योगी भांडवलदार (भाग ३ व ४ )

सौजन्य – बहुजन संघर्ष

अनुवाद – प्रज्वला तट्टे

फेब्रुवारी २००४ मध्ये रामदेवबाबाची ओळख के गोविंदाचार्य या आर एस एस च्या विचारवंतांनी राजीव दीक्षित सोबत करवून दिली. रामदेवना राजीव दीक्षितांच्या व्याख्यानाच्या cd आणि टेप्स आपल्या शिबिरात विकण्याची परवानगी हवी होती. राजीव दीक्षित अल्लाहबादला बी टेक चं शिक्षण घेत असताना भोपाळचं कार्बाईड गॅस कांड घडलं होतं. व्यथित होऊन दीक्षित यांनी धरमपाल या (आर एस एस शी जवळीक असलेल्या) गांधीवादी विचारवंतांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि ‘आझादी बचाओ’ आंदोलनाचा पाया वर्धेत १९९२साली रचला. जागतिकीकरण देशाला मल्टिनॅशनल कंपन्यांचं गुलाम करत असून जनतेनं स्वदेशी वस्तू वापरून हा हल्ला परतवून लावायला हवा असं राजीव दीक्षित त्यांच्या व्याख्यानांतून सांगत असत. एक प्रकारे ती आर एस एस च्या ‘स्वदेशी’ चळवळीची सुरुवात होती. पतंजलीच्या वस्तूंची जाहिरात करताना रामदेव जे मल्टिनॅशनल कंपन्यांविरुद्ध बोलतात, ती शिकवण राजीव दीक्षित यांचीच.

२००४मध्येच राजीव दीक्षितच्या भावाचं, प्रदीपचं लग्न झालं आणि त्याने वर्ध्याला ३०-४० लाख रुपये खर्चून घर बांधलं. आंदोलनातल्या अनेकांनी राजीव दीक्षित यांच्यावर आंदोलनाचा पैसा घरावर खर्च केल्याचा आरोप लावला. संघटनेत ते एकाकी पडले. त्यावेळी नेमकी रामदेव-राजीव भेट घडली. २००७पर्यंत दोघांची इतकी गट्टी जमली की त्यांनी राजकारणात उडी घेण्याचा निर्णय घेतला. मुलायमसिंह, नारायण दत्त तिवारी यांसहित सुब्रतो रॉय यांच्यासोबतही रामदेवची घसट वाढतच होती. सुब्रतो चे आर्थिक सल्लागार ओ पी श्रीवास्तव रामदेवला सुद्धा आर्थिक सल्ले देऊ लागले. सौ. श्रीवास्तव रामदेवला राखी बांधू लागल्या. जमिनीचे खरेदी व्यवहार होऊ लागले. श्रीवास्तव यांनी रामदेवबाबाला नवा ट्रस्ट बनवण्याचा सल्ला दिला. करण दिव्य योग मंदिर ट्रस्ट मध्ये एकतर खूप पदाधिकारी होते आणि ज्यापद्धतीने रामदेव व बालकृष्णला ट्रस्ट चालवत होते ते स्वामी शंकरदेव आणि करमवीर यांना पसंत येत नव्हतं. या पुढचे धंदा वाढवण्याचे मार्ग, कल्पना, आराखडे सर्व रामदेव आणि बालकृष्ण कडे तयार होते. त्यात त्यांना अडथडे नको होते तसेच वाटेकरीही. त्या दोघांनीच मग ४ फेब्रुवारी २००५ मध्ये मग ‘पतंजली योगपीठ’ ची स्थापना केली.

करमवीर अस्वस्थ होत होते. रामदेव हे शंकरदेव कडून घेतलेल्या दीक्षेचं पालन करत नव्हते. योगा शिबिरांसाठी तिकीट लावलं जात होतं. रामदेवबाबाच्या जवळच्या स्थानाची तिकीट जास्त असे. मोफत किंवा कमी पैसे देणाऱ्यांना दूरची जागा मिळे. ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्या पैसे रामदेवचा भाऊ रामभरत हाताळे. रामदेवचा एक भाऊ सोडून इतर सर्व कुटुंब हरिद्वरात आलं आणि गाड्या घरं घेऊन राहू लागलं. त्यावरून बालकृष्ण देखील करमवीर कडे तक्रार करे. विशेष म्हणजे बालकृष्ण आनी रामभरत यांचं अजिबात जमे ना. एखादं बाह्य आव्हान, जसं रामदेव आणि राजीव दीक्षित यांची जवळीक, समोर उभं ठाकलं तरच ते एकत्र यायचे. करमवीर यांनी रामदेवला घेतलेल्या कुटुंबीय, पैसा, किर्ती यापासून दूर राहण्याची शपथ आणि दीक्षेची आठवण करून दिली. तरी काही फरक पडेना. मग २००५ मध्ये होळीच्या दिवशी करमवीरनीच गुपचूप आश्रम (आणि मोबाईल सुद्धा) सोडून दिला.
रामदेव आणि बालकृष्ण यांच्या नव्या ट्रस्ट अंतर्गत १०० खाटांच्या आयुर्वेदिक दवाखान्याचा घाट घातला जात असतानाच तिकडे केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं. नारायण दत्त तिवारी आणि मुलायमसिंह यादवशी तर रामदेवची दोस्ती जमलीच होती. सुबोध कांत सहाय या राज्यमंत्र्यांनी खाद्य प्रक्रिया उद्योगांसाठी आधीचे खूप सारे जटील कायदे एकत्र करून नवा फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस आणून खाद्य उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर आणायच्या उद्देशानं लागू केला. त्यात पॅकेजिंग आणि लेबलिंग बाबतची नियमावली सुद्धा होती. सहाय यांनी ‘जगाला खाऊ घालण्याची भारताची क्षमता’ विकसित करण्यासाठी खाद्य प्रक्रिया उद्योगाला नव उद्यामींना ५०कोटी₹ देण्याची, देशभरात ५०० फूड पार्क्स स्थापन करण्याची घोषणा केली. २००७-१२ च्या पंचवार्षिक योजनेचं ते उद्दिष्ट ठेवलं आणि प्रायोगिक तत्वावर उत्तर प्रदेश व उत्तराखंडात पहिल्या दहा पार्क्स काढण्याला चालना दिली. त्यावेळी सहाय यांना हे माहीत नव्हतं की ते रामदेवच्या पतंजली खाद्य उद्योगाचं बीज रोवत आहेत!

