योगी भांडवलदार ( भाग ६)

सौजन्य – बहुजन संघर्ष
अनुवाद – प्रज्वला तट्टे

हे सर्व राजकीय उतार चढाव सुरू असतानाच रामदेवची श्रीमंती मात्र वाढतच होती. ३१ मार्च २०११ला रामदेवच्या कंपनीनं १६७ कोटींहून ३१७ कोटींवर फायदा गेल्याचं कागदोपत्री प्रथमच दाखवलं. मात्र एप्रिल २०११ मध्ये कंपनीच्या गेल्या दोन वर्षांची सेवा दिलेल्या आय आय एम पदवीधारक सी ई ओनं सी एल कमाल यांनी अचानक राजीनामा दिला. आणखी एक महत्वाच्या पदावरची व्यक्ती गेली. रंग, कापड आणि वीज उद्योगात उतरण्याची रामदेवची स्वप्न त्यामुळं धुळीस मिळतात की काय अशी स्थिती निर्माण व्हायला लागली तेव्हा एस के पात्रा या आयआयटीयन आणि भानू फार्मसच्या सी ई ओ ला रामदेवनं आपली कंपनी सांभाळायला बोलावलं.
पत्रा पतंजलीत रुजू झाले तेव्हा रामदेवच्या चार ट्रस्टचं जाहीर केलेलं टर्न ओव्हर ११०० कोटी होतं, याव्यतिरिक्त चौतीस कंपन्यांचं जाळं होतं ज्यात गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार होते. प्रचंड भूखंड कुणाकुणाच्या नावानं घेतलेले होते. त्यातच सरकारी यंत्रणेचा सासेमिरा मागे लागलेला. योगा शिबिरांमधून येणारा पैशाचा ओघ इतका होता की तो कुठेतरी गुंतवून ठेवावा म्हणून बाबानं धंद्याचा नियोजनशून्य विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रात केला होता. काही उत्तम दर्जाची यंत्र परदेशातून आयात करून ठेवली होती. काही यंत्र सामग्री पत्रा रुजू झाले तेव्हा पर्यंत पॅकेजच्या कार्टन मधून सुद्धा काढलेली नव्हती. आटा, च्यवनप्राश, रंग, जूस, बॉटलिंग, पॅकेजिंगचे असे काही कारखाने एका रात्रीतून काहीही नियोजन न करता उभे राहत होते. जूस काढण्याच्या कारखान्यातून जूस निघत नव्हता, १००मेट्रिक टनाची क्षमता असलेल्या आटा कारखान्यातून २मेट्रिक टन आटाच निघत होता. कंपनीत व्यवसायिकतेचा अभाव होता. पतंजली उत्पादनांकडे क्वालिटी कंट्रोल विभागाच्या मान्यता नव्हत्या की कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ट्रेनिंग नव्हतं. उत्पादनांच्या खपाचा, बाजाराच्या दृष्टीनं संशोधनाचा, स्पर्धात्मक विश्लेषणाचा प्रचंड अभाव होता. कशाचं उत्पादन घ्यायचं हे ठरवून मग गुंतवणूक करण्यापेक्षा कंपनी आधी फूड पार्कसाठी जागा घेणे, कारखाना उभा करणे, मग यंत्र सामग्री घेणे आणि मग त्याचं काय करायचं ते जमेल तसे ठरवणे या क्रमानं काम करत होती. पत्रानं लेखिकेला सांगितलं, ‘ रामदेव बाबाला टूथब्रश, टूथपेस्ट, जूस, दलिया, मीठ, साबण, कॉस्मेटिकस ते कपडे धुण्याच्या पावडर पर्यंत सर्व काहीचं उत्पादन करायचं होतं’. त्यातच पत्राला या कंपन्यांचे एकमेकात गुंतलेले पाय काढायचे होते. कारण एकाच जागेत अनेक कंपन्यांचं ऑफिस असे आणि त्याच एकमेकांकडून माल मागवायच्या, एकमेकीला विकायच्या. कंपन्यांमध्ये आपापसात मालकी हक्कांचं जाळंच बनलं होतं. अनेक चार्टर्ड अकाउंटंट्सची नियुक्ती करून पत्रांनी हा गुंता सोडवला. २०११ च्या शेवटी शेवटी बालकृष्णची चौकशी संपून केस दाखल झाल्यावर त्याला फुरसत मिळाली आणि त्यानं दिव्य फार्मसी, आयुर्वेदिक औषध निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं. पतंजली आयुर्वेदा लिमिटेड आणि पतंजली फूड पार्क रामदेवचा भाऊ राम भरत पतंजली बघू लागला. त्यावेळी रामदेव आपली काँग्रेस विरोधी आणि भाजप स्नेही भूमिका घेऊन राजकारण पेटवण्यात गुंतला असला तरी त्याच्या उत्पादनांकडेही पुरेपूर लक्ष देत होता. पण बाबा आपल्या भाषणांमध्ये तोंडात येतील ते आकडे लोकांवर फेकायला. १०० कोटींची उलाढाल असताना बेडकी फुगवून मल्टिनॅशनल कंपन्यांना पळवून लावण्याच्या गोष्टी करायचा. ‘मै आयटीसी को भगा दुगा, मै हिंदुस्थान लिव्हर को भगा दुगा” असं म्हणायचा पण त्यांच्याशी स्पर्धा करायला त्यांची व्यावसायिकता आणि त्यांची कार्यपद्धतीही अंगी बाणावनं जरुरी असते हे बाबाच्या गावीही नव्हतं, असं पत्रा सांगतात.

