राहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा!

-माणिक बालाजी मुंढे

  एक चॅनल सकाळी 9 वाजता एक बातमी चालवतं आणि त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी बांद्र्यात अमराठी भाषिकांची प्रचंड मोठी गर्दी जमते हा मला चमत्कार वाटतो. कारण अण्णा हजारेंचं आंदोलन ऐन भरात असताना आणि देशभर त्यांना गांधी गांधी असा त्यांचा जयघोष होत असतानाही मुंबईत चिमुटभरही गर्दी त्यांना जमली नव्हती. एबीपी माझाच्या एका बातमीनं तशी जमली असेल तर हे त्यांचं केवढं मोठं यश म्हणावे लागेल. बरं ही गर्दी मराठी नाही तर अमराठी लोकांची जमली, म्हणजे मुंबईतले अमराठीही आता मराठी चॅनल्स बघतायत असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या चॅनलचं याच्यासारखं दुसरं यशच असू शकत नाही. आम्हा मराठी चॅनलवाल्यांसाठी आणखी थोडं अवकाश मोठं करायला वाव आहे म्हणायचा.

त्याच्यासाठी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा कारण हिंदी भाषिकांना समजवण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना मराठी बोलता बोलता काल हिंदीत बोलावं लागलं होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते राहुल कुलकर्णीं करून दाखवलं. हिंदी भाषिकही ज्याची बातमी समजू शकतात असे किती पत्रकार आहेत महाराष्ट्रात?

बांद्र्यातल्या गर्दीसाठी आज जरी राहुल कुलकर्णींच्या रूपानं गृहमंत्री अनिल देशमुखांसह सरकारला तोंड लपवण्यासाठी जागा मिळाली असली तरी काही प्रश्न त्यांचा पिछा सोडणार नाहीत. बांद्र्यातली गर्दी ही काही मजुरांची नसल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंच आहे. मग ही आगलावी गर्दी जमवली कुणी ? उद्धव ठाकरेंचं यश मिळवत असलेलं नेतृत्व कुणाच्या डोळ्यात खुपतंय याचा शोध खुद्द त्यांनीच घ्यायचाय. वाधवानचं प्रकरण आणि बांद्र्याची गर्दी हा योगायोग नक्कीच नाही. राहुलनं जी मुळ बातमी दिली त्याच्यात कुठलीच चूक नाही. तिच्या सादरीकरणावर मात्र वाद होऊ शकतो. काल रात्री माझं त्याच्याशी बोलणं झालं तर त्याला मी एकच प्रश्न विचारला. तू ज्या पत्राच्या हवाल्यानं बातमी दिलायस तर ते खरं आहे की खोटं? तो म्हणाला खरंय. रेल्वेनेही नंतर ते मान्य केलं की पत्र खरं असून आमच्या अंतर्गत कम्युनिकेशनचा तो भाग आहे. मग पुराव्यासहीत बातमी असेल तर द्यायची नाही ?

त्याच रेल्वेच्या पत्रावर आज दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं आणि तेच महाराष्ट्रातलं काँग्रेस सरकार राहुलला सकाळी सकाळी त्याच्या उस्मानाबादच्या घरातून आहे त्या कपड्यावर ताब्यात घेतं, त्याचा फोन बंद करतं, घरातल्यांशी बोलू देत नाही, त्याला डायबीटीज, ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्याचे औषधं घेऊ देत नाही आणि थेट व्हॅनमध्ये बसवून मुंबईला आणतं(राहुलच्या पत्नीनं रितसर उस्मानाबाद एसपींना जी तक्रार केलीय त्यात हा मजकूर आहे) एवढी तत्परता ज्या वाधवान बंधूंनी लोकांना कोट्यावधींना लुटलं ते मुंबईतून साताऱ्याला गेले त्यांच्याबद्दल का नाही दाखवली? त्यांना मुंबईत आणताना कोरोना होऊ शकतो तर मग हायरिस्क असलेल्या राहुल कुलकर्णींना नाही का होणार ? म्हणजे ज्यानं खरी बातमी दिली त्याला अतिरेक्यासारखी वागणूक देणार आणि ज्यांनी लोकांना लुटलं त्यांना पंचतारांकित?

बरं एक वेळेस असं आपण मानू की, राहुलची बातमी पूर्णपणे चुकली तरी पण त्याच्या एका बातमीनं बांद्र्याचा गोंधळ झाला हे कसं मानणार ? त्याची बातमी चुकीची होती तर कालपर्यंत रेल्वेनं 39 लाख तिकिट बूक केले ते काय खार घालण्यासाठी होते ? बातमी चुकीची असेल तर त्याला नोटीस पाठवा, चौकशी करा, चॅनलच्या संपादकांना नोटीस पाठवा, त्याची कसलीच सत्यता न करता थेट अटक करून मुंबईत आणणार ? तेही ऐन कोरोनाचा कहर सुरु असताना? ही दमनशाहीची नवी सुरुवात म्हणायची ?

राहुल तुही कुठल्या तरी अमिताभ गुप्ताचं लेटर सोबत ठेवायला हवा होतास. एक पत्रकार म्हणून मला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. बरं झालं तुला अटक झाली, कारण यामुळे तू आणि तुझी बातमीदारी दोन्ही चकाकून निघाली. भाजपच्या सरकारमध्ये माध्ममांची गळचेपी होत होती आणि आघाडीचं सरकार हक्काचं स्वातंत्र्य देईल हा विश्वासही लोकांचा आज तुटला असणार. गेल्या बारा तेरा वर्षापासून आपण सोबत आहोत, पुढेही राहू. तुझी बातम्यांबद्दलची तडफ अशीच कायम राहो. तुझ्या बातमीदारीतल्या सातत्याबद्दल तर मला हेवा वाटतो. तो कायम राहो.

(लेखक टीव्ही 9 मराठीचे कार्यकारी संपादक असून त्यांच्या ह्या भूमिकेचा चॅनलशी काही संबंध नाही)

Previous articleजगातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक
Next articleकाळ तर मोठा कठीण आला…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.