तिकडे आस्था tv चॅनल सेबीच्या कचाट्यात सापडलं तरी २००३ पासून रामदेवबाबाच्या योगाचं प्रक्षेपण चालूच होतं आणि मोठ्याप्रमाणात दक्षिणा येतच होत्या. दिव्य फार्मसी बिल्डिंग, पतंजली योगपीठ१ ज्यात आयुर्वेदिक दवाखाना आणि महाविद्यालय आलं, पतंजली योगपीठ २ ज्यात जडिबुटिची नर्सरी आली यांची किंमत २००५-६ पर्यंत १०० कोटींपर्यंत पोहचली होती. जानेवारी २००६ च्या च्या अंकात दी ट्रिब्युन वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार शाहरुख खान च्या लाईव्ह कार्यक्रमापेक्षाही रामदेवचा योगा कार्यक्रम अधिक लोकप्रिय होता. बंगलोरच्या योगा शिबिरात ७८०० लोक ₹५०० ते ₹२१००ची तिकिटं विकत घेऊन आले होते. म्हणजे एकूण ७५ ते ८०लाख ₹ चा गल्ला जमा झाला होता. डिसेंम्बर२००५च्या नाशिक योगा शिबिरात ३कोटी₹ जमा झालेत. कृष्णकुमार पिट्टी या मारवाडी व्यावसायिकाने २००५सालच्या शेवटी शेवटी मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित शिबिरात ४०,०००लोक सकाळी आणि ४०,००० ते ५०,००० लोक संध्याकाळी आलेत. त्यात अनिलकपूर, शेखर सुमन, मल्लिका शेरावत, हेमामालिनी पासून तर बसरीवादक हरिप्रसाद चौरसिया पर्यंत अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली. पिट्टीच्या म्हणण्यानुसार किमान ४ ते ५ कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला असावा. रामदेवबाबांनी अमिताभ आणि अभिषेक बच्चनलाही योगा प्राणायाम शिकवलं. किरीट मेहता सांगतात ‘रामदेवबाबांना कुणीही रिकाम्या हातानं भेटत नव्हतं. कुणी १लाख देई तर कुणी २ लाख’. आता रामदेवच्या हरिद्वारच्या योगा केंद्राची सदस्य फी एक लाख ₹ झाली होती. ‘आजीवन सदस्य’ होण्यासाठी अडीच लाख ₹ मोजावे लागत होते.

इतक्या सर्व कमाईचा तपशील देण्याचं कारण म्हणजे, नेमक्या त्याचवेळी उत्तरप्रदेशात कामगारचं न्यूनतम वेतन १७४०₹ असताना रामदेवबाबा त्यापेक्षा कमी देत होते. त्यातही महिला कामगारांना १२००₹ मिळत होते. रामदेवचा धंदा वाढत असलेला त्यांनाही दिसत होता. ट्रक भरभरून दिव्य फार्मसीचं लेबल लावलेला माल कारखान्यांच्या बाहेर पडत होता. कामगारांनी एकजूट करून कामावर औपचारिक नियुक्ती करून कायम करवून घेण्याची मागणी कर्मवीरच्या गमनाच्या आधीपासूनच केली होती, जेणेकरून त्यांना प्रॉव्हिडंट फंड आणि राज्य सरकारच्या इन्शुरन्स स्कीमचा लाभ मिळेल. पण करमवीर गेल्यानंतर लगेच एकूण ४०० पैकी ११३ कामगारांना कामावरून काढून टाकलं गेलं. रामदेव आणि बालकृष्ण कुणाला दबत नाही असा संदेश त्यातून मिळाला. काढून टाकलेले कामगार मग सिटू (CITU) या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेकडे तक्रार घेऊन गेले. सिटू व कामगारांनी मिळून इंडस्ट्रीयल ऍक्ट अंतर्गत औपचारिक तक्रार केली. जिल्हा प्रशासनानं बोलावलेल्या तिन्ही गटांच्या प्रतिनिधींच्या मीटिंग मध्ये दिव्य फार्मसीचा प्रतिनिधी गेला खरा. कामगारांना परत कामावर घेणे, सर्वांना न्यूनतम मजुरी देणे आणि तक्रारकर्त्यांविरुद्ध कारवाई न करण्यासारख्या अटी दिव्य फार्मसीने मान्य देखील केल्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कामगारांना परत तर घेतलंच नाही, उलट त्यातल्या ४६ कामगारांना पोलीस केसेस करून त्यांनी न केलेल्या गुन्ह्यात त्यांना अडकवून टाकलं.

