मेंदूचे गूढ

 – डॉ यश वेलणकर

एखाद्या देवाच्या रूपाचे  कल्पना दर्शन वारंवार केले, तर त्या व्यक्तीच्या मेंदूतील रसायने बदलतात आणि तिला देव आपल्या समोर आहे असे वाटू शकते, ज्याला ती व्यक्ती देवाचे दर्शन झाले असे म्हणते. मात्र, असे दर्शन झाले तरीही त्या व्यक्तीच्या भावनिक मेंदूत रचनात्मक बदल होत नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीचा राग,चिंता कमी होत नाही. भीती आणि भक्ती या दोन्ही भावना मेंदूतील रसायने काही काळासाठी बदलवतात आणि त्यामुळे या दोन्ही भावना तीव्र असतील, तर त्यावेळी आभास होऊ शकतात, असे आजचे मेंदू विज्ञान सांगते. 

…………………………………………..

आपल्या मेंदूचे कार्य गूढ आहे, त्यातील काही गोष्टी विज्ञानाला समजू लागल्या आहेत. मेंदूतील कोणत्याही दोन पेशी परस्परांना जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीत पोचण्यासाठी दोन पेशींमध्ये रसायने पाझरतात, त्यांनाच न्युरोट्रान्समीटर्स म्हणतात. मराठीत त्यांना संदेशवाहक म्हणता येईल. अशी जवळपास शंभर रसायने शास्त्रज्ञांनी शोधली आहेत. यातील काही रसायने वेगवेगळ्या भावनांशी संबंधित आहेत. आनंद या भावनेशी निगडित मुख्यतः चार रसायने आहेत. डोपामीन, सेरेटोनीन, एनडोर्फीन आणि ऑक्झिटोसीन ही त्या रसायनांची नावे आहेत.

यातील डोपामीन हे उत्सुकतेशी, प्रेरणेशी निगडित आहे. ते कमी होते त्यावेळी कंटाळा येतो, उत्साह वाटत नाही. सेरेटोनीन आणि एनडोर्फीन ही रसायने कृती करताना मिळणाऱ्या आनंदाला कारणीभूत आहेत. ऑक्झिटोसीन हे रसायन सहवासाच्या प्रसंगात पाझरते. सहवासाचा आनंद या रसायनामुळे मिळतो.

वेदना जाणवू न देणारे एनडोर्फीन हे रसायन अफूतील मॉर्फीनसारखे वेदनाशामक असते. ते आपल्या उत्क्रांतीमध्ये खूप महत्त्वाचे होते. आपले पूर्वज जंगलात राहत असताना या रसायनामुळेच वाचू शकले. हिंस्र श्वापदे पाठीमागे लागली असताना काट्याकुट्यातून अनवाणी धावताना त्यांना झालेल्या जखमा दुखू लागल्या असत्या, तर ते पळू शकले नसते. त्याकाळात आपल्या पूर्वजांचा जीव वाचवायला उपयुक्त ठरलेले हे रसायन आजदेखील आपला जीव वाचवायला मदत करीत आहे. शारीरीक व्यायाम करताना हे रसायन पाझरते, त्यामुळे योग्य प्रमाणात व्यायाम केल्यानंतर बरे वाटते, आनंद होतो आणि पुन्हा व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. धावताना मिळणारा आनंद या रसायनामुळेच असतो. आपले शरीर हलत राहिले, तर निरोगी राहते. ते हालते ठेवायला हे रसायन प्रेरणा देते.

मेंदूतील डोपामाईन हे रसायन कंटाळा दूर करते. हे रसायन मेंदूत कमी होते, त्यावेळी माणसाला कंटाळा येतो. निसर्गतः हे रसायन दिवसभरात अधिक पाझरते आणि रात्री ते कमी होते. रात्री ते अधिक असेल, तर झोप लागत नाही. दिवसा देखील डोपामाईन काहीवेळा कमी होते. एखादा सुखद अनुभव बराच काळ टिकून राहिला की, त्यातील सुख कमी होऊ लागते, तो हळूहळू कंटाळवाणा होऊ लागतो. शास्त्रज्ञांनी असे प्रयोग केले आहेत. चुंबन घेणे हा अनुभव बऱ्याच जणांना उत्तेजित करणारा असतो. चुंबन घेण्याच्या कल्पनेनेच मेंदूत डोपामाईन पाझरते, मन उत्तेजित होते; पण त्याच चुंबनाच्या स्थितीत बराच वेळ राहिले, तर तो अनुभव देखील कंटाळवाणा होतो. त्यावेळी मेंदूतील डोपामाईन कमी झालेले असते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. कोणतीही कृती किंवा स्थिती नावीन्याची राहिली नाही की, डोपामाईन पाझरणे थांबते, माणसाला कंटाळा येऊ लागतो. मात्र, हेच रसायन अधिक वाढले, तर माणसाला आभास होऊ लागतात. वेड लागले असे म्हटले जाते. त्या मानसिक आजारात असे होणारे आभास, या रसायनाला ब्लॉक करणारी औषधे दिली की कमी होतात.

