यह पलाश के फूलने का समय है!

साभार – मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७

राही श्रुती गणेश

विख्यात अर्थशास्त्रज्ञ ज्यॉं द्रेझ यांनी गेल्यावर्षी झारखंडमधल्या आदिवासींच्या निवासी शाळांसाठी ‘सहपाठी’ नावाचा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या निमित्तानं राहीला सलग दोन वर्षं मला झारखंडला जाण्याची, तिथल्या दुर्गम भागांत राहण्याची संधी मिळाली. तिथल्या वास्तव्यादरम्यान एरवी ‘आउट ऑफ कव्हरेज’ असलेल्या जगण्यातील केवढ्या तरी लहान-मोठ्या गोष्टी तिनं खुबीनं टिपल्यात.  त्याचाच हा रंगबिरंगी कोलाज खास मीडिया वॉच दिवाळी अंकासाठी 

———————————-

कोसो लांब झारखंडहून मला पूनम कुमारीचं पत्र आलंय –

“माझं नाव पूनम कुमारी. झारखंडमध्ये रांची जिल्हातलं झरगाँव हे माझं छोटंसं गाव. माझ्या बाबांचं नाव आहे सुकरा मुंडा आणि आईचं सुशीला देवी. आमच्या गावपासून दोन गावं पलिकडच्या तमाड गावच्या आदिवासी मुलींच्या निवासी शाळेत मी दहाव्या इयत्तेत शिकते.

शाळेमागच्या मैदानात उभं राहिलं की समोर क्षितिजापर्यंत मोठमोठे डोंगर दिसतात. हा समोरचा डोंगर आहे ना, त्याचं नाव सोनाहातू. आणि तो उंच डोंगर उलिहातूचा. उलिहातू म्हणजे बिरसा मुंडा, आमचा बिरसा भगवान राहायचा ते गाव. या डोंगरांच्या पायथ्याशी जे दाट जंगल दिसतं ना, त्याला आडकीचं जंगल म्हणतात. या जंगलात सगळे सगळे प्राणी आहेत- वाघ आणि हत्तीसुद्धा! हे जंगल पार केलं की आलंच आमचं गाव! अगदी जंगलाला लागून आहे आमचं गाव. आडकी हे नाव ऐकल्यावर भीती वाटली तुम्हाला? तमाडच्या आसपासच्या नक्षल कारवाया करणारी टोळी या आडकीच्या जंगलात राहते असं ऐकलं असणार तुम्ही. पण आम्हाला जंगलाची दुसर्‍याच एका गोष्टीसाठी जास्त भीती वाटते, ती म्हणजे हत्ती! कधीही रात्री-बेरात्री अचानक हत्तींचा कळप गावात घुसेल आणि शेतांमध्ये शिरून सगळ्या पिकांची नासधूस करेल याचीच आम्हाला कायम चिंता असते. असे हत्ती एकदा गावात घुसले की सगळ्यांनी मिळून त्यांना पुन्हा जंगलात हुसकावून लावेपर्यंत कोणालाच काही सुचत नाही.

आणि हो, आमच्या गावात नदीपण आहे. खूप सुंदर आहे आमची नदी- आणि ती नं, जादूची आहे! का माहिती आहे? आमच्या नदीच्या तळाशी जमिनीत सोनं आहे म्हणे…सोनं! म्हणून तर  इतकं सुंदर चमचमतं पाणी असणार तिचं. माझा काका म्हणतो, हे सोनं बाहेर काढायचं तर नदीचं पाणी आडवावं लागेल. मग ते पाणी गावात शिरेल. म्हणजे आम्हाला सगळ्यांना घरं सोडून दुसरीकडे जावं लागेल. तेव्हाच तिथे खाण तयार होईल आणि सोनं बाहेर काढता येईल. पण मग गावपण राहणार नाही आणि नदीपण. नुसतं सोनं हातात आलं तर जादू संपून नाही जाणार नदीच्या पाण्याची?

जाऊ दे, आता मी सात वर्षांची असतानाची एक गोष्ट सांगते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे आत्त्याच्या गावी गेलो होतो. माझ्या आत्तेबहिणीचं लग्न होतं. आत्त्याच्या घरभर पाहुणे होते. नवरी दीदीची नुसती गडबड चालली होती. लग्नाच्या दिवशी नवर्‍या मुलीच्या तीन डिडा (लग्न न झालेल्या बहिणी) तिला आंघोळ घालतात. या आंघोळीसाठी पाणी आणणं हा मोठाच कार्यक्रम असतो. सगळी पाहुणेमंडळी गावातल्या तलावाकडे निघाली. मीसुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत पळत पळत सगळ्यांच्या पुढे निघाले. रात्र होऊ लागली होती. नगाडे वाजवत, गात-गात आम्ही सगळे तलावाजवळ पोचलो. मी मैत्रिणींबरोबर तलावात पाय बुडवण्यासाठी खाली उतरले. चप्पल काढून मी पाण्यात पाय ठेवते तोच माझ्या टाचेला एक साप चावला. मी खाली वाकून पाहिलं- हाय! हा तर डोढ साप. या डोढ सापाला खालच्या जातीतला, अस्पृश्य मानतात. डोढ चावला आणि गायीच्या शेणात पाय पडला तर माणूस मरतो म्हणे. मी खूपच घाबरले. मी मैत्रिणींना सोडून तलावातून एकदम वर आले. सगळे खूप आनंदात होते. सगळ्या बायका एका सुरात आमच्या पंच परगणिया भाषेतलं हे गाणं गात होत्या,

“आईज हांदेर हुदू मुनूर विवाह रे, आईज हांदेर हुदू मुनूर विवाह।

मोद खाबों डुमाए- डुमाए, मोद खाबों डुमाए- डुमाए,

नायबो झिया- दिक्का रे, आईज हांदेर हुदू मुनूर विवाह।”

म्हणजे ‘आज आमच्या छोट्या बहिणीचं लग्न आहे, मोठ्या भांड्यातून हांडिया पिऊ या आणि सगळी दुःखं विसरून भरपूर नाचू या!’

