याज्ञसेनी द्रौपदी

महाभारतातल्या स्त्रिया: भाग पाच

-मिथिला सुभाष

विवाहित स्त्री ही तिच्या नवऱ्याचा ‘मान’ असते असं म्हणतात, पण द्रौपदी मात्र ‘अपमानाचा डाग’ होती. महाभारतातलं तिचं सगळं अस्तित्वच चटक्यासारखं दिसतं. कापराचा चटका, मागे धूर, राख काहीही न सोडणारा, पण जिकडे लागला तिथे कायमस्वरूपी टिकणारा चटका!

सामान्य वाचकांना द्रौपदीचे खूपसे अभिमानिनी, थोडेसे उद्धट, लावण्यवतीचे रूप माहीत असते. ती सौंदर्यशलाका होती, तिचे केस अतिशय दाट, मऊ आणि तिच्या टाचेपर्यंत पोचणारे होते. वस्त्रहरणाच्या वेळी पूर्ण निर्वस्त्र झाल्यावर तिने स्वत:चं शरीर या केसांनीच लपेटून घेतलं होतं. तिच्या शरीराला कमळाचा सुगंध यायचा. ती रंगाने सावळी होती. म्हणून कृष्णा. यज्ञकुंडातून जन्मली म्हणून याज्ञसेनी. द्रुपदाची मुलगी म्हणून द्रौपदी. पांचाल देशाची राजकन्या म्हणून पांचाली. पण तिचे पाळण्यातले नाव कृष्णाच. द्रौपदीच्या जन्मापासून तिच्या मृत्यूपर्यंत तिचं अवघं जीवन अतिशय सनसनीखेज आणि अलौकिक गोष्टींनी भरलेलं आहे. यज्ञकुंडातून जन्म, एकावेळी पाचांशी लग्न, भर सभेत वस्त्रहरण, एका दिवसात पाच तरुण मुलांचा अश्वथाम्याने केलेला वध, ही काही उदाहरणे पाहिली तरी छाती दडपायला होते. आपण जे ऐकू शकत नाही, ते तिने भोगले, आणि मग हे दिसल्यावर ‘आंधळ्याचा मुलगा आंधळा’ म्हणणारी द्रौपदी मागे पडते आणि
अहल्या, द्रौपदी, तारा, कुंती, मंदोदरी तथा। 
पंचकन्या: स्मरेन्नित्यं महापातकनाशम्॥ 
या श्लोकातली द्रौपदी लक्षात राहते!

पांचाल नरेश द्रुपदाने केलेल्या यज्ञातून धृष्टद्युम्न, द्रौपदी आणि शिखंडीचा जन्म झाला. एक पुरुष, एक स्त्री आणि एक तृतीयपंथी. ‘आमच्याकडे सगळं होतं,” असं मानणारे संस्कृतीरक्षक असेही म्हणतात की ही तिन्ही अपत्ये म्हणजे त्याकाळी झालेल्या टेस्ट ट्यूब बेबीज होत्या. म्हणून निसर्गाने बनवलेली तिन्ही लिंगे जन्माला आली. पण आपला हा विषय नाही. हा नपुसकलिंगी शिखंडी म्हणजे मागच्या जन्मातली अंबा. त्याच्याच मागे उभा राहून अर्जुनाने भीष्मावर शरसंधान केलं आणि समोर अर्धी स्त्री आहे म्हणून भीष्म शस्त्र न चालवता शरपंजरी पडला. अंबेचा सूड पूर्ण झाला. एकातून एक आठवत राहिलं की माझी अवस्था देखील कीर्तनकारासारखी होते. असो.

अयोनिजा द्रौपदी जन्मापासून लग्नापर्यंत लाडाकोडात वाढली. लग्नानंतर मात्र तिची भावनिक परवड सुरु झाली. पण जी माणसं मानी असतात ती दु:खाचे प्रदर्शन करत नाहीत. तशी होती द्रौपदी. पाच नवऱ्यांना एक समान प्रेम करणं सोपं नसणार. पण तिने (तिचा शेवटचा क्षण वगळता) कधीच त्या पाच जणात भेदभाव केला नाही. धर्माने तिला जुगारात लावलं, तिची विटंबना झाली. त्यानंतरही त्याच्याशी बायकोसारखे वागत राहणे तिला कठीण नसेल गेले? अर्जुनाने सुभद्रेशी लग्न केलं, भीमाची हिडींबा होतीच, त्याबद्दल अवाक्षर काढण्याची प्राज्ञा होती द्रौपदीची? नकुल-सहदेव तिच्यापेक्षा बरेच लहान होते, त्यांच्या सहवासात तिला कधीच अवघड वाटलं नसेल? पण त्या प्रत्येकाबरोबरच्या एका वर्षाच्या सहवासात तिला पाच मुलगे झाले. त्यापैकी ‘कोण कुणाचा’ हे तिला माहीत होतं, पण त्या पाचही जणांना आपला नेमका बाप कोण हे माहीत नव्हतं. आपल्या मुलांच्या डोळ्यात कधी तिला प्रश्न दिसले नसतील?

