रेड लाईट डायरीज

– समीर गायकवाड

१८ ऑक्टोबर २०१२ च्या रात्री बेंगळुरूच्या अलिशान कसिनो रोयाल बार अँड रेस्टोरंटमधून आठ बारटेंडर मुली आपली ड्युटी संपवून बेंगळुरूपासून तीस किमी अंतरावरील बिडादी या उपनगरवजा गावाकडे परतत होत्या. यातल्या तीन मुली बारमधील ऑर्केस्ट्रासाठी हेल्परचं कामही करत होत्या. बिडादीमध्ये त्यांनी भाड्याने एक घर घेतलं होतं ज्यात त्या सगळ्याजणी मिळून राहत होत्या. हॉटेल ते घर हा चाळीस मिनिटांचा प्रवास होता. रात्री एकच्या सुमारास त्या आपल्या घरी पोहोचल्या. दिवसभरच्या श्रमाने त्या थकून गेल्या असल्याने त्या छोट्याशा प्रवासादरम्यान त्यांच्या लक्षात आलं नाही की एक मारुती व्हॅन त्यांचा मागोवा घेत काही अंतर राखून पाठलाग करत होती. कसिनो बारपासूनच नऊ नराधम या व्हॅनमधून त्यांच्या मागोमाग आले होते. मुली घरात शिरताच त्यांनी नेमक्या त्या तीन मुली हेरल्या आणि कुणाला काही उमजण्याआधी त्यांना दुसऱ्या एका गाडीत कोंबून ते शहराच्या उत्तरेस वेगाने निघाले. त्यांनी मुलींना नेण्यासाठी सोबत खास स्वतंत्र स्कॉर्पिओ आणली होती. आपल्याला कुठं आणि का नेलं जातंय हे त्या भेदरलेल्या मुलींना कळत नव्हतं. साधारण रात्री दीड ते पाऊणेदोनच्या सुमारास एका सुनसान जागी त्यांनी मुलींना गाडीतून खाली उतरवण्यात आलं. त्यांनी आधी त्यांचे सगळे कपडे उतरवले आणि आपल्यातला हिंस्त्र पशू मोकाट सोडला. त्या तिन्ही मुलींवर त्या नऊ जणांनी आळीपाळीने बलात्कार केले. तब्बल दोन तास त्यांच्यावर जबरदस्ती झाली. विशेष म्हणजे या नऊ जणापैकी दोघं सोडता उरलेले सर्वजण शुद्धीत होते. अत्याचार झालेल्या तीनही मुलींचे वय अठरा ते वीसच्या दरम्यानचे होते. त्या तिघीही देखण्या आकर्षक तरुणी होत्या. आपला कार्यभाग उरकल्यानंतर या मुलींच्या तोंडात बोळे कोंबून आणि हातपाय बांधून निर्वस्त्र अवस्थेतच तिथेच सोडून देऊन ते सगळेजण बेंगळूरूच्या दिशेने रवाना झाले.

ही घटना नियोजनबद्ध होती. जिथे त्यांनी बलात्कार केला तो मारियाप्पनपाल्या नजीकचा भाग बेंगळूरू पोलिसांच्या कक्षेत न येता त्यांच्या सीमेवरचा होता. त्यामुळे ही घटना ग्रामीण पोलिसांकडे वर्ग झाली. विविध महिला संघटनांनी आणि मीडियाने आवाज उठवल्यामुळे नऊही आरोपी जेरबंद करता आले. तीन दिवसात सर्व आरोपी गजाआड झाले. चौदावे रत्न दाखवताच सगळी माहिती बाहेर पडली आणि महत्वाचा आरोपी पोलिसांच्या कब्जात आला. शांतव्वाला पोलिसांनी अटक केली आणि कोडं सुटलं. बेंगळुरू ते बिडादी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची आरॊपींची ओळख पटवण्यात मदत झाली. रामेश्वर हा या सर्व प्रकरणाचा म्होरक्या होता. मुली ज्या हॉटेलमध्ये काम करत होत्या आणि जिथं राहत होत्या त्या जागांची रेकी शांतव्वाने रामेश्वरच्या सांगण्यावरून केली होती आणि तिच्याच फूस लावण्यावरून त्यांनी बलात्कार केला होता. बलात्कारित मुलींना धंद्याला लावण्याचे नामी कसब तिच्याकडे होते. पुढे जाऊन वाईट गोष्ट अशी झाली की बलात्कार झालेल्या तीन मुलींतील एक मुलगी साधना ही खरोखरच सेक्सवर्कींगच्या दलदलीत फसली. २०१५ च्या सुमारास ती नाईलाजाने धंद्यात आली.

