सारेगामाचा डिजीटल सूर

-शेखर पाटील

कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून याचा अनेक व्यवसायांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे व्यवसायाच्या पारंपरीक संकल्पना गळून पडल्या असल्या तरी नवीन मार्गांचा अवलंब करून वाटचाल करता येत असल्याचे अनेक कंपन्यांनी दाखवून दिले आहे. याच प्रकारे भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी म्युझिक कंपनी असणार्‍या सारेगामाने (पूर्वाश्रमीची ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेट ) फेसबुक वा स्पॉटीफायसोबत केलेले ग्लोबल डील हे नाविन्याचा सहजपणे स्वीकार करण्याच्या या कंपनीच्या लौकिकाला साजेसे आहे. एलपी रेकॉर्ड, कॅसेट, सीडी/पेन ड्राईव्ह ते डिजीटल प्लेअर व अ‍ॅप्स असा प्रवास करत आता सारेगामा डिजीटल विश्‍वात जोरदार आगेकूच करत असल्याचे चित्र असून ते नक्कीच अभ्यासनीय आहे.

सध्या लॉकडाऊनमधून थोडी शिथिलता मिळत असल्याने जीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे. विविध व्यावसायिकही मध्यंतरीची नाऊमेद झटकून आपापला उद्योग, व्यापार वा सेवा आदींना आधीप्रमाणे सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या कोलाहलात काही दिवसांपूर्वी घडलेल्या काही अतिशय महत्वाच्या घटना आपल्या नजरेतून सुटून गेल्याची शक्यता आहे. यातीलच एक घटना म्हणजे फेसबुकने सारेगामासोबत केलेले ‘ग्लोबल डील’ होय. याच्या अंतर्गत या कंपनीकडे कॉपीराईटचे अधिकार असणारी गाणी व संगीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मुक्तपणे वापरण्याची संधी युजर्सला मिळणार आहे. तर याच्या बदल्यात सारेगामाला रॉयल्टी मिळणार आहे. या व्यवहाराबाबत माहिती समोर आली नसली तरी फेसबुक व इन्स्टाग्रामचा महाकाय युजर्स बेस पाहता सारेगामाला यातून चांगले उत्पन्न मिळेल, हे अपेक्षित आहे. अर्थात, यामुळे या कंपनीचा शेअर गत काही दिवसांमध्ये चांगलाच वधारल्याचे दिसून येत आहे.

सारेगामाचा फेसबुक सोबतचा करार हा अनेक अर्थांनी लक्षणीय असा आहे. एक तर अलीकडेच सारेगामाने स्पॉटीफाय या म्युझिक स्ट्रीमिंग कंपनीसोबत याच प्रकारातील करार केला आहे. या पाठोपाठ आता फेसबुकनेही याच प्रकारचे डील केल्याने सारेगामा आता डिजीटल विश्‍वात रग्गड कमाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सारेगामाची ही लवचिकता तशी आश्‍चर्यकारक नाही. कारण ही कंपनी काळाची पावले अचूकपणे ओळखण्यासाठी ख्यात आहे. १९०२ साली देशात ध्वनीमुद्रीत झालेली पहिली रेकॉर्ड असो की, १९३१ साली प्रदर्शित झालेला देशातील पहिला बोलपट यांचे रेकॉर्डीग त्यांनीच केले होते. नंतरही या कंपनीने सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतला आहे. यामुळे सारेगामाकडे आज विविध भारतीय भाषांमधील तब्बल एक लाखांपेक्षा जास्त गाणी आणि संगीताचे अधिकार आहेत. भारतातील निम्म्या संगीताचे स्वामित्व सारेगामाकडे आहे. तर याच्या विक्रीसाठी आवश्यक असणारे कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे. अनेक दशकांपर्यंत एलपी रेकॉर्डच्या माध्यमातून (एचएमव्ही ब्रँड !) त्यांनी संगीताची विक्री केली. यानंतर उण्यापुर्‍या दीड-दोन दशकांपर्यंत ऑडिओ कॅसेटस विकल्या. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सीडीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत संगीत पोहचवले. मध्यंतरी पेन ड्राईव्हमध्ये संगीताचे आकर्षक पॅक विकले. यानंतर विक्रीत साचलेपणा वाटू लागल्यानंतर त्यांनी ‘कारवा’ या डिजीटल प्लेअरला लाँच केले. याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून याला अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे. भारतीयांच्या भाव जीवनाशी एकरूप झालेल्या रेडिओचे बाह्यांग वापरून त्यांनी सादर केलेला हा डिजीटल म्युझिक प्लेअर तुफान लोकप्रिय झाला असून याला आजही खूप मागणी आहे. तर स्वतंत्र म्युझिक स्टोअर (https://www.saregama.com/musicstore ) आणि अ‍ॅपच्या माध्यमातूनही या कंपनीचे संगीत उपलब्ध आहे. युट्युब, गाना आदींसह १०० पेक्षा जास्त डिजीटल पार्टनर्सच्या माध्यमातून गाणी व संगीताच्या विविध प्रकारांपासून ते कॉलर ट्युन्सपर्यंत कमाईचे मार्ग त्यांनी आधीच शोधून ठेवलेले होते. यात आता फेसबुक सारख्या बलाढ्य पार्टनरची भर पडणार आहे.

