राईज अँड फॉल ऑफ अजित पवार

-विजय चोरमारे

‘राजकारणाचा प्रपंच करताना दुसऱ्याचं अंतःकरण जाणावं लागतं. अडचणीत न सापडण्याची खबरदारी घ्यावी लागते. समय ओळखावा लागतो. प्रसंगी नम्र व्हावे लागते. लोकांची पारख करावी लागते. प्रामाणिक आणि फितूर, दोन्ही गृहीत धरावी लागतात. दोष आढळला, तर तो अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडे काणाडोळा करावा लागतो. विरोधकांशी त्यांच्याच शस्त्राने लढावे लागते. तसे करणे कित्येकदा आवश्यकच असते. दूरदर्शीपणाने काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागते.’

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांनी मांडलेले हे चिंतन आहे. अजित पवार यांनी १४ एप्रिल २०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कराड येथे यशवंतरावांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश उपोषण केले होते. त्याबरोबरच त्यांनी यशवंतराव समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, दुर्दैवाने त्यांनी तो केला नसावा त्याचमुळे सहा वर्षांनी पुन्हा त्यांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन अश्रू ढाळायची वेळ आली. कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागायची वेळ आली. त्याचाही काही उपयोग होणार नाही, कारण जे निसटायचे ते निसटून गेले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे व्हायचे ते नुकसानही होऊन गेले आहे.
अजित पवार यांच्या राइज अँड फॉलचा विचार करताना नांदेडच्या सभेपाशी जावे लागते. जिथे भर सभेत त्यांना प्रश्न विचारणाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कॅमेरे वळले, तेव्हा त्यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतले. माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी दंडुक्याची भाषा वापरली आणि त्यांचा शब्द प्रमाण मानून उपस्थित पोलिस अधिकाऱ्याने संबंधित पत्रकाराला सभेतून बाहेर नेले. त्यानंतर पत्रकार संघटनांनी अजित पवार यांच्यावर बहिष्काराचे अस्त्र उपसले. त्याचवेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बहिष्कार घालण्याचा आततायीपणा केला. दोघांनीही या बहिष्काराला किंमत दिली नाही. शेवटी शरद पवार यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकला होता.

इस्लामपूरजवळच्या एका सभेत चौदा वर्षांपूर्वी अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांना तंबाखू खाण्यावरून झापले होते आणि त्यानंतर चार दिवस प्रसारमाध्यमांनी गोंधळ घातला होता. त्यावर ‘अजित पवार हे आपले बंधुतुल्य मित्र आहेत आणि त्यांना तसे बोलण्याचा अधिकार आहे’, असे आर. आर. पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आणि विषयावर पडदा टाकला. त्याचवेळी आर. आर. पाटील यांनी, ‘चौकटीच्या बातमीची हेडलाइन होऊ लागल्यामुळे गोंधळ वाढतोय ’, अशी टिपणी केली होती आणि ती प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरुपावर बोट ठेवणारी होती. त्याचीच पुनरावृत्ती दहा वर्षांपूर्वी झाली. तासगावमध्ये तासगाव अर्बन बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी गाव आणि तालुकापातळीवर राजकारणासंदर्भात बोलताना टगेगिरीचा उल्लेख केला होता. ‘एकवेळ आमदार-खासदार म्हणून निवडून येणे सोपे असते; मात्र, तालुका पातळीवर निवडून येण्यासाठी खूप काही करावे लागते. त्यासाठी गावाने ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी तालुका पातळीवर निवडून आलो आहे… त्याअर्थी मीही टग्याच आहे…’ असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील समारंभात गमतीने केलेल्या या विधानावर कॅमेरे लावून बसलेल्या नैतिक पोलिसांनी गहजब केला आणि त्यानंतर तमाम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अजित पवारांच्या कोणत्याही कृतीसाठी ‘टगेगिरी’ हे विशेषण कायमचे जोडून टाकले.

