यशोदाबाई आगरकर : वेदनेच्या अंधारात जळणारी विद्रोहाची वात

गोपाळ गणेश आगरकर यांचे हे १२५ वे स्मृतिवर्ष आहे. “सत्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही ” ,असे म्हणणारे आगरकर आयुष्यभर सामाजिक सुधारणेच्या अग्निपथावरून चालत राहिले आणि त्या अग्निपथावरच मृत्यू पावले. त्यांच्या निधनानंतर नवऱ्याला दिलेला शब्द अतिशय निग्रहाने पाळत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजसुधारणेचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या पत्नी यशोदाबाई आगरकर यांची ही कहाणी .

………………………………………………………………………………

-डॉ.अजय देशपांडे

” माझ्या हयातीत माझी तत्त्वे लोकांनी स्वीकारलेली मला पाहायला मिळणार नाहीत,हे मी जाणतो ; पण कितीही वेळ लागला तरीही ल़ोकांना ही तत्त्वे स्वीकारावीच लागतील. ” – गोपाळ गणेश आगरकर

यशोदाबाई आगरकर यांचे विवाहापूर्वीचे नाव अंबू फडके होते .अंबू फडके आणि गोपाळराव आगरकर यांचा विवाह १८७७ मध्ये झाला. विवाहानंतर अंबू फडके  या यशोदाबाई आगरकर झाल्या .गोपाळरावांचा मृत्यू १८९५ मध्ये झाला , म्हणजे यशोदाबाई आणि गोपाळराव यांच्या वाट्याला सहजीवनाची उणीपुरी अठरा वर्षे आली ,असे म्हणता येते ; पण प्रत्यक्षात हे सहजीवन बारा – तेरा वर्षांचेच होते . वयाच्या नवव्या वर्षी विवाह झालेल्या यशोदाबाई पुढे ‘नहान ‘येईपर्यंत म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत माहेरीच होत्या .विवाहानंतर पहिली पाच वर्षे यशोदाबाई दर वर्षातील दीड-दोन महिन्यांचा कालावधी वगळता इतर सर्व काळ माहेरीच राहत होत्या . यशोदाबाई लिहितात  ” होता होता पाच वर्षे लोटली .तेवढ्या अवधीत मी दरसाल दीड-दोन महिने ते सुट्टीत घरी आले म्हणजे सासरी जात असे .बाकीचा वेळ माहेरीच असे ” . ( रानडे प्रतिभा ” यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन ”   द्वितीयावृत्ती १९९७ पृष्ठ ६४ )

म्हणजे यशोदाबाई आणि गोपाळराव यांचे प्रत्यक्ष सहजीवन उण्यापुऱ्या बारा – तेरा वर्षांचे होते. या काळात म्हणजे १८८१ ला आगरकर पुणे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये नोकरीला लागले .त्यांना तीस रुपये पगार मिळत असे. त्यानंतर यशोदाबाई पुण्याला आल्या आणि संसार सुरू झाला. १८८१ या वर्षात कधीतरी पुण्यात यशोदाबाई आणि गोपाळरावांच्या संसारी जीवनात खरी सुरुवात झाली. .पुढे १८८३ मध्ये प्रारंभी चार महिने कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात साधी कैद आणि नंतर एकशे एक दिवस तुरुंगवास असे सात-साडेसात महिने आगरकर तुरुंगवासात होते .संसाराच्या  प्रारंभीच्या दिवसात उणीपुरी तेरा – चौदा वर्षे वय असणाऱ्या यशोदाबाई सात साडेसात महिने एकट्या राहिल्या. त्यातही त्याकाळी ‘ सुधारक ‘ हा शब्द निंदाव्यंजक ठरला होता ‘सुधारकाची बायको ‘ हा अवहेलना करणारा शब्द सहन करीतच यशोदाबाईंचा संसार सुरू झाला.