गात-नाचत सगळे  घरी पोचले. मला मात्र भीतीनं काही सुचत नव्हतं. मी आईला शोधू लागले. लग्नाच्या गडबडीत आई कुठं गेली होती कोण जाणे. शेवटी सगळ्या पसार्‍यामध्येच मी झोपून गेले. थोड्या वेळाने आईच आली आणि मला उठवून म्हणाली, “अगं, लग्न सुरू होतंय, बघायला नाही यायचं?” माझं सगळं अंग दुखत होतं, पण मी आईला काहीच सांगितलं नाही. “खूप झोप येतेय गं, मी नाही येत बाहेर. झोपतेच आता,” एवढंच म्हणाले. मी माझा हाल कोणाला सांगितला तर लग्नाच्या गडबडीत सगळे माझ्याकडेच लक्ष देतील आणि खूप गोंधळ वाढेल असं मला वाटलं. त्यात हा डोढ साप! सगळे उगाच घाबरतील आणि लग्नच थांबवून पळापळ करतील, त्यापेक्षा मी मेले तरी चालेल असा काहीतरी विचार करत मी पुन्हा झोपून गेले.

सकाळी मला जाग आली. मला खूपच आश्चर्य वाटलं की मी मेले कशी नाही. तोंड धुवून मी आईला घट्ट मिठी मारली. आईने सांगितलं की रात्री नवरा मुलगा आला तेव्हा सगळे फटाके फोडू लागले आणि त्यातले काही समोरच्या रानात उडून पडले आणि चांगलीच आग लागली. ओल्या कापडांनी, कांबळी, पोती आणि सतरंज्यांनी आग विझली नाही तेव्हा तलावातून पुन्हा-पुन्हा पाणी आणावं लागलं. मला खूप वाईट वाटलं. बरं झालं मी कोणाला सापाचं सांगितलं नाही ते. केवढा गोंधळ उडाला असता- आग आणि त्यात हा डोढ साप! हुश्श! सगळं ठीक निभलं. पण रानाचा काही भाग जळाला. पिकं जळाली असतील तर नुकसान झालं असणार.

डोढ सापाचे दात लागले की वरच्या जातीतले साप आपल्याला चावत नाहीत म्हणे. किती छान झालं, मला वरच्या जातीतल्या मोठ्या, भयंकर सापांपासून या डोढ सापानं कायमचं वाचवलं. मला आता सापांची मुळीच भीती वाटत नाही. कुठलाही साप आरामात पकडते मी. आमच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये अधून-मधून साप येतो. अशा वेळी त्याला अलगद पकडून दूर सोडून यायच्या कामगिरीवर मीच जाते. आमच्या दीदी म्हणतात की पुरूष माणसाला बोलावून घेऊन सापाला मारून टाकलेलं बरं. पण मला- ‘मुलगी माणसाला’ साप न मारता पकडता येतो, तर कशाला बोलवायचं कोणाला? असं दीदींना विचारलं तर म्हणतात, मुलींनी साप-बीप पकडायला जाऊच नाही. पण आमच्या घरी सगळ्या भावंडांमध्ये मला आणि टुसूदीदीलाच साप पकडता येतो. मग घरी साप आला तर काय करायचं? दीदी म्हणतात, अशा घरात राहायचंच नाही मुळी!

माझ्या आत्तेबहिणीच्या लग्नाहून आम्ही आमच्या घरी परतल्यावर मी एक दिवस घाबरत-घाबरत आईला सांगितलं की मला साप चावला होता आणि मी त्यातून वाचले आहे. त्यामुळे आता मुळीच घाबरायचं कारण नाही. डोढ सापाचे दात मला लागले त्यामुळे आता मला कुठल्याच सापाची भीती नाही. लग्नाच्या गडबडीत मला साप चावल्याचं सांगून सगळ्यांना घाबरवण्यापेक्षा मी मेले असते तरी चाललं असतं असं मी सांगितल्यावर आईचे डोळे भरून आले. मला कुशीत घेत आई म्हणाली, “बुद्धू लडकी, आपण वीर बिरसाची लेकरं आहोत. आपल्याला कोणत्याच जातीतल्या सापांची भीती नसते…”

एरवी कधी झारखंड म्हणल्यावर डोळ्यांसमोर काहीच आलं नसतं. शाळेतसुद्धा भूगोलात कधी या राज्याविषयी काही शिकल्याचं आठवत नाही. परीक्षेमधल्या ‘अपेक्षित प्रश्नां’च्या चौकटीत या राज्याला कधीच जागा नव्हती.

