योगी भांडवलदार (भाग ५)

(सौजन्य -बहुजन संघर्ष )

(अनुवाद – प्रज्वला तट्टे)

३० नोव्हेंबर २०१० ला रामदेव आणि राजीव दीक्षित यांनी देशपातळीवरची भारत स्वाभिमान यात्रा सुरू केल्यावर दोनच महिन्यांनी दिक्षित छत्तीसगडच्या बेमेतारा येथे आर्यसमाजच्या गेस्ट हाऊसच्या न्हाणीघरात कोसळले. तिथं ते व्याख्यान द्यायला गेले होते. राजीवचे भाऊ प्रदीप म्हणतात, “राजीव सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला. त्यावेळी ते राजीवना दवाखान्यात नेत होते. मी राजीव सोबत बोलू शकलो नाही कारण ते म्हणाले ते बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मी दुसऱ्या दिवशी पोहचलो तेव्हा माझा भाऊ मरण पावला होता’. पण आस्था चॅनेलवर रामदेवबाबानं सांगितलं, ‘मी राजीवना फोनवर जवळपास एक तास समजावत राहिलो, किमान एक तास! आता शरीर साथ देत नाही आहे तर..त्यांना बहुतेक हा आजार अनुवांशिक होता…बी पी, शुगर, हृदयरोग…तीनही.’ राजीवसोबत एक तास भर बोलून त्यांच्या दुखण्यावर त्यांनी कोणतं औषध घ्यावं ते रामदेव म्हणे त्यांना समजावून सांगत होते. आता प्रदीप दीक्षित बुचकाळ्यात पडले आहेत की त्यांच्याशी काहीएक बोलू न शकणारा त्यांचा भाऊ रामदेवशी अख्खा एक तास कसे काय बोलू शकला? आणि राजीव यांना रामदेव म्हणतो त्याप्रमाणे न कोणता आजार होता न त्यांनी काही औषधं घेतली होती.

रामदेवनं दीक्षित कुटुंबियांना राजीवचा अंत्यविधी वर्धेला करण्याऐवजी हरिद्वारला करण्याची गळ घातली. दुसऱ्यादिवशी मदन दुबे सहित स्वदेशी आंदोलनातले शेकडो कार्यकर्ते हरिद्वारला पोहचले. पतंजली योगपीठ २ च्या भव्य हॉल मधे बर्फाच्या लादीवर राजीवचं पार्थिव ठेवून होतं. शरीर भगव्या-पांढऱ्या वस्त्रानं झाकलं आणि झेंडूच्या फुलांनी आच्छादित होतं. फक्त चेहरा तेवढा दिसत होता. नाकपुड्यांमध्ये कापसाचे बोळे होते. पण बघणाऱ्यांना काही तरी फार खटकत होतं. राजीवचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. वेगळाच निळा जांभळा झालेला होता. त्वचा पोपड्यांसारखी सुटत होती. काळं-निळं रक्त नाकाशी साकळलं होतं. हे बघून उपस्थितांमध्ये धुसफूस सुरू झाली. येणाऱ्यांची संख्या वाढली तशी राजीवच्या संभाव्य खुनाची चर्चा जोर पकडू लागली. शेवटी दुबे यांनी मोठ्या आवाजात ‘इथे कुणाला postmortem झालं पाहिजे असं वाटतंय का?’ म्हणून विचारलं. रामदेवला उद्देशून लिहिलेल्या postmortemची मागणी करणाऱ्या निवेदनावर पन्नास जणांनी सह्या केल्या. पण हॉल मधला शिपाई त्यांना रामदेवबाबाला भेटू देईना. जोवर रामदेवला भेटू देत नाही तोवर पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ देणार नाही असा पवित्रा घेतल्यावर रामदेव कडून त्यांना दुसऱ्यादिवशी सकाळी त्याच्या निवासस्थानी भेटण्याची वेळ दिली गेली.