आगरकर आयुष्यभर तत्त्वांसाठी झगडले. शिक्षणासह सामाजिक सुधारणांसाठीही त्यांनी आग्रह धरला.स्त्रीविषयक सुधारणा निर्भीडपणे मांडत नव्या स्त्रीवादी विचारांचा कैवार केला. आगरकर इहवादी होते .त्यांचे धर्मचिंतन बुद्धिप्रामाण्यवादाच्या पायावर उभे होते .आगरकरांचे  स्त्रियांच्या संदर्भातील सुधारणा विषयकविचार, धर्मविषयक व सामाजिक सुधारणा विषयक विचार, त्यांचे अज्ञेयवादी विचार त्या काळच्या समाजास रुचणे अशक्यच होते. आगरकरांच्या तत्त्वचिंतनास त्याकाळी प्रखर विरोध झाला. आजही त्यांच्या विचारांना काही प्रमाणात विरोध कायम असल्याचेच दिसते. सभोवतीचा सारा समाज प्रखर विरोधात असताना आगरकर सुधारणावादासाठी प्राणपणाने संघर्ष करीत होते. १८८१ ते १८९५ या काळात आगरकरांच्या साऱ्या संघर्षात फार शिक्षण न घेतलेल्या ,अत्यंत संवेदनशील आणि समंजस असणाऱ्या यशोदाबाईंनी त्यांना अत्यंत निष्ठेने, प्राणपणाने साथ दिली.

“सत्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही ” , असे म्हणणारे आगरकर आयुष्यभर सामाजिक सुधारणेच्या अग्निपथावरून चालत राहिले आणि अग्निपथावरच मृत्यू पावले .दिनांक १७ जून १८९५ रोजी आगरकरांचे निधन झाले .त्यावेळी यशोदाबाई यांचे वय फार फार तर २८वर्षांचे असावे.आगरकरांच्या नंतर त्यांच्या विचारांच्या अग्निपथावरून चालण्याचे धैर्य यशोदाबाईंच्या राखरांगोळी झालेल्या एकाकी मनात निश्चितच होते .सोबत दोन मुले  , एक मुलगी , अठराविश्वे दारिद्र्य, सुधारकाची बायको हा निंदाव्यंजक शब्द, सर्व पातळ्यांवरची सामाजिक उपेक्षा हे सारे होते ,पण सोशिक यशोदाबाईंनी सभोवतीच्या निराशेच्या – दुःखाच्या – उपेक्षेच्या अंधाराशी अत्यंत संयमाने लढा दिला .आगरकर विचारांचा अंगार पदरात बांधलेल्या यशोदाबाईंनी पुढे ४४ वर्षे जीवनाची लढाई लढली.

आगरकरांनी आयुष्यभर केशवपनाचा विरोध केला.आपल्या मृत्यूनंतर  पत्नीने केशवपन करू नये, असे वाटणाऱ्या आगरकरांनी यशोदाबाईंकडून केशवपन न करण्याचे वचन घेतले होते .                   ” गोपाळरावांना मृत्यूची चाहूल दोन वर्षांपूर्वीच लागली होती . वामनराव आपट्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी ते रमाबाई आपटे यांची विचारपूस करण्याकरता गेले तेव्हा रमाबाई दरवाजाआडूनच त्यांच्याशी बोलत राहिल्या .तेव्हा त्यांना केशवपन करण्यास वामनरावांच्या बंधूंनी भाग पाडलं असल्याचं आणि म्हणून त्या आपल्यासमोर येण्याचं टाळीत असल्याचं गोपाळरावांच्या लक्षात आलं .त्यानंतर अस्वस्थ मनःस्थितीत भर दुपारच्या उन्हात ते गावातून चतुःशृंगीच्या मैदानात आपल्या झोपडीत परतले .यशोदाबाईंकडून त्याच दिवशी त्यांनी वचन घेतलं.” यशोदे माझ्या मागं तू रमाबाई आपट्यांसारखं केशवपन करणार नाहीस असं वचन मला आताच दे .नाहीतर माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही .माझ्या जिवाचा आता काही भरवसा देता येत नाही .मी गेल्यानंतर मामा किंवा माझे भाऊ ‘ केशवपन कर ‘ असं दडपण आणतील .त्यांना मुळीच दाद देऊ नकोस.” यशोदाबाईंनी त्यांना हवं तसं वचन दिल्यावर गोपाळराव शांतपणे बसून राहिले .कितीतरी वेळ.