आता पत्रांनी सूत्र हाती घेतल्यावर उत्पादनांचा स्तर सुधारण्यावर आणि वितरक-सुपर वितारकांचं व विक्रेत्यांचं जाळं विण्यावर भर दिला. तर तिथंही वितरकांमध्ये रामदेवचे भाई भतीजे घुसलेच. पत्रांनी रामदेवकडून प्रचार करण्यासाठी वाढीव आर्थिक तरतूद करवून घेतली. अनेक ठिकाणी रामदेवनं स्वतःचं डोकंही वापरलं. उदाहरणार्थ एका वर्तमानपत्राच्या मालकाला चार कोटींच्या जाहिरातींच्या बदल्यात पतंजलीला जास्त झालेली, च्यवनप्राश इन्व्हेंटरी देऊन टाकली. हा मालक त्यातून तयार झालेलं च्यवनप्राशचं वितरण आपल्या हजारो कर्मचाऱ्यांमार्फत करणार होता म्हणे! शिवाय ते पाच हजार आरोग्य केंद्र जे आधीच फुकट तपासणाऱ्या डॉक्टरांच्या बहाण्यानं पतंजली उत्पादन विक्री करतच होते. सोबतच एक लाख स्वदेशी केंद्र सुद्धा उघडण्यात येणार होते. आधीच्याच स्वदेशी केंद्रांच्या जागेचा भाग आता पतंजलीचे प्रॉडक्ट्स विण्यासाठीही होणार होता. वितरक त्यामुळे नाराज होण्याची शक्यता होती, पण रामदेवनं त्यांना लगेच विकलेल्या मालावर एक टक्का देऊ करून शांत केलं. १००कोटींचे उलाढाल करणारी कंपनी पत्रांच्या मार्गदर्शनाखाली२०१२ मध्येच ४४६ कोटींच्या उलाढाली पर्यंत पोहचली.

पतंजलीनं आता अन्य कंपन्यांकडून मध घेऊन पतंजलीच्या नावे विकायलाही सुरुवात केली. मग पत्रांनी सुचवल्या प्रमाणे पतंजलीनं “शुद्ध गाईचं” असं सांगून तूप विकायला सुरुवात केली, जे पत्रा म्हणतात तसं, “ते बकरीच्या, का म्हशीच्या, का जर्सी गाईच्या दुधापासून बनलं आहे हे स्वतः रामदेवबाबा सुद्धा सांगू शकणार नाहीत!” कारण वेगवेगळ्या राज्यातल्या दूध संकलन केंद्रांकडून ते एकत्रित केलेलं असतं. त्यातही रामदेवबाबा सरळ ‘साय’ मागवून त्यापासूनच तूप बनवतो. लोण्यापासून बनवलेलं तुपच आरोग्याला चांगलं असतं. पण आपण ज्याचा प्रचार करतो तेच विकलं पाहिजे असे काही नियम रामदेवनं कधी पाळलेच नाहीत! पतंजली नूडल्स मध्ये अळ्या सापडल्यावर रामदेवनं उलट बातमी देणाऱ्या प्रसारमध्यमांवरच दोष दिले होते! “१०० टनाच्या वर तथाकथित गाईचं तूप रामदेवबाबा रोज विकतो. आणि प्रत्येक लिटरवर ५०-६०रुपये नफा कमवतो”, पत्रा सांगतात. तसंच पतंजली दंतकांती ही टूथपेस्ट ईतर ब्रँडच्या पेस्ट पेक्षा ४२%नी महाग असूनही मल्टिनॅशनल कंपन्यांच्या रागावर लोक घेतच आहेत.