डिप्रेशनमध्ये सेरेटोनीन आणि डोपामाईन ही दोन्ही रसायने कमी होतात, त्यामुळेच या आजारात काही करावे असे वाटत नाही आणि काही केले तरी आनंद होत नाही. क्लिनिकल डिप्रेशन या मनोविकारामध्ये औषधे देऊन ही रसायने वाढवली जातात. ही रसायने वाढली की, उत्सुकता वाटू लागते, उदासी कमी होते. असा आजार असेल, तर औषधे घेणे आवश्यक असते.

मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन वाढवणारी औषधे डिप्रेशनमध्ये वापरली जातात. सेरेटोनीन आतड्यातील न्युरोन्समध्ये देखील तयार होते. त्यामुळे पचनसंस्था आणि उदासी याचा निकटचा संबंध आहे. त्याचप्रमाणे प्रकाशाशी देखील त्याचे नाते आहे. अंधुक प्रकाशात ते तयार होत नाही. त्यामुळे ढगाळ हवामान असेल, तर आपल्याला उदास वाटते. युरोप आणि अमेरिकेत हिवाळ्यात सूर्यदर्शन होत नाही, त्यावेळी औदासिन्य वाढते, त्याला विंटर ब्ल्यू म्हणतात. ही रसायने कमी जास्त होतात, त्यानुसार मनातील भावना बदलतात. सेरेटोनीन नावाचे रसायन कमी झाले की नैराश्य येते. हे नैराश्य अधिक काळ टिकले, त्यामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला की, त्याला क्लिनिकल डिप्रेशन, औदासिन्य हा आजार आहे असे म्हटले जाते. यावर दिली जाणारी औषधे मेंदूतील सेरेटोनीन रसायन कमी होऊ देत नाही. माणसाच्या मनावर काम करणारी अनेक औषधे सध्या वापरली जातात.

ही औषधे म्हणजे कृत्रिम रसायने असतात. त्यातील काही रसायने नशा येण्यासाठीही वापरली जातात. माणसाच्या मेंदूवर आणि त्याच्या विचार प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या रसायनांचे चार प्रकार आहेत.

1.उत्तेजित करणारी रसायने- एल.एस.डी., गांजा, भांग यामुळे आभास होतात, नवीन कल्पना सुचतात. वास्तवाचे भान राहत नाही.
2. झोप आणणारी द्रव्ये- बेंझोडायझेपाईन गटातील रसायने उत्तेजना कमी करतात, झोप आणतात, निद्रानाश असेल तर ही औषधे वापरली जातात.
3. आनंदाचा अनुभव देणारी रसायने- कोकेनसारखी रसायने मेंदूतील आनंद निर्माण करणाऱ्या रसायनांचे प्रमाण वाढवतात, त्यामुळे खूप छान वाटते, एकाग्रता वाढते. मात्र, त्याचमुळे याचे व्यसन सुटणे खूप कठीण असते.
4. वेदनाशामक रसायने- अफू आणि त्यासारखे काम करणारी रसायने. यामुळे शरीरातील वेदना समजत नाहीत. तीव्र वेदनांचा त्रास कमी करण्यासाठी ही वापरतात, पण त्यामुळे विचार करण्याची क्षमता मंद होते.

ही रसायने भ्रम निर्माण करतात आणि त्यांचे व्यसन लागते. कारण ती शरीरात गेली की, मनातील विचारांचा कल्लोळ शांत होतो. माणसाला नशा चढते. त्यामुळे शत्रू राष्ट्राला हानी पोचवण्यासाठी अशी रसायने वापरली जातात.