वामनराव आपट्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठीही  रमाबाई आपट्यांकडे रोख रक्कम नव्हती. तेव्हापासूनच यशोदेवर असा प्रसंग यायला नको म्हणून आपल्या उत्तरक्रियेसाठी त्यांनी एक पुरचुंडी बांधून वेगळी ठेवली होती. ” ( फडके य .दि.  ‘ आगरकर ‘ मौज प्रकाशन तिसरी आवृत्ती २०१६ पृष्ठ २५०,२५१ ) आगरकरांच्या मृत्यूच्यानंतर यशोदाबाईंनी सासर आणि माहेर अशा दोन्ही बाजूंचे विरोध सहन केले पण केशवपन केले नाही .यशोदाबाई लिहितात ,” मला लोकांनी नाना तऱ्हांनी भीती घातली. लोक म्हणत,’ तुझ्या मुलांची लग्नकार्य व्हायची आहेत .आपली मुकाट्याने सोवळी होऊन जनरूढीप्रमाणं चाल ; म्हणजे सर्वकाही सुसूत्र होईल .नाहीतर उगीच हाल-अपेष्टा आणि मुलाबाळांचा वनवास करून घेशील .’ पण मला त्यावेळी कोणाच्याच म्हणण्याची पर्वा वाटली नाही व मी गोपाळरावांनी सांगितलेल्या मार्गापासून एक पाऊलभरही ढळले नाही ” (रानडे प्रतिभा “यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन ” राजहंस प्रकाशन, द्वितीय आवृत्ती १९९७ पृष्ठ १०९)

यशोदाबाईंच्या वडिलांनी त्यांना जरा वैचारिक पातळीवर आधार दिलेला दिसतो. आगरकरांच्या  मृत्यूनंतर यशोदाबाई फक्त दोन वेळा उंब्रज येथे माहेरी गेल्या. वडिलांनी मात्र यशोदाबाईंना समजून घेतले, केशवपनाचा लकडा त्यांच्यामागे लावला नाही उलट त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला असे दिसते. यशोदाबाई लिहितात ” यांच्या मरणानंतर मी अवघी दोन वेळाच माहेरी गेले .माहेरी असताना मात्र माझ्या वडिलांनी मला कधी हिडीसफिडीस केल्याचे स्मरत नाही .लोक त्यांना विचारीत ,’अंबु सोवळी का होत नाही ? तुम्ही तिला आग्रह का करीत नाही ? ‘ त्यावर ते म्हणत ,’अंबूवर कोणत्याही तऱ्हेने मी सत्ता चालवावी असं नाही. तिची ती पूर्ण मुखत्यार  आहे. ती आमच्यावर थोडीच अवलंबून आहे ? ‘ अर्थात बापाचे हृदय ते ! माझ्यावरचा हा प्रसंग पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटे आणि माझ्या मनाला न वाईट वाटेल अशा तऱ्हेने वागण्याची आणि बोलण्याचालण्याची ते नेहमी खटपट करीत ” (रानडे प्रतिभा ” यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन ” राजहंस प्रकाशन, द्वितीय आवृत्ती १९९७ पृष्ठ १०९,११०)