इंदापूर तालुक्यातील निंबोळीच्या सभेतल्या धरणासंदर्भातील वक्तव्याचेही तसेच झाले. गावाकडच्या सभेत विनोद करण्याच्या भरात तिथे अजित पवार घसरले आणि भलतेच बोलून गेले. (इंदापूरच्या त्यांच्या परममित्रांनी त्या भाषणाची क्लिप बुलेटट्रेनच्या वेगाने मुंबईत वृत्तवाहिन्यांना पोहोचवल्याचा इतिहासही सर्वज्ञात आहे.) अजित पवार यांचे ते वक्तव्य राज्यकर्त्याला शोभा देणारे नव्हते, परंतु चूक लक्षात आल्यानंतर तीनदा माफी मागूनही अनेकांचे समाधान झाले नाही. पंचवीस वर्षे सार्वजनिक जीवनात असलेल्या एका नेत्याची संपूर्ण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलल्यासारखी प्रसारमाध्यमे कामाला लागली. प्रसारमाध्यमांतील शहरी मानसिकतेच्या विशिष्ट वर्गातील मंडळींनी कोंडीत पकडून त्यांना जेरीस आणले होते. अजित पवार यांनीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तमाम नेत्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ‘टवाळा आवडे विनोद’ अशी धारणा असलेले रामदासांचे अनुयायी नैतिक पोलिस बनून सगळीकडे लक्ष ठेवून आहेत, तेव्हा बोलताना, उदाहरणे देताना किंवा विनोद करताना खूप काळजी घ्यायला हवी.

अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीतला ऐतिहासिक निर्णय म्हणजे पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचा. अजित पवार होते म्हणूनच हा निर्णय अंमलात आणू शकले, दुसऱ्या कुठल्या नेत्याला ते शक्य नव्हते. या कृतीमुळे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक प्रदूषित पान कायमचे फाडून टाकले. शिवरायांच्या बदनामीची कुजबूज संपवून टाकली. परंतु हाच निर्णय अनेकाच्या जिव्हारी लागला आणि अजित पवार प्रसारमाध्यमांच्या हिटलिस्टवर आले. दुर्दैव म्हणजे ज्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी हे धाडसी पाऊल उचलले ते सगळे लोक मात्र अडचणीच्या काळात अजित पवार यांच्यामागे उभे राहिले नाहीत.

यशवंतराव चव्हाण यांनी वेळोवेळी विविध घटकांसाठी काही ना काही सांगितले आहे. राजकारणासंबंधी त्यांनी म्हटले आहे, ‘राजकारणामध्ये यशस्वी होणे एक कष्टसाध्य काम आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचे जाळे विणावे लागते, माणसे सांभाळावी लागतात, वाढवावी लागतात व त्यासाठी असंख्यांच्या मनाची जपणूक वर्षानुवर्ष करावी लागते. पण त्यांतले काही थोडे, पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाचा फणा उभारतात. (चिंतन – माझ्या आयुष्यातील आशा-निराशेचे क्षण)

नेता आणि नेतृत्वासंदर्भात यशवंतरावांनी म्हटले आहे, ‘नेता असणाऱ्याला, नेतृत्व करणाऱ्याला सर्वांच्या अग्रभागी, शिरोभागी राहावे लागते, पण ते श्रेणीने – सर्वांच्या शिरोभागी म्हणजे प्रत्यक्ष डोक्यावर नव्हे. तसा तो डोक्यावर बसून राहिला, तर त्याला ज्यांचे नेतृत्व करावयाचे आहे, त्यांच्या भावना, आशा-आकांक्षा स्वभावातःच तो पायदळी तुडवू लागतो. असे घडले, म्हणजे त्या नेत्याबद्दलचा, नेतृत्वाबद्दलचा आदर संपुष्टात येतो. इतकेच नव्हे, तर ते नेतृत्वही संपुष्टात येते. ज्याला नेतृत्व करावयाचे आहे, त्याने अशी काही पथ्ये पाळली पाहिजेत. (चिंतन – जीवनाचे पंचामृत)
यशवंतरावही माणूस होते. त्यांच्याकडेही राग-लोभ-संताप वगैरे भावना होत्या. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केलेल्या यशवंतरावांनाही आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागली. तशा भावना त्यांनी अपवादानेच व्यक्त केल्या. मात्र एकदा एका जाहीर समारंभात ते म्हणाले होते, ‘महाराष्ट्रामध्ये मी माकडांची माणसं बनवली, माणसांचे सरदार बनवले, त्यांच्या हातात सहकार, पंचायतराज व्यवस्था या साधनांच्या तलवारी दिल्या आणि त्याच तलवारी घेऊन ते माझ्यावर वार करायला निघाले आहेत.’