इतिहासात ब्रिटन आणि चीन यांच्यामध्ये १८३९ ते ४२  आणि १८५६  ते ६० अशी दोन युद्धे अफूयुद्ध म्हणून ओळखली जातात. त्यावेळी ब्रिटिश भारतात अफूची शेती करून ती मोठ्या प्रमाणात चीनमध्ये पाठवीत असत. त्यामुळे चीनमधील तरुण पिढी निष्क्रिय झाली आणि तेथील राजसत्तेने ब्रिटिशांनी असे करू नये, म्हणून त्यांच्या विरोधात दोन युद्ध केली.

मात्र, आपल्याच देशातील जनतेचे मतपरिवर्तन करण्यासाठी अशा रसायनांचा उपयोग केला जातो का, या विषयी कोणतेही पुरावे नाहीत. कारण, अशा रसायनांचे व्यसन लागते, त्यामुळे विचारशक्ती भ्रमित होते, पण अशा रसायनांनी कोणतेही विशिष्ट विचार निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे मतपरिवर्तन, ब्रेन वॉशिंगसाठी अशा रसायनांचा उपयोग शक्य नाही. याचमुळे डिप्रेशनमध्ये औषधे वापरून औदासिन्य कमी करता येते. मात्र, विचार कसा करावा, समस्येला सामोरे कसे जावे, हे कौशल्य केवळ औषधानी विकसित करता येत नाही. त्यासाठी मानसोपचार आणि समुपदेशन आवश्यक असते.

मेंदूतील रसायने आणि भावना एकमेकांवर परिणाम करतात. मात्र, अशी रसायने वापरून मुद्दाम राग, द्वेष किंवा ठरावीक व्यक्तीवर, देशावर, धर्मावर प्रेम निर्माण करता येणे अजून शक्य झालेले नाही. म्हणजे, ऑक्झीटोसीन हे रसायन सहवासाच्या प्रसंगात पाझरते, एखादी व्यक्ती प्रेमाने मिठी मारते त्यावेळी मेंदूत हे रसायन असते. मात्र, हे रसायन इंजेक्शन किंवा नाकातील फवारा वापरून वाढवले, तर त्यामुळे व्यक्तीच्या मनात समोरील व्यक्तीविषयी प्रेम निर्माण होत नाही. अनोळखी व्यक्तींना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची भीती असेल, तर नाकात या रसायनाचा स्प्रे मारल्यास ती काही काळ कमी होते, असे संशोधनात दिसून आले आहे. म्हणजे, अशी रसायने चिंता, भीती, उदासी, राग अशा भावना काही वेळ कमी करू शकतात; पण या किंवा प्रेम, करुणा, कृतज्ञता अशा भावना बाहेरून दिली गेलेली रसायने निर्माण करू शकत नाहीत.

येथेच लक्ष देण्याचे कौशल्य, विचार करण्याचे कौशल्य, मुद्दाम काही भावना निर्माण करून त्या मनात धरून ठेवण्याचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. त्यासाठी प्रत्येक माणसाने लक्ष देण्याचा सराव, म्हणजेच ध्यान करायला हवे. त्यासाठी कोणतीही श्रद्धा किंवा देवावर विश्वास आवश्यक नाही. ध्यान हा आपल्या मेंदूला दिलेला व्यायाम आहे. ध्यान ही केवळ आस्तिक माणसांची मक्तेदारी नाही. शारीरिक व्यायाम जसा धर्मातीत आहे, तसेच ध्यान देखील धर्मातीत आहे. नास्तिक माणसाने देखील ध्यान साधना करायला हवी.

नास्तिक म्हणजे अशी व्यक्ती की, जी ईश्वर कल्पना नाकारते. हे विश्व भौतिक आहे, त्याचा कुणीही कर्ता नाही असा विश्वास ज्यांच्या मनात असतो. त्यामुळे परब्रह्म, अल्ला, गॉड यांची प्रार्थना तो करत नाही. त्याचबरोबर तो पुनर्जन्म मानत नाही. मृत्यूनंतर जीवन नसते, भौतिक शरीरातच चैतन्य निर्माण होते, यावर ज्याचा पूर्ण विश्वास असतो; त्यामुळे मोक्ष, निर्वाण, कयामत या कल्पना ज्याला मान्य नसतात, अशा माणसाला नास्तिक म्हणतात. अशी व्यक्ती देखील ध्यानाचा सराव करू शकते.