आगरकरांचे मामा दत्तोपंत भागवत अकोल्याला राहत होते. त्यांनी आगरकरांना आणि आगरकरांच्या नंतर यशोदाबाईंनाही सहकार्य केले .गोपाळराव आगरकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरही जरा उशीराच आणि काही प्रमाणात का होईना पण झाला.   ” गोपाळराव आगरकरांमुळे त्यांचे सनातनी मामाही हळूहळू सुधारणांचा स्वीकार करू लागले .भाऊमामांना प्रथम केशवपन करण्याचं नाकारणाऱ्या विधवा पुतण्यांचं आणि सुनांचं दर्शन दुःसह होत असे .पण पुढे पुढे ते घरातल्या विधवांनी मोकळेपणाने वावरावं असे स्वतःच त्यांना सांगू लागले. विधवांच्या शिक्षणाला तसेच पुनर्विवाहाला पाठिंबा देऊ लागले “. त्यामुळे यशोदाबाईंना जरा आधारच मिळाला. आगरकरांना जर अकाली मृत्यू आला तर यशोदाबाईंना आश्रय देण्याचे ,सहकार्य करण्याचे वचन दत्तोपंतांनी गोपाळरावांना दिले होते आणि त्यांनी ते पाळले देखील.एवढेच नव्हे तर पुढे पुढे दत्तोपंतांचे विचारही बदलले. ” यशोदाबाईंनी सोवळे घेतले नाही कारण त्यांचे धारिष्ट्य. त्याबरोबरच बरेचसे श्रेय आगरकरांचे समवयस्क मामा दत्तोपंत भागवत यांनाही द्यायला हवे .दोघांमध्ये करार झाल्यानुसार मामांनी आगरकरांच्या माघारी यशोदाबाईंना आधार दिला , त्यांची जबाबदारी पेलली. केशवपन करून न घेण्याचे यशोदाबाईंचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले, नाहीतर यशोदाबाईंची अवस्था फार कठीण झाली असती. आपल्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याची हिंमत बायकांमध्ये असणे पुरेसे होत नाही .त्यासाठी कोणाचातरी आधारही लागतो.”( रानडे प्रतिभा ” यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन ” राजहंस प्रकाशन, द्वितीय आवृत्ती १९९७ पृष्ठ २२) हे खरे आहे यशोदाबाईंना वडिलांनी लढण्याचा धीर दिला. दत्तोपंतांनी तर धीर आणि आधार दोन्ही दिले. आगरकरांच्या नंतर यशोदाबाई अधिक खंबीर होत गेल्या .त्यांच्या वेदनांना विद्रोहाचे धुमारे फुटू लागले.

विद्रोहाचा हा उच्चार मर्यादित अवकाशातला असला तरी त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. दत्तोपंतांंचे बंधू अनंतराव भागवत यांची मुलगी मनुताई बापट ही बालविधवा होती.मनूताईंच्या दिराचा मृत्यू झाला . तेव्हा त्या दिराच्या बायकोला केशवपनाच्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागले .तिच्या जवळ बसायलाही कोणी तयार होत नव्हते. तेव्हा मात्र यशोदाबाईंच्या वेदना काही प्रमाणात विद्रोहात रूपांतरित झाल्या .यशोदाबाई लिहितात,” स्त्रीशिक्षणाचा हा पहिला आरंभ अकोल्यास या मनूताईंनी  केला .त्यांचा दीर वारला तेव्हा त्याच्या पत्नीजवळ तिला सोबत करताना कोणी बसण्यासही तयार होईना ! मी ही गोष्ट पाहिली तेव्हा मला या दुष्ट रूढीबद्दल अत्यंत वाईट वाटलेच ;पण मनस्ताप, संतापही आला. मी रागाने म्हटले ,” यापेक्षा विष देऊन मारून तरी का टाकीत नाही ! ” ,अर्थात माझे मन कळवळल्यामुळे माझ्या तोंडून असे उद्गार निघून गेले. पण त्या प्रसंगापासून मी मात्र ठरवून टाकले , आता यापुढे शक्यतो स्त्रियांना उपयोगी पडावयाचे.”