लग्न करून हस्तिनापुरी गेल्यावर पहिला द्यूताचा प्रसंग. वस्त्रहरण. त्यावेळी कर्णाने तिला वेश्या म्हंटलं, दुर्योधनाने तिला धोतर वर करून मांडी दाखवली. त्यानंतर देश-निकाला. मग दुसऱ्यांदा द्यूत. त्यात हरल्यावर बारा वर्षाचा वनवास, एक वर्षाचा अज्ञातवास. वनवासात कौरवांची सख्खी बहीण दु:शलाच्या नवऱ्याने – जयद्रथाने तिला पळवून नेलं. पुन्हा अपमान. भीमाने तिला सोडवलं. अज्ञातवासात कीचकाने तिच्यावर वाईट दृष्टी ठेवली. ती आपल्याला बधत नाही हे बघून त्याने भर दरबारात तिच्या दोन मांड्यांच्या मधे लाथ मारली. तिथे हजर असलेला युधिष्ठिर तिला म्हणाला तू आत जा, पण भीमाने त्या रात्री कीचकाचा वध केला. ती बघत होती, तिच्यासाठी नेहमी भीमच धावून येत होता. नंतरच्या निर्णायक युद्धात भीमानेच दु:शासनाची छाती फोडली आणि तिथलं रक्त द्रौपदीच्या मोकळ्या ठेवलेल्या केसांना लावून तिची प्रतिज्ञा पूर्ण केली. दुर्योधनाने जी मांडी दाखवली ती मांडी भीमानेच फोडली. स्त्रीला प्रौढत्व आल्याशिवाय कुणावर प्रेम करावं ते कळत नाही. नंतर मात्र द्रौपदीने भीमावर जीवापाड प्रेम केलं आणि जीव सोडतांना त्याला सांगितलं, “पुढच्या जन्मी थोरला हो!” पण हे ती असत्या आयुष्यी बोलू शकली नाही. एवढी दु:खं, एवढे अपमान कुठल्या स्त्रीच्या वाट्याला आलेले माहीत आहेत??

द्रौपदी नुसती सुंदर नव्हती. ती संसारी, बुद्धिमान, चाणाक्ष आणि प्रेमळ होती. म्हणूनच तिने सुभद्रेला सांभाळून घेतलं. वस्त्रहरणाच्या वेळी तिने विचारलेल्या प्रश्नांनी भीष्मादी वृद्धांची पण बोबडी वळली होती. या घटनेनंतर द्रौपदी त्या पाच पांडवांच्या प्रतिष्ठेवर लागलेला ‘अपमानाचा डाग’ झाली. थोरल्या धर्माने तर तिच्याशी बोलणंच टाकलं. सुभद्रेशी लग्न झाल्यावर अर्जुन तिला वचकून असायचा. नकुल-सहदेव आयुष्यभर तिच्याबाबतीत कन्फ्युजलेले! राहता राहिला भीम. पण तो प्रेमप्रणय वगैरे बाबतीत शून्य. म्हणजे पाच नवऱ्यांची बायको असून हिचं मन प्रेमासाठी आसुसलेलंच. पण बाईच्या मनाला किंमत ती किती द्यायची? नवऱ्यांनी नाहीच दिली, सासूने पण नाही दिली. पाच बलदंड पोरग्यांच्या तावडीत सापडलेली सुकुमार द्रौपदी कशी जगेल हा विचार केला कुंतीने?