ध्यान म्हणजे इंग्लिशमध्ये अटेन्शन. मेंदूकडे एकाच वेळी अनेक मार्गांनी माहिती जात असते, पण मेंदू ती सर्व माहिती हाताळू शकत नाही. एकावेळी ठरावीक माहिती तो घेतो, ती कोणती माहिती घ्यायची हे ठरवले जाते; आणि तेथे लक्ष, ध्यान, अटेन्शन जाते. जेथे ध्यान असते तेथील ज्ञान होते. हा लेख वाचत असताना तुमचे ध्यान वाचनावर असते, तेव्हाच यातील अर्थाचे तुम्हाला आकलन होते. मध्येच दुसरा आवाज आला किंवा भजी तळल्याचा वास आला आणि त्याचे विचार मनात येत राहिले, तर तेवढ्या काळात तुमची नजर येथे असली, तरी येथील ज्ञान तुम्हाला होणार नाही. आपले लक्ष दुसरीकडे गेले आहे, याचे भान तुम्हाला आले की; तुम्ही पुनः वाचनाकडे ध्यान देऊ लागलात की, येथील शब्दांचे आकलन तुम्हाला होऊ लागते.

म्हणजेच लक्ष जाणे आणि लक्ष देणे, या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. कुठे आणि कसे लक्ष द्यायचे, हे ठरवून एखादा माणूस पुनःपुन्हा लक्ष देण्याचा सराव करतो, त्याला आपण ध्यानसाधना म्हणू शकतो. नास्तिक माणूस देखील अशी साधना करू शकतो. कारण, ध्यान म्हणजे माणसाच्या मेंदूतील चार क्षमता वापरणे आणि विकसित करणे आहे. माणूस कुठे लक्ष द्यायचे हे निवडू शकतो, कोणता विचार करायचा नाही हे तो ठरवू शकतो, कल्पनेने एखादे दृश्य पाहून तो मनातील भावना बदलवू शकतो आणि एखादी भावना पुनःपुनः तोच विचार करून तो मनात काहीवेळ धरून ठेवू शकतो. यातील कोणते कौशल्य वापरले जाते, त्यानुसार ध्यानाचे एकाग्रता ध्यान, साक्षीध्यान, कल्पनादर्शन आणि करुणाध्यान असे चार प्रकार होतात.

आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर एखादा माणूस कोणतीही कृती करत असताना, त्याच्या मेंदूतील कोणता भाग अधिक सक्रिय असतो, हे समजू लागले आहे. माणसाचे लक्ष जाते आणि तो लक्ष देतो, त्यावेळी मेंदूत वेगवेगळ्या प्रक्रिया होतात. या प्रक्रिया समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी माणसांच्या डोक्याला स्कॅनर लावून, त्यांना संगणकाच्या स्क्रीनसमोर बसवले आणि त्यांना स्क्रीनवरील ठरावीक अक्षरे शोधायला सांगितले. अशी अक्षरे शोधत असताना ते लक्ष देत होते. त्याचवेळी स्क्रीनवर एका बाजूला एक आकृती अधिक तीव्र प्रकाश देत ब्लिंक होऊ लागली आणि तेथे माणसांचे लक्ष गेले. माणूस लक्ष देतो आणि त्याचे लक्ष जाते, त्यावेळी मेंदूत होणारे बदल शास्त्रज्ञांना पाहता आले. तो ठरवून लक्ष देतो त्यावेळी मेंदूत टॉपडाऊन प्रोसेस होत असते. मेंदूत प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स या पुढील, वरील भागातून मेंदूच्या खालील भागात अधिक लहरी जात असतात. या उलट त्याचे लक्ष जाते त्यावेळी मेंदूच्या खालील भागाकडून प्रीफ्रण्टल कॉर्टेक्सकडे अधिक लहरी जातात, त्यामुळे याला बॉटमअप प्रोसेस म्हणतात. मोठ्ठा आवाज, चमकणारी किंवा हलणारी वस्तू याकडे आपोआप लक्ष जाते, तसेच शरीरात कुठे चमक आली तरी तिकडे लक्ष जाते आणि त्यावेळी मेंदूत तळाकडून वर लहरी अधिक जात राहतात. या उलट माणूस ठरवून लक्ष देतो, त्यावेळी वैचारिक मेंदू निर्णय घेतो आणि त्यानुसार ठरावीक दृश्य, आवाज किंवा शरीर याकडे लक्ष दिले जाते. त्या वेळी वरून तळाकडे लहरी अधिक प्रमाणात जातात. वयाच्या सहा-सात वर्षापर्यंत प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स सक्रिय नसल्याने लक्ष देण्याची प्रक्रिया कमी असते. या मुलांचे लक्ष वेधून घ्यावे लागते. त्यानंतर मात्र कुठे लक्ष द्यायचे, याचा निर्णय माणूस घेऊ शकतो.