नेतरहाटच्या जंगलातल्या उतरत्या घाटरस्त्यावरून जाताना मी झारखंडचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होते, तर तोही जेमतेम अंधुक आठवत होता. या नकाशाच्या आतली माती पायांना लागली नसती तर इथली शेकडो लोकगीतं, इथल्या स्थानिक भाषंमधली सुरेल गाणी कधी माझी झालीच नसती. इथल्या वाड्यावस्त्यांमधून, जंगलांमधून वेळी अवेळी थरार प्रवासाचे, पायपिटीचे अनुभव मिळाले नसते, पूनम-रिंकी-टूसू-कल्याणीसारख्या मैत्रीणींबरोबर राहिले- गायले- नाचले नसते तर मी कुणीतरी वेगळीच असते. इथली गाणी आणि दोस्ती मुरवून किती सुरेल-रंगीत झाले मी…

वळणावर लहान मुलींच्या गलक्याच्या आवाजानं माझी तंद्री तुटली. ‘नेतरहाट आदीम जनजाती आवासीय विद्यालया’ची पाटी पाहून मी शाळेच्या आवारात आले आणि नव्या ‘दीदी’कडे कुतुहलाने पाहणार्‍या पहिली- दुसरीच्या मुलींकडे पाहून ओळखीचं हसले. मुलीसुद्धा हसून मला आत बोलावत होत्या आणि देशाच्या दुसर्‍या कोपर्‍यातली ही सगळी माणसं किती सहज माझी झाली होती.

राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत चालवलेल्या आदिवासीसाठींच्या निवासी शाळांमध्ये पंधरा दिवस राहून तिथल्या मुलामुलींना शिकवणं, शाळेतल्या शिक्षणाबाबत निरिक्षणं करणं, या शाळा टिकाव्यात आणि चांगल्याप्रकारे चालाव्यात म्हणून विभागाला रिपोर्ट देणं, उपाय सुचवणं असं या प्रकल्पाचं स्वरूप होतं. दोन्ही वर्षी देशभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधून पस्तीस- चाळीस विद्यार्थी ‘सहपाठी’मध्ये सामील झाले. रांचीमध्ये कामाविषयी माहिती आणि ओळख करून घेऊन मग गटांमधले विद्यार्थी एकेका शाळेत गेले. गेल्या वर्षी सहभागी विद्यार्थी म्हणून आणि यावर्षी नियोजनात मदत करण्यासाठी समन्वयक म्हणून मी ‘सहपाठी’सोबत जोडली गेले.

रांचीमधल्या नामकुम भागातल्या ‘बागाईचा’ नावाच्या ऐसपैस परिसरात विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली होती. बागाईचा हे झारखंडमधल्या शहीद आदिवासींचं स्मारक आहे. मोठ्या आवारात उंच डेरेदार झाडांमध्ये दोन हॉस्टेल आणि कार्यक्रमांसाठीचे दोन हॉल, ऑफिस असलेली बंगली असा बागाईचाचा पसारा गावाबाहेरच्या लांबवर पसरलेल्या शेतांमध्ये मिसळून गेला आहे. मधल्या चौकात बिरसा मुंडाचा पुतळा आहे. आदिवासींच्या जंगल- जमिनीवरच्या हक्कांविषयीच्या घोषणा असलेली पोस्टर्स बागाईचामध्ये सगळीकडे लावली आहेत. तिथल्या शहीद स्मारकावरच्या तारखा बिरसा मुंडाच्या काळापासून अगदी २०१६ पर्यंतच्या दिसतात. या ‘स्वातंत्र्यलढ्यानंतर स्वातंत्र्यासाठी’ शहीद झालेल्या आदिवासींचं कोडं इथं राहू तसं हळूहळू उमगत जातं.

झारखंड हे राज्य ‘नक्षल बेल्ट’मध्ये येतं. या भागातल्या नक्षलवाद्यांच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी सरकारनं ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ सुरू केलं. इथल्या जंगलांमध्ये ठिकठिकाणी सैन्याच्या तुकड्या उतरल्या. सैन्यामार्फत सरकारच्या हातात इथल्या माणसांवर ताबा ठेवण्यासाठी अमर्याद ताकद आली. झारखंडची जमीन निरनिराळ्या खनिजांनी समृद्ध आहे. इथल्या नद्यांखाली, जंगलांखाली सोन्याचांदीपासून बॉक्साईट आणि कोळशापर्यंत अनेक  मौल्यवान खनिजांचे साठे आहेत. या खनिजांच्या खाणींसाठी लागणार्‍या जमिनीवर आदिवासी राहतात. या जमिनी स्वस्तात किंवा फुकटात मिळवण्यासाठी कंपन्यांनी आणि सरकारनं अनेकदा आदिवासींना राहत्या घरांमधून हुसकावलं. जे तरीही ऐकेनात त्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं. तरीही काही आदिवासी जमिनीला धरून राहिले. जमीन सुटली तर जगण्याची दुसरी आशा नाही हे त्यांना दिसत होतं. शहराकडे रेटल्या गेलेल्या त्यांच्या भाईबंदांची स्थिती ज्यांना ठाऊक होती, ते इतरांना सावध करू लागले. शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये पडेल ते काम करून कसंबसं जगणं ढकलण्यापेक्षा जंगलातलं आपलं आयुष्य ते घट्ट धरून बसले होते. हे सरळ ऐकत नाहीत म्हटल्यावर सरकारनं ‘ग्रीन हंट’च्या जवानांना हाताशी धरलं. एकेक माणूस सरळ नक्षलवादी आहे म्हणून त्याला मारून टाकून सरकार जमिनी ताब्यात मिळवू लागलं. बर्‍या बोलानं आपली जमीन न सोडणार्‍या एकेका घरात शिरून सैन्यानं सामानसुमानाची लुटालूट, नासधूस सुरू केली. स्त्री-पुरूष, लहान मुलं… बंदुकीसमोर येणार्‍या प्रत्येकावर गोळी चालली. चालते आहे. जंगलांच्या- डोंगर- नद्यांच्या ठिकाणी खणून-कोरून मोठाल्या खाणी झाल्या आहेत. वर्षानुवर्षं खाणींसाठी जमिनी पोखरून झारखंड उजाड -वैराण बनत चाललाय…