याचाच अर्थ असा की, सारेगामाने आपल्या कटेंटच्या दर्जावर भर देतांना याच्या डिलीव्हरीकडे जरा देखील दुर्लक्ष केले नाही. म्हणजे त्यांनी उत्पादन आणि मार्केटींग या दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळल्या आहेत. यामुळे एकच कटेंट हे विविध स्वरूपात वापरून यापासून उत्पन्न मिळवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. खरं तर पायरसीमुळे अनेक म्युझिक कंपन्या लयास गेल्या असून बर्‍याचशा जेरीस आलेल्या आहेत. तर सारेगामाने मात्र सर्व आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला असून यात त्यांच्या लवचिकतेचा मोठा वाटा आहे. आज सीडी वा स्मार्टफोन अ‍ॅपसारखी स्वत:ची डिलीव्हरी सिस्टीम त्यांनी विकसित केली आहे. याच्या जोडीला ‘कारवा’सारख्या उपकरणापासून ते फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या डिजीटल मंचावरील रॉयल्टीतून उत्पन्नाचे मार्ग त्यांनी तयार केले आहेत. फिजीकल ते डिजीटल या सर्व माध्यमांमधून ते पैसे कमावत आहेत. तर, सारेगामाच्या लवचिकतेच्या पार्श्‍वभूमीवर मुद्रीत माध्यमाची तुलना केली असता आपल्याला लवचिकतेचा अभाव हा फरक स्पष्ट दिसतो. अनेक दशकांपासून कागदाच्या पलीकडे आपले उत्पादन पोहचवण्याची प्रणाली विकसित करण्यात अनेक वर्तमानपत्रे अयशस्वी ठरली असून कोरोनाचा त्यांना जोरदार फटका बसणार आहे. तर नाविन्याचा स्वीकार करणारी व लवचिक राहणारी वर्तमानपत्रे यात टिकून राहतील ही बाब उघड आहे.

आता सारेगामा सोबतच्या करारामुळे फेसबुकवर नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेणे देखील मनोरंजक ठरणार आहे. फेसबुक व याची मालकी असणार्‍या इन्स्टाग्रामवर आता सारेगामाची गाणी कुणीही कॉपीराईटची धास्ती न बाळगता सहजपणे वापरू शकतील. याआधी कॉपीराईटमुळे एक तर संबंधीत व्हिडीओ डिलीट होत असे वा संगीताचा भाग म्युट करण्यात येत असे. आता मात्र कॉपीराईटचा प्रश्‍न नसल्याने फेसबुक हे अधिक आकर्षक होणार आहे. कुणीही गाण्यांचा वापर हा मुक्त व सृजनात्मक पध्दतीने करून आपले व्हिडीओ, स्टोरीज वा म्युझिक स्टीकर्स हे आकर्षक करू शकणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे फेसबुकच्या प्रोफाईलवर लवकरच गाणी वापरता येणार आहे. या सर्व बाबी युजर्सच्या एंगेजमेंटसाठी उपयुक्त ठरतील ही बाब उघड आहे. तर याच्याच बळावर फेसबुक हे टिकटॉकला जोरदार टक्कर देण्याची शक्यता देखील आहे. याबाबतच्या हालचाली आधीच सुरू झालेल्या आहेत. फेसबुकने आधीच टी-सेरीज, झी आदींसोबत करार केला असून यात आता सारेगामाची भर पडल्याची बाब लक्षणीय आहे.

आणि हो- ज्या प्रकारे फेसबुकने सारेगामाकडून संगीताचे हक्क खरेदी केले. अगदी त्याच प्रमाणे विविध वर्तमानपत्रांकडून बातम्या खरेदी केल्यास काय होईल ? आज अशक्य कोटीत वाटणारा हा विचार येत्या काही वर्षांमध्ये प्रत्यक्षात साकार होईल हे माझे भाकीत आहे. एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगतो. जळगावची आजची लोकसंख्या अंदाजे ४५ लाख असल्याचे धरूया. यात फेसबुक/व्हाटसअ‍ॅप/इन्स्टाग्रामचे एकत्रीत युजर्स नक्कीच १०-१२ लाखांच्या आसपास (खरं तर जास्तच!) असतील. या युजर्ससाठी फेसबुक हे जळगावातील दर्जेदार काँटेंट असणार्‍या स्थानिक मीडिया हाऊसेसकडून मजकूर घेऊन त्यांना स्थानिक अपडेटस देऊ शकते. फेसबुक हे मीडिया हाऊस नसून टेक कंपनी असल्याचे मार्क झुकरबर्ग नेहमी म्हणत असतो. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्याने आढेवेढे घेऊन का होईना…फेसबुक ही मीडिया कंपनी असल्याचे कबूल केले होते. यामुळे स्थानिक प्रसारमाध्यमांच्या जोडीने फेसबुक स्वत:चे नवीन माध्यम विकसित करेल असा अनेक तज्ज्ञांचा अंदाज असून याकडे कुणाला दुर्लक्ष करता येणार नाही.

सर्वात शेवटी– आपण हायब्रीड जगात वावरत असल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे. फिजीकलला डिजीटलची जोड असेल तर कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आपत्तीतून बचाव करता येत असल्याचे सारेगामाने दाखवून दिले आहे. मात्र ही लवचिकता कोरोनामुळे गलीतगात्र झालेल्या मुद्रीत माध्यमाकडे येईल का ? हा खरा प्रश्‍न आहे.

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

Previous articleयाज्ञसेनी द्रौपदी
Next articleभारतीयांना नवजीवन देणाऱ्या ‘मान्सून’ चा वेध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.