काही कामगारांनी मग ‘दिव्य’ ची दोन औषधं कुलिया भसम् आणि यौनामृत बाटी चे सॅम्पल आणि औषधांमध्ये घातल्या जाणाऱ्या काही वस्तू ब्रिन्दा करात यांच्याकडे आणून दिल्या. कामगारांनी करातांना सांगितलं की ते अफगाणिस्तानातून आयात केलेल्या रानमांजराचे विर्योत्पादक ग्रंथींचे अंड होते. कामगारांनी करतांना हेही सांगितलं की, ‘हरणाची शिंगं आणि मानवी कवट्या औषधांमध्ये नियमित घातल्या जातात’. ब्रिन्दा करात म्हणतात, ‘हे ऐकून मी हादरले असं नव्हे, पण या घटकांचा उल्लेख त्या औषधांच्या घटकांच्या यादीत नसतो, ते पाहून मी हादरले’
३ जानेवारी २००६ला ब्रिन्दा करात यांनी रामदेव आणि दिव्य योग फार्मसी विरोधात गहन आरोप केले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचीव शिव बसंत यांनी दिलेल्या पत्राधारे करातांनी औषधांमध्ये भेसळ केल्याची, मानवी आणि प्राण्यांची हाडं घातल्याची आणि लेबल वर तसं नमूद न केल्याची, तसेच कामगारांच्या बाबतीत तीन पक्षीय बैठकीचा निर्णय न पाळल्याची तक्रार केली. उत्तरांचलच्या आरोग्य सचिवांनी सुजित दास यांनी ते सॅम्पल तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचं सांगून ते घ्यायलाच साफ नकार दिला. तिथून सॅम्पल आयुष मंत्रालयाकडे गेलं. डिसेंम्बर २००५ मध्ये मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार औषधांमध्ये मानवी DNA सापडल्याचं सांगितलं, पण काही आयुर्वेदिक औषधांमध्ये ते चालतं म्हणून सांगितलं. लेबल वर तसं नमूद नसल्याबद्दल दिव्य योग फार्मसी दोषी असल्याचं सांगितलं.

मात्र रामदेव वर कुणीच कारवाई करायला धजावत नव्हते. काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी तर स्वतःच ‘दिव्य’ची औषधं घेत होते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष(मुलायमसिंह यादव) आणि राष्ट्रीय जनता दल (लालू प्रसाद यादव) यांनी रामदेवबाबाचीच बाजू घेतली. रामदेवनी उलट ब्रिन्दा करात या परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर नाचत आहेत असा प्रचार सुरू केला. राजीव दीक्षित यांची भाषा वापरून हा स्वदेशी, हिंदू अभिमानावर घाला असल्याची बतावणी आस्था चॅनेल वरून सुरू केली. तरी बरं, ब्रिन्दा करात यांचा पक्ष काँग्रेस सोबत केंद्रात युती करून होता. पण इतर कोणताही पक्ष रामदेवशी पंगा घ्यायला तयार नव्हते, त्यांनी रामदेवच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भक्तगणांचा धसका घेतला होता. त्यांना रामदेवसोबत राजकीय युतीच्या संभावना दिसत होत्या.

हा सर्व वाद सुरू असंतानाच तिकडे रामदेवबाबा आणि बालकृष्ण ने पतंजली आयुर्वेदा प्रायवेट लिमिटेड या कंपनीची सथापना केली. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, अलोपॅथी औषधं, हर्बल कॉस्मेटिकस, औषधं निर्माण, प्रक्रिया, शुद्धीकरण, आयात, निर्यात, खरेदी, विक्री करणं या कंपनीची उद्दिष्टं होती. न्यूनतम १० ₹चा एक शेअर या प्रमाणे अधिकृत १० लाख रुपयांची गुंतवणूक होती आणि ९०% भाग बालकृष्णच्या नावे करून उरलेले १०% नावापुरते कुण्या स्वामी मुक्तनंदाच्या नावे होते. पण पुढे अनेकदा बारके शेअर धारक बदलत गेले. फक्त बालकृष्णकडे शेअरचा मोठा भाग कायम राहिला. रामदेव किंवा रामदेवच्या कुटुंबियांना अधिकृत शेअर धारक केलं गेलं नाही. (आठवा भगवे वस्त्र परिधान करताना शंकर देव यांच्याकडून घेतलेली दिक्षा).