यशवंतरावांचे हे वाक्य कानामात्रावेलांटीउकार आणि विरामचिन्हेसुद्धा न बदलता आज जसेच्या तसे शरद पवार यांच्याही तोंडी शोभू शकेल. परंतु अजित पवार यांच्या तोंडी ते शोभणार नाही. कारण शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर अनेक संस्था उभ्या केल्या आहेत, अनेकांना बळ दिले आहे. कठिणातील कठीण परिस्थितीवर अनेकदा मात केली आहे. शून्यातून पुन्हा सगळे उभे केले आहे. अजित पवार यांच्या कारकीर्दीत उत्कर्ष आहे तो सत्तेत असताना मिळत गेलेल्या पदांचा. बाकी सगळा उतारच आहे. सत्ता होती, तोवर त्यांचे कर्तृत्व दिसून येत होते, सत्ता गेल्यानंतर ते निष्प्रभ झाले. गेलेली सत्ता मिळवण्यासाठी आपले कौशल्य, ताकद पणाला लावतानाही ते दिसले नाहीत. स्वत:वरील आरोपांचा प्रतिवादही आक्रमकपणे करू शकले नाहीत. नेता दबंग असला तरच कार्यकर्ते त्याच्यामागे उभे राहात असतात, परंतु अजित पवार यांची दबंगगिरी सत्तेच्या बळावर चालली होती. विरोधात ते नेहमी सत्तेच्या दहशतीखाली राहिले. सत्ताधाऱ्यांनीही त्याचा फायदा उचलून आपली मुळे घट्ट रोवताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक फांद्या छाटून टाकल्या. अजित पवार यांनी थोडे दक्षिणेकडे वळून जगनमोहन रेड्डीकडे पाहिले असते तरी जनमताच्या जोरावर सत्तेला कसे भिडायचे असते, हे त्यांना कळले असते. परंतु ते मैदानातच उतरले नाहीत, त्यामुळे पाठीमागची गर्दी ओसरत गेली. निवडणुकीच्या तोंडावर ती पुन्हा गोळा करण्यासाठी एकोणऐंशी वर्षांच्या शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले!

शरद पवार यांच्या वयाचा विचार करता पुढच्या निवडणुकीत ते आतासारखे सक्रीयपणे प्रचारात फिरू शकतील की नाही याबाबत शंका वाटल्यावाचून राहात नाही. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे खंबीर नेतृत्वाचा पर्याय असावयास हवा होता. तो पर्याय अजित पवार हेच असतील असे सात-आठ वर्षांपूर्वी वाटत होते, परंतु त्यांच्या राजकारणाची घसरण पाहता आज तसे म्हणणे धाडसाचे ठरेल. अजित पवार यांना खरोखर भविष्यात पक्षाचे नेतृत्व करावयाचे असेल तर स्वकर्तृत्वाने सिद्ध करावे लागेल. आणि हे सिद्ध करण्यासाठी संघटना बांधणी आणि निवडणुकीतील यश याव्यतिरिक्त तिसरा कुठलाही पर्याय नाही. रुसवे फुगवे करून हट्ट पुरवून घेता येतात, नेता बनता येत नाही!

(लेखक ‘महाराष्ट टाइम्स’ चे सहायक संपादक आहेत)

95949 99456

Previous articleगांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना
Next articleसांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्रात मुस्कटदाबी-अरुणा सबाने
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.