मनात आपोआप येणारे सारे विचार हा खालून वर जाणाऱ्या लहरींचा परिणाम असतो. मात्र, माणूस वर्तमान क्षणात लक्ष आणतो त्यावेळी किंवा एखाद्या विचारावर, शब्दावर लक्ष देतो त्यावेळी मेंदूत वरून खाली लहरी वाहू लागतात. ही क्षमता म्हणजेच, लक्ष देण्याचे कौशल्य प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते. कोणतेही आलंबन निवडून त्यावर पुनःपुन्हा लक्ष देत राहणे, लक्ष विचलित झाले आहे, हे लक्षात येणे, एकाग्रता विकसित करण्यासाठी मेंदूचा व्यायाम आहे, असे संशोधनात दिसत आहे.

मेंदूच्या संशोधनात पूर्वीची अनेक गृहीतके चुकीची होती, असे लक्षात येत आहे. पूर्वी असा समज होता की, मेंदूची सर्व जडणघडण बालवयातच होते. ठरावीक वयानंतर मेंदूमध्ये काहीही बदल होत नाहीत. पण, हा समज चुकीचा आहे. आपला मेंदू त्याला मिळणाऱ्या अनुभवानुसार सतत बदलत असतो, असे अनेक प्रयोगातून सिद्ध होत आहे. लंडनमधील टॅक्सी ड्रायव्हरना गाडी चालवताना अनेक रस्ते लक्षात ठेवावे लागतात. आपल्या मेंदूतील दिशाविषयक स्मरणशक्तीशी निगडित भाग आता मोजता येतो. मेंदू संशोधकांनी या ड्रायव्हरांच्या मेंदूतील असा भाग मोजून ठेवला. त्याच वेळी त्याच वयाच्या, पण नियमित ड्रायव्हिंग न करणाऱ्या माणसांच्या मेंदूतील हा भाग मोजून ठेवला. चार वर्षांनी पुन्हा दोन्ही गटातील माणसांच्या मेंदूचे परीक्षण केले असता, टॅक्सी ड्रायव्हरच्या गटातील दिशाविषयक स्मृतीचा मेंदूतील भाग रोज ड्रायव्हिंग न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक विकसित झालेला आढळला. म्हणजेच, मेंदूच्या ज्या भागाला अधिक काम करावे लागते, तो अधिक विकसित होतो. दुसऱ्या एका प्रयोगात, काही व्यक्तींचे डोळे बांधून त्यांना एका घरात ठेवले. काही दिवसातच ती माणसे अंध माणसांप्रमाणे हाताच्या स्पर्शाने आजूबाजूच्या गोष्टी समजून घेत त्या घरात वावरू लागली. सर्व हालचाली, बाथरूमला जाणे, जेवणे अशा कृती करू लागली. पंधरा दिवसांनी त्यांच्या मेंदूचे परीक्षण केले असता, दृष्टीविषयक काम करणारा त्यांच्या मेंदूचा भाग आता स्पर्शविषयक काम करू लागला आहे, असे जाणवले. जे काम करावे लागत नाही, तो मेंदूतील भाग बदलतो. तो अन्य काम करू लागतो किंवा संकुचित होतो. ज्या भागाला अधिक काम करावे लागते, त्याची वाढ होते. या गुणधर्माला न्युरोप्लास्टिसिटी असे म्हणतात. माणूस जो अनुभव घेतो, जे काही काम करतो, त्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर होतो आणि त्यामुळे मेंदूत रचनात्मक बदल होतात.