बागाईचामधल्या शहीद स्तंभावर कोरलेली ताजी नावं तर अगदी विशीतल्या मुलांची आहेत. आदीवासींना नागरिकही न मानणारं सरकार ब्रिटिशांच्याच हिंसक वृत्तीनं सातत्यानं हत्या करतंय.

या अत्याचारांविरोधात आदिवासींनी अनेक अहिंसक आंदोलनं उभारली, कोर्टाकडे दाद मागायला सुरूवात केली. बागाईचा हे या जनआंदोलनांचं एक केंद्र आहे. तिथले व्यवस्थापक फादर स्टॅन स्वामी हे या आदीवासींच्या जमीन अधिकारांसाठीच्या आंदोलनातले एक कार्यकर्ते आहेत.

‘ग्रीन हंट’च्या नावाखाली चाललेल्या खोट्या एन्काउंटरच्या मालिकेवरची ‘द हंट’ नावाची डॉक्युमेंटरी सध्या बरीच गाजते आहे. ती आम्ही यावर्षी प्रशिक्षणाच्या वेळी दाखवली. ‘सहपाठी’विषयी त्यांचे अनुभव सांगण्यासाठी प्रकल्पाच्या एका शाळेतून नुकतीच दहावी झालेल्या सुमिता आणि आनंदिता आल्या होत्या. डॉक्युमेंटरी पाहताना दोघी हमसून रडत होत्या. शेवटच्या फ्रेमनंतर तर सगळे सुन्न झाले होते. न राहवून हुंदके आवरत सुमिता बोलायला लागली. ‘दीदी, हम ये रोज देख रहे हैं. पिछले साल में स्कूल के लिये निकली और एक साल बाद घर लौट रही थी तो घर वापस जाने का रास्ता ही नही बचा था… खदान में घर का रस्ता चला गया, मेरा पूरा का पूरा गांव चला गया था…’ सुमिता बोलत होती, घरी परत यायचा रस्ताच उरला नाही… ? आम्हाला कुणालाच काय बोलावं कळेना. मला वाटू लागलं मी घरी निघाल्यावर मीही रस्ता चुकेन का काय घराचा. गाव अनोळखी दिसेल. घरातून निघून परत घरीच पोचता येणं हीसुद्धा एवढी मोठी चैन वाटायला लागली. सुमिताच्या गावासारखीच इथल्या शेकडो लहान मोठ्या गावा-वस्त्यांची ही कहाणी आहे.

आदिवासींच्या हक्कांसाठी उभ्या असलेल्या झारखंडच्या जनआंदोलनांच्या दयामणी बारला या एक मोठ्या नेत्या आहेत. दयामणी दीदींचा जन्म मध्य झारखंडमधल्या एका आदिवासी कुटुंबातला. लहानपणापासून जमिनीबाबतीत होणार्‍या फसगतीचे परिणाम त्या पाहत होत्या. त्यांच्या आजूबाजूच्या इतर अनेक कुटुंबांप्रमाणे त्यांचीही जमीन गेली आणि पाठोपाठ आलेलं दारिद्र्य त्यांनीही सहन केलं. पडेल ते काम करत त्या शिकल्या आणि पत्रकारितेची पदवी घेऊन तिथल्या ‘प्रभात खबर’ या दैनिकात काम करू लागल्या. काम करताना हळूहळू त्यांना जाणवलं की इथल्या आदिवासींचे बहुतेक प्रश्न त्यांच्या जमिनीच्या हक्कांशी संबंधित आहेत. त्यांनी लोकांना बळजबरीने होणार्‍या विस्थापनाविरुद्ध संघटित करायला सुरूवात केली आणि अनेक बेकायदेशीर विस्थापनं रोखली. पूर्व झारखंडमधल्या ‘आर्सेलर मित्तल कंपनी’च्या लोखंडाच्या प्लांटविरुद्धच्या  लढ्यामुळे त्यांचं नाव भारतभर पोचलं.

