रावसाहेबांची कवचकुंडलं गेली!

महाभारतात कर्णाची व्यक्तिरेखा मोठी औत्सुक्यपूर्ण आहे. त्याला असलेली कवचकुंडलं, त्यामुळे त्याला मिळणारी सुरक्षितता, त्याचा पराक्रम याविषयात अनेक वेगवेगळ्या दंतकथा रचण्यात आल्या आहेत. कौरव-पांडवांच्या निर्णायक लढाईत श्रीकृष्ण चातुर्याने कर्णाची ही कवचकुंडलं काढून घेतो, तेव्हा तो एकदम निष्प्रभ, निस्तेज होऊन जातो. पराभूतही होतो. ती कवचकुंडलं हीच त्याची खरी ताकद असते. खरं तर पुराण्यातल्या कथा पुराणात ठेवायच्या असतात, पण ही कथा आता एकदम आठवायचं कारण म्हणजे, अमरावतीचे आमदार मावळत्या राष्ट्रपतींचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांची कवचकुंडलं आता गेली आहेत. प्रतिभाताईंचं राष्ट्रपतीपद हे रावसाहेबांसाठी कवचकुंडलं होतं. आता हे कवचकुंडलं बाजूला झाल्याने आगामी काळात रावसाहेब कसं काम करतात, याकडे सार्‍यांचं लक्ष असणार आहे. रावसाहेबांची आमदारकी आणि गेल्या पाऊनेतीन वर्षातील त्यांची कामगिरी यामागे प्रतिभाताई होत्या हे त्यांच्यासहित कोणालाही नाकारता येणार नाही. आता त्यांचा कार्यकाळ संपल्याने रावसाहेबांना इतर आमदारांच्या तुलनेत मिळणारी वेगळी वागणूक, प्राधान्य आणि बाकी सार्‍याच गोष्टी संपणार आहेत. देशातील सर्वोच्च सत्तास्थानाच्या सुरक्षित तटबंदीतून रावसाहेबांना आता खुल्या मैदानात यावे लागणार आहे. येथे त्यांचा खरा कस लागणार आहे.

दुसर्‍या शब्दात सांगायचं झाल्यास रावसाहेबांच्या खर्‍या परीक्षेला आता सुरूवात होणार आहे. पाऊणेतीन वर्षापूर्वी प्रतिभाताईंच्या जोरावर सुनील देशमुखांसारख्या तेव्हाच्या ताकदवर मंर्त्याला राजकारणातून उठवून रावसाहेब आमदारकी मिळविण्यात यशस्वी झाले होते. कॉंग्रेसमधील काही अतृप्त आत्म्यांनी दिल्लीच्या प्रभावाचा पुरेपूर वापर करीत, साम, दाम अशा सर्व साधनांचा वापर करत रावसाहेबांची अमरावतीच्या आमदारपदावर तेव्हा प्रतिष्ठापना केली होती. सुनील देशमुखांनी राजकारणात ज्यांना- ज्यांना दुखावले त्या सार्‍यांनी एकत्रित येऊन आपले हिशेब तेव्हा चुकते केले होते. या सार्‍या घटनाक्रमानंतर बरंच पाणी वाहून गेलं आहे. आमदार झाल्यानंतर रावसाहेबांनी आपल्यापरीने बरंच काही करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या पाऊनेतीन वर्षातील त्यांच्या कारकिर्दीचं बारकाईने अवलोकनं केलं, तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे, राजकारण हा मुळात रावसाहेबांचा पिंड नाही. एक सरळसाधा, कुटुंबात रमणारा, आपलं काम बरं आणि आपण बरं या वृत्तीने वागणारा हा माणूस आहे. 24 तास केवळ राजकारण आणि राजकारण हे काही त्यांना साधत नाही. चेले-चपाटयांच्या सल्ल्याने त्यांनी स्वत:त बरेच बदल केले असले तरी कायम माणसांनी घेरून राहणं, सुमार लोकांच्या अवाजवी मागण्यांसमोर झुकणं, नियमात न बसणार्‍या कामांसाठी शब्द टाकणं, नको तिथे नको त्या तडजोडी करणं या गोष्टी त्यांना फार रूचत नाही. मात्र सुनील देशमुखांची भिती दाखवून त्यांच्या भोवतालची मंडळी त्यांना हे असं करावंच लागतं, हे कायम पटवून देत असतात. नाईलाजाने ते हे सारं करतातही, पण तो जबरदस्तीचा रामराम आहे, हे लक्षात येतं.