हे सुद्धा नक्की वाचा – कुंती-माद्री: सत्व आणि सावली https://bit.ly/3cgBFPG

महाभारत युद्धानंतर छत्तीस वर्षे ती महाराणी होती. पण डोळ्यासमोर पाच तरुण मुलांचा एकाच दिवशी मृत्यू झालेला पाहिलेली कुठली आई सुख उपभोगू शकली असती?? शिवाय कृष्णाचा दुर्दैवी अंत झालेला होता. (सगळे यादव तेव्हापासून जे आपसात भांडत बसले ते अजूनही भांडतायत.) अखेर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून हे सहाजण वानप्रस्थाला गेले. अभिमन्यू म्हणजे अर्जुन-सुभद्रेचा मुलगा. ज्याला चक्रव्यूहात घेरून मारून टाकलं होतं. सुमेरू पर्वतावर चालत असतांना सगळ्यात आधी पडली द्रौपदी. युधिष्ठिर म्हणाला, ती दाखवत नसली तरी तिने आपल्या पाच जणांवर कधीच एकसमान प्रेम केलं नाही, म्हणून ती पडली, सोडा तिला तिथेच आणि पुढे चला. युधिष्ठिर तिच्याकडे न पाहता पुढे गेला. इतकं निर्ढावलेले काळीज असायला बहुतेक पुरुषच व्हावं लागत असेल. त्यानंतर एक एक करत चारी भाऊ पडले. धर्मराज युधिष्ठिर सदेह स्वर्गात पोचला. तिथे त्याने यमराजाला सांगितलं, माझे चार भाऊ आणि पत्नी वाटेत मरून पडलेत. त्यांनाही सदेह स्वर्गात प्रवेश करण्याची अनुमती मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्यावर यम म्हणाला, तुझी बायको सगळ्यात आधी आलीये इथे आणि तिच्या पुण्याईने तुम्ही पाच इथे राहणार आहात. अशी होती द्रौपदी!

प्रत्येकाला द्रौपदी अभिमानिनी वाटते. तशी ती होतीच, पण एक स्त्री म्हणून तिच्या मनाचा विचार केव्हा, कुणी केला? ‘माझ्या पाची मुलांशी तू लग्न करायचं’ असं जेव्हा कुंतीने सांगितलं तेव्हा कुणी होतं तिच्या बाजूने? ती तर तेव्हा तिच्याच बापाच्या राज्यात होती. त्यानेच तिची पाच लग्न लावून दिली. कुरु राज्याशी संबंध येणार, एवढा एकच विचार केला ना त्याने? ‘मला अर्जुनाने जिंकलं आहे. मला तोच जास्त आवडतो,’ हे बोलू शकली द्रौपदी? नाही! त्यानंतर रोज एकासोबत रात्र घालवतांना तिचं शरीर थकलं म्हणून कुंतीने हा नियम एका वर्षाचा केला. पहिली दोन वर्षे धर्म-भीमासोबत काढून तिसऱ्या वर्षी अर्जुन तिच्या वाट्याला आला. ते वर्ष झाल्यावर, आता काही पुन्हा ही आपल्याला चार वर्षे मिळणार नाही, हे बघून अर्जुन सरळ चालता झाला. उलूपी आणि चित्रांगदाशी लग्न करून त्यांना एक-एक अपत्य देऊन, द्वारकेत जाऊन सुभद्रेशी लग्न करून तिला घेऊन परत आला. सुभद्रा शहाणी. मी फक्त तुझीच पत्नी बनून राहीन, या एकाच अटीवर तिने अर्जुनाशी लग्न केलं. ही अर्जुनाची वाट पाहत होती आणि तो अर्ध्या वयाच्या दुसऱ्या बायकोला घेऊन आला, तेव्हा द्रौपदीच्या मनाचा विचार झाला? इतर सगळ्यांनी जाऊच दे, कृष्ण तर तिचा जिवलग होता, सखा होता. तिच्या प्रिय अर्जुनाला सुभद्रेशी लग्न करण्यासाठी त्याने चक्क उचकवलं होतं. तेव्हा त्याने तरी केला द्रौपदीच्या मनाचा विचार??

खूप दु:ख सहन केलेलं माणूस निर्विकार होऊन जातं. अग्नीसारखं निर्विकार. त्यात जे पडेल त्याचं भस्म होतं. द्रौपदी तर यज्ञकुंडातून जन्माला आली होती. तेज तिच्या अस्तित्वातच होतं. पण तिच्या नियतीने तिला कधीच तळपू दिलं नाही, फक्त ‘जाळत’ राहिली तिला. शेवटी पाचही जणांना स्वत:च्या पुण्याईने सोबत घेऊन स्वर्गात गेली.

[email protected]

हे सुद्धा नक्की वाचा –

गांधारी..तिचं चुकलंच..!! पण ती अजाण होती..!!https://bit.ly/3aFk3Nw

अंबा..!! पुरुषप्रधान समाजाचा बळी..!!https://bit.ly/2Jzxy5j  

मत्स्यगंधा..! योजनगंधा..!! सत्यवती..!!https://bit.ly/2UYhJKI

Previous article‘मैत्री’ आली धावून!
Next articleसारेगामाचा डिजीटल सूर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.