविषयी.
मी : त्याने काही फरक पडणार नाही. सगळं ऐकूनही तो पुन्हा अर्णब गोस्वामीकडेच जाणार आहे.
गांधीजी : मग हे कुणाचं फेल्युअर असेल?
मी : कुणाचं म्हणजे? त्याचं…
गांधीजी : कसं काय? फेल व्हायला मुळात तो काही करतच नाहीये. त्याचं ठीकच चाललंय.
मी : म्हणजे फेल्युअर माझं आहे?
गांधीजी : अर्थात! कारण बदल तुला हवाय. तुला जाणवतंय की काहीतरी बेसिक चुकतंय पण तू त्याला ते पटवून देऊ शकत नाहीयेस.
मी : हं…पण काही बेसिक्स कळू नयेत एखाद्याला?
गांधीजी : खरंय. माझा तुलाही हाच प्रश्न आहे.

-9850677875

Previous articleइज इट अबाउट जेंडर ऑर इज इट अबाउट पॉवर?
Next articleअय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.