यशोदाबाईंनी पुढे या वाटेवरूनच चालण्याचा निर्धार केलेला दिसतो .आगरकरांएवढा प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद , विवेकवाद ,अज्ञेयवाद  व्यक्त करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही पण आपल्या मर्यादित अवकाशात राहून अत्यंत गंभीरपणे , संपूर्ण निष्ठेने स्त्रियांच्या संदर्भातील कार्य त्या करीत राहिल्या. यशोदाबाईंनी सुइणीचे कार्य केले . त्याकाळी स्त्रियांची बाळंतपणे घरीच होत असत.बाळंतपणासाठी सुईण लागत असे.अकोल्यात कोणत्याही जातीपातीच्या स्त्रीचे बाळंतपण यशोदाबाई करीत असत . त्यासाठी त्या पैसे घेत नसत. ” त्यांनी आयुष्यभर जातीपातीचा विचार न करता सुइणीचे काम केले. त्यासाठी त्यांनी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत .कामासाठी कुठेही केव्हाही त्या जायच्या .पुढे यशवंत ,माधव ही मुले मोठी झाल्यावर आईला म्हणत की आता म्हातारपणी तरी त्यांनी सुइणीचे काम सोडून द्यावे, निदान रात्री-बेरात्री तरी जाऊ नये ,पण त्या म्हणायच्या ,’ एक बाई अडली आहे तिला सोडवणं माझं कर्तव्य आहे ‘. मग नातवंडांना टांगा आणायला सांगायच्या. एकट्याच टांग्यात बसून कुठेही जात .त्यांना कधी कुणाची, कशाचीही भीती वाटली नाही .विधवांच्याबद्दल त्यांच्या मनात अतिशय सहानुभूती होती .त्यांना हरप्रकारे मदत करण्यात त्यांनी कधीही कुचराई केली नाही. आपण होऊन त्या विधवांच्या मदतीला जात “

स्त्रियांची बाळंतपणे  करणाऱ्या यशोदाबाई विधवा स्त्रियांना मदत करण्याचे कार्य देखील निष्ठेने करीत होत्या. पुढे स्त्रीशिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या मनुताई बापट यांना प्रारंभी यशोदाबाईंनी शिकवण्याची ही नोंद आहे.” राम आगरकर यांनी सांगितले की मनुताई बापट ही बालविधवा आगरकर कुटुंबाच्या घरोब्यातील .ती विधवा झाल्यावर अकोल्याला माहेरीच आली होती. तिला शिकविण्याचे यशोदाबाईंनी ठरविले आणि स्वतःच्या घरीच तिला शिकविण्याचे काम सुरू केले. आणखीही एक दोन बालविधवा घरी शिकायला येत. राम आगरकरांचे आई-वडीलही त्या  मुलींना शिकवीत.( रानडे प्रतिभा ” यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन ” राजहंस प्रकाशन, द्वितीय आवृत्ती १९९७ पृष्ठ ५५.) स्त्रियांना , मुलींना शिकविण्याचे कार्यही यशोदाबाई करीत असल्याचे दिसते .

स्त्रियांना सर्वप्रकारे मदत करण्याचा त्यांचा ध्यास दिसतो .यशोदाबाईंच्या या प्रकारच्या सामाजिक कार्याच्या सविस्तर नोंदी इतिहासाने ठेवलेल्या नाहीत. पण यशोदाबाई जे सुईणीचे कार्य करीत होत्या, त्यामुळे जनमानसात त्यांच्याविषयीची आदराची भावना त्याकाळी नक्कीच निर्माण झालेली होती. म्हणूनच अकोल्यातील  पहिले महिला सुतिका गृह असलेल्या दाबके महिला सुतिकागृहाचे उद्घाटन यशोदाबाईंंच्या हस्ते करण्यात आले .यशोदाबाईंनी विधवा स्त्रियांसाठी केलेले कार्य, एकूणच स्त्रियांसाठी त्या करीत असलेले कार्य व त्यांची या कार्यातील सेवाज्येष्ठता त्यावेळी विधवांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवी स्त्रियांनीही  आणि संस्थांनीही मान्य केल्याचे दिसते . म्हणूनच त्याकाळी अकोला येथे विधवांना कुंकू लावण्याच्या एका मोठ्या विद्रोही सभेचे अध्यक्षपद यशोदाबाईंकडे सोपविण्यात आले होते .या सभेत अध्यक्षस्थानावरून यशोदाबाईंनी भाषणही दिले होते.