२००६ साली ‘ट्रस्ट’चं लोढणं दूर सारून रामदेव-बालकृष्णने नफा कमावण्याच्या स्पष्ट उद्देशानं कंपन्या काढायला जी सुरुवात केली ती पुढच्या दशकात किमान ३७ कंपन्यांची नोंद केली!

नंतर पुढे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरेटरी कडून रामदेवच्या औषधांना क्लीन चिट मिळवून त्याचा भरपूर प्रचारही करण्यात आला.

आस्था चॅनेलचे प्रेक्षक जगभर विखुरलेले होते. चॅनेलचे मालक किरीट मेहता यांनी रामदेवसमोर इंग्लंड मध्ये योगा शिबिरं घेण्याची कल्पना मांडली आणि त्यांच्या मुलीनं भक्ती मेहता हिनं पासपोर्टसहित सर्व तजवीज करून रामदेवबाबा आणि त्यांच्या ४०अनुयायांचा इंग्लंड दौरा आखला. या पहिल्याच यशस्वी दौऱ्यात रामदेवना बकिंगहॅम पॅलेस मध्ये बसून राणी एलिझाबेथ सोबत चहा पिण्याची संधी मिळाली, आणि युनायटेड नेशन्सच्या सेक्रेटरी जनरल चं निमंत्रणही मिळालं ज्यामुळं न्यू यॉर्क ला जाऊन १५०देशांच्या राजकीय नेत्यांसमोर गरिबी निर्मूलनावर भाषणही देता आलं. पण याच दौऱ्यात भक्तीला रामदेवची काळी बाजू सुद्धा दिसली. उदाहरणार्थ: योगा करण्याच्या आधी आणि नंतर रामदेवची माणसं वजन काट्यात फेरफार करून शिबिरार्थीला वजन कमी झाल्याचा भास करवून देत. रामदेव मग कॅमेऱ्यासमोर त्याला/तीला बोलायला सांगत. कॅमेऱ्यासमोर ती व्यक्ती मोठ्या उत्साहात योगा मुळं फायदा झाल्याचं, वजन कमी झाल्याचं सांगे. ती व्यक्ती निघून गेल्यावर रामदेव आणि त्यांची माणसं त्या व्यक्तीच्या मुर्खपणावर फिदीफिदी हसे.

शिबिरार्थी कडुन ५००पौंडाची फी घेतली जाई.(२००६ मध्ये १ पौंड बरोबर ८५₹ होते). शिबिर आटोपल्यावर रामदेव काहींच्या घराला ११,००० पौंडांच्या बदल्यात भेट देई. यजमानाच्या घरात बाबा जिथं बसे तिथं पायाखाली एक भगवं वस्त्र पसरलं असे. भेटायला येणारे नमस्कार करून बाबाच्या पायावर पैसे टाकत. गाठीभेटी आटोपल्यावर परत जाताना रामदेवची दोन माणसं त्या वस्त्राची पैशांसकट गाठोडं बांधत आणि परत निवासस्थानी आल्यावर त्यातला प्रत्येक पाउंड मोजून आज किती जमा झाले त्याचा हिशोब मांडत. भक्ती म्हणते, ‘पैशासाठी इतकं हावरट झालेल्या बाबाचं रूप प्रथमच पाहिलं.’ मेहता बाप-लेकीच्या अंदाजाने किमान १७कोटी रुपये तरी या दौऱ्यात कमावले. त्यातले त्यांनी भारतात किती परत आणले की या दौऱ्यातच इंग्लंडमध्ये स्थापन केलेल्या ‘पतंजली योगपीठ ट्रस्ट’ मध्ये गुंतवले, माहीत नाही.

आता रामदेवना हे कळून चुकलं होतं की आस्था चॅनल त्यांच्यावर विसंबून आहे. इंग्लंड मधून परत येताच ऑक्टोबर २००६ मध्ये बालकृष्णने ‘स्वामी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या एका कंपनीचं नाव बदलून ‘वेदिक आरोग्य प्रायव्हेट लिमिटेड’ केलं ज्याच्या उद्दिष्टात ‘इन्फर्मेशन आणि टेकनोलॉजी, टेलिकॉम्युनिकेशन, सॅटेलाईट, इंटरनेट, नेटवर्किंग’ वगैरेच्या क्षेत्रात काम करणं असं नमूद केलं. २२ मे २००७ मध्ये पुन्हा कंपनीचं नाव बदलवून ‘वेदिक ब्रॉडकास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड केलं गेलं, आणि उद्दिष्टं आणखी स्पष्टपणे रेडिओ आणि tv चॅनेल स्थापन करणं, बातम्या, आरोग्य आनी शैक्षणिक चॅनल चालवणं वगैरे सांगितली गेली आणि आरोग्य विषयक कंपनीचा मुखवटा काढून फेकला. मोठा भागधारक अर्थात बालकृष्णच होता.

