हिंदू पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा

प्रा. हरी नरके

समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे जे काही ओपिनियन मेकर्स आहेत त्यात बहुसंख्यांक पुरोगामी हे उच्चवर्णीय समाजवादी वा मार्क्सवादी छावणीतले आहेत. ते हिंदुत्ववाद्यांवर तोंडसुख घेतात ते ठिकच आहे. मात्र मुस्लीम समाजातील सनातनी, जात्यंध, धर्मांध शक्तींबद्दल बोलायचे झाले की यातले ९९% हे मौनात जातात. हा हिंदु पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा आहे. नरहर कुरूंदकर आणि हमीद दलवाई हे याला अपवाद होते.

त्यामुळे ते हिंदुत्ववादाविरोधी असण्यापेक्षा हिंदुविरोधी असल्याचा प्रभावी प्रचार करणे हिंदु सनातनी शक्तीला सोयीचे जाते.

सामान्य हिंदू माणसाला ते पटतेही. त्यामुळेच हिंदु समाजामध्ये यांना काडीमात्र प्रतिष्ठा नाही.

ह्या बोटचेपेपणाची सुरूवात फार जुनी आहे. देशाच्या तत्कालीन श्रेष्ठ नेत्यांना हिंदुमुस्लीम प्रश्न जितका जिव्हाळ्याचा वाटला तितका एस.सी.एस.टी. ओबीसींचा प्रश्न कधीही महत्वाचा वाटला नाही.

मुस्लीम समाजातला ९९ टक्के वर्ग हा हिंदुंमधून धर्मांतरीत झालेला आहे. त्यातले जे उच्चवर्णांमधून तिकडे गेले ते तिकडे अश्रफ म्हणून ओळखले जातात. ह्यांची संख्या मूठभर असली तरी संपुर्ण सनातनी मुस्लीम छावणीचे नेतृत्व या अश्रफांकडे आहे.

जे घटक हिंदु ओबीसी आणि एस.सी.एस.टी.मधून धर्मांतरित झाले ते तिकडे अजलफ आणि अर्जल मानले जातात. त्यांच्या हातात नेतृत्व नाही.
हा वर्ग गरिब, अल्पशिक्षित, कष्टकरी आणि कारागिर आहे. अश्रफ यांच्याशी बेटीव्यवहार करीत नाहीत.

हिंदु सनातनी छावणीचे नेतृत्व आणि मुस्लीम सनातनी छावणीचे नेतृत्व दोन्हीही उच्चवर्णियांच्याच हाती असल्याने यांचे नेतृत्वाचे हितसंबंध आहेत. त्यांची मूस एकच असल्याने विरोधीभक्ती, मिलीभगत आणि वर्ग वर्ण जाणीव यांच्यात सामंजस्य आहे. कमालीचा आप्पलपोटेपणा, दांभिकपणा, सामान्य माणसाविषयीची तुच्छता आणि अहंभाव ही यांची खास वैशिष्ट्ये. यांचा सामान्य वर्गातून आलेल्या बुद्धीमंतांबद्दलचा आकस फारच सकस असतो. त्यांना कॉर्नर करणे, त्यांची मुस्कटदाबी करणे, त्यांच्याविषयी बदनामीकारक, तुच्छतावादी अफवा पसरवणे यासाठी ते एकवटतात. अशांना बहिष्कृत करण्यासाठी ते जीवाचे रान करतात. बहुजन राज्यकर्तेही यांच्याच ओंजळीने पाणी पिणारे. मांडलिक. त्यामुळे प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमं हे लोकशाहीचे चारही खांब यांच्याच हातात.

बाजूचे आणि विरोधी असे सगळेच चर्चाविश्व व्यापून टाकण्याचा हा गेम फार मजेदार असतो. हे हिंदु पुरोगामी ज्ञानी लोक जगातील प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होतात मात्र ते ओबीसी, एस.सी. एस.टी. यांच्या प्रश्नांवर कायम मिठाची गुळणी धरून बसतात. हा मौनाचा धुर्तपणा थोरच असतो.

-(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत)

Previous articleकोरोनाची ‘पेशंट झिरो’: वेई गुझियान
Next articleहोय, मी बांडा मुसलमान!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.