मेळघाटातील आगळावेगळा ‘डोलार’ महोत्सव

-डॉ. एकनाथ तट्टे 

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पोळ्याच्या करीला आदिवासी बांधव ‘डोलार’ नावाचा एक आगळावेगळा आनंद-उत्सव साजरा करतात. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमीच्या दिवशी गावात मोठा पाळणा बांधला जातो. त्या पाळण्याला डोलार उत्सवाच्या दिवशी विविध पानाफुलांनी सजवले जाते. पाळण्यावर झोके घेऊन गावातील महिला, युवती पारंपारिक गीत गात डोलार साजरा करतात.

असा असतो ‘डोलार उत्सव’

सातपुडा पर्वत रांगेत कोरकू जमातीमध्ये अनेक आगळावेगळा प्रथा परंपरा आहेत. श्रावण महिन्याची सुरुवात होताच ग्रामस्थ सागवानच्या लाकडाचा भला मोठा झोका गावात बांधतात. विशेष म्हणजे हा झोका बांधण्यासाठी कुठलाही दोर किंवा साखळी वापरली जात नाही, तर झाडाच्या सालीद्वारेच हा झोका बांधला जातो. एकाच वेळी आठ ते दहा महिला बसू शकतील इतका मोठा हा झोका असतो. पोळ्याला बैलांची पूजा केल्यावर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावकरी गावा लगतच्या जंगलांमधून विविध वनस्पतींची पाने फुले तोडून आणतात. अशा हिरव्या लाल पिवळ्या आणि विविध रंगाच्या पानाफुलांनी हा भव्य झोका सजवला जातो. या झोक्यावर गावातील महिला नटून थटून एकत्रित बसतात आणि पारंपारिक गीत गाऊन झोका घेतात.  हा झोका घेत असताना या लाकडी झोक्याचा आवाज येतो. त्या आवाजासह महिला गात असलेल्या सुंदर अशा पारंपारिक गाण्यांमुळे परिसराचे वातावरण अगदी आनंदमय होते. या उत्सवाला ‘डोलार’ असे म्हटले जाते. विशेष म्हणजे अनेक  पिढ्यांपासून कोरकू जमातीमध्ये हा डोलार उत्सव असा साजरा केला जातो. गणपतीपूर्वी हरितालिकेला महिला ज्याप्रमाणे निसर्गातील विविध वृक्षांची पाने एकत्रित करून पूजा करतात अगदी त्याच स्वरूपात मेळघाटातील कोरकू बांधव नव्याने फुललेल्या, बहरलेल्या अनेक फुलपानांना या डोलार महोत्सवात महत्व देतात.

गावालगत नदीत होते डोलारचे विसर्जन

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारपासून सायंकाळपर्यंत युवती आणि महिला फुलं व पानांनी सजवलेल्या झोक्यांवर जुळत पारंपारिक गीत गातात. सायंकाळी या झुल्यावरील सर्व पानं-फुलं एकत्रित करून ग्रामस्थ त्या पानाफुलांची मिरवणूक काढतात. वाजत गाजत ही मिरवणूक ग्रामदेवतेजवळ पोहोचते. या ठिकाणी गावातील घुमका अर्थात पुजारी ग्रामस्थांच्या वतीने पूजा करतो. पूजेचा विधी पार पडल्यावर सर्व पानाफुलांचा डोलार गावालगत वाहणाऱ्या नदीत विसर्जित केला जातो.

(लेखक आदिवासी संस्कृती व इतिहासाचे अभ्यासक आहेत)

9404337944 

डोलार उत्सवातील पारंपारिक गीत- क्लिक करा 

 

Previous articleसनातन धर्म, वसाहतवाद आणि आधुनिकता
Next articleअस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.