या काळा दरम्यान बलात्काराच्या खटल्याची सुनावणी पुरी झाली आणि आरोपींना वेगवेगळ्या कालमर्यादेची सक्तमजुरीची सजा सुनावली गेली. आरोपीपैकी म्होरक्या असलेला रामेश्वर रेड्डी जेलमध्ये जाताच त्याचं घर कोलमडूल गेलं. त्यांनं अनेकांना सतावलं होतं त्या सर्वांची त्याच्या घरावर बरीवाईट नजर होती. त्यांनी बरोबर वचपा काढला. यातून ज्याची भीती होती तेच घडलं. त्याचं अख्खं कुटुंब देशोधडीला लागलं. त्याच्या बायकोपोरींवर कर्जाचा डोंगर चढला. २०१७ च्या दिवाळीत व्याजाचे पैसे चुकवण्यासाठी त्याची मुलगी स्वाती हिला चेन्नैतील एका दलालास विकलं गेलं. तिचं ‘पान फिरवत’ तिची रवानगी चेन्नै, मेडक, मंगलोर, बंगलोर येथून मजल दरमजल करत हैदराबादजवळील मेडीपली येथे झाली. धंदयात आलेली रामेश्वरची मुलगी स्वाती आणि बिडादीमधली बलात्कार पिडीत अभागी मुलगी साधना जी या नरकात खोल रुतली होती त्या दोघींची भेट मेडीपली या छोट्याशा गावात धंद्याच्या निमित्तानेच पण योगायोगाने झाली. स्वातीने आपली सगळी हकीकत तिला सांगितली. काही क्षण साधनाला काय वाटलं असेल याचा कोणताच अंदाज बांधता येत नाही. मग साधनाने तिला आपली हकीकत सांगितली आणि आपल्या दुर्दशेस स्वातीचा बापच कारणीभूत आहे हे ही तिला सांगितलं. बराच वेळ त्या दोघी निशब्द बसून होत्या. यावेळी त्या दोघींच्या मनात कोणकोणते विचार आले असतील हे शब्दात मांडता येणं अशक्य आहे. आपल्या स्वावलंबी आयुष्याचं मातेरं झालेल्या साधनाला स्वातीची दया आली तिने सेक्सवर्कर्स आणि ट्रान्सजेंडर्ससाठी काम करणाऱ्या मल्लिकाशी संपर्क साधला. अवघ्या काही दिवसात मल्लिकाने स्वातीची सुटका केली. स्वाती घरी परतली. स्वातीच्या आईने स्वाती परतताच गाव सोडलं, घर सोडलं आणि विजाग(विशाखापट्टणम) येथे ते कुटुंब स्थायिक झालं.

बलात्कार पिडीत साधनाला मात्र या धंद्यातून बाहेर पडायची इच्छा उरलेली नाही. किती तरी लक्ष (?) योनीचा तथाकथित प्रवास केल्यानंतर मिळणारा मनुष्यजन्म तिला नकोसा झालाय. आपल्या आयुष्याला कंटाळून जीव देणाऱ्यातली ती नाही उलट ती जमेल तितक्यांचा जीव वाचवणारी आहे. अगदी स्वतःवर बलात्कार करणाऱ्या अधम व्यक्तीच्या मुलीवर देखील तिने वत्सल दया भाव दाखवला. मनुष्यजन्म पुन्हा मिळालाच तर तो अयोनीचा मिळावा आणि जीवात जीव असेपर्यंत बाईच्या जातीवर लागलेला कलंक पुसून निघावा यासाठी आपण झटत राहावं इतक्याच काय त्या तिच्या इच्छा उरल्यात. साधनासारख्या बायका इन्फॉर्मरचं काम करतात म्हणून या धंद्यात येणाऱ्या बायकांची काही प्रमाणात का होईना सुटका होण्यास मदत होते, त्याचबरोबर स्वतः ट्रान्सजेंडर असलेली मल्लिका ही देखील खरेच ग्रेट आहे. तिने आजवर अनेक मुलींना या धंद्यातून बाहेर काढण्यास मदत केली आहे. मल्लिका नुसती नावाची नसून कामाची देखील आहे. तिच्यासोबतच्या मैत्रीचा अभिमान आहे.

या धंद्यात असलेल्या सर्वच बायका सारख्या नसतात, स्वतःला कुलीन म्हणवून घेणाऱ्या जिथे एकसारख्या नसतात तिथे या कशा काय समविचारी असू शकतील ? एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते हेच खरे. साधनासारखी बाई या जगात आहे म्हणून स्वातीसारखी मुलगी यातून बाहेर पडू शकली. रामेश्वरने केलेल्या पातकाबद्दल त्याला सजा देण्याचं निसर्ग न्यायाचं वर्तुळ पूर्ण झालं पण त्या वर्तुळामुळे उध्वस्त झालेले काही बिंदू नेटके रेखाटण्याची धमक साधनासारखी रेड लाईट एरियातली बाईच दाखवू शकते ! त्यासाठीही गट्स लागतात आणि जिगर लागतं..

(फोटो – स्वतःच्या बाईपणावर बेहद्द खुश असलेली मल्लिका)

 

-(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

8380973977

 

Previous articleसई ताम्हणकर : काळजात रुतून बसणारी सय
Next articleगांधी- आंबेडकर आणि पुणे करार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here