मला दयामणी दीदींना भेटायची कधीची उत्सुकता होती. यावर्षी रांचीत गेल्या-गेल्या मी त्यांच्या ‘होटल’ला गेले. गेली काही वर्षं त्या रांचीमध्ये एक चहाच्या टपरीसारखी दिसणारी खाणावळ चालवतात. बाहेरून वाटतही नव्हतं की हे तेच ‘होटल’ आहे. हे त्यांचं होटल म्हणजे झारखंडमधल्या वेगवेगळ्या जनआंदोलनांच्या कार्यकर्त्यांचा अड्डाच. दुपारच्या वेळेला तिथल्या चार-पाच टेबलांवर स्टीलच्या परातींसारख्या मोठ्या थाळ्यांमधून डाळ-भात खाणार्‍या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली होती. टेबलांभोवतीही लोक उभे राहून खात, चर्चा करत होते. दयामणी दीदी मात्र पुढच्या आठवड्यात होणार्‍या ‘भूमि अधिकार आंदोलना’च्या संमेलनाच्या तयारीसाठी कुठेतरी गेल्या होत्या. ‘सहपाठी’च्या प्रशिक्षण शिबिरात त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी यावं असं आधी बोलणं झालं होतं. डाळ-भात खाऊन मी दीदींसाठीचं औपचारिक निमंत्रण देऊन परतले.

त्यानुसार दीदी अगदी आठवणीनं सहपाठीच्या शिबिरात प्रेमाने सगळ्या विद्यार्थ्यांची चौकशी करून झारखंडमधल्या खाणकामामुळे होणार्‍या विस्थापनाविषयी त्या विस्ताराने बोलल्या. ‘जमिनीचा तुकडा म्हणजे दगडमाती थोडीच आहे? माणसाला इकडे-तिकडे खेचणारं क्षेत्रफळभर पसरलेलं जगणं आहे ते.. रक्त काढणारं जगणं!’  नंतर ‘भूमि अधिकार आंदोलना’च्या संमेलनात त्यांना पुन्हा ऐकता आलं.

नव्या सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्या-आल्या जमीन अधिग्रहण अध्यादेश जाहीर केला. कारखाने आणि इंडस्ट्रिअल कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांसाठी लोकांच्या परवानगीशिवाय थेट जमीन अधिग्रहण करण्याचा हक्क यातून सरकारला मिळत होता. देशभरातल्या शेतकरी आणि आदिवासींनी या ऑर्डिनन्सला संघटितपणे विरोध केला आणि एक ‘भूमि अधिकार आंदोलन’ उभं राहिलं. या आंदोलनाचं तिसरं संमेलन यावर्षी रांचीमध्ये झालं.

‘झारखंडमधल्या आदिवासींची जमीन बिगरआदिवासींना विकत घेता येणार नाही’ अशी तरतूद असलेला सीएनटी- एसपीटी (छोटा नागपूर टेनन्सी आणि संथाल परगना टेनन्सी) कायदा इतकी वर्षं आदिवासींच्या जमिनीसाठीच्या लढ्यांचा आधार होता. रघुवर दास यांच्या नव्या सरकारने या कायद्यात आदिवासींची जमीन घेण्यासाठी सोयीच्या अशा या कायद्यातल्या ‘सुधारणा’ सुचवल्या. आता मोठ्या सरकारी प्रकल्पांसाठी आणि उद्योगांसाठी आदीवासींची जमीन घेण्यासठी त्यांची परवानगीही घेण्याची गरज राहणार नाही अशाप्रकारच्या तरतुदी या सुधारणांमध्ये होत्या. राज्यभरातले आदीवासी आणि शेतकरी या सुधारणांविरुद्ध रस्त्यावर उतरले. या सुधारणांना अधिक संघटितपणे कसा विरोध करता येईल, याविषयी आंदोलनाच्या संमेलनामध्ये चर्चा झाली. संविधानातल्या आदीवासींच्या जमिनीच्या अधिकारांचं संरक्षण करणार्‍या पाचव्या अनुसूचीचा आधार घेत या असंवैधानिक कायद्यांना कसं उत्तर देता येईल याविषयी गावोगावचे कार्यकर्ते बोलत होते. आपापल्या भाषेत स्टेजवर येऊन म्हणत होते, ‘आमच्या जमिनीचा एक इंच तुकडाही देणार नाही!’

अनुज लुगुन हे या भागातले आदिवासी कवी त्यांच्या कवितेत सरकारची उद्योगांची हाव पाहून जंगलात अचानक फुललेल्या ‘बेमौसम पलाश’चं गाणं लिहितात,

‘जंगल में पलाश के फूल को देख
आप भ्रमित हो सकते हैं कि
जंगल जल रहा है
जंगल में जलते आग को देख
आप कतई न समझें पलाश फूल रहा है
यह पलाश के फूलने का समय है
और, जंगल जल रहा है।‘