Postmortem चं निवेदन घेऊन दुबे आणि काही कार्यकर्ते रामदेव राहत असलेल्या वास्तूत गेले. तिथं बैठकीच्या खोलीत प्रवेश देताना त्यांच्याकडून मोबाईल काढून घेण्यात आले (किरीट मेहतांशी बैठकीच्या वेळी केलं तेच). तिथं तास भर राजीवनिष्ठ कार्यकर्ते आणि रामदेव यांच्यात वादविवाद झाला. रामदेव म्हणे, ‘ राजीवला कुणी का मरेल? राजीवचा मृत्यू नैसर्गिकच आहे. शिवाय हिंदू धर्मात शरीराची चिरफाड मान्य नाही’. दुबे म्हणे, ‘राजीवची लोकप्रियता, त्यांच्याकडे मोठ्या संख्येनं भेटायला येणाऱ्यांची संख्या पाहून तुमच्या गोटातल्यांचा जळफळाट होत होता, म्हणून तुमच्या लोकांनी घातपात केला असू शकतो. म्हणून तुम्हाला postmortem होऊ द्यायचं नाही. राजीव स्वतःला निधर्मी म्हणत. त्यामुळं postmortem झालंच पाहिजे.’

शेवटी रामदेवनं प्रस्ताव ठेवला, ‘पार्थिव ठेवलेल्या हॉल मधे जाऊन तिथल्या उपस्थितांना विचारू. त्यांनी ‘हो’ म्हटलं तर postmortem करू.’ दुबे आणि कार्यकर्त्यांनी हे मान्य केलं. या बैठकीच्या निवासस्थानापासून पतंजली योगपीठ 2 चा हॉल चालत जाऊन वीस मिनिटांच्या अंतरावर होता. रामदेव कार मध्ये बसून भुर्रर्रकन निघून गेल्यावर वीस मिनिटांनी बाकीचे पोहचले. दुबे आणि कार्यकर्ते जवळ पोहचत असताना त्यांना दुरून राजीव दिक्षितांचं पार्थिव ambulance मध्ये घालून नेताना दिसलं. ‘आम्ही गोंधळलो आणि ambulance ला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला न जुमानता ambulance घाटावर पोहचली तेव्हा जिथे हजारो लोक आधीच हजर होते.’ असं दुबे म्हणतात. घाटावर अचानक प्रदीप दीक्षित कडे वळून रामदेवनं विचारलं, ‘तुम्हाला वाटत असल्यास postmortem करू या’. प्रदीपनं गोंधळून ‘नाही’ म्हटलं.

प्रदीप लेखिकेला सांगतात, ‘मी काय बोलू शकत होतो? घाटावर हजारो लोक जमा झालेले होते. काय म्हणावं मला सुचलंच नाही. उपस्थित माझ्या कानावर काही बाही घालत होते. Postmortem चा अहवाल खोटा येऊ शकत होता. रामदेवशी पंगा घेण्याच्या स्थितीत मी नव्हतो.’ दुबेंनी लेखिकेला सांगितलं, ‘ अंत्यसंस्कारानंतर राजीवचे दोन मोबाईल आणि लॅपटॉप दीक्षित कुटुंबियांना परत करण्यात आला. ही तीनही उपकरणं पूर्णपणे साफ करण्यात आली होती. त्यात कुठलाही डाटा शिल्लक नव्हता. ते राहत असलेल्या खोलीत आम्ही गेलो, तेव्हा तिथलं समान अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. महत्वाची कागदपत्रं तिथून गायब होती. मला खात्री आहे त्यांच्यासोबत घातपातच झाला. त्यांचं पार्थिव मी पाहिलेलं आहे. माझ्या म्हणण्यावर मी कायम आहे…’
३० नोव्हेंबर २०१० मध्ये राजीव दिक्षितांच्या मृत्यबरोबरच रामदेवच्या राजकीय आकांक्षेच्या पुर्ततेत एक अडथळा निर्माण झाला खरा, तरी लगेच एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजारेंच्या लोकपाल-भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात जबरदस्ती सामील होऊन ती आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न रामदेवनं केलाच. ५एप्रिल २०११ ला अण्णा हजारेंनी जंतरमंतरवर सुरू केलेल्या उपोषणानंतर दोन दिवसांनी रामदेवबाबानंही तिथंच उपवास सूरू केला. ‘अण्णा आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ च्या घोषणा दिल्यात. ‘मी पण उपवास करतोय, बघा!’, असं मीडिया समोर म्हणत अंगावरची शाल काढली आणि आतडे आत ओढून सर्वांना बरगड्या दाखवल्या. स्टेज समोरच्या गर्दीनं ते पाहून जल्लोष केला. स्टेजवरचे अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, शांती भूषण, जस्टीस संतोष हेगडे, किरण बेदी सहित सर्व खळखळून हसले. या सर्वांनी मिळून १६एप्रिलला, अण्णांचं उपोषण संपल्यावर ज्या लोकपाल बिलाचा मसुदा तयार केला त्यात जबरदस्ती रामदेवबाबाची एक मागणी- देशाबाहेर अवैध मार्गे पाठवलेला काळा पैसा परत आणून त्याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करणे- घातली गेली. रामदेवची लोकप्रियता पाहू जाता, काँग्रेस सरकारनं ही मागणी मान्यही केली. काँग्रेस मधल्या त्याच मित्रांना ज्यांनी रामदेवला त्याचं पतंजली उभं करण्यात मदत केली होती त्याच काँग्रेस सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या गटात रामदेव सामील झाला होता. मग कॉंग्रेसनही रामदेवच्या जमिनी हडप केल्याचा, दानाच्या स्वरूपातल्या धनाचा गैरवापर केल्याचा आरोप लावायला सुरुवात केली. दिगविजय सिंहांनी त्याला ‘ठग’ म्हटलं, ‘पैशाची हेराफेरी करणारा’ म्हटलं.

