मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा- संदीप वासलेकर

स्वीडन व डेन्मार्क या दोन देशांच्या सीमेवर; पण स्वीडनच्या हद्दीत लुंड विद्यापीठ आहे. गेल्या ५०० वर्षांपासून ते आजतागायत हे विद्यापीठ ज्ञानप्रसाराचं काम करतं. मात्र, ते काळानुसार बदलतं. सध्या तिथं २१ व्या शतकाशी सुसंगत अशा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर भर आहे.
विद्यापीठाच्या परिसरात अमेरिकेतल्या ‘सिलिकॉन व्हॅली’सारखाच ‘स्कॉने कौंटी’ हा विभाग नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकतेनं गजबजलेला आहे.
या विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय विषयावर भाष्य व विश्‍लेषण करणारं एक नियतकालिक निघतं. त्याचा दर्जा ‘टाइम’, इकॉनॉमिस्ट’ अशा सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसारखा आहे; पण हे नियताकालिक विद्यार्थी चालवतात.
अलीकडंच या विद्यापीठाला भेट दिल्यावर मला या नियतकालिकाच्या संपादक-मंडळातले विद्यार्थी भेटले. चर्चेसाठी एका विद्यार्थिनी माझ्या शेजारी बसली होती. आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, साहित्य या विषयांचं तिचं आकलन पाहून मी प्रभावित झालो. ती नॉर्वेची नागरिक होती व लुंडमध्ये शिक्षण घेत होती. तिला विचारलं ः ‘‘इथं पदवी मिळाल्यावर पुढं काय करायची इच्छा आहे?’’
teacherती म्हणाली ः ‘‘माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे; पण ती मला साध्य करता येईल की नाही, हे मला माहीत नाही.’’
मी विचारलं ः ‘‘तुला यूनो, नॉर्वेचं पराराष्ट्र मंत्रालय, नॉर्वेतल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या इथं मोठ्या जबाबदारीवर काम करण्याची इच्छा आहे का?’’
ती म्हणाली ः ‘‘बिलकूल नाही. माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. ती खूप प्रयत्न करूनही साध्य नाही झाली, तर मग परराष्ट्र मंत्रालय, यूनो, वगैरे इतर बाबींचा विचार करता येईल.’’
मी पुन्हा विचारलं ः ‘‘तुझी एवढी मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे तरी काय, हे मला सांगू शकशील का?’’
ती म्हणाली ः ‘‘मला नॉर्वेतल्या एका ग्रामीण शाळेत शिक्षिका होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण आमच्याकडं शिक्षिकेची नोकरी अतिशय प्रतिष्ठित समजली जाते. ती मिळवण्यासाठी सर्वांत हुशार विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रयत्न करतात. त्यामुळं प्रवेश मिळणं सोपं नाही.’’
ती विद्यार्थिनी अपवादात्मक नव्हती. युरोपमध्ये ऑक्‍सफर्ड, केंब्रिज, सोबोर्न, लुंड, उपसाला, हाइडलबर्ग या विद्यापीठांतल्या अनेक युवक व युवती शिक्षक अथवा अध्यापक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, राजकीय तज्ज्ञ जोसेफ नाथ असे विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ अध्यापनाचं काम आवर्जून करतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भारतातले अग्रगण्य विश्‍लेषक कांती वाजपेयी यांनी दिल्लीतल्या थिंक टॅंक्‍समध्ये काही वर्षं संशोधन केल्यावर डून स्कूलमध्ये प्रमुख शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. तिथं अनेक वर्षं काम केल्यावर ते ऑक्‍सफर्डमध्ये अध्यापक झाले.
मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो, तेव्हा भूतानमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून अर्ज केला होता. मला ती नोकरी मिळाली नाही. नंतर आयुष्याला वेगळं वळण मिळालं व ती महत्त्वाकांक्षा अपुरी राहिली. पुढं आयुष्यात अनेक प्रकारच्या संधी मिळाल्या व अनेक प्रकारच्या संधी हातातून निसटल्यासुद्धा; पण मला भूतानमधली ती शिक्षकाची नोकरी न मिळाल्याची हुरहूर एकसारखी वाटते. कधी कधी अजूनही शिक्षक व्हावंसं वाटतं मला.

मी जरी शिक्षक होऊ शकलो नाही, तरी मी जो काही घडलो ते शाळेतल्या शिक्षकांमुळेच याबद्दल मला शंकाच नाही. मी पाचवी ते जुन्या ११ वीचं शिक्षण डोंबिवली इथल्या मराठी माध्यमाच्या टिळकननगर शाळेत घेतलं. आम्हाला जोशी सर व टांकसाळेबाई समाजशास्त्रं शिकवत, तर सामाजिक बांधिलकी म्हणजे काय ते बाजपेयी सर शिकवत. या तीन शिक्षकांमुळंच मला समाजशास्त्राची गोडी लागली. त्यांनीच माझ्या विचारांची पायाभरणी केली व माझ्या आयुष्याला दिशा दाखवली. नाहीतर मी समाजशास्त्राकडं बहुधा पाहिलंही नसतं
आपल्या देशातले अनेक उद्योगपती, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार यांचं आपण कौतुक करतो; पण त्या सगळ्यांच्या जडणघडणीमागं त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचा हातभार होता, याची जाणीव आपल्याला राहत नाही.
भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन व डॉ. अब्दुल कलाम या तीन राष्ट्रपतींनी उच्च पदावर आल्यावरही शिक्षकांचं महत्त्व सांगण्याचा खूप प्रयत्न केला म्हणून मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.