रांचीपासून चार तासांवर असलेल्या आडकी जंगलाशेजारी तमाड गाव आहे. तिथल्या शाळेत मी गेल्या वर्षी राहिले. इथल्या बाकीच्या सरकारी शाळांप्रमाणे तमाडच्या शाळेचीही परिस्थिती भयंकर होती. पहिली ते दहावीच्या वर्गांसाठी सरकारी नियमानुसार एकवीस शिक्षक असायला हवे होते, त्यातले पटावर चौदा होते आणि प्रत्यक्ष शाळेत जेमतेम चार येत होते. त्यातही कायम निवासी वॉर्डन असलेली एक शिक्षिका आणि एक मुख्याध्यापक हे वर्गात कधीतरीच शिकवू शकत होते. शाळेच्या इमारतींचं प्लास्टर जिकडे-तिकडे पडत होतं. गेल्या वर्षी तर एका वर्गात परीक्षा सुरू असताना छताचा मोठा भाग कोसळला. एका मुलीच्या कवटीला त्यात गंभीर इजा झाली. वर्गातल्या शिक्षिका आणि इतर काही मुलींनाही इजा झाली. ‘सहपाठी’ अंतर्गत पाहिलेल्या सगळ्या शाळांमध्ये जवळपास अशीच स्थिती होती. बॉक्साईट खाणींच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातल्या शाळा तर बाकीच्या जगापासून तुटलेल्याच आहेत. डोंगर उतरून एक दीड किलोमीटर गेल्याशिवाय पाणीसुद्धा मिळणं शक्य नाही. धड मोबाईलचीही रेंज कुठे नाही, विजेचा तर पत्ताच नाही आणि सरकारी आदेशानुसार मुलांच्या बायोमेट्रिक हजेरीसाठी मशिन्स येऊन पडली आहेत. यावर्षी मध्यान्ह भोजनासकट सगळ्या योजना आधारसोबत जोडल्यामुळे मुलांची बायोमेट्रिक हजेरी घ्यायला शिक्षक बांधील आहेत पण वीज-इंटरनेट नसल्यामुळे शिक्षकांच्याही बायोमेट्रिक हजेरीची नोंद न झाल्याने त्यांचेच चार-चार महिन्यांचे पगार थकले आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षांत शिक्षणासाठीच्या बजेटला सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर कात्री लागते आहे. जागोजाग खाजगी शाळा वाढत आहेत. मात्र झारखंडच्या दुर्गम भागांमध्ये सरकारी शाळांची जागा खाजगी शाळा घेतील अशी अपेक्षा करणंसुद्धा अशक्य आहे. इथल्या आदिवासी मुलामुलींसाठी या सरकारी शाळाच जागा देऊ शकतात. खाजगीकरणाच्या रेट्यात शाळांमधल्या आहाराच्या बजेटलाही कात्री लागली आहे. शासनाच्या गोदामांऐवजी आता खाजगी डीलरकडून आहारासाठीचा शिधा विकत घ्यावा लागतो. या डीलर व्यवस्थेत पैसा पुरवण्याच्या कसरतीत शेवटी अपुरं आणि निकृष्ट खाणं मुलांच्या वाट्याला येतं. गेल्या वर्षी बर्‍याच शाळांमध्ये खडे-किडे असलेला भात मुलं ताटात निवडून खात होती. अनेकदा खाणं कमी पडल्यामुळे पहिली-दुसरीच्या मुलामुलींना भाताच्या पाणचट पेजेवर भागवावं लागत होतं. ‘सहपाठी’च्या रिपोर्टनंतर यावर्षी आहारावरचं बजेट विभागाने दुपटीनं वाढवलं गेलं आणि नवीन मेनूही लागू केलाय.

या सगळ्यातही मुलंमुली खूप मन लावून शिकतात. तमाडच्या मुलींचे आईवडील दहावीचे क्लास लावूनही मुलींना शिकवायला तयार आहेत. सुट्टीत तालुक्याच्या गावात अर्धवेळ काम करून नववी-दहावीच्या मुली पैसे जमवतात. आता लग्नाच्या कारणाने मुलींची शाळा सुटण्याचं प्रमाणही हळूहळू कमी होतं आहे.

शाळेत मुलांना पाठ्यपुस्तकाशिवाय कुठलंही वाचनसाहित्य नाही, पण कल्याण विभागातर्फे मिळणारी एनसीआरटीची पुस्तकं मुलं खूप आवडीने वाचतात. मी पुण्याहून आले आहे म्हटल्यावर तमाडला गेल्या दिवशी आठवी-नववीच्या मुली माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘दीदी, आप तो सावित्रीबाई के गांव से आयी है! उनका घर देखा है आपने?’ मला भरूनच आलं. मग रात्री जेवताना मुलींनी हट्टाने सावित्री-ज्योतिबांची गोष्ट ऐकली. पाठोपाठ मला बिरसा मुंडाची गोष्ट सांगितली. मुंडारी भाषेतली बिरसावरची गाणी गायली. इथे बिरसा मुंडा केवळ इतिहासातली एक व्यक्ती नाही, तो आदिवासींचा ‘बिरसा भगवान’ आहे. मुंडा जमातीच्या वस्त्यांच्या वेशीवर बिरसा मुंडाचा पुतळा नेहमी पाहायला मिळतो. इथल्या प्रत्येक सणावाराला बिरसा मुंडाची गाणी उत्साहात गायली जातात.