या सर्व आरोपांचं खंडन जोरात करतच, ‘आज तक’ या tv चॅनल वर अपल्यावरचे सर्व आरोप खोटे असल्याचं हा बाबा ‘भगवान राम, भगवान कृष्ण, मोहम्मद पैगंबर, आदी शंकराचार्य आणि स्वामी दयानंद महर्षी यांच्या शपथा’ घेऊन सांगू लागला. अण्णांचं आंदोलन लोकपाल साठी होतं पण रामदेव स्वतःची काळ्या धनाची मागणी एकारलेपणे पुढं रेटत राहिला. टीम अण्णातल्या जस्टीस संतोष हेगडे सारख्या ज्यांनी लोकपालाच्या मागणीवर लक्ष केंद्रित केलं, काळ्या धानाच्या मागणीला उचलून धरलं नाही, त्यांच्यावर रामदेवनं टिका केली. ४ जून २०११ मध्ये मग काळ्या धनाच्या मागणीसाठी स्वतंत्र पणे उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली. अण्णांच्या उपोषणाच्या वेळी भारतभरातून २०० शहरांमध्ये कोट्यवधी लोक रस्त्यावर उतरले होते. अण्णांच्या उपोषणाला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा अधिक प्रतिसाद मिळावा म्हणून बाबा ईरेला पेटला. इकडे काँग्रेसचे दिगविजयसिंह सारखे प्रवक्ते जाहीरपणे रामदेवच्या विरुद्ध वक्तव्य करत होते तरी आतून सुबोधकांत सहाय, मंत्री अन्न प्रक्रिया मंत्रालय भारत सरकार ज्यांच्यामुळं रामदेवबाबाचा उद्योग सुरू होऊ शकला, आतून आतून तहाची बोलणी पण करतच होते. काँग्रेसच्या आतल्या गोटात रामदेवचा बोलविता धनी कुणी वेगळाच असल्याची चर्चा जोरात होती. रामदेवनं के एन गोविंदाचार्य (आरएसएस सल्लागार) यांना न भेटण्याची विनंती केली. गोविंदाचार्यांनी ते मान्यही केलं. ‘कारण आम्ही या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, तरी रामदेवच्या आंदोलनाला यश मिळो अशी इच्छा बाळगून होतो’, गोविंदाचार्य लेखिकेला सांगतात.

शेवटी १जून २०११ ला जेव्हा तणाव कळसावर पोहचला, उज्जैनहून एक चार्टर्ड विमान रामदेवला घेऊन दिल्लीत उतरलं. तिथं स्वागतासाठी प्रणव मुखर्जी, सुबोधकांत सहाय, पी के बन्सल आणि कपिल सिब्बल सारखे दिग्गज नेते हजर असल्याचं मुख्य मीडिया चॅनलनं टिपलं. हा रामदेवच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण होता. राजकीय दृष्ट्या पॉवरफुल झाल्याचा तो पुरावा होता.

पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक. प्रत्येक संबंधित व्यक्ती आज वेगवेगळी कथनं देत आहे. मात्र मीडियाला सुगावा लागू न देता सरकार आणि रामदेव मध्ये चर्चा चालू होत्या तरी ४ जूनला उपोषणाला बसण्याचा आपला मनसुबा रामदेवनं जाहीर केलाच.
उपोषणाला बसण्याच्या एक दिवस आधी आपल्या चाळीस हजार अनुयायांसमोर रामदेवनं जाहीर केलं की सरकारनं मागण्या मान्य केल्या आहेत. बालकृष्ण आणि सरकारमध्ये अनौपचारिक तह ल्युटन्स दिल्लीतील क्लारीज हॉटेल येथे झाला असून त्यालाच औपचारिक मसुद्यात रूपांतरित करण्याचं बोललं जात होतं. पण दोन्ही पार्ट्यांचा एकमेकांवर विश्वास नव्हता आणि खाजगीत उपोषण मागे घेण्याचं मान्य करूनही जाहीररीत्या दोघेही एकेकांवर आरोप प्रत्यारोप करतच होते. हा कलगीतूरा चालू असतानाच आंदोलन स्थळी पोलीस जमा होऊ लागले. मध्यरात्री पोलिसांनी झोपलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अश्रूधूर सोडला. घाबरून रामदेवनं स्टेज वरून खाली उडी घेतली. एका महिलेची पांढरी सलवार कमीज घातली. पण दाढी लपेना. तेव्हा ती दुपट्ट्यानं झाकून पळायचा अयशस्वी प्रयत्न केला.

पोलिसांनी या ‘भागूबाई’ रामदेवला ताब्यात घेतल्यावर बदलण्यासाठी भगवी वस्त्रही दिली आणि देहराडूनच्या विमानात कोंबलं. पुन्हा पुढचे पंधरा दिवस दिल्लीत पाय ठेवायचा नाही म्हणून तंबी दिली. पण देहराडूनच्या विमानतळावर उतरल्यावर कॅमेऱ्यांचा सामना करताना रामदेव तेच पांढरं सलवार कमीज घालून होता. ‘युपीएनं माझी काय हालत केली ते पहा’, असा कांगावा रामदेव करत असताना हास्यास्पद वाटत होता. यावेळची रडीचा डाव खेळण्याची रामदेवची खेळी मात्र साफ चुकली… सरकारी यंत्रणा रामदेवच्या सर्व अस्थापनांच्या चौकशीच्या मागे लागल्या. रिजर्व बँक, एन्फोरसमेंट डायरेक्टरेट, सीबीआय आणि आयकर विभाग यांनी बालकृष्ण सहित रामदेवच्या चौतीस कंपन्यांची चौकशी सुरू केली. फेमा अंतर्गत बालकृष्ण विरुद्ध केस चालू आहे आणि गुन्हा सिद्ध झाल्यास बालकृष्णला दोन वर्षांची शिक्षा होईल. सी बी आय नं शंकरदेव यांच्या गायब होण्याची केस सुद्धा पुन्हा उघडली होती. अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत रामदेवनं याला , ‘काँग्रेस आपल्याविरुद्ध घाणेरडं राजकारण करून आपल्याला ड्रग, सेक्स आणि टॅक्स रॅकेट मध्ये फसवण्याचा प्रयत्न करत आहे’ असं म्हटलं. रामदेवच्या या म्हणण्यावर भक्तांचा विश्वासही बसतो. म्हणूनच मग रामदेवनं २०१४च्या निवडणुकीत ‘काँग्रेस हटाव, देश बचाओ’ चा नारा दिला होता. त्यामुळंच काँग्रेसची सत्ता गेली म्हणता येणार नाही, पण भाजप येण्याचा रामदेव आणि कंपनीला फायदा जरूर झाला. रामलीला मैदानावरच्या त्या पलायन नाट्यानं खरं तर रामदेवच्या राजकीय आकांक्षांना खीळ घातली आहे. पण रामदेव माघार घेण्याचं नाव घेत नाही..

 (सौजन्य -बहुजन संघर्ष )
या लेखमालेचे आधीचे ४ भाग याच पोर्टलवर अन्यत्र उपलब्ध आहे
Previous articleगुढीपाडवा….स्वातंत्र्योत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
Next articleदंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.