आस्था इंडिया आधी सांगितल्याप्रमाणे सेबी च्या कचाट्यात सापडलेली कंपनी होती आणि त्यामुळं तिचे ९३% शेअर सेबीनं गोठवले होते. उर्वरित ७% शेअर विकत घेण्याचा प्रस्ताव रामदेवने मेहतांसमोर ठेवताना असं सांगितलं की, ‘वेदिक ब्रॉडकास्टिंग मालक झाल्यावर सरकारी बाबूंवर दबाव आणून सेबीच्या कटकटीतून आस्थाची सुटका करता येईल’. ७%शेअर साठी १० कोटी₹ मोजायची तयारी रामदेवनं दाखवली. आस्था इंटरनॅशनल ज्या अंतर्गत आस्था यू के आणि आस्था यु एस ए येत होतं किरीट मेहतांकडे अजूनही होती. आस्था इंडियाच्या सर्व चित्रफिती व्हीडिओ वगैरे साहित्य त्यामुळंच आस्था इंटरनॅशनल वर सुद्धा दाखवले जात होते. त्यासाठी आस्था इंडिया आणि आस्था इंटरनॅशनल मध्ये काही करार मदार करण्याची गरज मेहतांना भासली नव्हती. रामदेवच्या प्रस्तावावर विचार करत असतानाच मेहता आस्था इंटरनॅशनलला वाढवण्याच्या कामात गुंतले होते. त्यांचा अधिक वेळ भारताबाहेर जात होता. याचाच गैरफायदा घेऊन रामदेवने अस्थामध्ये मेहतांनंतर दुसऱ्या महत्वाच्या स्थानावर असलेल्या प्रमोद जोशीशी घसट वाढवली. हिरेन दोषी हा छोटा भागधारक शेअर दलाल ज्यानं आस्थाच्या स्थापनेच्या वेळी महत्वाची भूमिका बजावली होती तो आणि एस के जैन हा एक जरा मोठा भागधारकही रामदेवला मिळाला. रामदेव सोबत शेअर्स चा विक्रीचा व्यवहार होत होता म्हणून आनी वेळी अवेळी आस्था इंटरनॅशनलच्या कामासाठी बाहेर जावं लागत होतं म्हणून काही कागद पत्र आणि कोरे कागद सही करून मेहतांनी जोशी कडे देऊन ठेवले होते. त्याचा गैरवापर करून अनेक ठिकाणी खोट्या सह्या करून रामदेवच्या कंपनीला ठरल्यापेक्षा कमी पैशात शेअर हस्तांतरित केले गेल्याचं मेहतांना कळलं तेव्हा ते भडकले. मेहतांनी रामदेवच्या मागे उर्वरित रक्कम देण्यासाठी तगादा लावतानाच आस्था इंडियाचा रेकॉर्ड केलेला ऐवज आस्था इंटरनॅशनलचे हक्क म्हणून bidding करून विकण्याचा घाट घातला. त्याची भनक जोशी-दोषी-जैन-रामदेव चौकडीला लागली. त्यांनी मेहतांना हरिद्वारला बोलावून रामदेवकडून
उर्वरित पैसे घेण्यासाठी म्हणून बैठकीचं आयोजन केलं.

मेहता त्यांचा मुलगा चेतन, दोषी व जोशी यांना घेऊन हरिद्वारला गेले. पतंजली योगपीठ १ मध्ये रामदेव आणि बालकृष्ण त्यांची वाटच पाहत होते. आत पाऊल टाकताच मेहतांना भीतीचा गारठा जाणवला. रामदेवने मेहतांचा पेन तपासून त्यात छुपा कॅमेरा नसल्याची खात्री करून घेतली. आणि मग आपला रुद्रावतार धारण केला. ‘आस्थाचे आंतरराष्ट्रीय हक्क विकायचा मी विचारच कसा काय केला म्हणून रामदेव मोठमोठ्यानं मला विचारू लागले’, मेहता सांगतात. ‘आणि अचानक रामदेवनं मला आस्थाचा राजीनामा मागितला. माझ्यासमोर कागद पेन ठेवला. १३ नोव्हेंबर २००९ ची तारीख टाकलेलं ते राजीनामा पत्र होतं’. मेहता हरिद्वारला रामदेवकडे अडकून पडलेले पैसे घ्यायला आले होते. आणि आता त्यांना आस्थावर असलेले उरले सुरले हक्क सोडायला सांगितलं जात होतं. मुलगा चेतन सही करू नका म्हणून सांगत होता. पण, ‘डॅडींच्या डोळ्यात भीती दाटली होती’ चेतन लेखिकेला सांगतो. मेहता म्हणतात, ‘मी तिथेच रडायला लागलो. आजही मी मनातल्या मनात रडत असतो. हा रामदेव तोच माणूस आहे ज्याला मी घडवलं’.