गेल्या तीन-चार वर्षांत ‘एका दिशेचा शोध’ हे माझं पुस्तक व ‘सप्तरंग’मधलं हे सदर वाचून मला महाराष्ट्रातल्या काही हजार
युवक-युवतींची पत्रं आली. त्यापैकी सर्व युवक-युवतींनी ‘राजकारण, समाजकारण, उद्योग या क्षेत्रांत काय भरीव करता येईल,’ याविषयी माझ्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा केली. हे सर्व चांगलंच आहे व कोणत्याही क्षेत्रात स्वतः समाज आणि राष्ट्र बांधण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या युवकवर्गाचं मला कौतुकच आहे; परंतु त्याचबरोबर ‘शिक्षक होणं ही खूप मोठी महत्त्वाकांक्षा असू शकते,’ असं त्यांपैकी कुणालाही वाटलं नाही, याची मला खंतही वाटते.
भारतात समाजसेवा म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्य करू इच्छिणारे अनेक युवक आहेत; परंतु ‘शिक्षक होणं’ या बाबीकडं महत्त्वाकांक्षा म्हणून पाहणारे युवक मला भेटले नाहीत.

मी शिक्षण क्षेत्रातल्या काही अनुभव व्यक्तींशी याबाबत चर्चा केली, तेव्हा कळलं की आपल्याकडं शिक्षकांची स्थिती खूप विदारक आहे. सरकारी शाळांतल्या शिक्षकांचा वापर सर्रासपणे जनगणना, निवडणुका व इतर कारकुनी कामांसाठी केला जातो. एवढंच नव्हे तर, काही गावांत सरपंच हे शिक्षकांना घरची अथवा शेताची कामं करण्यास भाग पाडतात. म्हणजे शिक्षण सोडून आपण शिक्षकांना एक प्रकारे गुलाम केलं आहे.
काही जण म्हणाले, की अनेकदा शिक्षकांना बॅंकेतून कर्ज घेणं अवघड असतं. एखादा प्रतिभाशाली युवा शिक्षक असेल व तो कितीही बुद्धिमान असेल, तरी त्याच्याशी संबंध जोडणं प्रतिष्ठेचं मानून त्याच्याबरोबर आपल्या कन्येचा विवाह लावून देण्यासाठी त्याच्याकडं कुणी उद्योगपती वा सरकारी अधिकारी खेटे घालत नाहीत.

शिक्षकदिनाचा नाममात्र अपवाद सोडला तर इतर कार्यक्रमांत, साहित्य संमेलनांत, नवीन वास्तूच्या उद्‌घाटनाला कधी शिक्षकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जात नाही. त्यासाठी आपल्याला मंत्री, खासदार अथवा धनाढ्य उद्योगपती यांची आठवण येते.
जसे काही आपले सारे साहित्यिक खासदारांनी व मंत्र्यांनी जडणघडण केल्यामुळं बनले आहेत! आपलं सर्वांत मोठं उत्तरदायित्व आपल्या शिक्षकांकडं प्रामुख्यानं आहे, असं कुणाला वाटतं का याची मला शंका येते.
शिक्षकांना मिळणारा पगार हा कितपत कमी अथवा जास्त आहे, हा चर्चेचा विषय होऊ शखतो; पण समाजात जास्तीत जास्त मान, प्रतिष्ठा व आदर असलेली व्यक्ती ही शिक्षकच असली पाहिजे, याविषयी आपल्या मनात तीळभरही शंका असायला नको.
समाजकारण हे बीजगणितातल्या समीकरणांवर चालतं. ‘जिथं शिक्षक होतो भ्रष्ट, तो समाज होतो नष्ट,’ हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिक्षकाला सरकारी कामं, निवडणुकीची कामं, नेत्यांची खासगी कामं करण्यास भाग पाडणं अथवा शिकवण्या घेण्याची गरज वाटेल, अशी त्याची आर्थिक स्थिती करणं वा इतर कोणत्याही कारणांमुळं उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं कार्य करण्यात अडचणी आणणं म्हणजे शिक्षकाला भ्रष्ट होण्यास, भाग पाडणंच होय.
उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांमधून बनणार आहे. काही विद्यार्थी सर्व अडचणींवर मात करून स्वबळावर पुढं येऊ शकतील; पण ते अपवादात्मक असतील. काही विद्यार्थ्यांना त्यांचे पालक सक्षम करतील; पण ते सुदैवी असतील. देश काही केवळ अपवादात्मक व सुदैवी युवकांच्या जिवावर आपण निर्माण करू शकणार नाही. त्यासाठी भारतातल्या सर्व ६ लाख खेड्यांतल्या व सर्व शहरांतल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्षम करणारे उच्च दर्जाचे शिक्षक देशभर हवे आहेत.

नॉर्वेतली ती विद्यार्थिनी ‘शिक्षक होणं’ ही मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा समजते. कारण नॉर्वे हा अतिशय प्रगत देश आहे. शिक्षक होणं हे जगातल्या प्रगत देशांत प्रतिष्ठेचं समजलं जातं. ज्या देशात सर्वांत बुद्धिमान युवक हे शिक्षक होणं, ही केवळ समाजसेवा समजतात किंवा शिक्षणाकडं एक महत्त्वाचं करिअर म्हणून पाहत नाहीत, ते देश मागासलेले असतात.

जेव्हा मला हजारो युवकांची पत्रं येऊन त्यात उद्योगपती, नेता, अधिकारी, अभियंता या सर्वांपेक्षा शिक्षक होणं खूप मानाचं, प्रतिष्ठेचं आणि अतिशय कठीण असं ध्येय मानलेलं प्रतिबिंबित झालेलं दिसेल, तेव्हा भारतीय समाजात सर्वांगीण समृद्धी आलेली असेल… तेव्हा एका दिशेचा शोध घेण्याची गरज राहणार नाही!
सौजन्य -सकाळ

Previous articleवर्तमानपत्राचे काम नेमके काय असते?
Next articleमातीतला मोती
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here