ध्यान साधनेने देखील मेंदूत रचनात्मक बदल होतात. कोणतेही एक आलंबन, एक आवाज, समोरील बिंदू, शरीरातील श्वासाची हालचाल किंवा वाचनाची कृती यावर लक्ष द्यायचे असे ठरवायचे. असे लक्ष देत असताना मनात अन्य विचार येतात. आपले लक्ष विचलित झाले आहे, याचे भान माणसाला येते, त्यावेळी त्याच्या मेंदूतील डोर्सोलॅटरल प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स हा भाग सक्रिय झालेला दिसून येतो. म्हणून या भागाला अटेन्शन सेंटर म्हणतात. लक्ष विचलित झाले आणि पुन्हा ठरवलेल्या ठिकाणी आणले, असे पुनःपुन्हा केल्याने या भागाचा विकास होतो. तेथील न्यूरॉन्समधील कनेक्शन वाढतात. त्यामुळेच एकाग्रता वाढते. लक्ष विचलित होत आहे, हे लवकर लक्षात येते. असे पुनःपुन्हा लक्ष देण्याचा सराव हे एकाग्रता ध्यान आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे आकलन सुधारण्यासाठी असा सराव करणे आवश्यक आहे.

एकाग्रता हे सिलेक्टिव्ह अटेन्शन असते. बुद्धिबळ खेळताना कुणी हाक मारली, तर ती ऐकू येत नाही. अभ्यास करताना, खेळताना एकाग्रता आवश्यक असते, पण प्रत्येक प्रसंगात एकाग्रता आवश्यक नसते. काही वेळा पूर्ण भान आवश्यक असते. आजूबाजूला काय घडते आहे, शरीरात काय होते आहे, मनात कोणते विचार, भावना आहेत, याचे भान विकसित करण्यासाठी त्याकडे लक्ष द्यावे लागते. असे काहीवेळ वर्तमान क्षणात लक्ष देणे, ही दुसऱ्या प्रकारची ध्यान साधना आहे. त्याला साक्षीध्यान किंवा माइंडफुलनेस म्हणतात. असा सराव करताना शरीरात आणि मनात जे जाणवते, त्यावर हे नको असा विचार करायचा नसतो. असा सराव केला की, मेंदूत काय होते हे समजू लागल्यानंतर साक्षीध्यान मानसोपचार म्हणून वापरले जाऊ लागले. चिंता, औदासिन्य, मानसिक तणाव आणि त्यामुळे होणारे शारीरिक आजार टाळायचे असतील, तर शारीरिक व्यायाम आणि सजगतेचा सराव सर्वच माणसांनी रोज थोडा वेळ तरी करायला हवा, असे जगातील संशोधक आता सांगत आहेत.

माइंडफुलनेसची पहिली पायरी सजगता असते. इंग्रजीत टू माइंड हे क्रियापद आहे. त्याचा अर्थ लक्ष देणे, असा आहे. मुंबईत लोकलमधून प्रवास करणारे सारेजण प्रत्येक स्टेशनवर माइंड दि गॅप ही उद्‌घोषणा ऐकतात, त्यामध्ये हे क्रियापद वापरलेले आहे. त्याचा उद्देश गाडीत चढताना आणि उतरताना माणसांना सजग करण्याचाच आहे. माणूस सजग असतो त्यावेळी त्याला परिसराचे भान असते. संमोहित अवस्थेत असे भान कमी झालेले असते. त्या दृष्टीने संमोहन आणि सजगता या जागृतीच्या स्पेक्ट्रमच्या दोन टोकांच्या अवस्था आहेत, असे म्हणता येईल. मात्र, या दोन्ही अवस्था येण्यासाठी मेंदूला सराव द्यावा लागतो.

माणूस वेगवेगळ्या कृती करीत असताना मेंदूतील कोणते भाग सक्रिय होतात, याचे सध्या संशोधन केले जात आहे. त्यावेळी कोणतीही कृती न करता शांत बसलेली माणसे कंट्रोल ग्रुप म्हणून सहभागी करावी लागतात. त्यांची तपासणी केली असता, मेंदूतील ठरावीक भाग या शांत बसलेल्या माणसांमध्ये सक्रिय असतो, असे दिसू लागले. त्यालाच डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द 2001 साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ मार्कस राय्चल (ऊी चरीज्ञरी ठरळलर्हीश्रश) यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो, पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, ह्या भागातील सक्रियता कमी होते, असे त्यांनीच दाखवून दिले.