आगरकर स्वराज्याचे पुरस्कर्ते होते .त्यांच्यानंतर १९३०च्या दशकात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील मिठाच्या सत्याग्रहात यशोदाबाई सहभागी झाल्याची नोंद इतिहासात आढळते. राष्ट्रसभेच्या राजकारणात सहभागी झालेल्या गोपाळराव आगरकरांच्यानंतर यशोदाबाईंनीही वर्‍हाड प्रांतिक सभेने आयोजित केलेल्या सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला , राष्ट्रध्वज फडकावला .मात्र यशोदाबाईंचे वय साठवर्षांपेक्षा जास्त असल्याने त्यांना अटक झाली नाही आणि तुरुंगवासही झाला नाही.

आगरकरांच्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशोदाबाईंनी यशवंत ,माधव आणि सुमती या मुलांचा सांभाळ केला .सुमती मात्र आठ वर्षांची होऊन मरण पावली .दोन मुलांचा सांभाळ करीत आपल्या मर्यादित अवकाशात विधवांना , मुलींना शिकवण्याचे, जातिधर्म न मानता स्त्रियांची बाळंतपणे करण्याचे आणि अन्य काही समाजसेवी कार्ये यशोदाबाईंनी  निष्ठेने केली .यशोदाबाईंची ही वाटचाल आगरकरांच्या अग्निपथावरूनच होती. म्हणूनच य. दि .फडके लिहितात, “… १२ जुलै १९३९ रोजी सत्तरी उलटलेल्या यशोदाबाईंचा थकलाभागला देह अनंतात विलीन झाला .लग्नात गोपाळरावांबरोबर त्या सात पावलं चालल्या त्या रिवाज म्हणून. गोपाळराव गेल्यानंतर त्यांनी दाखविलेल्या सुधारणेच्या मार्गावर एक दोन पावलं का होईना आपल्याला स्वबळावर टाकता आली याचा यशोदाबाईंना आयुष्याच्या अखेरीस निश्चित अभिमान वाटला असणार !”.( फडके य .दि. ‘ आगरकर ‘ मौज प्रकाशन , तिसरी आवृत्ती २०१६ पृष्ठ २६० )

सभोवतीचा अंधार कितीही गडद ,व्यापक ,गहन आणि भीषण असला तरीही इवलीशी जळणारी वात त्या अंधारावर विजय मिळवत असते .आपल्यासह एकूणच स्त्रियांच्या वाट्याला आलेला उपेक्षेचा ,वेदनांचा, अवहेलनांचा ,दास्यत्वाचा अंधार मिटवण्यासाठी  यशोदाबाई नावाची इवलीशी वात संथ आणि मंदपणे जळत राहिली. वेदनेच्या  अंधारात  मंद तेवणाऱ्या या विद्रोहाच्या वातीने कदाचित भव्य – दिव्य इतिहास घडविला नसेल. पण इतिहास लिहिला जाईल तेव्हा यशोदाबाईंचे नाव अंधाराच्या बाजूने नसेल तर आगरकरांच्या विद्रोहाच्या प्रखर अग्निपथाच्या बाजूने लिहिलेले असेल.

संदर्भ :

• फडके य .दि. ” आगरकर ” मौज प्रकाशन , तिसरी आवृत्ती २०१६ 

• रानडे प्रतिभा ” यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन ” राजहंस प्रकाशन, द्वितीय आवृत्ती १९९७ 

-(लेखक समीक्षक असून ‘ सर्वधारा ‘ या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)

९८५०५९३०३०

 [email protected]

Previous articleडॉ. पंजाबराव देशमुख: एक द्रष्टा महापुरुष
Next articleउद्योगपती आणि नेशन बिल्डर महात्मा जोतीराव फुले
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.