झारखंडमध्ये ‘असूर’ नावाचीही एक आदीवासी जमात आहे. नेतरहाटच्या मुलींना आपल्या या जमातीच्या नावाचा अर्थ विचारला तर हसून म्हणतात, ‘मतबल ताकतवान!’ ही जमात स्वतःला महिषासुराचे वंशज मानते. त्यांचा हा शक्तिवान राजा महिषा असूर कधी बाईवर हात उचलायचा नाही म्हणून बाहेरून आलेल्या आणि स्वतःला देव म्हणवून घेणार्‍या काही लोकांनी महिषाचं राज्य बळकावण्यासाठी मुद्दाम दुर्गा नावाच्या बाईला त्याच्याशी लढण्यासाठी पाठवलं असा या लोकांचा समज आहे. दुर्गेनं छलकपट करत महिषाला मारलं तो दिवस म्हणजे दसरा. दसर्‍यानंतर पाच दिवसांनी महिषा असुराचा स्मृती दिवस पाळतात. हिंदुंच्या दुर्गा पूजेचा आनंद असुरांसाठी मात्र त्यांच्या पूर्वजाच्या हत्येचा शोक घेऊन येतो. स्वतःच्या ‘असूर’ या ओळखीला जपत पुन्हा दुर्गा पूजेच्या उन्मादाला शांतपणे पाहणं वर्षानुवर्ष त्यांच्या वाट्याला आलंय.

झारखंडच्या जमिनीवर सखुआची जंगलं सगळीकडे पसरलीत. चकचकीत पोपटी रंगाची पानं असलेल्या सखुआचं लाकूड खूप चांगल्या प्रतीचं मानलं जातं. इथल्या वेगवेगळ्या जमातींमध्ये आदिवासी या सखुआच्या झाडांनाच भगवान मानतात. त्यांच्या ‘सरना धर्मा’मध्ये या सखुआची पूजा होते, त्याच्या सावलीची गाणी गायली जातात. रात्री जंगलातून एकेकटं परत यावं लागलं तर वाटेच्या दोन्ही बाजूला असलेली ही झाडं त्यांना आधारासारखी वाटतात. उराऊं भाषेतलं हे गाणं आम्ही तमाडला येता जाता म्हणायचो-

‘चला टोंका कलोवारी डहरिनु येनि येकेला, डहरिनु येनि येकेला,

साथची की चला आयो निन्यमकी अंबरी, साथची की धरमबाबा’

‘मी रस्त्यावरून जाणारा एकटा वाटसरू आहे, माझ्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत रहा’ असं सखुआच्या झाडांना घातलेलं साकडं हीच प्रार्थना असते इथली.

इथले आदिवासी पुन्हा-पुन्हा सांगत राहतात, ‘आम्ही हिंदू नाही!’ मात्र कितीतरी वेळा संघटितपणे विरोध करूनही अजूनही जनगणनेत, सरकारी कागदपत्रांमध्ये आदिवासी जमातींच्या नावाआधी ‘हिंदू’ असं लिहिलं जातं. गेल्या दहा बारा वर्षांत इथल्या सखुआच्या झाडांखालच्या ‘सरना पूजे’च्या ठिकाणी कुठल्यातरी हिंदू देवाची मूर्ती आणून ठेवली जाते आहे. पाठोपाठ हळूच मंदिर येतं. इथले गावोगावचे स्थानिक देव मग बळेच रामाचा किंवा शंकराचा अवतार होतात. घराघरावर भगवे झेंडे आणून लावले जातात. वर्षाकाठी होणार्‍या जत्रा बजरंगबलीच्या नावाखाली भरू लागतात. धर्मांतर होऊन ख्रिश्चन झालेल्या आदिवासींच्या घरवापसीची मोहीम वेगाने सुरू होते. आणि मग एक दिवस गावातल्या हिंदू-मुस्लिम मित्रांच्या भांडणात जमाव एकाएकी हिंसक होत मुस्लिम तरूणाचा जीव घेतो. गेल्या दोन महिन्यात झारखंडमध्ये मॉब लिंचिंगच्या सर्वाधिक घटना घडल्यात. नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या हिंदुकरणाचा हा परिणाम आहे. गावांगावांमध्ये हिंदू-मुस्लिम, हिंदू-ख्रिश्चन तणाव पराकोटीचा आहे.

शाळांमध्ये बिगरआदिवासी शिक्षक आदिवासी मुलींना हॉस्टेलमध्ये दुर्गेचा फोटो लावून पूजा करायला शिकवतात. कुणी आजारी पडलं तर गावातल्या बुवाला बोलावून गंगाजळ शिंपडून सामूहिक हनुमानचालिसा पठण करतात. काही शिक्षक तर ‘या जंगली पोरांना शिकवून उपकार करतंय सरकार, यांनी जाण ठेवायला नको का काही’ असं बिनदिक्कतपणे मुलांसमोर म्हणतात. दहा वर्षं शाळेत घालवल्यानंतर मुलं आपापली बोलीभाषा बोलायला लाजतात. घरीसुद्धा हिंदी बोलायचा हट्ट धरतात. शाळेतलं शिक्षण जशी नवी स्वप्नं घेऊन येतं तसे हे नवे पेचसुद्धा त्यातून जन्मतात.