राजीनामा दिल्यानंतर आस्था इंडिया चं कुठलंच साहित्य (contents) मेहता विकू शकणार नव्हते. काही दिवसातच आस्था इंटरनॅशनलच्या सर्व इमेल पत्ते, वेबसाईट्स पासून मेहतांना तोडून टाकण्यात आलं. दोषी, जोशी, जैन होते तिथंच राहिले. वेदिक ब्रॉडकास्टिंग लिमिटेड कंपनीचा एक छोटा भागधारक शिव कुमार गर्ग कंपनीच्या अध्यक्षपदी रुजू झाला. आणि मेहतांचा आस्था इंटरनॅशनलनं आस्था इंडियाचं साहित्य प्रक्षेपित केलं म्हणून रामदेवनं मेहतांवर पायरसीची केस ठोकली!
इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर वर्षभरानं रामदेवचा आणखी एक परदेश दौरा अनिमेश गोएंका यांनी आखला. न्यू यॉर्क ला ३०जून २००७ पासून सुरू होणारा हा दौरा न्यू जर्सी, शिकागो, ग्लासगो करत करत इंग्लंड मध्ये ८ऑगस्टला संपणार होता. अनिमेश गोएंकानी (अध्यक्ष हेरिटेज इंडिया) मीडियाला सांगितलं की दौऱ्याचा अमेरिकेतल्या भागाचा खर्च ३५०,०००अमेरिकन डॉलर येणार असून तो संपूर्ण खर्च देणग्यांमार्फत भरून काढला जाणार आहे. योगा शिबिरांच्या १००$ आणि ५००$ ची तिकीटं विकून जो पैसा जमेल तो आवळ्यावर शोध करून त्यापासून काही उत्पादनांचं पेटंट मिळवण्यासाठी वापरला जाणार होता. इकडे बालकृष्णने १८मे २००७ रोजी ‘पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड’ मधून प्रायव्हेट काढून टाकून कंपनीला स्टॉक मार्केट मध्ये उतरवण्याची तयारी चालवली होती. आता या कंपनीत रामदेवचे सख्खे नातेवाईक सुद्धा भागधारक बनू शकत होते. नंतर लगेच ठरल्याप्रमाणे रामदेवचा अमेरिका दौरा सुरू झाला. आस्था चॅनल वरून जे रामदेवबाबाला बघत होते ते अमेरिकेत त्यांच्या योगा गुरूला प्रत्यक्षात बघायला जमले. एकट्या न्यू जर्सीतल्या एका शिबिरात ३००० लोक आले. आणि अशातच शिकागोत असताना १४ जुलै २००७ रोजी रामदेवला बातमी मिळाली, ‘गुरू शंकर देव हरवले’!

आता नियोजित दौऱ्यानुसार इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स चा सत्कार स्वीकारायचा का दौरा अर्धवट सोडून कंखाल, हरिद्वारला परत जायचं हा प्रश्न रामदेवला पडला असेल का? करण शंकर देव यांच्यापासून दिक्षा घेऊन रामदेवनी जे भगवे वस्त्र धारण केले, त्याचा अर्थ होता की आता रामदेवचे गुरुच आता त्याचे अध्यात्मिक माता पिता होते. इतकंच नाही तर कृपाळू बाग आश्रमाची जागा शंकरदेव मुळंच रामदेवला मिळाली होती, तिथंच एवढ्या मोठ्या विस्तारलेल्या साम्राज्याची सुरुवात झाली होती. पण रामदेवनं दौरा रद्द केला नाही. १८जुलै २००७ रोजी इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये रामदेवनं ठरल्याप्रमाणं सत्कार स्वीकारला. त्याच दिवशी कंखालच्या पोलीस ठाण्यात शंकरदेव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली.

शंकर देव यांच्या खोलीत एक चिट्ठी सापडली ज्यात लिहिलेलं होतं, ‘मी तुझ्याकडून हा ट्रस्ट स्थापन करण्यासाठी काही कर्ज घेतलं होतं. पण आता मी ते परत करू शकत नाही. मला माफ कर. मी जात आहे’. असं कोणतं कर्ज होतं की जे १००कोटी₹ चा मालक, त्यांचा शिष्य परत देऊ शकत नव्हता? करमवीर ने आश्रम सोडल्यावर शंकरदेव करमवीरला कधी कधी फोन करत आणि पैसे मागत होते. ‘माझ्याकडे जे थोडेफार असायचे मी द्यायचो’, करमवीर सांगतात. बाकी शंकर देव चा विषय काढला की कंखाल मधले लोक तुमच्याकडे शंकेनं बघतात. तुम्ही रामदेवच्या बाजूचे की विरोधातले? बोलावं की बोलू नये अशी घालमेल त्यांची होते. हरिद्वारच्या आम जनतेला जे दिसत होतं ते रामदेवला दिसत नव्हतं का? असा प्रश्न ते जे सांगतात ते ऐकून आपल्याला पडतो.

हरवले तेव्हा ७० वर्षांच्या असलेल्या शंकर देव यांना मणक्याच्या टी बी झालेला होता. त्यांच्या खोकल्यातून रक्त पडायचं, ते बारीक आणि अशक्त होत चालले होते. छोट्या गावात स्नेहबंध अधिक टिकतात, तसेच कंखाल मध्येही. सुशांत महेंद्रूचे कुटुंबीय त्यांना असेच शोधत त्यांच्याकडे कधीतरी जात तेव्हा शंकर देव असेच एका छोट्या खोलीत टी बी नं पीडित पडून असत. स्वतः स्वतःचं जेवण बनवत, स्वतः भांडी घासत, स्वतः कपडे धूत. आता त्यांना बाहेर सायकलनं जायला जमत नव्हतं म्हणून त्यांना भाड्यानं रिक्षा घ्यावी लागे. रामदेव-बालकृष्ण कडे त्यावेळी निस्सान टेर्रनो होती. पण शंकरदेव यांना त्यात कधीही बसायला मिळालं नाही. करमवीर हरिद्वारच्या दुसऱ्या एका आश्रमात कधीतरी भेट द्यायला येई. तेव्हा शंकरदेव त्यांना भेटायला येई. त्यांच्या मागे रामदेवची दोन माणसं नजर ठेवायला गेट वर उभी राहत होती. ‘ते खूप दुःखी होते’, करमवीर म्हणतात.