आता मात्र त्यांना बर्‍यापैकी बदलावं लागणार आहे. राजकारणातलं आपलं स्थान केवळ आईच्या जोरावर नाही, हे सिध्द करण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. माणसं ओळखणं हे सुध्दा त्यांना शिकावे लागणार आहे. याविषयात त्यांचा रेकॉर्ड काही फार चांगला नाही. त्यांच्या जवळची मंडळी कायम बदलत असतात. सुरूवातीला विश्वासराव देशमुखांशिवाय त्यांचं पान हलत नव्हतं. मात्र वर्षभरातच त्यांनी विश्वासरावांची शहर कॉंग्रेस अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. त्याची खरी कारण अजूनही कळली नाहीत. विश्वासरावांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्यासाठी मेहनत केलेली बरीच मंडळी पुढे गायब झाली. नंतर वसंतराव साऊरकर आले. याशिवाय संजय वाघ, अनंत अत्रे, किशोर बोरकर, संजय अकर्ते ही मंडळी त्यांच्या सभोवताल असायची. ही कधी जवळ असतात. कधी दूर जातात. घरचे असल्याने बबलू शेखावतांचं स्थान तेवढं स्थिर असतं. अलीकडे विलास इंगोलेंशिवाय त्यांचं पान हलत नाही.

या सार्‍या प्रकारात त्यांनी अनेक कार्यकर्ते नाराज करून ठेवले आहेत. संधी मिळतील तेव्हा ते सारे फणा काढतील. राजकारणात तसेही माणसं आपल्या निष्ठा बदलवायला वेळ लावत नाही. रावसाहेबांनी बारकाईने अवलोकन केलं, तर त्यांच्या लक्षात येईल की, सुनील देशमुखांजवळ सत्ता असताना, त्यांच्याजवळ जी माणसं होती, त्यापैकी अनेक माणसं आज त्यांच्याभोवती आहे. या अशा माणसांची निष्ठा ही सत्तेसोबत, खुर्चीसोबत असते. खुर्चीवरचा माणूस बदलला की, हे लगेच नवीन माणसांना चिपकायला मोकळे असतात. रावसाहेबांना राजकारणात लॉंग इनिंग खेळायची असेल, तर ही अशी माणसं त्यांना ओळखता यायला हवी.

माणसांची योग्य पारख करण्यासोबत आता त्यांना कामाचा झपाटाही वाढवावा लागणार आहे. पाच-सहा रेल्वे गाडय़ा व दोन-चार प्रकल्पांची पुण्याई पाच वर्ष पुरत नाही. आता प्रतिभाताई पदावरून दूर गेल्यानंतर रावसाहेब काय करतात, याकडे जनता बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. आतापर्यंत राष्ट्रपतीपुत्र या बिरूदामुळे दिल्ली-मुंबईत त्यांच्या फाईली वेगात सरकत असे. आता खेटे घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. अधून-मधून कोटय़वधी रूपयांचे आकडे फेकून आम्ही अमुक विकासकामं केली, हे सांगणं सोपं आहे. प्रत्यक्षात अमरावती शहराचा ताल बिघडत आहे. शहराचं रंगरूप उतरत आहे. अमरावती महापालिकेचा नाकर्तेपणा रावसाहेबांना भारी पडू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. लोक शेवटी तुलना करतात. आज पालिकेजवळ साधे खड्डे बुजवायला पैसे नाही. कर्मचार्‍यांचे पगार नियमित नाही. रावसाहेबांना यात जातीने लक्ष द्यावं लागणार आहे. पैसे नाहीत, हे कारण लोक ऐकणार नाहीत. यापुढे त्यांना अनेक आघाडयांवर लढावे लागणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा सामनाही करावा लागणार आहे. वीरेंद्र जगताप व यशोमती ठाकूर यांच्यासोबत त्यांचे संबंध फार सौख्याचे नाहीत. सुनील देशमुखांचीही कॉंग्रेसमध्ये कोणत्याही क्षणी एन्ट्री होऊ शकते. त्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम आणखी वाढणार आहे. हे सारे दबाब आणि आव्हानांचा ते कसा सामना करतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत.)

मो.8888744796

Previous articleशेतकर्‍यांचं पाणी उद्योजकांना विकलं, हे जनतेला कळू द्या!
Next articleप्रतिभाताईंच्या खात्यात वजाबाकीच अधिक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here