इतक्या उंचीवर दोन वर्षात नेल्यामुळं पत्रा सहाजिकच रामदेवच्या प्रेमास पात्र झाले आणि माशी शिंकली. बालकृष्ण आणि राम भरतला त्रास व्हायला लागला. त्यांनी रामदेवकडे कुरबुरी सुरू केल्या. रामदेवबाबा भाजप सोबत मिळून काँग्रेसला खाली खेचण्याच्या राजनीतीत पूर्णपणे गुंतला होता तेव्हा पत्रा मुक्तपणे कंपनीचे निर्णय घेऊ शकत होते. पण रामभरत आणि बालकृष्ण सोबत पात्रांचे खटके उडायला लागल्यावर रामदेवचं हरिद्वारला येणं वाढलं. बरं, कंपनीत रामदेव आला की त्याच्या पायासुद्धा पडावं लागे, जे पात्रासारख्या आयआयटियनच्या जीवावर येत होतं. खरं तर पात्रा पतंजली आयुर्वेद आणि फूडपार्क या दोन्हीचं काम पतंजली आयुर्वेदाचे सी ई ओ म्हणून एकाच पगारात करत होते. त्यांनी दुसऱ्याही कामाचे, फुडपार्कच्या कामाचे पैसे मागितले तर रामदेव म्हणे, “कसली पगारवाढ? तुम्ही तर देशसेवा करत आहात!” कंपनीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा विषय काढला की हे ठरलेलं उत्तर मिळे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यानं हे मानून चालायचं होतं की एका मोठ्या स्वदेशी चळवळीचा तो भाग आहे, म्हणून त्यानं कामाचा मोबदला घ्यायचा नाही.

याशिवाय बाहेर वाच्यता न झालेले अन्य आणखी अनेक प्रकार होतेच. जसं, कामगारांनी कारखान्यात प्रवेश करताना आपला मोबाईल प्रवेशद्वारावर जमा करायचा. एकदा एका कामगारानं आवळा कॅण्डी खाल्ली. रामभरतनं त्याला बेदम झोडपलं. देशी विदेशी बँकांच्या विश्लेषकांनी रामदेवच्या करखान्यांबद्दल चांगले अभिप्राय दिलेले नाहीत. इन्स्टिट्युशनल सेक्युरिटीज, कोटक सेक्युरिटीज लिमिटेडचे आनंद शाह म्हणतात, “कारखान्यांची स्थिती काही चांगली नाही…. मध आणि तूप कारखान्यात स्वच्छता पाळलेली नाही..शिवाय अमूल आणि नंदिनी कडून मलाई घेऊन तूप बनवलं जातं…त्यापूर्वीची कोणतीच व्यवस्था पतंजली कडे नाही..”
सुपर- वितरक, वितरकांचेही अनेक प्रश्न आहेतच. मध्यप्रदेशच्या भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर झोनचे सुपर वितरक कांकडे माल येणं अचानक बंद झालं, तेही अशावेळी जेव्हा पतंजली कडून त्यांना ९,४६,०००रुपये घेणं होते. महाराष्ट्रातून बुलढण्याच्या भगवानदास महांडे यांच्याकडून २२कोटी रुपयांचा बारीक गूळ घेण्याचा करार पाळला गेला नाही आणि त्यांचा धंदा बसला. पत्रांकडे सी इ ओ या नात्यानं या तक्रारी येत होत्या. हळू हळू पात्रांच्या लक्षात यायला लागलं की ही रामदेवची कार्यप्रणालीच बनली आहे. रामदेवकडून देणं लागत असलेल्या पैशांवरून एकदा पात्रांचा चांगलाच वाद झाला. जेव्हा ही बातमी हरिद्वार मध्ये पोहचली तेव्हा लोक स्वतःहून पात्रांकडे येऊन हरिद्वारात न थांबण्याचा, जीवाला जपण्याचा सल्ला देऊ लागले. त्याक्षणी पात्रांनी पतंजली सोडून दिली.

(या लेखमालेतील आधीचे पाच  लेख याच पोर्टलवर अन्यत्र उपलब्ध आहेत) 

Previous articleदंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला…
Next articleराजगुरु, संघ आणि स्वातंत्र्यलढा..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.