राधिका नागराथ यांनी दिव्य योग फार्मसी ट्रस्टचा लोगो बनवून दिला होता आणि त्याच्या आधी पासून उपचार घेण्याच्या निमित्तानं त्या बालकृष्ण-रामदेवच्या संपर्कात आहेत. रामदेव बद्दल त्यांना अजूनही आदर आहे. पण त्याच लेखिकेला सांगतात, ‘शंकरदेव खरोखरचे संत होते. खूप मावळ. त्यांना आता या घरात उपऱ्यासारखी वागणूक मिळत होती. आधी काही चेक वर त्यांच्या सहीची गरज पडे. नंतर तेही नाही. त्यांनी या लोकांना आश्रय दिला आणि नंतर यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ते फार दुःखी होते’.

परदेश दौऱ्यावरून ८ऑगस्ट २००७ रोजी परत आल्यावर रामदेवनी एक पत्रकार परिषद घेतली. जनसत्ता चे पत्रकार सुनील पांडे यांनी रामदेवला विचारलं, ‘ की गुरू शंकरदेव तुम्हाला वडिलांच्या जागी होते तर ते हरवल्याची बातमी ऐकून तुम्ही परत का आला नाहीत?’
रामदेवनी भर पत्रकार परिषदेत उत्तर दिलं, ‘ ते जिवंत आहेत हे माहीत असतं तर मी आलो असतो’.
‘म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की ते जिवंत नाहीत’, पांडे.
रामदेव यावर गप्प झाले असं पांडे सांगतात. पण वर्तमान पत्रातल्या या बातम्यांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. त्यानंतर पाच वर्षांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये शंकर देव यांच्या हरवण्याचा तपस सी बी आय कडे दिला गेला. रामदेवने या सी बी आय चौकाशीचं एकीकडे स्वागत केलं तर दुसरीकडे सरकारवर ‘आरोपीच्या पिंजऱ्यात उभं’ केल्याबद्दल टीकाही केली. मोदी सरकार २०१४मध्ये सत्तेत आल्यावर तपास थंडावला. लेखिकेनं स्वतः माहितीच्या अधिकारात तपास कुठवर आल्याचं विचारलं तर दिल्लीत सांगितलं गेलं की सी बी आय माहितीच्या अधिकार क्षेत्रात येत नाही आणि डेहराडून मध्ये उत्तर मिळालं, ‘तपास चालू आहे’.

२००४ मध्ये राजीव दीक्षित सोबत रामदेवनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या थिंक टँक गोविंदांचार्यांमार्फत सोबत संपर्क केला तेव्हा आझादी बचाओ आंदोलनाचा पैसा त्यांनी खाजगी कामासाठी वापरला म्हणून संघटनेतली त्यांची विश्वासार्हता कमी झालेली होती, हा उल्लेख पूर्वी केलाच आहे. २००८ पर्यंत रामदेव आणि दीक्षित मैत्री आणखी दृढ होण्यासाठी आणखी एक कारण घडलं. आस्था वरून प्रक्षेपित होणारे योगा कार्यक्रम बघणारी प्रेक्षक संख्या आता स्थीर झालेली होती. परदेशवाऱ्या करूनसुद्धा शिबिरार्थींची संख्या वाढेनाशी झाली होती. सिंगापूर आणि व्हिएतनाम इथं केलेल्या योगा क्रूझचं प्रक्षेपण करून देखील प्रेक्षक घटले होते. प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी त्याला स्वदेशी अर्थशास्त्राची जोड देण्याची कल्पना रामदेवच्या डोक्यात शिरली.

तिकडे ‘गायत्री परिवार’च्या प्रणव पांड्यांकडे राजीव दीक्षितांनी काळा पैसा आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात काही आंदोलन उभं करता येऊ शकतं का म्हणून पडताळणी केली. आम्ही अराजकीय संस्था आहोत असं सांगून पांड्यांनी दीक्षितांना नकार दिला. “माझ्या भावाला एक व्यासपीठ हवं होतं, रामदेवबाबांनी ते आस्था चॅनलच्या रुपात ते उपलब्ध करून दिलं. एकाकडे संदेश होता तर एकाकडे चॅनल! दोघंही मिळून आता भारत स्वाभिमान आंदोलनाला मजबूत करून, त्याला राजकीय स्वरूप देऊन २०१४ च्या लोकसभा निवडणुका लढवण्याचे स्वप्न बघू लागले. लेखिकेनं स्वतः ‘मिंट’ साठी २००८ मध्ये दोघांची मुलाखत घेतली. तेव्हा हरिद्वारला रामदेवच्या योग ग्राम निवासाच्या पायऱ्यांवर रामदेव आणि दिक्षितांमध्ये गहन खलबतं चालली होती. जुलै २००८ मध्ये रामदेवनी लेखिकेला सांगितलं की ते पहिली राजकीय यात्रा सप्टेंबर २००९ मध्ये सुरू करणार आणि २०१४ पर्यंत इतकी तयारी झालेली असेल की देशाच्या प्रत्येक लोकसभा मतदार संघात त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा राहू शकेल. “माझं भारत स्वाभिमान आंदोलन पुढच्या वर्षी ५०कोटी लोकांपर्यंत पोहचेल” रामदेवनं लेखिकेला सांगितलं.