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो, त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते. शरीर स्थिर असले, तरी मन इतस्ततः भटकत असते. आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे, हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे. पण, ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा, तणावाचा शिकार होतो. ते टाळण्यासाठी या भागाला अधूनमधून विश्रांती द्यायला हवी. ज्यावेळी आपण एखादी शारीरिक हालचाल सजगतेने करू लागतो किंवा नैसर्गिक श्वासामुळे होणारी छाती पोटाची हालचाल जाणू लागतो, त्यावेळी मेंदूच्या या भागाला विश्रांती मिळते. त्यासाठी एक तासात अठ्ठावन्न मिनिटे मेंदूचे काम केले, विचार केला, नियोजन केले की, दोन मिनिटे विश्रांती घ्यायला हवी, त्यावेळी सजगतेने शारीरिक हालचाली करायला हव्यात किंवा स्वतःच्या शरीराकडे, श्वासामुळे होणाऱ्या छातीपोटाच्या हालचालीकडे लक्ष द्यायला हवे.

माणसाने भविष्याचा विचार करायलाच हवा, पण सतत विचारात राहणे टाळायला हवे. सतत विचारात राहणे, ओव्हर थिंकिंग मानसिक तणाव वाढवते. असा तणाव आस्तिक नास्तिक अशा सर्वच माणसांना येत असतो. अंधश्रद्धांच्या आहारी न जाता तणाव योग्य प्रमाणात ठेवायचा असेल, तर काही वेळ वर्तमान क्षणात लक्ष देण्याची साधना करायला हवी.

मनात आपोआप विचार येणे आणि ठरवून एखाद्या गोष्टीचा विचार करणे, या देखील दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. माणूस वर्तमान क्षणात लक्ष देतो त्यावेळी तो विचार करणे थांबवू शकतो, मात्र मनात कोणतीही भावना असेल, तर विचार येणे माणसाच्या नियंत्रणात नसते. मनात विचार वेगाने येत राहतात, या आपोआप येणाऱ्या विचारांकडे तटस्थ होऊन पाहता येणे, हे एक कौशल्य आहे.
औदासिन्याच्या रुग्णांमध्ये नकारात्मक विचारांना बदलणे कॉग्निटिव्ह थेरपी (चिंतन चिकित्सा) या मानसोपचार पद्धतीमध्ये केले जाते. ‘मी अपयशी आहे’ हा औदासिन्याला कारणीभूत असलेला विचार लक्षात आला की, त्या विचाराला आव्हान देऊन तो बदलण्याचे तंत्र शिकवले जाते. यासाठीही मनातील विचारांकडे लक्ष देणे आणि नकारात्मक विचार आला की तो बदलणे आवश्यक असते.
‘मी अपयशी आहे, एकाकी आहे, माझे भविष्य चांगले नाही,’ असे विचार औदासिन्य वाढवतात. अशा वेळी ‘मी सतत अपयशी नाही, मला काहीवेळा यश मिळाले आहे,’ असा विचार करून नकारात्मक विचार बदलवण्याचा प्रयत्न चिंतनाधारित मानसोपचारात केला जातो. या प्रक्रियेमध्ये विचाराच्या अर्थाला महत्त्व असते.

मात्र, या उपचारपद्धतीला काही मर्यादा आहेत, असेही चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांना जाणवत होते. औदासिन्य असलेल्या काहीजणांचा दृष्टिकोन असा असतो की, स्वतःच्या आयुष्यातील यशाचे प्रसंग ते आठवू शकत नाहीत. तो माणूस स्वतःला अपयशीच समजत राहतो. माइंडफुलनेस, म्हणजे साक्षीध्यानाचा परिचय झाल्यानंतर यातील तंत्रे मानसोपचारात वापरायला थेरपिस्टनी सुरुवात केली. त्यानुसार मनातील विचार त्यापासून अलग होऊन पाहता येतात. त्याच्या अर्थाला महत्त्व न देता, त्या विचारामुळे शरीरात होणारे बदल जाणायचे आणि त्याचाही स्वीकार करायचं. हेच साक्षीध्यान होय. डायलेक्टिकल बिहेविअर थेरपी, अ‍ॅक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी, माइंडफुलनेस बेस्ड् कॉग्निटिव्ह थेरपी अशा अनेक मानसोपचार पद्धती विकसित झाल्या. त्यामध्ये असे साक्षीध्यान शिकवले जाते. या विविध मानसोपचार पद्धतींवर आणि ध्यानाचा सराव केला की मेंदूत काय होते, यावर सध्या वैज्ञानिक संशोधन होत आहे.