इथल्या मूळ संस्कृतीमध्ये स्त्रीपुरूष संबंध खूप मोकळे, निरोगी आहेत. काही जमातींमध्ये गावातली सगळी तरूण मुलंमुली एकत्रच राहतात. पुढे त्या गटातल्या दोघांना लग्न करावंसं वाटलं की ते आपलं वेगळं घर बांधून राहू लागतात. पैसे जमल्यावर लग्न होतं. चार पाच दिवस नाचगाणी चालतात. नागपुरिया- सादरी गाण्यांवर सगळ्या जमातींची मुलंमुली एकत्र भान हरपून रात्रभर नाचतात. हातात हात धरून ‘झुमर’ करून गोलांमध्ये ठेका धरतात. गावच्या जत्रांना, दुसर्‍या गावी बाजाराला अनेकदा तरूण मित्रमैत्रीणी एकत्रच जातात. त्यांच्या मैत्रीविषयी कोणाला काही आक्षेप असण्याचा प्रश्नच नसतो. झारखंडमधली स्थानिक दारू म्हणजे ‘हांडिया’. इथल्या जगण्याचा तो अविभाज्य भाग आहे. लग्नांमध्ये, सणावाराला बायका-पुरूष, म्हातारेकोतारे सगळे मिळून हांडिया पितात. दारू पिऊन मारहाण करणारा नवरा मात्र आदिवासी कुटुंबांमध्ये दुर्मिळ आहे, कारण नवरा मारत असेल तर इथं बायकोसुद्धा त्याला मारू शकते.

तमाडजवळच्या बारपांडे नावाच्या गावात आमच्या शाळेतल्या कल्याणीच्या घरी मी गेलते. या आसपासच्या गावांमध्ये बस अजून पोचली नाही. शाळेच्या गार्डभय्याच्या बरोबर त्याच्या मोटरसायकलवर आम्ही गेलो. उलिहातू-सोनाहातू या डोंगरांच्या पायथ्याशी कल्याणीचं गाव. जंगलाला अगदी लागून. सहज जाता येता हरणं आणि हत्ती दिसत राहतात. आदिवासींच्या नजरेत त्यांचं अस्तित्व हे निसर्गाच्या मोठ्या गोधडीतल्या एका धाग्यासारखं आहे. या गोधडीचा इथले प्राणीपक्षी, किडे, मुंग्या झाडंझुडुपंही तितकाच महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे इथल्या रोजच्या जगण्यात प्रत्येक जिवाच्या जगण्याचा आदर जाणवत राहतो. सोनाहातूचा डोंगर माळ दिवसा माणसांचा आणि रात्री हत्तींचा, असा माणूस आणि हत्तींमधला समंजस, मूक करार आहे. म्हणून रात्रीचं कुणी घराबाहेर पडत नाही. पहाटेच्या दरम्यान हत्ती जंगलात परततात आणि डोंगर माणसांचा होतो.

कल्याणीच्या घरामागच्या वाटेला आम्ही पोचलो तर डोंगरावरून बकऱ्या घेऊन कल्याणी येत होती. डोंगरावरूनच ‘राहीदीदी!’ अशी हाक मारून ती पळत आली. घराकडे घेऊन गेली. मातीच्या भिंतींवर काळा गिलावा दिला होता. इथे वेगवेगळ्या जमातींची घरं त्यांच्या भिंतींवरून ओळखली जातात. असुरांच्या घरांच्या भिंती काळ्या रंगाच्या, उराऊं लोकांच्या भिंती पांढर्‍या आणि ‘हो’ लोकांच्या भिंती फुलापानांची नक्षीदार! कल्याणीच्या घराला बांबूचं कुंपण होतं आणि अंगणात चार-पाच कोंबड्या होत्या. बाहेर तिचे आईबाबा खाट विणत बसले होते. तिनं आईबाबांना माझी ओळख करून दिली. दोघं माझ्याशी सादरी भाषेत बोलू लागले. तिच्या आईने भरपूर साखर घालून काळा चहा केला आणि माझी चौकशी केली. ‘माझं अजून कसं लग्न झालं नाही’ म्हणून त्यांना काळजी वाटत होती. जंगलातून वेचून आणलेले पुट्टू नावाचे मशरूम त्यांनी पिशवीत बांधून दिले. ‘घरी सगळ्यांना खाऊ घाल’ म्हणाल्या. मग मी आणि कल्याणी डोंगरावरचं कुलकुलीचं मंदिर पाहायला गेलो. डोंगरावरच्या सरना स्थलाजवळ कुलकुली म्हणून दगडांची रांग आहे. सरना पूजेनंतर लोक कुलकुलीलाही फुलं वाहायचे. गेल्याच वर्षी कुलकुलीभोवती सिमेंटचं मंदिर बांधलं आणि कुलकुली शंकराचा अवतार झाली. आता गावची जत्रासुद्धा शंकराच्या नावानेच भरते. बाहेरच्या गावांमधून बजरंग दलाचे लोक येतात, घराघरावर भगवा लावतात. इथल्या आदिवासींच्या अनेक जमातींमध्ये बायका ब्लाउजशिवाय अर्धी साडी नेसतात. कल्याणी मात्र सलवार कमीज ओढणीत होती आणि तिची लग्न झालेली मोठी बहिण ब्लाउज-पाचवारी साडीत. ‘अब लोगों की नजर खराब हो गयी दीदी. पहले तो हम स्कर्ट पहनते थे!’ ती सांगत होती. अंधार वाढू लागला. कातर आवाजात कल्याणी म्हणाली, ‘चल दीदी, हत्ती जंगलातून निघालेत, जाऊ या.’

बेमौसम फुललेल्या पलाशच्या रानातून अवेळी हत्ती बाहेर पडले होते. आम्ही घाईघाईत घराकडे निघालो होतो…

  • राही श्रुती गणेश

[email protected]

(लेखिका सध्या दिल्लीला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत आहेत)

Previous articleपॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था
Next articleहिंसेची पाळंमुळं संस्कारातच!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.