तशी संधी त्यांना लगेच मिळाली. २००७ मध्ये रामसेतू आंदोलन यशस्वी झाल्यावर विश्व हिंदू परिषदेनं आपला मोर्चा गंगा नदीकडे वळवला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी हा मुद्दा राजकीय करण्याच्या तयारीत विहिंप होती. गंगा महासभेचे अशोक त्रिपाठी सांगतात, ‘अशोक सिंघल यांच्या नेतृत्वात सर्व हिंदू संघटना दोन मागण्या घेऊन एकत्र येत होत्या. एक, गंगेला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करा आणि दुसरं, गंगेचा प्रवाह धरणं आणि बांधारे मुक्त करा”. रामदेवनं संधी साधली आणि आणि आंदोलनाला पतंजली योगपीठाचं व्यासपीठ आणि आस्थाचं प्रचारमध्यम देऊ केलं. अशोक त्रिपाठी पुढं म्हणतात, “सर्व भागधारक, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी, वैज्ञानिक, नेते, आणि पर्यावरणवादी या बैठकीला उपस्थित होते. बैठक साडेतीन तास चालली. जवळपास पूर्ण वेळ रामदेवच बोलत राहिले आणि ‘गंगा रक्षा मंच’ चे स्वयंघोषित convener बनले. मी अशोक सिंघल यांना म्हणालो, ‘रामदेवनं आंदोलन हायजॅक केलं!’ ”

रामदेवनं गंगेला राष्ट्रीय नदी घोषित करण्यावर भर देत धारणांवर भाष्य न करून स्वतःची राजकीय जाणीव जागृत असल्याची चुणूक दाखवली. २००८ मध्ये रामदेव डॉ मनमोहनसिंह यांना भेटले आणि गंगेला राष्ट्रीय नदी घोषित करवून घेतलं. रामदेवच्या साह्यानं काँग्रेसला वि हिं प वर मात करता आली. (रामसेतू मामल्यात काँग्रेस ला मात खावी लागली होती). असं, तबला डगग्यावर हात मारणं रामदेवच जमवू शकतात.

तिकडे आस्था ताब्यात घेतल्यावर रामदेवनं २०१० मध्ये संस्कार चॅनलही ताब्यात घेतलं. जानेवारी २०१० मध्ये पतंजली फूड पार्क सुरू झालं, ज्यावर पूर्णपणे बालकृष्णचा कब्जा होता. त्यापूर्वी २००७ ऑक्टोबर मध्येच बालकृष्ण हा ‘पतंजली आयुर्वेदा’चा मॅनेजिंग डायरेक्टर नियुक्त केला गेला(तरी त्याला पगार घेण्याचा अधिकार नव्हता), तेव्हापासूनच रामदेवचा भाऊ रामभरत त्याचा दुस्वास करत होता. रामभरत आणि बालकृष्ण परक्या शत्रूच्या विरोधात मात्र सहज एकत्र येत होते. आता त्यांना एकत्र आणणारी व्यक्ती होती-राजीव दिक्षित- भारत स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव. राजीव हे बालकृष्ण आणि रामभरत पेक्षा अधिक शिक्षित आणि चांगले वक्ते होते. रामदेवच्या राजकीय भविष्याला तेच आकार देणार होते. राजीव दिक्षित चं पतंजली साम्राज्यातलं महत्व वाढणं रामभरत आणि बालकृष्णच नाही तर रामदेवच्या इतर नातेवाईकांना देखील धोक्याचं वाटत होतं. यशदेव शास्त्री या रामदेवच्या जावयानं चॅनलवर दिक्षितला जास्त वेळ प्रक्षेपित करण्यावरून रामदेवला म्हटलं ‘लोक तुम्हाला विसरून जातील आणि दिक्षितच्याच मागं लागतील.’ दिक्षितांच्या जुन्या नाराज सहकाऱयांपैकी कुणी दिक्षितांचे आणखी काही घोटाळे सांगू शकतील का त्याची चाचपणी रामभरतनी करून पहिली. तरीही ठरल्याप्रमाणं मार्च २०१० मध्ये दिक्षितांच्या सल्ल्यानुसार रामदेवनं भारत स्वाभिमान पक्ष काढला. आणि ३०नोव्हेंबर २०१० ला दिक्षितांच्या त्रेचाळीसाव्या वाढदिवशी त्यांचा गूढ मृत्यू झाला.

सौजन्य – बहुजन संघर्ष

अनुवाद – प्रज्वला तट्टे

Previous articleअंतिम शब्द विज्ञानाचा असला पाहिजे
Next articleटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.