माणसाच्या मेंदूत तात्कालिक बदल (स्टेट चेंज) आणि रचनात्मक बदल (ट्रेट चेंज) असे दोन प्रकारचे परिणाम दिसून येतात. मेंदूतील रसायने बदलली की, मनःस्थिती बदलते. पण, हे बदल काही काळासाठी होतात. स्वसंमोहन, स्वयंसूचना आणि कल्पनादर्शन यामुळे मेंदूतील रसायने काही काळासाठी बदलतात. लिंबू तोंडात पिळतो आहोत अशी कल्पना केली की, तोंडात लाळ येते, तसेच प्रिय व्यक्तीला भेटतो आहोत असे कल्पनेने पहिले, तर मेंदूत सेरेटोनीन, डोपामाईन आणि ऑक्झिटोसीन ही रसायने काही वेळ वाढतात. मात्र, त्यामुळे मेंदूत रचनात्मक बदल होत नाहीत.

एखाद्या देवाच्या रूपाचे असे कल्पना दर्शन वारंवार केले, तर त्या व्यक्तीच्या मेंदूतील रसायने बदलतात आणि तिला देव आपल्या समोर आहे असे वाटू शकते, ज्याला ती व्यक्ती देवाचे दर्शन झाले असे म्हणते. मात्र, असे दर्शन झाले तरीही त्या व्यक्तीच्या भावनिक मेंदूत रचनात्मक बदल होत नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीचा राग,चिंता कमी होत नाही. भीती आणि भक्ती या दोन्ही भावना मेंदूतील रसायने काही काळासाठी बदलवतात आणि त्यामुळे या दोन्ही भावना तीव्र असतील, तर त्यावेळी आभास होऊ शकतात, असे आजचे मेंदू विज्ञान सांगते. भावनिक आघात झाल्यानंतर किंवा तीव्र भीती वाटते त्यावेळीही आभास होतात.

गांजाची चिलीम ओढली की, मेंदूतील रसायने बदलून आभास होतात, दर्शन होते असे त्या साधूला वाटते. पण, तो रसायनाचा तात्कालिक परिणाम असतो.मेंदूत रचनात्मक बदल होण्यासाठी मेंदूला ठरावीक अनुभव पुनःपुन्हा मिळावा लागतो. चिंता, भीती, डिप्रेशन असा त्रास असताना मेंदूतील अमायगडला नावाचा भाग अतिसंवेदनशील झालेला असतो. त्याचा आकार देखील पेशी पातळीवर वाढलेला असतो. मानसोपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या साक्षीध्यानाचा सराव नियमितपणे रोज वीस मिनिटे असा दोन महिने केला की, मेंदूतील या भागात रचनात्मक बदल होतात, त्याचा आकार वाढला असेल, तर तो पुनः नॉर्मल होतो. त्यामुळेच सततची चिंता, भीतीचा झटका, औदासिन्य, आघातोत्तर तणाव असे भावनिक आजार बरे होतात, टाळता येतात. असा सराव स्वभावात, व्यक्तिमत्त्वात बदल घडवू शकतो, म्हणून त्यांना ट्रेट चेंज म्हणतात. त्यामुळे रागाने बेभान होणे बंद होते, सैराट वागणे टाळता येते.

आत्महत्यांचे प्रमाण, मानसिक तणाव आणि चिंता औदासिन्य या भावनिक विकृतीची साथ थांबवायची असेल, समाजातील अंधश्रद्धा कमी करायच्या असतील, तर वैज्ञानिक पद्धतीने ध्यानसाधना करायला हवी आणि समाजात तिचा प्रसार देखील करायला हवा.

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

(लेखक नामवंत मानसोपचारतज्ज्ञ आहेत . त्यांचे ध्यान -विज्ञान हे पुस्तक गाजले आहे.)
९४२२०५४५५१

Previous articleहास्याची ढगफुटी- महाराष्ट्राची हास्यजत्रा 
Next articleबहिरम बोवा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.